वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांचं अमेरिकेत गाजलेलं सिंहावलोकन प्रदर्शन आता युरोपात.. व्हेनिसमध्ये भरलं आहे.. व्हेनिस हा या प्रदर्शनाचा अखेरचा पडाव. त्यानंतर ही चित्रं जिथून आली तिथं परत जातील. त्यामुळे काही हौशी भारतीय मुद्दाम व्हेनिसला जातीलच; पण गायतोंडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या चित्रांबद्दल अ-भारतीयांना- विशेषत: युरोपीयनांना काय वाटतं, हेही पाहायला हवं.. मराठी माणसाला ज्यांचा अभिमान वाटतो, त्या चित्रकारापासून हे लोक परके तर नाहीत ना? ओरिकेत न्यूयॉर्कच्या गुगेनहाइम संग्रहालयात वर्षभरापूर्वी  वासुदेव गायतोंडे यांच्या निवडक ४० चित्रांचं सिंहावलोकनी प्रदर्शन भरलं, तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स, अटलांटिक मॅगेझीन यांसारख्या दर्जेदार प्रकाशनांनी त्याची दखल घेतली होती. मराठीतही कौतुकाचा उत्साह ओसंडला होता. ते ठीकच, कारण आपल्या अमूर्तवादी (म्हणजे चित्रकलेच्या परिभाषेत, नॉनऑब्जेक्टिव्ह) चित्रकाराची एवढी मोठी दखल जगानं पहिल्यांदाच घेतली होती. याच संग्रहालयाची एक शाखा व्हेनिसला ‘पेगी गुगेनहाइम कलेक्शन’ म्हणून आहे, तिथं हेच प्रदर्शन परवाच्या  ३ ऑक्टोबरपासून सुरू झालं.

व्हेनिस हाच या प्रदर्शनाचा दुसरा आणि अखेरचा टप्पा आहे. म्हणजे आता कौतुक संपून, जग भारतीय अमूर्त चित्रांची दखल कशी- कोणत्या प्रकारे आणि किती गांभीर्यानं – घेतंय हे पुढल्या काही आठवडय़ांत कळेल. प्रदर्शनाचा पहिलाच दिवस गाठायचा म्हणून व्हेनिसला गेलो, तेव्हा ही दखल कशी घेतली जाणार याची थोडीफार कल्पना लोकांशी बोलल्यामुळे आली. आपल्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाचे दिल्लीकर संचालक राजीव लोचन किंवा मुंबईच्या जहांगीर निकल्सन चित्रसंग्रहाच्या कामिनी साहनी यांचा समावेश प्रदर्शनाच्या मार्गदर्शक समितीतच असल्यानं त्यांच्याशी बोललो नाही.

अमूर्तवादी कलेची दखल सध्या कमी घेतली जाते, या दुखऱ्या जागेवर पॅट्रिक कुन्चेन या तरुण जर्मन चित्रकारानं बोट ठेवलं. उद्घाटनाच्या पार्टीत त्यानं हिकमतीनं प्रवेश मिळवला होता आणि त्यामुळेच- ‘लाइफस्टाइलचा भाग’ म्हणून कलाप्रेम जपणाऱ्या अनेक निमंत्रितांपेक्षा पॅट्रिक वेगळा होता. अर्थात, असे वेगळे ठरणारे निमंत्रितही अनेक होते. गायतोंडे यांच्यावरची एकमेव फिल्म बनवून, या प्रदर्शनाला एकप्रकारे प्रेरणाच देणारा सुनील काळदातेसुद्धा पॅरिसहून खास आला होता. त्याची फिल्म पाहून व्हेनिसकरही चित्रप्रेमीही भारावलेत, हे त्यांच्यापकी दोघातिघांशी झालेल्या गप्पांतून जाणवत होतं. सुनीलला प्रदर्शनाबद्दल छेडल्यावर त्यानं आवर्जून सांगितलं : ब्रूस फ्रिश या न्यूयॉर्कवासी छायाचित्रकारानं १९६५ सालच्या जानेवारीत (गायतोंडे पाठय़वृत्तीवर तिथे गेले असताना) त्यांच्या एका चित्राची प्रक्रिया टिपलीय, ते फोटो फक्त व्हेनिसमध्येच प्रदíशत झालेत.

