सिनेमा, जाहिरात, मालिकांच्या चित्रीकरणासाठी खोटे खोटे गाव, हवेली, बाजार आणि परदेशी स्थळेही उपलब्ध करून देणे हे हैदराबादच्या ‘रामोजी फिल्म सिटी’चे वैशिष्टय़. नावातच ‘फिल्म’ असल्याने हीरोने एकाच फटक्यात चार गुंडांना लोळवणे किंवा जिवावर बेतणाऱ्या कसरती करून हीरोइनला वाचविणे असे लुटुपुटूच्या मारामाऱ्यांमधील प्रसंग या वातावरणाला नवे नाहीत. पण आता हिरव्यागार वनराईने नटलेले, मनमोहक बागांनी सजलेले, वळणावळणाचे हे आखीवरेखीव, छोटेखानी नयनरम्य शहर पर्यटकांमधील खरेखुरे ‘साहस’ पाहण्यासाठी सज्ज झाले आहे.
विविध प्रकारच्या शूटिंगकरिता निरनिराळ्या लोकेशन्स रामोजी चित्रनगरीमध्ये मौजूद आहेत. परंतु आता lr21या व्यवसायाला आलेल्या मर्यादांमुळे जवळपास दोन हजार एकर जमिनीवर वसलेल्या या चित्रनगरीत पर्यटकांसाठी विविध आकर्षणस्थळे उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
पर्यटनाच्या नवनवीन आधुनिक कल्पनांपैकी ज्या ज्या म्हणून या ठिकाणी विकसित करता येतील, त्या त्या विकसित करण्याच्या दृष्टीने सध्या येथे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटकांमध्ये धाडसी खेळांविषयी असलेले आकर्षण लक्षात घेऊन सुमारे २७ एकर जमिनीवर विकसित करण्यात आलेले ‘साहस’ हे नवे पर्यटन केंद्र हा याच प्रयत्नांचा एक भाग.
‘साहसी खेळांच्या बाबतीत पर्यटकांमध्ये असलेले कुतूहल लक्षात घेऊन आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा ‘साहस’च्या माध्यमातून पुरविण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी सांगितले. एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या साहसी खेळांचा अनुभव देणारी ही आशियातील सर्वात सुसज्ज अशी साहसभूमी असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी या प्रकारच्या धाडसी खेळांमध्ये गणना होणाऱ्या पॅराग्लायडिंग, पॅरास्लायडिंग आदी अनेक महत्त्वाच्या साहसी क्रीडाप्रकारांचा समावेश रामोजी फिल्मसिटीच्या भौगोलिक मर्यादांमुळे त्यांना करता आलेला नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे पाण्याशी संबंधित चित्तथरारक क्रीडाप्रकारही येथे अनुभवता येत नाहीत. त्यामुळे या खेळांची कसर नेट कोर्स, हाय रोप आणि हार्नेस कोर्स, झोर्बिग, एटीव्ही राइड्स, बंजी इजेक्शन आदी चित्तथरारक व धाडसी खेळांमधून भरून काढण्यात आली आहे.
‘साहस’मधील साहसी खेळ विकसित करण्याकरिता फ्रान्समधील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. सध्या तरी कॉर्पोरट्सकरिता ‘साहस’ खुले आहे. परंतु कुटुंबातील प्रत्येकालाच याचा थरार अनुभवता येईल यादृष्टीने ‘साहस’मध्ये विविध खेळांची रचना करण्यात आली आहे. हे ‘साहस’ थीमपार्क २७ एकर जागेवर विकसित करण्यात आलेले आहे. उंच टेकडय़ा, पठारे, दगडी चढउतार, खडकांचे सुळके अशी या परिसराची वैविध्यपूर्ण रचना करण्यात आली आहे.
