धोंडूताई कुलकर्णी या जयपूर घराण्याच्या खलिफाच होत्या, त्यांच्या आवाजातील ‘आ’कार ही त्यांची सिद्धी होती आणि जन्मभर केसरबाईंचं गाणं जतन करणाऱ्या व्रतस्थ धोंडूताईंनी केसरबाईंचं गाणं या सिद्धीमुळेच पुढे नेलं, हे त्यांचं मोठेपण सांगताना घराण्याचे, संगीताचे संदर्भ पुन्हा जुळवणारा, समीक्षक केशव परांजपे आणि ‘लोकसत्ता’चा प्रतिनिधी यांच्याशी झालेल्या दीर्घ मुलाखतीवर आधारित हा लेख..  
चिरंतन, निरंतर अशा ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थी जेव्हा पहिलं पाऊल टाकतो, तेव्हा त्याला धरून चालवणारी, पडलं तर सावरणारी ती माउलीच असते. हे गुरुमाउलीचं मोठेपण. ती शिकवते. शिकवत राहते. पुढे मूल त्याच मार्गानं जाईल की नाही, हे कुणाला सांगता येत नाही. पुढे कलेच्या क्षेत्रातही तसंच आहे..  गुरू रस्ता दाखवतो, हे खरं आहे. पण शिष्य वेगळा रस्ता शोधू शकतोच ना!  ध्येय दाखवतो, तो गुरू. फारतर गुरू सांगेल की बाबा या अमुक इथल्या रस्त्यानं जाऊ नको, तिथं काटेकुटे आहेत, खड्डे आहेत. कलांमधल्या शक्यता अमर्याद असतात.. चालणं, बोलणं जसं अमर्याद शक्यतांचं असतं, तसंच गाण्याचं आहे. तसंच चित्रकलेचंही आहे. चित्रकलेत गुरू शिष्याला रेषा कशी काढ हे शिकवू शकेल. पण पुढे त्या रेषेचं काय करायचं हे शिष्यालाच ठरवावं लागतं. संध्याकाळचं चित्र दोन चित्रकारांनी काढलेलं निरनिराळं असतं, कारण त्यांना भावलेला क्षण आणि त्या क्षणाची त्यांना झालेली जाणीव निरनिराळी असते. घराण्याच्या गायकीचा, ती गायकी जपण्याचा किंवा गुरूचं गाणं जतन करण्याचा प्रश्न विचारता तुम्ही, तेव्हा हे सारं समजून घ्यावं लागेल आधी. संदर्भ समजावून घ्यावा लागेल.. गुरू विषयाचा (संगीताचा) अभ्यास शिकवतो. घराण्यापुरता नाही. या संदर्भात प्रत्येक कलाकाराचं वेगळेपण लक्षात घेतलं ना की मग तुम्ही तुमचे ते ठरावीक शिक्के मारत सुटणार नाही- ‘हिनं स्वत: प्रयोग केले, तिनं घराण्याचं गाणं जपलं..’ अरे! इतकं सोपं असतं का रे हे?
प्रत्येकाचा आवाज निरनिराळा, वेगळा, एकमेव. त्या आवाजातून पुढे संगीताकडे जायचं आहे. स्वरच नव्हे तर श्रुती अनुभवायच्या आहेत. कलेचं एक दुसरं स्वरूप असतं, बुद्धी आणि मन यांच्याही पलीकडलं. या अनुभूतीमधूनच अभिजात संगीत जपायचं आहे. अभिजात म्हणजे साधा अर्थ सांगते.. सर्वोच्च. ज्याच्या पुढे- पलीकडे काही असू शकत नाही, ते! यात घराणी आहेत, पण ती कशी? शूद्र, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे चार वर्ण पूर्वी होते. ती विभागणी समाजापुरती, समाजाच्या कामापुरती करण्यात आली. पण स्वत:च्या घरचा केर ब्राह्मणानं काढायचा असतो की नाही? आणि या वर्णाच्या (पान १ वरून) पलीकडला मानवधर्म पाहिल्यावर जातीपाती शिल्लक राहतच नाहीत. या उदाहरणातला मानवधर्म जसा महत्त्वाचा, तसं संगीताचं अभिजातपण टिकवणं महत्त्वाचं. हे अभिजातपण एखाद्यानं टिकवलं की नाही, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा परंपरा माहीत असाव्या लागतात, तुमच्या आधीचा जो संगीताचा अव्याहत काल आहे, त्याचा आवाका तुम्हाला माहीत असावा लागतो आणि हा आवाका तुमच्यापर्यंत पोहोण्याचं काम गुरू करतो.