स्लाइड शो स्वरूपात, एकामागोमाग हे फोटो पाहताना पॅट्रिक शेजारीच होता. दोघेही गप्प. नंतरच्या बोलण्यात तो म्हणाला : आपल्या पिढीतले दृश्यकलावंत- अगदी परफॉर्मन्स करणारेसुद्धा- यांनी हे प्रदर्शन पाहायला हवं!

हो, एक प्रकारे, कलेतल्या वैचारिकतेच्या पहिल्या काही उद्गारांत अमूर्तीकरणवाद आणि नंतरचा अमूर्तवादी विचार यांचा समावेश आहेच. दृश्य आणि अर्थ या निरनिराळ्या संकल्पना आहेत, हा आजच्याही कलेतल्या वैचारिकतेचा गाभा आहे. पॅट्रिकचं म्हणणं तशा प्रकारे ऐकलं तर, आपणच पाडलेले कप्पे जरा खुले होतील.

प्रा. सेवेरीओ सिमि दे बर्जसि हे व्हेनिसच्या अकाडेमिया डि बेले आर्ट िया कला महाविद्यालयात कलेतिहासाचे प्राध्यापक. आधुनिक कलेविषयी त्यांचा अभ्यास आहे. ते या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्याही आधी झालेल्या खास प्रथमदर्शनाला (प्रिव्ह्य़ू) निमंत्रितांपकी एक होते. (हे प्रथमदर्शन पत्रकार परिषदेला जोडूनच असल्यानं पत्रकारांसाठी खुलं होतं.) भारतातल्या आधुनिक चित्रकारांबद्दलही तुमचा अभ्यास आहे का, असं विचारलं असता, विनयानं ते नाही म्हणाले. पण विनयानंच, कारण त्यांना हे माहीत होतं की, १९५० च्या दशकात भारतात अनेक आधुनिक चित्रकार होऊन गेले. हेही की, आशियातल्या नवचित्रकारांवर तेव्हा क्युबिझमचा प्रभाव अधिक होता आणि तो नाकारण्यासाठी आणखी अमूर्तीकरणाकडे जाणं सर्वानाच भाग होतं. या त्यांच्या निरीक्षणातला ‘सर्वानाच’ हा शब्द केवळ अमेरिकी वा युरोपीय चित्रकारांसाठी नसून अन्य आशियात देशांतले चित्रकार आणि गायतोंडे यांच्यासह काही भारतीय नवकलावंत यांना लागू पडणारा आहे. गायतोंडे यांच्याबद्दल, पत्रकार परिषदेत संधिनी पोद्दार म्हणाल्या होत्या की, गुगेनहाइम संग्रहालयात अन्य अमूर्तीकरणवादी तसंच अमूर्तवादी चित्रकारांच्या सान्निध्यात गायतोंडे यांची चित्रं पाहता येणं, हा कलेतिहासाकडे आपण कसं पाहतो, यातला एक टप्पा आहे. प्रत्यक्षात न्यूयॉर्कप्रमाणेच व्हेनिसलाही, गायतोंडे यांची चित्रं निराळ्या दालनांत आहेत- म्हणजे सान्निध्याचा टप्पा अद्याप यायचाय. हा आक्षेप मुंबईकर कलाभ्यासक सुमेश शर्मा यानं आधी नोंदवला होता.

