अभिव्यक्तीची कोंडी झाली की माणसं विकृतीकडे वळतात. वाळव्यातील तरुणास स्वत:लाच व्हॉट्स अ‍ॅपवर श्रद्धांजली वाहून जीवनयात्रा संपवावीशी वाटते यावरून त्याची व्यक्त होण्याची निकड लक्षात घ्यायला हवी. आपणा प्रत्येकालाच काही ना काही सांगायचं असतं. समाजनियम, संस्कार, रीतीभाती यामुळे बंड करण्यासाठी आवश्यक संधी आणि माध्यमं आजवर मिळत नव्हती. ही कोंडी स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे फुटली. राजकारण, समाजकारण तसेच वैयक्तिक आयुष्यात ‘माझंही मत आहे.. आणि ते व्यक्त केलं तरीही कुणी रोखणारं नाही’ हे कळल्यानंतर निर्माण झालेला आजचा गुंता अत्यंत कळीचा आहे. वाळव्यातील तरुणाच्या आत्महत्येनंतर ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर कशासाठी केला जातो, याचा शोध घेतला असता कळलं, की वापरला जाणारा बहुतांश डेटा व्हिडिओ डाऊनलोिडगसाठी असतो. त्यातही अश्लील फिल्म्स पाहण्याचा कल अधिक आहे. एकूण वापराच्या तब्बल २० टक्के! त्यामुळे अभिव्यक्तीची कोंडी ‘तसल्या’ प्रकारातील आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य़ांमध्ये भ्रमणध्वनीचे बिल हे बोलण्याचे कमी आणि डेटा-वापराचेच अधिक असल्याची निरीक्षणे आहेत. सामाजिक संकेतस्थळं ही करमणुकीच्या पातळीवरच आहेत. त्यातून कामाचं बोलणं  होतच नाही. ग्रामीण भागात तर ते प्रचाराचं हत्यारच आहे. शहर व ग्रामीण भागात मोबाइल दरांमध्ये फार तफावत नाही. पण लोकांना व्यक्त व्हायचं आहे, मनातील कोंडी फोडण्यासाठी काहीएक साधन हवं आहे. शासनाने शैक्षणिक संस्थांसाठी इंटरनेटची खास सोय उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयं त्याला जोडली आहेत. पण त्यांचा वापर एकूण वापरात नगण्य म्हणता येईल असाच आहे. खरं तर अशी संकेतस्थळं तातडीने बंद करणं तंत्रज्ञास सहजशक्य आहे. असा निर्णय घेतला तर सर्वाधिक ओरड दूरसंचार कंपन्या करतील. व्यक्त होण्यासाठी माध्यमबदलाचा वेगही खूप अधिक आहे.
पूर्वी संगणकावर फेसबुक पाहिलं जायचं. फार तर हिंदी गाणीही डाऊनलोड व्हायची. आता स्मार्टफोन हातात आल्याने व्हिडिओ डाऊनलोडिंगचं प्रमाण वाढलं आहे. ज्या दिवशी क्रिकेटची मॅच असते, त्या दिवशीही डाटा वापरण्याचं प्रमाण अधिक असतं. ८ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गेम डाऊनलोड करून खेळण्याचं प्रमाणही दहा टक्क्य़ांच्या घरात असल्याचं या विभागातील तज्ज्ञ सांगतात. सांगलीची घटना आणि ग्रामीण भागात वापर होणारा इंटरनेटचा डेटा यांचं विश्लेषण तेंडुलकरांच्या नाटकांची आठवण करून देतं. त्यांच्या काही नाटकांचा केंद्रबिंदू हिंसा आणि लैंगिकता हा होता. मनोविश्लेषणाच्या पातळीवर या अशा घटना खूप गुंतागुंतीच्या असल्याचं डॉ. विनय बऱ्हाळे सांगतात.
होळी हा सण माणसाच्या मनातील बीभत्स गोष्टी व्यक्त करण्याचा आहे. माणसाच्या अंतर्मनातील अनुचित गोष्टी व्यक्त व्हाव्यात याकरताचा हा सण. या सणामागे समाजव्यवस्थेची निकड  दडली आहे. हिंसा आणि लैंगिक भावना या दोन्ही गोष्टी ‘ऊर्मी’ (इन्स्टिंक्ट) या शब्दात सामावतात. त्यांचा योग्य तऱ्हेनं निचरा होण्यासाठी तसं वातावरण लागतं. ग्रामीण भागात तसं वातावरण नाही. त्यामुळे साहजिकच व्यक्त होण्यासाठी जे कोणतं माध्यम उपलब्ध असेल तेथे या प्रकारचा संवाद होऊ लागतो. माणसाच्या ‘व्यक्त’ होण्याला पोषक वातावरण मिळालं नाही तर माणूस आणि पशू यांत ऊर्मीच्या पातळीवर वेगळेपण उरत नाही. व्यक्त होण्याची ही प्रक्रिया संपर्कक्रांतीमुळे वेगवान आणि अनियंत्रित झाली आहे. परिणामी सामाजिक संकेतस्थळांवर ‘तसलं’ काहीतरी पाहणं हा रिकामपणाचा उद्योग बनून राहिला आहे. सांगलीतील या कोवळ्या तरुणाच्या आत्महत्येच्या प्रकाराने कसं ‘व्यक्त’ व्हायचं आणि कोणत्या बाबींवर नियंत्रण असायला हवं, याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.