14 August 2020

News Flash

‘अ‍ॅक्ट्स ऑफ फेथ : जर्निज टू सॅक्रीड इण्डिया’च्या निमित्तानं..

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील दि सेंटर फॉर इंग्लिश स्टडीजमध्ये दीर्घकाळ अध्यापन करणारे ज्येष्ठ विचारवंत, कवी व लेखक डॉ. मकरंद परांजपे यांचं Acts Of Faith

| November 25, 2012 12:57 pm

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील दि सेंटर फॉर इंग्लिश स्टडीजमध्ये दीर्घकाळ अध्यापन करणारे ज्येष्ठ विचारवंत, कवी व लेखक डॉ. मकरंद परांजपे यांचं Acts Of Faith : Journeys to Sacred India हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी प्रकाशित  झालं आहे. त्यानिमित्त परांजपे यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा..
स्मरणांची गाथा असते तशी व्यथाही असते. विशिष्ट स्थळांचं आपल्या जाणिवेशी कायमचं नातं जुळलेलं असतं. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाशी माझं असंच आयुष्यभराचं नातं जुळलं गेलं आहे. जे. एन. यु. च्या परिसरातून भटकताना तिथल्या दिवसांच्या आठवणी दाटून आल्या. ‘स्कूल ऑफ सोशल सायन्सेस’ पार करून ‘सेंटर फॉर इंग्लिश स्टडीज’पाशी पोहोचलो. इमारतीखाली दोन क्षण थांबलो. दुसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या दारावर टकटक करून आत शिरलो. खोलीच्या कोपऱ्यातल्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत बसलेल्या माणसानं माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, ‘या.या ..’ ते होते प्रा. मकरंद देशपांडे.
त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘हो. दिल्लीत प्रकाशन झालं.  Acts Of Faith: Journeys to Sacred India असं या पुस्तकाचं नाव ठेवलंय.’ शीर्षकातल्या विश्वासाला कर्माची जोड दिलेली पाहून मला गंमत वाटली. ‘विश्वास या कल्पनेत एक द्वैत दडलेलं आहे असं मला वाटतं,’ परांजपे म्हणाले ‘विश्वास एखाद्यावर टाकला की त्याचा घात होऊ शकतो या शक्यतेसोबतच आपण जगत असतो. विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून माणूस खूप प्रयत्न करत असतो. पण, कधीकधी विश्वास एक उडीसुद्धा घेतो, ज्याला ‘लीप ऑफ फेथ’ म्हणतात. यात मानवाचे प्रयत्न उपयोगाचे नसून दैवी शक्तीचे प्राबल्य अधिक असतं. आधुनिक जगात वावरत असताना या दोन ध्रुवांवरच्या विश्वासातल्या मधल्या अवकाशात आपण वावरतोयं असं मला वाटतं.’
‘अ‍ॅक्ट्स ऑफ फेथ’चा पसारा तसा मोठा आहे. १९८३-८४ मध्ये अमेरिकेतल्या इलियॉन  विद्यापीठात पीएच. डी.चा अभ्यास करत असताना परांजपेंना व्ही. व्ही. गिरी हे प्राध्यापक म्हणून लाभले. रामकृष्णांचं गॉस्पेल गिरींनी परांजपेंच्या हातावर ठेवलं आणि तिथून पुस्तकाच्या व पर्यायानं परांजपेंचा आध्यात्मिक शोध सुरू झाला. तो ‘Mysticism in Indian English Poetry’ या त्यांचा प्रबंध पुस्तकाच्या स्वरूपात १९८५ मध्ये प्रकाशित झाला.
