कोणताही गाजावाजा न करता एखाद्या गर्दीच्या ठिकाणाहून हलक्या पावलांनी निघून जावं तशी नंदा  चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. (आणि आता जीवनापासूनही!) फार थोडय़ाजणांना डोळसपणे असा निर्णय वेळीच घेता येतो आणि तो पाळता येतो. अभिनेत्री नंदा म्हणजे सोज्वळ, पवित्र नंदादीप. तिची चित्रपटातली ही प्रतिमाच तिच्यासाठी िपजरा बनली. ज्यातून तिला कधीच बाहेर पडता आलं नाही. तिनंही त्याची कधी खंत बाळगली नाही.
क्रिक्रिकेटमध्ये फलंदाजांची मधली फळी असते तशी साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत नायिकांची मधली फळी होती. गुणी, भरवशाची आणि कठीण समय येता निर्मात्यांच्या कामास येणारी. नंदा या फळीची अव्वल प्रतिनिधी होती. नंदा, माला सिन्हा आणि निम्मी या अभिनेत्री रूप आणि अभिनयगुण असूनही आघाडीच्या ‘सुपर फाइव्ह’मध्ये नव्हत्या. याची कारणं दोन. एक- त्यांचे (कम)नशीब आणि दोन- त्या काळातली रजतपटावरची एकाहून एक सरस अभिनेत्रींची गर्दी! मीनाकुमारी, नूतन, वैजयंतीमाला, वहिदा रहेमान अशी ती रत्नमालाच होती. नंदा पडद्यावर येण्याआधीच या अभिनेत्री स्थिरावल्या होत्या.
नंदाचं नाव ‘सुपर फाइव्ह’मध्ये नव्हतं म्हणून हळहळण्याऐवजी अशा गुणवंतींच्या स्पर्धेत ती त्यांच्यानंतर येऊन आणि त्यांच्यापेक्षा वयानं लहान असून पंचवीस र्वष टिकली याचं कौतुक करायला हवं. तिच्यानंतर आलेल्या सायरा बानू, साधना, आशा पारेख यांच्या पिढीलाही ती पुरून उरली. सात्विक सौंदर्य व हृदयस्पर्शी अभिनयामुळे ‘गरीब निर्मात्यांची मीनाकुमारी’ म्हणून उल्लेख होण्याएवढी मजल तिनं मारली यातच तिची योग्यता कळते. मात्र, ती कधीही मीनाकुमारीच्या वा कोणत्याच बडय़ा नायिकेच्या छायेत वावरली नाही. तिला तशी गरजच नव्हती. मराठी चित्रपटाला वरदान ठरलेल्या अष्टपैलू मास्टर विनायकांची ती कन्या. अभिनय तिच्या रक्तातच होता.
पण तो असूनही तिला संघर्ष चुकला नाही. तिचा संघर्षही वेगळाच होता. तो यशातूनच निर्माण झाला होता. ‘छोटी बहन’ हा तिचा चित्रपट हिट् झाला. बलराज सहानी, रहमान आणि महमूद असे त्या काळातले बडे नट त्या चित्रपटात असूनही, ‘भैया मेरे, राखी के बंधन को निभाना’ असा लाडिक हट्ट धरणारी आणि सगळ्यांना ज्युनियर असणारी नंदाच तो चित्रपट घेऊन गेली. ती भूमिका नंदाच्या करिअरचा प्लस पॉइंट ठरली आणि मायनस पॉइंटदेखील! तिनं नंदाला लोकप्रियता दिली, सोज्वळ प्रतिमा दिली आणि तिनंच नंदाला कौटुंबिक चित्रपटांमध्ये कैद केलं.