हे लक्षात घेतलं की मग, केसरबाईंचा आवाज काळी तीनचा होता आणि माईचा (मोगुबाई कुर्डीकर) काळी पाचचा होता, या फरकाच्या पलीकडे जाऊन संगीताकडे पोहोचता येतं. त्या गाण्यातलं सांगीतिक विधान ऐकू येतं आणि उमगतं. माईचा आवाज उंच होता, शिकवण्याची तिची पद्धत ठाम आणि ठाशीव होती. देवगिरी बिलावलमधली ‘केरो धर्मराज’ ही अस्ताई शिकवताना माई एकदा म्हणाली- या अक्षरापासनं त्या अक्षरापर्यंत दम तोडायचा नाही. मी विचारलं का नाही तोडायचा दम? तर माई म्हणाली, अर्थच नाही थांबल्यावर..  तू मध्येच थांबलीस तर, तुला त्यातून जे सांगायचंय सांगताच येणार नाही! हा स्वरभाषेतला अर्थ तिच्या पद्धतीनं तिनं शिकवला.. त्याचा विचार करण्याची पद्धत तिनं दिली. संगीत ही मुळात एक स्वरभाषा आहे, त्या भाषेला तिचं स्वत:चं व्याकरण आहे, म्हणून ती शिस्तबद्ध आहे. आणि म्हणूनच तिला शास्त्रीय संगीत असं म्हणतात. जेव्हा शास्त्रशुद्धतेने, शिस्तीने तो भाव स्वरामधून निर्माण होईल, ते शास्त्रीय संगीत. केसरबाईंचा आवाज निराळा. कदाचित शिकवणंही निराळं असेल. तरीही माईच एकदा मला म्हणाली होती की, तू केसरबाईंकडे शिक. त्या वेळच्या काही कारणांमुळे ते राहिलं. यादरम्यान मी कॉलेजात होते, अगदी स्पोर्ट्सपासून सर्व अॅक्टिव्हिटींमध्ये भाग घेत होते आणि माईकडे शिकतही होते. त्या वेळी मी केसरबाईंना भेटायला थेट नव्हते गेले. आमचे सीताराममामा फातरपेकर निरोप नेण्याआणण्याचंही काम करीत. पण माईच्या शिकवण्यातून मला घराणं उमगत गेलं. परंपरा म्हणजे काय, ते समजत गेलं.