गायतोंडे यांच्या चित्र प्रवासातले टप्पे अगदी लहान मुलालाही कळतील, अशी या प्रदर्शनाची रचना आहे. हा प्रवास १९५३ सालापासून सुरू होतो आणि १९९८च्या चित्रापाशी संपतो. म्हणजे गायतोंडे यांची चित्रं आधी कशी पॉल क्लीसारखी (पॉल क्ले किंवा क्ली : जर्मन चित्रकार ; १८७९ ते १९४०) होती आणि १९५७ नंतर कशी स्वतंत्र झाली, हे कुणालाही प्रदर्शन पाहिल्यावर कळतं. पण भल्याभल्यांना कळत नाही ते हे की, इथं जी चित्रं आहेत ती कशाची तरी नाहियेत. त्यांतून आपण कुठलेही- कसलेही आकार शोधायचे नाहियेत. उदाहरणार्थ, ‘कर्ोीएरे डेल व्हेनेटो’ या स्थानिक इटालियन दैनिकात (तीन ऑक्टोबरच्या अंकात) इसाबेला पान्फीदो या कलासमीक्षक बाईंनी लिहिलेला जो वृत्तलेख जवळपास पाऊण पानभर प्रसिद्ध झाला आहे, तो जर इंटरनेटवरला ‘ट्रान्सलेटर’ वापरून इंग्रजीत वाचला, तर पाचव्या परिच्छेदात चित्रांबद्दल रंगून सांगताना इसाबेला यांनी ‘अखेरच्या या चित्रात बायझंटाइन क्रूसासारखी किंवा रस्त्यातल्या चौकासारखी आकृती दिसते’ असं म्हटलं आहे. कबूल- अगदी कबूल की, या चित्रातून नेमकी याच आकारांची आठवण होणं अगदी साहजिक आहे. त्यातच, गायतोंडे हे झेन अध्यात्माकडे वळलेले होते आणि चित्रं रंगवण्याच्या क्रियेतून मुक्ती आणि समर्पण या दोहोंकडे जाण्याची त्यांची प्रवृत्ती होती, असं एकदा (पत्रकार परिषदेत) संधिनी पोद्दारबाईच म्हणाल्यात म्हणून, कुणा इटालियन चित्रसमीक्षिकेनं त्या म्हणण्याला स्वत:चं अध्यात्म जोडून बायझंटाइन क्रूसाची आठवण तिच्या वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे तर एरवी स्वागतार्हच ठरलं असतं. पण इथं दोन जरासे घोटाळे झालेत. पहिला : अध्यात्म म्हणजे धर्म नव्हे. दुसरा : गायतोंडे यांच्याकडून जो आकार झाला, तोच त्यांना अभिप्रेत होता, असं म्हणता येत नाही. तो आकार अगदी ‘मधोमध एकत्र येऊन िबदुरूप पावणाऱ्या रेषा’ असाही अपेक्षित नसू शकेल; गायतोंडे यांना!  मग या चित्रातून आपण काय पाहायचं? या प्रश्नाचं उत्तर गायतोंडे यांच्याबद्दल तरी ‘आपण स्वत:ला खोदून आणि शोधून पाहायचं’ असं आहे.

एकदा हे मान्य केलं की खरं तर, गायतोंडे यांच्या चित्रांची जातकुळी कोणती किंवा त्यांची शैली कोणती हाही प्रश्न उरूच नये. पण शैलीविचार हा कोणत्याही सांस्कृतिक इतिहासलेखनाचा भाग असतोच. प्रदर्शननियोजक या नात्यानं संधिनी पोद्दार यांनी तो केला आहे. या संदर्भात, मार्क रॉथ्को आणि अ‍ॅडॉल्फ गॉटलिएब यांचा उल्लेख प्रदर्शन-पुस्तकातल्या (कॅटलॉग) त्यांच्या  निबंधात आहे. मात्र अशा प्रकारचा उल्लेख अभ्यासापुरताच होणं बरं. त्यातून कधीही भावनांना आवाहन होऊ नये; कारण त्या दुखावतात तरी किंवा फाजीलपणे फुलून तरी येतात. किंवा मग, त्या उल्लेखाचा सवंग वापर तरी होतो. गायतोंडे हे  ‘भारताचे मार्क रॉथ्को’ असल्याचं अमेरिकी अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिस्ट (ुं२३१ूं३ी७स्र्१ी२२्रल्ल्र२३) चित्रकार  मॉरिस ग्रेव्हज् ज्या पत्रात म्हणतो, त्या पत्राचा काही भाग इथे व्हेनिसमधल्या प्रदर्शनात िभतीवर लावला आहे. त्याचा उल्लेख इसाबेला यांच्या वृत्तलेखातही आहे. म्हणून मग, व्हेनिसच्या या वृत्तपत्रानं ‘भारताच्या रॉथ्कोचं व्हेनिसमध्ये प्रदर्शन’ अशा उपसंपादकीय टिप्पणीत धन्यता मानली.