साधारणपणे बहीण किंवा नायिकेच्या मैत्रिणीच्या भूमिकेपासून सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रीला पुढे तशाच भूमिका द्यायच्या, असा त्या काळातल्या हिंदी चित्रपटाचा दंडक होता. तो नंदाच्याही वाटय़ाला आला. तिला देव आनंदबरोबर पहिला चित्रपट (कालाबाजार) मिळाला. त्यात तिला त्याच्या बहिणीची भूमिका होती. नायिकेच्या भूमिका मिळायच्या तेव्हा एक तर अशोककुमारसारखा वडिलांच्या वयाचा माणूस नायक असायचा किंवा विजय आनंदसारखा नवोदित नट (आग्रा रोड). नाही तर चक्क शेख मुख्तारसारखा बहुतेकदा मारामारीपटांमध्ये काम करणारा दुय्यम हीरो (कैदी नं. ९११).
तेव्हाच्या काळात नंदाला अनुरूप नायक मिळणं अनेकार्थी कठीण होतं. ती वयानं लहान होतीच, पण त्यापेक्षाही लहान दिसायची. म्हणूनच बहुधा कितीतरी र्वष तिच्या नावाला लागलेलं ‘बेबी’चं लेबल कायम राहिलं. अशोककुमार गमतीनं  म्हणायचा, ‘मी सर्वात तरुण हीरो आहे. माझी हीरोइन बेबी (नंदा) आहे.’ तिच्या चेहऱ्यावरचं लहानपण जवळपास शेवटच्या चित्रपटापर्यंत कायम राहिलं. ‘प्रेमरोग’मध्ये आईच्या भूमिकेत दिसलेल्या नंदाच्या चेहऱ्यात तिच्या वयाच्या इतर नटय़ांपेक्षा जास्त टवटवी अन् गोडवा होता. तिचा चेहरा ‘बेबी’ या उपनामाला शोभेसा होता आणि तिचा आवाज त्याला मॅचिंग होता.
या रूपगुणांना साजेशा अल्लड, अवखळ भूमिका मात्र नंदाला अभावानंच मिळाल्या. भूमिका छोटय़ा बहिणीची असो की मोठय़ा बहिणीची, बेटीची असो की पत्नीची- कर्त्यां स्त्रीच्या जबाबदारीनं तिला माणसांना आणि घराला सावरावं लागायचं. तिच्याच वयाची वहिदा रहेमान ‘कालाबाजार’मध्ये ‘सच हुए सपने मेरे’ची खुशी नाचून- गाऊन व्यक्त करायची किंवा देव आनंदबरोबर पावसात ‘रिमझिम के तराने’ गायची. नंदाला मात्र म्हाताऱ्या आईबरोबर देव्हाऱ्यातल्या देवाची आळवणी करावी लागायची. ‘ना मैं धन चाहूँ, ना रतन चाहूँ’सारख्या गाण्यांमध्ये तिचा चेहरा, तिचे डोळे असं काही काम करून जायचे, की शूटिंगच्या प्रॉपर्टीमध्ये निरांजन नसलं तरी उणीव भासू नये.
शशी कपूर चित्रपटात आला आणि नंदाच्या मागची धुपारती सुटली! तिच्या वयाचाच नव्हे, तर तिच्या निर्मळ, प्रेमळ व्यक्तिमत्त्वाला साजेसा उमदा जोडीदार तिला मिळाला. पडद्यावरचा समंजसपणा अन् शहाणपणा पडद्यामागे दाखवत नंदानं धरलेला धीर फळाला आला. ही भेट घडण्याआधीच तिला बडय़ा निर्माते-दिग्दर्शकांचे चित्रपट मिळू लागले होते. बी. आर. चोप्रांसारख्या सुजाण आणि पुरोगामी दिग्दर्शकानं तिला ‘धूल का फूल’, ‘कानून’ हे महत्त्वाचे चित्रपट दिले होते. ‘हम दोनो’साठी तिचं बहिणीच्या भूमिकेतून देव आनंदच्या पत्नीपदावर प्रमोशन झालं होतं. हृषिकेश मुखर्जीनी ‘आशिक’मधून तिला राज कपूरबरोबर काम करण्याची संधी दिली होती. पण या सगळ्या भूमिका समांतर नायिकेच्या होत्या. पत्नी आणि बेटी याच वर्तुळात तिला फिरावं लागलं. कथेत तिला महत्त्व होतं, पण चित्रपट नायकाभोवती फिरत होता आणि उठावदार भूमिका दुसऱ्या नायिकेच्या हाती पडत होत्या. ‘पती, पत्नी और वो’ फॉर्मुल्याची कथा असली की सोशिक, प्रेमळ आणि त्यागमूर्ती पत्नीची भूमिका नंदासाठी राखीव होती. अशा व्यक्तिरेखांना कंगोरे नसतात. त्या साचेबंद वाटतात. विजोड साथीदारामुळे त्यांची  विश्वासार्हता संपते.
