09 March 2021

News Flash

उलगडत जाणारं गाणं

‘कालजयी कुमार गंधर्व’ या मराठी व इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन १ नोव्हेंबर रोजी प्रथितयश छायाचित्रकार रघु राय यांच्या हस्ते पुण्यात होत आहे. राजहंस प्रकाशनाच्या या पुस्तकातील

| October 26, 2014 05:08 am

‘कालजयी कुमार गंधर्व’ या मराठी व इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन १ नोव्हेंबर रोजी प्रथितयश छायाचित्रकार रघु राय यांच्या हस्ते पुण्यात होत आहे. राजहंस प्रकाशनाच्या या पुस्तकातील चिं. शं. इनामदार यांनी घेतलेल्या कुमार गंधर्वाच्या अप्रकाशित मुलाखतीचा संपादित अंश..
गायनाचा आपला अनुभव अतिशय प्रदीर्घ आहे. १९३७ पासूनच्याही आधीचा. प्रतिभावंतांच्या गायनामुळे श्रोत्यांचाही दृष्टिकोन बदलत असतो हे जसं खरं, तसंच श्रोत्यांच्या दर्जाप्रमाणे गायकावरही परिणाम होताना दिसतो. अशा बदलत्या दृष्टिकोनाच्या श्रोत्यांविषयी आपण काही सांगू शकाल का? गेल्या ३५-४० वर्षांतल्या गाण्याच्या बदलत्या अभिरुचीविषयी आपले काय विचार आहेत?
– याच्याबद्दल माझे तसे एकाच शब्दात सांगावयाचं तर फार वेगळे विचार आहेत. या प्रश्नाला- म्हणजे श्रोत्यांच्या बदलत्या अभिरुचीला मी घाबरलेलो नाही. याबाबतीत संगीतकार लोक फार घाबरलेले दिसतात. सांगायचा उद्देश हा, की भारत स्वतंत्र झाल्यापासून विचारांमध्ये एक खूप मोठी उलथापालथ होऊन गेली आहे. ज्यांना आजवर आपण गाणारे म्हणत होतो त्यांना लोक गाणारे म्हणेनासे झालेले आहेत. त्याचबरोबर लोकांची संगीत ऐकण्याची आवड मात्र फार वाढलेली आहे. नवीन नवीन गायक लोक आलेले आहेत. ते किती दिवस टिकतील, त्यांची नावं किती दिवस राहतील, हा भाग वेगळा. ते त्यांच्या तपश्चय्रेवर अवलंबून आहे. lr23पण गाणं ऐकण्याची आवड मात्र वाढलेली आहे. मात्र, श्रोत्यांना ज्या प्रकारचं गाणं पाहिजे तसं संगीतकार देत नाही असा माझा समज आहे. म्हणजे शास्त्रीय संगीतात आजपर्यंत असा समज दृढ आहे, की ते रागसंगीत आहे व ज्याला रागसंगीत कळतं त्याला गाणं कळतं असं आपण गृहीत धरलेलं आहे. ज्याला रागसंगीत कळत नाही त्याला गाणं कळतच नाही असं आपण मानलं. नवी नवी क्षितिजं गाण्यामध्ये आलेली आहेत. आणि त्या सर्व प्रकारचं गाणं आज कानावर पडत आहे.
लोकांना गाणं आवडतं. पण ‘गाणं आवडतं’ म्हणजे काय? अमक्याला गाणं समजत नाही असं आपण म्हणतो. म्हणजे त्याला रागाबिगाची नावं माहीत नाहीत; पण गोड असलं तर ते त्याला आवडतं! आणि मग रागसंगीत गाणारे- मी मुद्दाम रागसंगीत गाणारे असे म्हणतो- शास्त्रीय संगीत गाणारे लोक त्यांना खूश करू शकत नाहीत. मग आपण म्हणतो, ‘तुम्हाला गाणं कळत नाही.’ दुसरं उत्तरच नाही. मग ते फार नाराज होतात. असे शास्त्रीय संगीतकार मग सिनेसंगीताला नावं ठेवायला लागतात. ती नावं ठेवण्याची जागा झालेली आहे. आजकाल आपण नाटय़संगीताचा फार गौरव करतो. ठीक आहे. पण पूर्वी नाटय़संगीत जेव्हा लोकप्रिय होतं तेव्हा त्याला आपण नावं ठेवत होतो; तसंच आजकाल फिल्मी संगीताला नावं ठेवतो.