यात चार वेगवेगळ्या पातळ्यांवरचे हाय रोप, हार्नेस कोर्स आहेत. टप्प्याटप्पाने हे कोर्स कठीण होत जातात. प्रत्येक कोर्स संपल्यानंतर झिप लाइनच्या माध्यमातून खाली उतरण्याची सोय आहे. झिप लाइनने उंचावरून दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याची गंमत अनुभवल्यानंतर कोर्स पूर्ण करताना दाखविलेल्या साहसाचे चीज झाल्यासारखे वाटते.
नेट कोर्सवर २४ विविध प्रकारचे कोर्स आहेत. हा भारतातला सर्वात मोठा नेट कोर्स असल्याचे सांगण्यात येते. यात बुद्धी, एकाग्रता आणि शरीरचापल्य यांचा कस लागतो. फळ्या, दोरी, लाकडाचे छोटे छोटे ओंडके यांच्या साहाय्याने तयार केलेल्या मार्गानी हा कोर्स पूर्ण करावा लागतो. त्याच्या दोन पातळ्या आहेत. वरची पातळी प्रौढांसाठी, तर खालची लहान मुलांसाठी आहे. बऱ्यापैकी उंची असलेली पाच वर्षांची मुलेही हे कोर्स पूर्ण करू शकतात. आव्हानात्मक असल्याने मुलांनाही त्याची मजा लुटता येते. हे संपूर्ण कोर्स जाळ्याने बंदिस्त असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरीही यातील प्रत्येक कोर्स पूर्ण करणे आव्हानात्मक असल्याचे ‘साहस’चे प्रशिक्षक अमित भागवत यांनी सांगितले.
पेंटबॉल या लुटुपुटूच्या युद्धातूनही वेगळ्या प्रकारचा थरार अनुभवता येतो. हा थरार पाहण्याकरिता गॅलरीची सोय आहे. याशिवाय सुमो रेसलिंग, मेल्टडाऊन, फूस बॉल, बॉडी झोर्ब फाइट, टेली बॉक्सिंग अशा गमतीदार खेळांचाही आनंद पर्यटकांना घेता येईल. एटीव्ही राइड्समध्ये खडकाळ, मातीच्या, रेतीच्या, दगडी अशा विविध प्रकारच्या जमिनींचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्यात प्रौढांबरोबरच लहान मुले आणि महिलांनाही शर्यती लावता येतात. तर त्यावर माऊंटन बायकिंगदेखील करता येते. दुचाकी चालविण्याचा अनुभव नसलेल्यांनाही या अवाढव्य गाडय़ा थोडय़ाफार सरावानंतर चालवता येतात, हे विशेष. याशिवाय शारीरिक कसरतींचा कंटाळा येणाऱ्यांकरिता शूटिंग, तिरंदाजी यांचीही सोय करण्यात आलेली आहे. या खेळांचा अनुभव घेण्यात एक संपूर्ण दिवस निश्चितपणे लागतो. ‘साहस’मधील सर्व खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुरक्षाविषयक तंत्राने युक्त आहेत. याशिवाय या खेळांमध्ये निपुण असलेले तज्ज्ञ प्रशिक्षक पर्यटकांना मार्गदर्शन करीत असतात.‘साहस’व्यतिरिक्तही लहान मुलांसाठी मनोरंजनपर खेळांचे ‘युरेका’ हे थीम पार्क, अनेक रंगीबेरंगी परदेशी पक्ष्यांचे बर्ड पार्क, चित्रपट व मालिकांकरिता वापरले जाणारे भव्य सेट्स, वळणावळणावर असलेले सुंदर बगीचे अशा अनेक गोष्टी रामोजी चित्रनगरीमध्ये अनुभवता येतात. भविष्यात ‘रामोजी’मध्ये आध्यात्मिक आणि कृषी- पर्यटन विकसित करण्याची योजना असल्याचे रामोजी राव यांनी सांगितले. मात्र, त्याकरता शेकडो एकर जमिनीची गरज भासणार आहे. त्यामुळे येत्या तीन-चार वर्षांत यासंबंधातील योजना प्रत्यक्ष कागदावर उतरेल अशी माहितीही त्यांनी दिली.