या सवंगतेच्या आणि भावनिक अभिमानाच्या पलीकडे जाऊन, अभ्यासूपणेच एखाद्या आधुनिक कलासंग्रहालयात जाऊन चित्रं पाहणारे बरेच जण युरोपात आहेत. व्हेनिसच्या पेगी गुगेनहाइम संग्रहालयाचं महत्त्व एकंदर युरोपीय कलासमीक्षेच्या प्रांतात दुय्यम असलं; तरीही अशा अभ्यासू प्रेक्षकांची कमतरता या प्रदर्शनाला कदाचित भासणार नाही. कलाविद्यार्थी येतील, प्राध्यापक आणि चित्रकारही येतील.. इटलीतच मिलान शहरातल्या जिओ मार्कोनी फाऊंडेशनमध्ये (याच संस्थेनं गेल्या ५० वर्षांत कधी ना कधी ज्यांना हात दिला, अशा) अमूर्तीकरणवादी चित्रकारांचं प्रदर्शन भरलंय, तिथली स्वागतकक्षात काम करणारी मुलगी (बहुधा चित्रकारच) म्हणाली- भारतीय अमूर्त चित्रकाराचं प्रदर्शन तिकडे व्हेनिसला भरलंय ते पाहायला जाणारे मी  ..पाहिल्यावर मलाही असंच वाटेल (असंच म्हणजे, इटालियन अमूर्तीकरणवाद आपल्याला किती कमी माहीत असतो, असं वाटणाऱ्या भारतीय पत्रकारासारखंच).

अद्याप युरोपीय समीक्षकांनी व्हेनिसच्या गायतोंडेंबद्दल काही लिहिलेलं नसलं, तरीही व्हेनिसचं द्वैवार्षकि महाप्रदर्शन – म्हणजे ‘बिएनाल’ २२ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार असल्यानं इथं लोक येतील. अशा दर्दीपकी एक पॉल. हा कॅनडाचा आहे आणि सध्या जगप्रवास करतोय. व्हेनिसमध्ये असताना, गायतोंडे प्रदर्शनाचा दुसरा दिवस त्यानं गाठला. तो कलाविद्यार्थी नाही; पण त्यानं प्रदर्शन नीट पाहिलं. आम्ही एकाच होस्टेलमध्ये राहत असल्यामुळे भेटलोच. तो सांगू लागला की त्याला गडद हिरव्या रंगांतली चित्रं आवडली. लाल चित्रं फार नाही भावली आणि आधीची- १९५७ ते ६६ या वर्षांतली चित्रं तर त्याला ‘स्वत:पासून दूरची’ वाटली! मग स्वत:च म्हणाला- मला या प्रदर्शनामुळे कळलं की, मला समुद्रकिनारे का नाही आवडत आणि इटलीतही चिंकोटेरेसारख्या जंगलात का जातोय मी .. काही तरी निबिड आहे, असं लक्षात आलं की मला आवडतं!

पॉल खरोखर पलीकडलं पाहत होता, याची खात्री नाही. कदाचित तो स्वत:तच अधिक गुरफटलेलाही असू शकेल.पण म्हणून, गायतोंडे यांच्या चित्रांमधून पलीकडलं पाहण्याची प्रेरणा कुणाला मिळणारच नाही असं कुठंय? प्रेरणा वगरे जड शब्द वाटतील, पण ..गायतोंडे मात्र बराच काळ पलीकडे राहून जगले, ‘तिथे कुठे तरी’ नक्कीच पोहोचले. त्यांची चित्रं  पाहणाऱ्यांना पलीकडली वाट सापडण्याचा एखादा क्षण येईलही. ही पलीकडली वाट वैचारिक समृद्धीकडे नेणारी ठरली, तर चांगभलं!

अभिजीत ताम्हण  , abhijit.tamhane@expressindia.com