मग पुढे कधी तरी मी केसरबाईंच्या मागे (बैठकीत, तानपुरा घेऊन) बसलेही आहे. काय पाहिलं मी त्या गाण्यात? हिरव्यागार गवताचं माळरान वाऱ्याच्या झुळकीनं जसं लाटांसारखं डोलतं ना? तसा तो केसरबाईंचा मंद्र मध्यम! आमच्या घराण्यात (जयपूर-अत्रौली) ही श्रीमंती आहे.. मन्सुरांचं गाणं आणखी निराळं, केशव म्हणेल की एका अर्थानं गजाननबुवा जोशीही आमचेच. खरं आहे. पण हे सारे एकत्र नाही आले, त्यांच्या वाटाच निरनिराळ्या होत्या, याला तुम्ही महत्त्व देणार आहात की मूळ विषयाला? संगीत विषयाची ही श्रीमंती माझ्यापर्यंत पोहोचवली ती माझ्या माईनं. म्हणजे ज्ञानेश्वरमाउलींच्या शब्दांत, ‘आमचे गुरू श्रीमंत म्हणून आम्ही श्रीमंत!’ त्यानंतर मी एकदा मन्सुरांच्याही मागे त्यांच्या अडचणीच्या वेळी बसले आहे.. अगदी शोभाताईंच्यासुद्धा मागे बसलेय मी. पण हे केव्हा? माईनं आमच्या श्रीमंतीची उंची दाखवल्यावर. इथं पुन्हा जयपूर घराणं समजून घेतलं पाहिजे. आमच्या घराण्याबद्दल माझी समज आहे ती अशी की, इथे जितकं स्वराला महत्त्व आहे, तितकंच तालामधल्या मात्रेला महत्त्व आहे. आमच्या घराण्याच्या गायकीत बंदीश मांडलीत, त्या रागाची लय सिद्ध केलीत की ती तशीच राहिली पाहिजे. मग तुम्ही तान घ्या, आलापी घ्या किंवा बोलतान घ्या. तुम्हाला तानबाजी करायची म्हणून लय वाढवायची नाही, तुम्हाला तान वाढवायची ना? मग चौपटीने गा, आठपटीने गा, सोळा पटीने गा! इतकी बौद्धिक शिस्त या गाण्यामध्ये असूनही ते मनाला भावतं, म्हणून हे घराणं वाढलं. साहजिकच आमच्या घराण्यात रागांची रेलचेल आहे.. यमनापासून, भैरवापासून ते मिश्रराग, संकीर्ण राग.. सगळे आमच्या घराण्यात चालत आलेलं आहे. मी विश्वसंगीताकडे निघाले ती याच घराण्याच्या वाटेवरून. बंदीश मांडल्यानंतर – ताल सिद्ध केल्यावर आलापी, बोलआलाप, गमक, बोलतान, तानेमधली गमक, मग द्रुततान, अतिद्रुत तान. आमच्या घराण्यात ‘द्रुत बंदीश’ नाही. लयीच्या पटीत अतिद्रुत तानेपर्यंत गेल्यावर वेगळ्या द्रुत बंदिशीची गरजच काय? इंटेन्सिटी- उत्कटता आणि स्पीड- वेग यांच्यामधला फरक आहे हा! ही उत्कटता जयपूर घराण्यात, गळ्याभोवतीच्या मोत्यांच्या माळांसारखी ताना-तानांमधून प्रकट होते. त्या उत्कटतेला स्पीड आहे, पण तो अंगभूत आहे. रागाचा भाव द्रुत बंदीश न घेता मांडता येतो, या अर्थानं द्रुत आमच्याकडे नाही. आमच्या घराण्यात हलकंफुलकं काही नाही. आहे ते भव्य आणि उदात्त संगीत. एक ‘सकलदुखहरणा’सारखी अस्ताई- दोन दोन विलंबितांच्या आवर्तनांमध्ये बंदीश मांडणं आणि मग शब्दांच्या पलीकडलं सांगणं.. भावांचं ते रागनाटय़ श्रोत्यापर्यंत पोहोचवणं ही भव्यता नाही तर काय आहे? या उदात्ततेचं स्वररूपांतर करण्याच्या भाषेची गुपितं जयपूर घराण्याकडे भरपूर आहेत.