नंदाचं मोठेपण हे, की तोटे ठाऊक असूनही तिनं कामात कधी कुचराई केली नाही. तिची मन:पूर्वकता आणि अनुरूप व्यक्तिमत्त्व यांनी या ठरीव भूमिकाही गोड झाल्या. शशी कपूरची साथसोबत मिळाल्यावर नंदाचं नष्टचर्य संपलं. ‘चार दिवारी’ हा या जोडीचा पहिला चित्रपट अगदी साधा, पण हृदयंगम होता. या नवविवाहित जोडप्याचं सहजीवन कसं मार्गी लागतं, अशी अगदी एकच वाक्याची कथा या चित्रपटाला होती. हीच कथा बासू चटर्जीनी ‘सारा आकाश’मध्ये सांगितली तेव्हा तिच्या साधेपणाचं आणि वास्तवदर्शीपणाचं कोण कौतुक झालं. कारण त्यावेळी समांतर चित्रपट रुळला होता. ‘चार दिवारी’ २० र्वष आधी आला म्हणून त्याची कुणी दखल घेतली नाही. दिग्दर्शक कृष्ण चोप्रांना आयुष्य लाभलं नाही आणि चित्रपटदेखील.
‘मुहब्बत इस को कहते है’ची हीच गत झाली. नित्याची प्रेमकथाच; पण ती इथे खऱ्या अर्थी खुलली होती. पण याही चित्रपटाची उपेक्षा झाली. ‘ठहरिये होश में आऊ, तो चले जाईयेगा’ हे गाणं तेवढं गाजलं. नंदा-शशी कपूर जोडीला यश दिसलं ‘जब जब फूल खिले’ चित्रपटात. कात टाकण्याचा आनंद या चित्रपटानं नंदाला दिला. इथे ती तिच्या वयाची, तिच्या काळातली तरुण स्त्री होती. पंजाबी सूट आणि वेस्टर्न ड्रेसेस घालणारी,  मोकळेपणानं वागणारी, बोलणारी. ‘ये समां.. समां है ये प्यार का’ ही धुंद धून गायला मिळाली. शशी कपूर या मेमसाबचा काश्मिरी शिकारावाला होता. ‘गाव का छोरा- शहर की मेम’ हा प्रेमाचा मामला प्रेक्षकांना बेहद्द आवडला. तेही हिंदी सिनेमात पंचविशीतला जोडा बहुतेक पहिल्यांदाच पाहत होते.
२०-२२ वर्षांनी ‘जब जब फूल खिले’चा ‘राजा हिंदुस्थानी’ या नावानं भडक रिमेक झाला. तोही जबरदस्त हिट् झाला. त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षांव झाला. त्यात सात मिनिटांच्या प्रदीर्घ चुंबनदृश्याखेरीज काहीच वेगळं नव्हतं. ‘जब जब फूल खिले’चा मोहक साधेपणा नव्हता. नंदा- शशी कपूर जोडीच्या प्रेमकथेत जे लाघव, जी निरागसता दिसली, तिचा शंभरावा हिस्साही आमिर खान-करिश्मा कपूर यांच्या चुंबकीय रोमान्समध्ये दिसला नाही.