प्रश्न निघाला म्हणून सांगतो, आमचं मराठी रंगभूमीवरचं संगीत फार समृद्ध आहे असं आपण म्हणतो, ते ठीकच आहे. पण त्यामधून दीनानाथ व नारायणराव काढून टाकले म्हणजे बोंब! खरं आहे की नाही माझं? हे दोघं जर झाले नसते, तर तुमचं नाटय़संगीत इतकं समृद्ध झालं नसतं! म्हणजे भास्करबुवा असते तरीसुद्धा झालं नसतं. नाटय़संगीताची अतिशय आवड लावणाऱ्या या दोन व्यक्ती  होऊन गेल्या. तशीच आवड लोकांना शास्त्रीय संगीताची आहे. ती कशामुळे आहे? शास्त्रीय संगीतकारांमुळे नाही. रेडिओचं माध्यम आलं, त्यामुळे कानावर सारखं गाणं पडतं. सिनेमा हे आणखी एक माध्यम आलं. त्यामुळे कानावर चांगले स्वर पडतात. पण तुम्ही त्याला चांगलं संगीत म्हणत नसाल.
आता नावं घ्यायची, तर मोठय़ांचीच घेऊ. लताचंच नाव घ्या. लताचा आवाज वाईट आहे असं कोण म्हणेल? मी तर म्हणणंच शक्य नाही, या जन्मात तरी! ती वाईट गाते असं मी कसं म्हणेन? तुम्हाला जसं हवं तसं तिचं गाणं नसेल कदाचित; पण सूर तरी आहेत ना? गाण्यामधला एक खास, अतिशय महत्त्वाचा भाग असा आहे, की ते कानाला गोड लागलं पाहिजे, आवडलं पाहिजे. अगदी पेपरिमटच्या गोळीसारखं. पेपरिमटची गोळी द्यायची आणि ती कडू लागायची. मग म्हणायचं, तुम्हाला अजून कडू चवीची आवड उत्पन्न झालेली नाही! तर लोकांचे कान आता फार सुरेल झालेले आहेत. स्वाभाविकच आहे. पूर्वीचं आपण बघितलं आहे. आणि आताचं पाहा. लहान मुली म्हणा, मुलं म्हणा- गुणगुणतात. किती छान गुणगुणतात! गोड गातात.
आपण जुनं पुष्कळ संपादन केलेलं आहे. आजवर नवीनही पुष्कळ दिलेलं आहे. या जुन्या-नव्याची आपण सांगड कशी घालता? सर्वस्वी नवीन असा खास आपला विषय म्हणजे भजन व लोकसंगीत. यासंदर्भात जुन्या-नव्यासंबंधी आपण काही सांगू शकाल काय?
– हा प्रश्न मला वाटतं, आपण सोडून देऊ. कारण ती लोकगीतं आली, ते राग आले. एक-दोन मिनिटं मला भजनाबद्दल एवढंच सांगायचं आहे- आपल्याकडे वारकरी जी भजनं म्हणतात ती सोडून दिली तर बाकी ‘भजन’ गाण्याची जी पद्धत रूढ आहे तिचा संगीतकारांनी कधी विचारच केला नाही. हा एक संगीताचा मोठा भाग आहे. संत लोकांनी सर्व करून ठेवलं, पण संगीतकारांनी भजनाकडे संगीतकार म्हणून कधी प्रेमानं बघितलंच नाही. खरं म्हणजे काही मंडळी भजनाकडे थोडंसं नाइलाजास्तवच वळली. भजनं म्हटली पाहिजेत, भजनं म्हटली तर लोक आपल्याला बरं म्हणतील, सभ्य म्हणतील (खरं सांगतो मी हे. हा माझा अनुभव आहे.), बरं म्हणतील. आपल्याला हे भजन म्हण म्हणतात हं! तर या लोकांनीसुद्धा ‘भजन’ म्हणून त्याचा काही खास विचार केला आहे असं कधी वाटलं नाही मला.