आमचं घराणं स्वामी हरिदासांपासूनचं आहे. पण म्हणून तेच अल्लादियाखाँसाहेब गात होते का? तेच केसरबाई गात होत्या का? केसरबाईंचं गाणं धोंडूताईंनी जपलं असं मी म्हणते, पण मला काय म्हणायचंय हे या संदर्भात लक्षात घ्या. मी केसरबाईंच्या प्रत्यक्ष मैफली जशा फार ऐकल्या नाहीत, तसंच धोंडूताईंचंही गाणं खूपदा ऐकलं असं नाही झालेलं. या संख्येला माझ्या मते महत्त्वही नाही. धोंडूताईंना एकदा ऐकलं, पण लक्षपूर्वक ऐकलं. त्यातून त्यांनी काय केलं आहे, हे समजलं. केसरबाईंनी जे दिलं ते तसंच्या तसं धोंडूताईंनी टिकवून धरलं, हे एकापरीनं खरं आहे. पण मला, ‘त्यांनी पुढे काही केलं नाही,’ असं नाही म्हणायचं. घराण्याची ही बौद्धिक शिस्त त्यांनी अगदी आपसूक  टिकवली. कुठे तरी कधी तरी त्या समेवर आल्या, धडपडल्या असं कधीही झालं नाही. गाताना संयमानं गायचं, समजुतीनं गायचं ही अभ्यासातून आलेली शिस्त होती. केसरबाईंच्याकडे त्या जे अपरंपार शिकल्या, ते जतन करायचं आहे याची जाणीव त्यांना होती. आणि धोंडूताईंचा आवाज? अनन्यसाधारण! शोधूनही सापडणार नाही असा नैसर्गिक निव्र्याज-निरागस आवाज.. काय गोडवा तो.. काय आकार!  हा ‘आ’कार म्हणजे धोंडूताईंची सिद्धी. त्यांनी या आकारामुळे केसरबाईंचं गाणं, एक प्रकारे पुढे नेलं. हे सारं त्यांनी विचारपूर्वक केलं की नाही, त्यामागे त्यांचा विचार काही होता तर काय होता, हे मला खरंच माहीत नाही. त्यांच्या आवाजावर मात्र माझं प्रेम होतं प्रेम.
माझी संगीताकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यांची दृष्टी वेगवेगळी होती, हे खरं आहे. पण म्हणून माझ्यालेखी त्यांना महत्त्वच नव्हतं, असं नाही. आम्ही वेगळ्या आहोत, होतो, हे खरं आहे. पण या वेगळेपणाच्या पलीकडे काही सूत्र असतं की नाही?  एकदा माझ्या निवडक शिष्यांना घेऊन मी त्यांच्याकडे गेले होते. पण माझी खात्री आहे की, त्यांच्या शिष्यांना त्यांनी अगदी प्रामाणिकपणे जे आहे ते शिकवलं असेल.. अगदी कोण मोठं होईल, कोण पुढे जाईल, त्यालाच जास्त देऊ या असाही विचार न करता शिकवलं! पण या शिकवण्याची सुरुवात त्यांनी फार उशिरा केली, याचं दुखही मला आहे. त्यांनी आधीच शिकवणं सुरू करायला हवं होतं.
माणूस म्हणूनही मी त्यांच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न केलाच. मला आवडायच्या त्या. त्यांच्या रूपासकट.. कशा छान होत्या दिसायला. ‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान’- अशाच! गोरा रंग, केसांचा ब्राह्मणी घट्ट बुचडा. त्यांचे डोळे आवडायचे मला. माई असतानाही मला वाटायचं, धोंडूताईंकडे जावं, त्यांनीही मला जवळ घ्यावं. माई गेल्यानंतर त्यांना मी एकदा विचारलंच, ‘आई म्हणू का मी तुम्हाला’- त्यांनी तिथंच सांगितलं, ‘नाही बाई. तू ताईच म्हण मला.’ हीसुद्धा, शिस्तच! धोंडूताईंची आवाज लावण्याची पद्धत कधीच धसमुसळी दिसणार नाही. या अर्थानं, त्यांच्या तोडीचं कुणीही आर्टिस्ट नाही. ‘हे असंच व्हायला पाहिजे’ हे तिला माहीत होतं.