‘जब जब फूल खिले’च्या यशानं शशी कपूरला स्टार बनवलं. तो बडे भाई शम्मी कपूर याच्या पठडीतला ग्लॅमरस हीरो झाला. ‘चार दिवारी’ आणि ‘प्रेमपत्र’ यासारखे साधे चित्रपट करायला त्याच्यापाशी वेळ नव्हता. आता त्याला आशा पारेख, शर्मिला टागोर या नव्या पिढीतल्या तरुण, यशस्वी व ग्लॅमरस नायिका मिळाल्या. त्याच्या नव्या जगात नंदासारख्या घरगुती प्रतिमेच्या नायिकेला स्थान नव्हतं.
शशी कपूरप्रमाणेच धर्मेद्र, जितेंद्र, मनोजकुमार, संजय खान, राजेश खन्ना ज्युनियर असताना नंदानं त्यांच्याबरोबर काम केलं. मनोजचा अपवाद वगळता बाकीच्या चौघांनी शशी कपूरचा कित्ता गिरवत गरज सरताच नंदाकडे पाठ फिरवली. मनोजनं मात्र स्वत:च्या ‘शोर’मध्ये आठवण ठेवून नंदाला बोलावलं. ‘एक प्यार का नगमा है’ हे सुरेख गाणं दिलं. याच काळात बी. आर. व यश या चोप्रा बंधूंनी नंदाला ‘इत्तेफाक’ नावाचं सरप्राइज गिफ्ट दिलं. भूमिका तीच होती; पण शेवटी कलाटणी होती. या कलाटणीचा चित्रपटाला फायदा झाला. त्या रहस्यपटाला अनपेक्षित, रोमांचक शेवट मिळाला. पण नंदाला त्याचा लाभ झाला नाही. अभिनयाच्या दृष्टीनं या भूमिकेत काही नावीन्य नव्हतं.
ते नंदाला सापडलं ‘नया नशा’मध्ये. ही खरीखुरी वेगळी भूमिका होती. तिनं नंदाला ड्रग अ‍ॅडिक्ट रंगवण्याचं आव्हान दिलं. वाईट संगतीमुळे नकळत ड्रगच्या व्यसनात लोटली गेलेली (आणि अर्थातच नंतर सुधरणारी) कॉलेज तरुणी नंदानं छान रंगवली. हेरॉइन मिळत नाही तेव्हाची तगमग आणि लाचारी तिनं अचूक उभी केली. पण वेळेच्या आधी आलेला हा चित्रपट होता. अमली पदार्थाच्या व्यसनाचा हाहाकार त्या काळातल्या समाजानं अनुभवला नव्हता. शिवाय ‘हरे राम हरे कृष्ण’मध्ये ज्या चातुर्यानं आणि सफाईनं या व्यसनाची शोकांतिका दाखवली होती, ते दोन्ही गुण ‘नया नशा’मध्ये गैरहजर होते. नंदाची मेहनत त्यामुळे वाया गेली. या चित्रपटावर निर्माता म्हणून तिच्या मेहुण्यांचं नाव होतं (सी. व्ही. के. शास्त्री). याचा अर्थ नंदानं स्वत:चा पैसा घालून हा चित्रपट काढला असण्याची शक्यता आहे. काहीतरी वेगळं करण्याची तळमळ असलेला कलाकारच अशी जोखीम घेतो.
एव्हाना बॉलीवूडला ‘अमिताभयुगा’ची चाहूल लागली होती. या झंझावातामध्ये कौटुंबिक-सामाजिक चित्रपट पाचोळ्यासारखे उडून गेले. साध्या-सरळ नायिका हुसकल्या गेल्या. दादा, भाई, अण्णा या टोळीवाल्यांच्या तालावर नाचणाऱ्या बाहुल्यांनी त्यांची जागा घेतली. खेरीज बॉलीवूडच्या घटनेनुसार नंदाचं वय झालं होतं. तिनं तिशी पार केली होती. काळाची पावलं ओळखून नंदानं निवृत्ती पत्करली. चरित्रभूमिकांच्या नावाखाली भाभी वा दीदीच्या भूमिका करण्यात अर्थ नव्हता. या भूमिका तर तिनं आधीही केल्या होत्या.