संतांची जी पदं आहेत ती घ्यायची, बरं का आणि त्याला कुठल्या तरी रागात घुसवायचं. घुसवायचं.. बसवायचं नाही. आणि चुकून ते त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट् बसलं की नशीब.. अशा तऱ्हेनं सर्व विचार. त्याला न्याय म्हणून कुणी संगीतकारानं कधी दिलेला नाही. जुनी भजनं मलासुद्धा आमच्या गुरुजींनी शिकवली आहेत. पण मला याचा फार कमीपणा वाटला, की या भजनाकडे आपण काही लक्ष दिलं नाही. किती छान आहे- त्या दृष्टीनं मीराकडे बघितलं तर? मीरा फार वेगळी आहे. ती कशी गात असेल? हे सर्व माझे आजारपणातले विचार आहेत. आपण जर त्या साध्या ओळी वाचून इतके खूश होतो.. आणि लोक त्याचं वर्णनही करतात. पण काही त्यातलं कुणी अजून गायलेलं नाही. आणि ती खरोखर जेव्हा गात असेल तर कशी गात असेल? कारण मीरा नाचून गात असे. ती दोन तंबोऱ्यांमध्ये बसून गात नसे, तर ती नाचून गात असली पाहिजे आणि तिचा तसा उल्लेखच आहे. तर तिच्या सर्व लायनीत वगरे- म्हणजे तिच्या भजनाच्या गाण्यात नृत्यप्रकार दिसला पाहिजे- नृत्य दिसलंच पाहिजे. तरच मीराच्या भजनाला आपण न्याय दिला. आणि त्यातील शब्दांचे उच्चार, मूळ राजस्थानी भजनं, मीराची भाषा फार छान आहे. तर त्यादृष्टीनं मी त्यांच्याकडे बघितलं.
तसंच मग निर्गुणी लोक. कारण देवासला शीलनाथ महाराज म्हणून फार मोठे संत होऊन गेले. त्यांच्यामुळे या निर्गुणी नाथ संप्रदायाचे लोकांचं येणं-जाणं देवासला फार मोठं आहे. ते फार मोठं क्षेत्र झालं आहे. शीलनाथ महाराज जसे आले तसे एके दिवशी न सांगता राज्य सोडून निघून गेले. त्यांच्यामुळे या भूमीमध्ये पुष्कळ लोकांना निर्गुणी भजनाची आवड आहे व त्यामुळेच माझ्या कानावर ते पडलं आणि मी निर्गुणी भजनाकडे वळलो. म्हटलं, हे काही वेगळं आहे! मी निर्गुणी भजनं गाणाऱ्या लोकांना पाहिलंय. अतिशय तन्मय होऊन गातात. अगदी वेडे. रात्र-रात्रभर बसून ते वेडय़ासारखी भजनं गात असत. कुणी ऐकायला नाही, काही नाही. त्यांच्या हातात एक एकतारी असते आणि कुठलं तरी भजन म्हणतात आपले. ते ऐकताना मला वाटलं की, यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. हे स्वर वेगळे आहेत. म्हणून मी निर्गुणी भजनाकडे गेलो.
मफलीमध्ये श्रोत्यांच्या फर्माईशीला कितीसा अवसर असावा? मफलीच्या रंगतीच्या दृष्टीनं अशी फर्माईश अनुकूल की प्रतिकूल समजावी?