धोंडूताई व्रतस्थच.. आपल्याला कुठं जायचं आहे, कुठं थांबायचं आहे, हे माहीत असणारं माणूस म्हणजे व्रतस्थ. केवळ त्यांनी मैफली कमी केल्या किंवा प्रसिद्धीत त्या मागे राहिल्या म्हणून नाही म्हणत मी. उलट धोंडूताईंचं गाणं आणखी लोकांनी ऐकायला हवं होतं. संगीताच्या- म्हणजे आमच्या घराण्याच्याच असंही नाही- सर्वच विद्यार्थ्यांना धोंडूताईंचं गाणं समजण्याची संधी अधिक मिळायला हवी होती. धोंडूताईंनी कोणते आदर्श जपले आहेत, हे पोहोचायला हवं होतं. संगीतावर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना आणि मुख्य म्हणजे आयोजकांना कधी वाटलं नाही की त्यांच्याकडून गाऊन घ्यावं? हे झालं नाही, याला जबाबदार आयोजक आहेत, एका अर्थानं श्रोतेही जबाबदार आहेत. असंही नाही की त्या फार पैशाची मागणी केली म्हणून बोलावलं नाही. तशा नव्हत्याच त्या. त्यांना पुढे-पुढे करणं कधी आवडलं नाही. तो त्यांचा पिंड नव्हता. धोंडूताई पाचव्या वर्षांपासून तालीम घ्यायच्या असं मी ऐकलंय. त्या अर्थानं आमच्या घराण्यात सीनियरमोस्ट होत्या त्या धोंडूताईच. अशी व्रतस्थ व्यक्ती जेव्हा या पृथ्वीवरून निघून जाते ना, तेव्हा पृथ्वीलाही मुलगी गेल्याचं दु:ख होत असेल. संगीतक्षेत्रात घराण्याच्या सीनियरमोस्ट व्यक्तीला खलिफा म्हणतात. त्या खलिफाच होत्या.
धोंडूताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मला विलक्षण कुतहूल होतं. त्यांच्या गाण्याबद्दल मला विलक्षण आहर आहे. माझ्या सांगीतिक चिंतनाचा केवढा भाग धोंडूताईंनी व्यापला आहे, हे मी कोणाला कसं सांगू? अतिशय महत्त्वाची सांगीतिक-सांस्कृतिक मूल्य धोंडूताईंच्या रूपाने या जगात नांदत होती. त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या संगीताशी आपल्या संगीताचं नातं सांगावं, असं नेहमीच खूप वाटत होतं. मी काही प्रयत्नही केला, तो किती सफल झाला हे मला सांगता येत नाही. काही बोलायचं राहूनच गेलं. धोंडूताईंनी कधी समजुतीने, मी म्हणते क्षमाशीलतेने माझ्या पाठीवर हात ठेवला असता आणि मला विचारलं असतं, ‘किशोरी, तुला काय म्हणायचंय?’ तर मी म्हटलं असतं, ‘ताई, घराण्याच्या संगीताला मी चंबू म्हणते तेव्हा मला अवहेलना करायची नसते. घराण्याचं गाणं प्रचंड स्वार्थत्यागाने, आपल्या अस्मितेचा पूर्ण लोप करून जगणाऱ्या आणि जगवणाऱ्या तुमच्यासारख्या कलाकारांचा चुकूनही अवमान करायचा नसतो. संगीताच्या अफाट सागरात उडी घेऊ पाहणाऱ्या मला या चंबूचा किती आधार वाटतो, हे मी तुम्हाला कसं सांगू?’ आता धोंडूताई गेल्या. त्यांची मूल्य सांभाळणं ही आम्हा सर्वाचीच जबाबदारी आहे. त्यांच्यी शिष्यमंडळी किती असीम दु:ख अनुभवत असतील हे मला नक्की कळतं. आपले गुरू निवर्तल्यावर शिष्याच्या मनाची काय स्थिती होते हे मी अनुभवलं आहे. मला सांगावंसं वाटतं, गुरू म्हणजे ज्ञान. आणि तो त्या अर्थाने कधीच निघून जात नाही. व्यवहारात तो जातो त्याचं खूप दु:ख होतं. ते एकमेकांना आधार देऊन सोसूया. धोंडूताई देवाच्या अगदी जवळ जाऊन बसल्या असतील, त्यांना दु:ख होईल असं नको वागू या.        
(शब्दांकन : अभिजीत ताम्हणे)