संगीतकार तसेच अनेक गाजलेल्या जाहिरातींच्या जिंगल्सचे निर्मिक अशोक पत्की यांची जिंगल्सच्या दुनियेतली स्वैर भटकंती कथन करणारे पाक्षिक सदर…
‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा एका मिनिटाची असतात.
जिंगल्स अवघ्या एका मीटिंगमध्ये ठरतात. क्लायंट किंवा एजन्सीला नेमकं काय हवंय, हे या बैठकीत सांगितलं जातं. रेडिओसाठी जिंगल असेल तर बैठकीत त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा होते. म्हणजे जिंगल कोणत्या उत्पादनासाठी आहे? ती कोण गाणार? किती सेकंदाची आहे? ‘व्हॉइस ओव्हर’ कोण करणार? त्याला कोणत्या पद्धतीचं संगीत हवंय? भारतीय की पाश्चात्य धर्तीचं?.. वगैरे.
या बैठकीपूर्वी क्लायंटकडून (ज्याची जाहिरात करायची आहे त्या वस्तूचा वा सेवेचा निर्माता किंवा उत्पादक) अ‍ॅड एजन्सीला फोन जातो. क्लायंट्स कोणत्या एजन्सीकडे काम दिलं तर आपल्या जिंगलला पूर्ण न्याय मिळेल याचा विचार करूनच त्या एजन्सीकडे जातात. त्यांचं जाहिरातीचं बजेट ठरतं. त्यात रेडिओ, टीव्ही, होर्डिग्ज, रेल्वेस्टेशन्स व/ वा बसस्टॉप किंवा अन्य ठिकाणी ती जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी येणारा खर्च (बजेट) किती असेल, हे त्यांच्या चर्चेत निश्चित होतं.
हे सारं ठरलं की एजन्सीची स्वत:ची एक ‘लँग्वेज कमिटी’ असते. जिंगल कोणत्या भाषेत करायचीय, हे तीत ठरतं. मग त्या भाषेत जिंगल लिहून घेऊन ती क्लायंटकडून आधी संमत करून घेतली जाते. तिला एकदा का हिरवा कंदील मिळाला, की मग क्लायंटला इतरही भाषेत ती करायची असल्यास त्या- त्या भाषेतल्या संहिता लेखकाकडे ती जिंगल पाठविली जाते. मूळ जिंगलचा तिला दिल्या गेलेल्या संगीताच्या अनुषंगानेच दुसऱ्या भाषेत अनुवाद करावा लागतो. जिंगलचं संगीत कोणी करावं, याचाही विचार होतो. पाश्चात्य धर्तीचे असल्यास लुईस बॅक्स्-लेझली.. भारतीय संगीतात करायचं झाल्यास वनराज भाटिया, वैद्यनाथन, अशोक पत्की वगैरे नावं पुढे येतात. समजा, माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास मला एजन्सीचा फोन येतो. ‘उद्या जिंगल करायचंय,’ असं सांगितलं जातं. अमुक अमुक गायकाला सांग, स्टुडिओ आरक्षण, वाद्यवादकांना बोलवा, वगैरे गोष्टी संगीतकारावरच सोपवल्या जातात.
दुसऱ्या दिवशी स्टुडिओत पोहोचल्यावर संगीतकाराच्या हाती जिंगलचं स्क्रिप्ट पडतं. त्यात जिंगलचा कालावधी किती? गायक कोण? व्हॉइस ओव्हर कोण, वगैरे लिहिलेलं असतं. समजा, सकाळी दहा वाजता स्टुडिओत पोहोचलो, की आमच्या हाती एक-दीड तास असतो. त्या वेळात जिंगलला ‘चाल’ लावणे, ती एजन्सीकडून संमत करून घेणे आणि ट्रॅक तयार करणे वगैरे आटोपायचं असतं. कारण दीड तासाने गायक येणार असतो. त्याआधी  ‘ट्रॅक’ तयार पाहिजे. सिंथेसायजर वगैरे नव्हतं त्याकाळी वादकांसमवेत आयत्या वेळी तिथल्या तिथं काम करावं लागायचं. तबला, ढोलक, कोंगो, बोंगो, फ्लूट, सितार, स्पॅनिश अशी सर्वसाधारण वाद्यं असत. पुढे काळ बदलत गेला तसं फक्त सिंथेसायजर व रिदम बॉक्सवर काम होऊ लागलं.