– खरं सांगणं, सर्वाना बरं वाटेल असं बोलणं याबाबतीत कठीण आहे. पण मी माझं सांगतो. संगीताच्या क्षेत्रात आपण ज्याला खरा कलाकार म्हणू- तसा जर तो असेल, तर तो फर्माईश ही गोष्ट मान्य करणार नाही. हे वाक्य इथं संपलं. पण एकदा ऐकल्यावर जे आपल्याला आवडलं ते पुन्हा ऐकण्याची इच्छा असते, हा मनुष्यस्वभाव आहे. तर त्या अनुषंगानं फर्माईशीला महत्त्व आहे. पण मफलीत बसल्यावर मध्येच कुणीतरी म्हटलं, आम्हाला ‘उगीच का कांता’ पाहिजे, तर त्या फर्माईशीला काही अर्थ नाही. फर्माईशीला दर्जा हवा. तुम्हाला काही विशेष खास ऐकायचं आहे ना, तर आयत्यावेळी खाज सुटल्यासारखं करू नका. आपल्याकडच्या मफलीत काय आहे, की फर्माईशीला काही मतलब नसतो. आयत्यावेळी त्यांना हुक्की येते. म्हणजे एकदम डोक्यात त्यांना ‘बागेश्री’ दिसते. अरे, पण ‘बागेश्री’ तुला वाटली म्हणून त्यांनी म्हणावी, हा काय न्याय? अगोदर आपण कलाकाराचं गाणं ऐकायला जातो म्हणजे तो जे गातो ते ऐकायला जातो, हे लक्षात ठेवायला हवं. आता काही गायकांना फर्माईश आवडते. त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण माझ्या बाबतीत प्रथमपासूनच मी या गोष्टीला थारा दिला नाही. आजारपणाच्या पूर्वीही आणि आताही. मला कधी कुणी फर्माईश करण्याच्या भानगडीत पडत नसे. माझे मित्रसुद्धा कधी मला म्हणाले, ‘कुमार, हे ऐकव, ते ऐकव’ तर मी कधी ऐकवणार नाही. त्यांनी सांगितलं की मी ऐकवणार नाही. आमचे जगन्नाथबुवा- त्यांना फार इच्छा असायची, की माझ्याकडून ‘कौशी’ ऐकावा. पण मी कधी ऐकवला नाही. ते नसताना ‘कौशी’ म्हणालो. पण एकदा खूप आग्रह करून म्हणाले तेव्हा मी सांगितलं, ‘तुम्ही अगोदर सांगितलंत, आता मी ऐकवतो. मफलीत बसल्यावर तुम्ही जर म्हणाला, ‘कौशी गा’- तर मी गाणार नाही इथे. कारण मी ‘कौशी’ गाण्याच्या उद्देशानं आलेलो नाही.’ असंच एकदा गोिवदराव गुडघे दुखत होते, पाय दुखत होते तरी मुद्दाम वर चढून आले. ‘अरे, मला ‘कौशी’चा ख्याल ऐकव,’ म्हणाले. मला फार वाईट वाटले. त्यांना म्हटलं, ‘एवढय़ासाठी तुम्ही चढून वर आला. मुद्दाम जिना चढून येऊ नका. येथून जाण्याआधी मुद्दाम तुम्हाला गाणं ऐकवून जाईन.’ आणि जायच्या अगोदर त्यांना गाणं ऐकवून गेलो.
स्वराप्रमाणे ताल अंगाविषयी आपण काही सांगू शकाल काय?
– अगोदर एक फार गमतीशीर अनुभव सांगतो. आमचे अंबादासपंत (आगळे) आता नुकतेच होळीला वारले. त्यांची ही हकिकत आहे. आमचे अंबादासपंत हे पखवाजी. तर त्यांना कुणीतरी असंच विचारायला गेलं. विचारता विचारता मधेच त्यांना एक गाण्याचा प्रश्न विचारला. आमच्या िहदीमध्ये बडा ख्याल म्हणजे विलंबित लय व छोटा ख्याल म्हणजे द्रुत लय. तर त्यांना विचारलं, ‘अंबादासजी, बडा ख्याल क्या होता है और छोटा ख्याल क्या होता है?’ अंबादासजी म्हणजे भयंकर गरम मामला होता. प्रश्न विचारणाऱ्याला संगीतातलं काहीच कळत नव्हतं. अगदी फडतूस अशांपकीच ते. आता याला स्वतला काहीच कळत नाही आणि प्रश्न भलताच केला. अंबादासजींना भयंकर राग आला. पण राग येऊन काय उपयोग? उत्तर बरोबर दिलं पाहिजे. कारण जे देऊ, ते तो लिहून बसेल. त्यांनी उत्तर दिलं आणि फार उत्तम सांगितलं. ते म्हणाले, ‘बडा ख्याल उसको कहते हैं, जो लय में गाया जाता नहीं, जो ताल में गाया जाता नहीं, उसको बडा ख्याल बोलते है। और जो ताल में गाया जाता है उसको छोटा ख्याल कहते है।’ आता आपण यावर विचार करा. हे विचार करण्यासारखं आहे. फार सुंदर आहे. तर सांगण्याचा उद्देश असा, की मोठा ख्याल- जो गायक लोक गातात, तो तालात गात नाहीत. तालाचा आणि त्यांचा काही संबंध नसतो. फक्त समेला येऊन- हां, असं काहीतरी करायचं असतं. इथं सम आहे एवढं दाखवायचं. आणखी काही गायकांना माहीत असतं- समेला जोर करायचा. सम ही मात्रा जोराची असते, असं आपल्याला शिकवलेलं असतं. म्हणून समेवर थोडा जोर दिला की झालं. बाकी मात्रांशी आपला काय संबंध? तर एक उदाहरण सांगितलं. एकतालच्या बारा मात्रा. आता मात्रा वेगळ्या आणि एकताल वेगळा. पण आपण काय करतो, की एकताल म्हणजे १२ मात्रा. तसं म्हटलं तर चौतालही एकतालच होईल. छंदशास्त्राप्रमाणे एकताल तो एकतालच! मात्रा या मोजण्यासाठी आपण करतो. १, २, ३ हे त्याचे खंड- ब्लॉक्स आहेत वेगवेगळे. तो ताल काय सांगतो, अक्षरामुळे त्याचा काय आकार होतो, हे जोपर्यंत आपल्याला फीिलग येत नाही, तोपर्यंत दोन मात्रा गेल्यावर तोंड द्यायचं आणि समेला यायचं, याला काही अर्थ नाही. तो एकताल होत नाही. एकताल काय सांगतो, काय निर्माण करायला सांगतो, हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत अजून एकताल आपल्याला गाता आला नाही असं मला वाटतं. हा विषय फार मोठा आहे, म्हणून मी याचं एक वेगळं उदाहरण घेतो. अगोदर ‘ताल’ म्हणून जे आपल्या संगीतात आहेत ते फार थोडे आहेत. गाण्यासाठी, विद्वत्ता दाखवण्यासाठी जे ताल आहेत, त्यांना मी ‘ताल’ समजत नाही. मुळीच समजत नाही. चांगल्या गोष्टी करता करता मौज म्हणून वाईट गोष्टीही कराव्या तशातला तो प्रकार आहे. हॉटेलातील जेवणसुद्धा मध्येच एखाद्या दिवशी चांगलं लागतं म्हणून आपण नेहमी हॉटेलात नाही जेवत.
‘नवकाव्य’, ‘नवचित्र’, ‘नवशिल्प’ अशा रीतीनं नवीनतेची जी लाट सर्वत्र उचंबळलेली दिसते, तिनं ‘िहदुस्थानी संगीता’ला स्पर्श केलेला दिसत नाही, हे का? आपल्या दृष्टीनं याचं कारण काय असावं?
– हा प्रश्न रागसंगीतातून उत्पन्न झालेला आहे. आपलं जे शास्त्रीय संगीत आहे त्याच्या फाऊंडेशनवर उभं राहून हा प्रश्न केलेला आहे. बरोबर आहे ना? तर असं नाही. संगीतात नवीन क्षेत्रं आलेली आहेत. ज्याला आपण पूर्वी ‘गाणं’ म्हणत नव्हतो, त्याला आपण आज गाणं म्हणायला लागलो आहोत. आता अख्तरीबाईलासुद्धा आपण मोठी गायिका म्हणतो. कळावं म्हणून सांगतो. पूर्वी म्हटलं नसतं. काहीतरी दरिद्री गाते. गझल काय? गाणं काय? ठुमरी गायनानं काय मोठा गवई होतो? असा आपला समज! जसं जातींमध्ये आहे तसं संगीतात होतं. आपण मॉडर्न आर्ट वगरे म्हणतो ना. खरं तर आपल्याला कळत नसतं. का कळत नाही, तर आपण तसं बघितलेलं नसतं. त्याची दृष्टी नाही. पण संगीत इतर कलांसारखं नाही. चित्रकला वगरे कला या संगीताकडे चाललेल्या आहेत.