कोणताही गाजावाजा न करता एखाद्या गर्दीच्या ठिकाणाहून हलक्या पावलांनी निघून जावं तशी नंदा  चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. फार थोडय़ाजणांना डोळसपणे असा निर्णय वेळीच घेता येतो आणि तो पाळता येतो. नंदानं या दोन्ही दुर्मीळ गोष्टी करून दाखवल्या. पाटर्य़ा, प्रीमियर शो, पुरस्कार सोहळे- कुठे म्हणता कुठे नंदाचं नखही  दिसलं नाही. ही अगदी खरीखुरी निवृत्ती, खराखुरा संन्यास होता. २५ र्वष प्रसिद्धीच्या झोतात राहिल्यावर अशी विरक्ती सोपी नसते. पण नंदाला ती साधली. कारण ऐन बहराच्या काळातही ती बॉलीवूडच्या झगमगाटात सामील नव्हती. आपलं वैयक्तिक जीवन तिनं कटाक्षानं जपलं. त्यात कोणतीही गुप्तता, गूढता वा रहस्य नव्हतं, तरी! तिच्याबद्दल कधीच गॉसिप झालं नाही. तिचं नाव कुणाशी जोडलं गेलं नाही. तिच्यापाशी नाव होतं; पण त्याभोवती झगमगतं वलय नव्हतं.
म्हणूनच की काय, तिला विसरणं मीडियाला सोपं गेलं. चॅनेलवाले किंवा फिल्म नियतकालिकांचे प्रतिनिधी यांनी तिची कधी खबर घेतली नाही. तिच्या मृत्यूची बातमी ‘कव्हर’ करायला गेले असतील, ती त्यांनी घेतलेली तसदी असेल. निवृत्त कलाकारांनी ‘रिअ‍ॅलिटी शो’चे परीक्षक होण्याचा प्रघातही तिनं पाळला नाही. तिच्यानंतर आलेल्या कलाकारांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाले, जीवनगौरव पुरस्कार तर चार-चार संस्थांकडून मिळाले. ‘पद्मश्री’चं समजू शकतं. आजच्या राजकारण्यांप्रमाणे तेव्हाच्या राजकारण्यांची बॉलीवूडमध्ये ऊठबस नव्हती. नंदाचं नाव त्यांच्या लक्षात आलं नसेल. पण जीवनगौरव पुरस्कार देणारे तर चित्रपट व्यवसायातले आहेत. त्यांना नंदाच्या नावाचं विस्मरण व्हावं याचं सखेदाश्चर्य वाटतं. खुद्द नंदाला पुरस्कार-मानसन्मानाचं सोयरसुतक असेलसं वाटत नाही. नाही म्हणायला मनमोहन देसाई तिच्याशी विवाह करणार असल्याची बातमी एवढीच तिच्या आयुष्यातली सनसनाटी. एकाहून एक आचरट चित्रपट काढणाऱ्या देसाईंचा ‘चॉइस’ इतका चांगला असावा याचं सुखदाश्चर्य वाटलं होतं. पण नंदाच्याच काही चित्रपटातल्याप्रमाणे विपरीत घडलं. देसाईंच्या गूढ आत्महत्येनं सगळंच आकस्मिक संपून गेलं.
कलेबरोबरच तिचं जणू अप्रसिद्धीशी इमान होतं. ते जीवनाप्रमाणेच तिनं मरणातही पाळलं. देसाईंच्या आकस्मिक अन् अघोरी जाण्यानं ती उद्ध्वस्त झाली. परंतु त्याबद्दलही ती कधी बोलली नाही. तिच्याही मृत्यूची खबर अनपेक्षित आणि आकस्मिकच होती. चित्रपटातून ती जशी पाऊल न वाजवता बाहेर गेली, तशीच  जीवनापासूनही दूर झाली.

dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
water shortage in Pune
लोकजागर : पाणीकपात करा…