पहले आप, पहले आप
म्हणता म्हणता असे म्हणाले
लखनौचे दो भले नबाब
जर ही गाडी वाफेवरती
तोंडामधल्या धावत असते
कशास मग ती खालीपिली
वीज-कोळसा मागत असते?
सिस्टिमच ही सारी खराब
द्या घोषणा, हलवा झेंडे
धावेल मग ती आपोआप!
पहले आप, पहले आप..
०००
पहले आप, पहले आप
म्हणता म्हणता असे बोलले
लखनौचे दो भले नबाब
की कळकट सारे बरबटलेले
भ्रष्ट हात, मुख खरकटलेले
‘सर्फ’राज आपणच येथे
आपणच लाजवाब!
सवाल आम्हा करता तुम्ही?
शांत बसा चुपचाप!
पहले आप, पहले आप..
०००
पहले आप, पहले आप
म्हणता म्हणता असे दंगले
लखनौचे दो भले नबाब
की बघता बघता सुटली गाडी
पाटलुणीची तुटली नाडी
तमीज परी ना सुटली काही
म्हणती ऐसे : अजी जनाब!
भ्रष्टच होती, बरी तुटली
सुंठीवाचून गेला ताप!
पहले आप, पहले आप..
०००
पहले आप, पहले आप
म्हणता म्हणता असे भांडले
लखनौचे दो भले नबाब
जणू आझादीची दुजी लढाई
भरल्या फलाटी हातापायी
करता करता काढीत बसले
कसला कसला जुना हिसाब
हे तुझे स्टिंग, हे तुझे बिंग
हे तुझे पाप, हे तुझेच पाप..
पहले आप, पहले आप..
०००
पहले आप, पहले आप
म्हणता म्हणता भुलले झाले
लखनौचे दो भले नबाब
काही केल्या त्यांस कळेना
आप म्हणता हा कुठून आला
अहम् अहम्चा कुबट ओला वारा
त्याने गेला आब..
०००
पहले आप, पहले आप :
आपणच आपल्याला दिलेली
एक थाप!!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 15, 2015 3:32 am