संगीत अगोदर अमूर्त आहे. जे नवीन पेंटिंग वगरे आलेलं आहे, त्याचं कारण त्या नवीन कलाकारांना आतापर्यंतचं मान्य नाही. त्यांना फापटपसारा नको. त्यातल्या लायनीवरच नवे लोक भर देत आहेत. आता गाण्याला तरी काय आकार असतो? आपण विचार केला तर खरोखर हा प्रश्न पडेल आपल्याला. रागाची चित्रं वगरे जे आहे ते सर्व सोडून द्या. त्यांना काही अर्थ नाही. स्वराला काय आकार आहे? मी सांगितलं खरं म्हणजे असा गोल; परंतु ते तसं एक फीिलग आहे. ताल- तालाला काय आकार आहे? इतकं अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आहे. सर्व कलेपेक्षा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट म्हणजे संगीत. त्याला तसा काहीच आकार नाही. या जितक्या नव्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्या सर्व संगीताकडे चाललेल्या आहेत, हे आपण लक्षात ठेवा.
नवीन पेंटिंगमध्ये मला अडचण काही वाटत नाही. याचे कारण कदाचित माझे मित्र पेंटर आहेत, हे असेल. त्यांच्या-आमच्या विचारांची देवाणघेवाण चाललेली असते. पण त्यांचा प्रयत्न आहे- की फालतू गोष्टी सर्व काढून टाकायच्या. म्हणजे सर्वाना नवीन चित्रकला कळलेली आहे असं नाही. काही नुसतं आपलं वाकडंतिकडं करून ठेवतात, ते वेगळं. पण खरे समजदार लोक त्यांच्यात आहेत त्यांच्या बाबतीत मी म्हणतो. आपलं संगीत हे मूळचंच इतकं अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आहे, की त्यात विशेष काही करण्याची जरुरी नाही. पण या गाण्याच्या ज्या वेगवेगळ्या िवग्ज आहेत त्या अजून उलगडायच्यात. आपण लोकगीताला महत्त्वाचं समजत नाही. पण ते नाहीसे झाल्यावर महती कळेल. आणि सर्व अशा प्रकारे चालू आहे, की त्या सर्व गोष्टी नाहीशा व्हाव्यात. त्यांचा सर्वनाश व्हावा. टार-रोड्स (ळं१-फं२ि) आहेत, रेडिओ आहे आणि मूळ स्वाभाविक म्हणून जे आहे त्याचा आपण नाश करत चाललो आहोत. अशाच काही गोष्टी लिहिल्या गेल्या तर राहतील; पण जे स्वाभाविक ते दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे.
फॉरेनमध्ये मशिनवर संगीताचं कॉम्पोझिशन होतं. मी मशिन मानत नाही. वैविध्य म्हणून ठीक आहे, पण शेवटी आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आपल्या बुद्धीनं काहीतरी प्रयोग करून त्याच्यामधून जो आनंद येतो तो वेगळा आनंद आहे, वेगळी मौज आहे. मशिनचा आनंद टिकणारा नाही. रागसंगीत तुम्हाला गायचं असेल तर त्याची बंधनं पाळूनच गावं लागेल. आणि अजून आपण तसं गात नाही, हे सांगितलंच! वेगळं संगीत हवं ना? पण रागसंगीताला धक्का देण्याची जरुरी नाही. आता िहडालियम आहेच की! नाही म्हटलं तरी भांडं घेतोच आपण. पण ते तांब्याची बरोबरी करणार नाही. तांबं ते तांबंच. आपण माझ्या गाण्याला नवं का म्हणता, तर ते नवीन वाटतं म्हणून, वैचित्र्य वाटतं म्हणून. नवं असं काही नसतं.
(२८ मे १९७२ रोजी पुणे येथे ‘सेंटर फॉर इंडियन रायटर्स’तर्फे आयोजित प्मुलाखतीचे शब्दांकन)   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2014 5:08 am

Web Title: abstract of kumar gandharvas non published interview
Next Stories
1 संघर्षांला लाभला आवाज!
2 भीती आणि हानीचा विस्मृत प्रदेश
3 या निवडणुकीचं म्हणणं काय?
Just Now!
X