‘अ‍ॅक्ट्स ऑफ फेथ’मध्ये विभिन्न साहित्यशैलींचा वापर झाला आहे. एकाच वेळी हे प्रवासवर्णन, रोजनिशी आणि ललित या तिन्ही शैलींमध्ये मोडतं. ‘आयुष्यात सगळंचं मिसळलेलं असतं, नाही का? तीर्थयात्रावर्णन हा साहित्यप्रकार असू शकतो का याचा शोध मी या पुस्तकाद्वारे घेतलाय. पॉल ब्रन्टन या पश्चिमेतल्या विचारवंताने १९३० च्या दशकात भारताला भेट दिली होती. A Search in Secret India (१९३४) हे पुस्तक वाचून आजही पश्चिमेतले लोक भारतात येतात. ब्रन्टनसारख्या अनेक ब्रिटिशांचे आपल्यावर उपकार आहेत. भारताचं खरं महत्त्व या विदेशींनी जाणलं. विस्मृतीत गेलेल्या आपल्या प्राचीन रूढी-परंपरांशी आपल्याला पुन्हा जोडलं. अर्थात साम्राज्य विस्ताराच्या नादात भारतीयांचा केलेला अतोनात छळ व हाल यातून त्यांना क्षमा नाही हेही तितकचं खरं.’
‘शीर्षकाच्या दुसऱ्या भागाबद्दल म्हणजे Journeys to Sacred India… हा प्रवाससुद्धा दुतर्फा आहे. एक बाहेरच्या जगात तीर्थयात्रेच्या रूपातला आणि दुसरा आंतरिक, आपल्या दडलेल्या दिव्याचा शोध. पुस्तकाची रचनाही तशीच दिसते. योगी रामसूरत कुमार यांची पहिली भेट, आठवले यांच्या कार्याचा आढावा, स्वामी नारायण यांच्या मठांना भेटी, पाँडेचेरीतल्या अरविंदांच्या आश्रमातले दिवस या सगळ्यावर वेगवेगळी प्रकरणे आहेत,’ असेही परांजपे म्हणाले.
सरोजिनी नायडूंच्या कविता, स्वामी विवेकानंद व योगी अरविंद, भारतीय इंग्रजी वाङ्मय, कविता, साम्राज्योत्तर भारतीय इंग्रजी साहित्य यासारख्या अनेक विषयांवर परांजपेंची विपुल ग्रंथसंपदा आहे. ५२ व्या वर्षी त्यांची ३५ पुस्तकं (यात पाच काव्यसंग्रहसुद्धा), १३० शोधनिबंध, २५० हून अधिक लेख व असंख्य पुस्तकांवरील समीक्षणात्मक लेख हे त्यांचं प्रकाशित साहित्य आहे. एकदा त्यांच लिखाण पाहून मी त्यांची तुलना स्लाव्होज झिझेक या जगप्रसिद्ध स्लाव्हिक तत्त्ववेत्त्याशी केली होती. तेव्हा ते हसत म्हणाले होते, ‘पण मी त्याच्यासारखा विक्षिप्त नाहीये.’
परांजपेंच्या लिखाणात एक समान धागा आहे. तो कोणता? जगातल्या सगळ्या गोष्टी विस्कळीत असतात. पण जसा वेळ जातो तशी त्यांना एक सुसूत्रता येते. यावर परांजपे म्हणतात, ‘मी दोन गोष्टींचा शोध माझ्या सगळ्या लिखाणातून घेतोय- स्वत:चा व आधुनिक भारताचा. आधुनिक भारताचं तिच्या संस्कृतीशी व परंपरेशी काय नातं आहे हे शोधण्यात मला रस वाटतो. आधुनिकता हा महामार्ग समजायला हरकत नाही. पण मी पायवाटांच्या शोधात आहे. आज भारताला व पर्यायानं जगाला धर्माधतेपासून वाचवायचं असल्यास धर्मनिरपेक्षता उपयोगाची नाही. आध्यात्मिक चिंतन अधिक मोलाचं आहे असं मला वाटतं.’
परांजपेंना मी ‘आता यापुढील प्रोजेक्टस कोणते?’ असा सहज प्रश्न विचारला. त्यावर परांजपे म्हणाले, ‘सध्या तरी दोन आहेत. पहिलं म्हणजे एकोणिसाव्या शतकातील भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्याचं ब्रिटिश साम्राज्यविरोधी आंदोलनातलं स्थान व महत्त्व. यात मी राजा राममोहन रॉयपासून सुरुवात करून डेरोझियापाशी थांबतोय.  दुसरं पुस्तक महात्मा गांधींवर लिहितोय.’
गप्पांच्या ओघात संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. त्यांचा निरोप घेऊन मी खोलीबाहेर पडलो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2012 12:57 pm

Web Title: acts of faith journeys to sacred india
Next Stories
1 आवाऽऽज बंद झाला!
2 बाळासाहेबांचा करिष्मा
3 शिवसेनेसमोरील नवी-जुनी आव्हाने
Just Now!
X