स्क्रिप्ट हातात पडल्यावर त्या जिंगल्सच्या चार-पाच ओळी २० किंवा ३० सेकंदांत बसवायच्या म्हणजे त्याचा ‘टेम्पो’ काय असावा, उत्पादनाचं नाव श्रोते/ दर्शक यांच्या मनीमानसी ठसेल अशी सुरावट कशी करावी, याचा विचार संगीतकाराला करावा लागतो. एका हातात स्टॉपवॉच व दुसऱ्या हाताने पेटी किंवा पियानोवर जिंगलला चाल लावण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक जिंगलच्या वेळी त्यात नावीन्य काय आणता येईल, याचाही विचार करावा लागतो. कारण एखाद् दुसरी नोटही दुसऱ्या कोणत्या जिंगलसारखी वाटली तर एजन्सीवाले ती बदलायला सांगतात. म्हणजे सतत डोळे आणि कान उघडे ठेवून काम करावं लागतं.
गायक (किंवा गायिका) आला की  ध्वनिमुद्रण सुरू होतं. बरं, त्याला त्या जिंगलची फक्त चालच तेवढी गायची नसते, तर त्यात ‘नाटय़’ही आणायचं असतं. जिंगलच्या क्षेत्रात विनय मांडके, सुषमा श्रेष्ठ (पूर्णिमा), प्रीती सागर ही दादा मंडळी आहेत. रेडिओवर जिंगल ऐकली तरी त्यातल्या ओतप्रोत भावनांनी ती इतकी जिवंत वाटायला हवी, की ऐकणाऱ्याला जबरदस्त इच्छा व्हायला हवी, की ही वस्तू आत्ताच्या आत्ता जाऊन आपण विकत घेतली पाहिजे. यालाच जाहिरातीचं ‘मार्केटिंग’ म्हणतात. चॉकलेटची जाहिरात असेल तर मुलाने आई-वडिलांकडे हट्ट धरलाच पाहिजे, किंवा भांडी घासण्याचा साबण वा लिक्विड असेल तर बाईला वाटलंच पाहिजे, की आजच बाजारात जाऊन मी ते घेऊन यावं. माझ्या हातांना त्यानं आराम मिळेल.
पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या  स्टुडिओत जायचो.  एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी)  ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर! अशी तब्बल २५ वर्षे मी या क्षेत्रात काम केलेलं आहे. माझं स्वत:चं, त्याचबरोबर पी. वैद्यनाथन्, वनराज भाटिया, सुरेशकुमार यांचीही कामं त्यात असायची. एक वादक म्हणून मी भरपूर काम केलंय या मंडळींबरोबर!
पूर्वी अशी पद्धत प्रचलित होती, की एकाच जिंगल्सच्या तीन- तीन चाली आम्हाला लावाव्या लागत. त्यातली मग क्लायंट आणि एजन्सीला कोणती आवडलीय, हे ते फोनवरून सांगत. त्यांच्या पसंतीस उतरलेली जिंगल मग दुसऱ्या दिवशी ध्वनिमुद्रित केली जाई.
स्ट्रँड सिनेमा (कुलाबा) येथे एक स्टुडिओ होता. आर. टी. व्ही. सी. नावाने तो प्रसिद्ध होता. कुसूम कपूर व रावसाहेब यांचा तो स्टुडिओ होता. रावसाहेबांचे टुरिस्ट हॉटेल कोल्हापुरात खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे त्याकाळी जिंगल्ससोबत अध्र्या तासाचे जाहिरातींचे रेडिओ प्रोग्रॅमही व्हायचे. मराठीमध्ये ‘राघू-मैना’ व हिंदीत ‘तोता-मैना’! त्यात सर्व बडी माणसं ‘ड्रामा’ करायची. छोटी छोटी गाणीही त्यात असत. तबस्सुम, सुधा चोपडा, हरीश भिमानी, विनोद शर्मा, विजय बहेल अशी त्यावेळची मातब्बर निवेदक मंडळी त्यात असायची. आणि गाणं आलं की ती स्वत:च गायचीदेखील! गाण्यांना चालीही मी तिथल्या तिथे लावून त्यांना शिकवायचो आणि रेकॉर्ड करायचो. दिवसभरात असे दोन प्रोग्रॅम होत. म्हणजे जवळजवळ १५ ते १६ गाणी!
एकदा गंमतच झाली. मला दोन-अडीचपर्यंत ताप होता. मी कुसुमजींना फोन केला, की मला ताप आहे, मी नाही येऊ शकणार. उभं राहायचीही मला ताकद नव्हती. त्या म्हणाल्या, ‘आता कसं होणार? दोन्ही प्रोग्रॅम आज रात्रीच रेडिओला पाठवायचे आहेत. उद्या ब्रॉडकास्टिंग आहे. तू टॅक्सी कर आणि इथे ये.. प्लीज!’ मलाही त्यांची अडचण कळत होती. मी अंगात ताप असताना तसाच गेलो. त्यांनी माझ्या हातात स्क्रिप्ट दिलं. मी तो दिवस अक्षरश: झोपून पेटीवर कम्पोझिशन केलं आणि त्यांना शिकवलं. तापाने फणफणलेला असूनही मी दिवसभर काम केलं. सगळ्यांना माझं भारी कौतुक वाटलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्या एपिसोडला ‘फ.अ.ढ.अ.’ चा सवरेत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही मिळाला मला!
सिनेमातल्या पाच मिनिटांच्या एखाद्या गाण्याला चाल लावणं म्हटलं तर सोपं असतं. तुम्हाला आठ-दहा दिवस आधी हातात गाणं मिळतं. त्यावर विचार करायला भरपूर वेळ असतो. निर्माता, दिग्दर्शक व कवीबरोबर त्यावर चर्चा होते. विचारांची देवाणघेवाण होते. आणि मग गाणं ध्वनिमुद्रित होतं. या साऱ्यासाठी वेळच वेळ असतो. नाटकाचंही तसंच असतं. पण जिंगल म्हणजे तुमची खरी सत्त्वपरीक्षा असते. सर्व काही उत्स्फूर्तपणे तिथल्या तिथे करावं लागतं. तीच जिंगल जर दुसऱ्या भाषेत करायची असेल तर त्याच मास्टर ट्रॅकवर प्रत्येक भाषेतल्या स्क्रिप्ट रायटरबरोबर बसून नव्याने जिंगल तयार करावी लागते. त्याच मूळ ‘मीटर’मधला त्या- त्या भाषेतला चपखल शब्द अनुवादकाला त्याकरता शोधावा लागतो. त्यानंतर गायकाला त्याचं उच्चारण शिकवावं लागतं. अमूक एक शब्द उच्चारताना जीभ कुठे लावावी? टाळ्याला की दातांना? वगैरे बारीकसारिक गोष्टी त्याला शिकवाव्या लागतात. कविता कृष्णमूर्तीला दक्षिणी भाषा तसेच बंगाली, ओडिशा, आसामी, हिंदी, इंग्लिश उत्तम अवगत असल्यामुळे तिला याचा त्रास होत नाही. पण विनय मांडके, सुषमा श्रेष्ठ, प्रीती सागर, विनोद राठोड यांना अन्य भाषांतील जिंगल्ससाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
काही एजन्सीवाल्यांना काही नवीन प्रयोग करण्याच्या भरात वाटतं की, दहा-बारा सेकंदात एखादी जिंगल करायची तर त्यात कठीण ते काय? आपण अनू मलिक वा भप्पी लाहिरींकडून ती करून घेऊ. एकदा असे एक-दोघेजण गेले त्यांच्याकडे. पण ते म्हणाले, ‘आपको टय़ून सुनाते है. लेकिन वह डेढ- दो मिनिटसे कम नहीं होगी.’ आम्हाला मात्र आता जिंगल्स निर्मितीची इतकी सवय झाली आहे, की जणू रक्तातच भिनलं आहे ते! अर्थात हा सवयीचा परिणाम आहे. मला झटपट चाल लावण्याची सवय लागली ती जिंगल्समुळेच! हातात कागद पडला की दहाव्या मिनिटाला माझी चाल तयार असते. माझी एक खासियत आहे. पेटीवर हात ठेवून सूर छेडता छेडता ओठांवर कधी हसू यायचं तेच कळायचं नाही. विनय मांडकेने याचा अभ्यास केला होता. माझ्या तोंडावर हास्य दिसलं, की तो ओळखायचा, की अशोकला हवी ती चाल सुचली आहे!
(पूर्वार्ध)
डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘एक झाड, एक पक्षी’ हे मासिक सदर पुढील आठवडय़ात…

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
Fraud of crores by selling replicas of famous painters including MF Hussain Mumbai
एम.एफ हुसैनसह प्रसिद्ध चित्रकारांच्या प्रतिकृती विकून कोट्यावधींची फसवणूक; हवाला नेटवर्कच्या माध्यमातून मनी लाँडरींग