भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या बरोबर एक र्वष आधी अनंत अंतरकर यांनी ‘हंस’ हे वाङ्मयीन मासिक सुरू केलं, तर स्वातंत्र्यानंतर एक वर्षांनी ‘मोहिनी’ हे मासिक सुरू केलं. त्याआधी त्यांनी ‘सत्यकथा’ आणि ‘वसंत’ मासिकांतही काही काळ काम केलं होतं. पुढे १९५३ साली अंतरकरांनी ‘नवल’ सुरू केलं. अशा या तीन भिन्न प्रकृतीच्या आणि स्वभावधर्माच्या मासिकांचे संस्थापक-संपादक असलेल्या अनंत अंतरकर यांचं जन्मशताब्दी वर्ष २०१०-११ साली साजरं झालं. त्यानिमित्तानं त्यांच्या एका मुलीनं अनुराधा औरंगाबादकर यांनी ‘‘अनंता’ची फुलं’ हे त्यांचं चरित्र लिहिलं, तर दुसऱ्या मुलीनं, म्हणजे प्रस्तुत संपादिकेनी त्यांच्याविषयीच्या या स्मृतिगौरवग्रंथाचं संपादन केलं आहे.
या पुस्तकाचे एकंदर चार विभाग आहेत. ‘सुहृदांची अंतरे’ या पहिल्या विभागात विविध लेखक, पत्रकार यांनी अंतरकरांविषयी लिहिलेले लेख आहेत. ‘निवडक अंतरकर’ या दुसऱ्या विभागात अंतरकरांच्या ‘चोरटे हल्ले’ व ‘गाळीव रत्ने’ या पुस्तकातील आणि इतर काही लेख आहेत. ‘सहचरी-निर्मला अंतरकर’ या तिसऱ्या विभागात स्वत:च्या आईविषयी अरुणा अंतरकर यांनी लिहिलं आहे.
‘सुहृदांची अंतरे’ या पहिल्या विभागात एकंदर एकवीस लेख आहेत. त्यात ना. सी. फडके, पु. भा. भावे, अरविंद गोखले, बाळ सामंत, विजय तेंडुलकर, रमेश मंत्री, शि. द. फडणीस, यशवंत रांजणकर, इंद्रायणी सावकार, वसंत शांताराम देसाई,    शं. ना. नवरे,  इत्यादींचा समावेश असून, आनंद आणि अरुणा (प्रस्तुत पुस्तकाच्या संपादक) या अंतरकरांच्या मुलांचेही लेख आहेत. लेखांचा क्रम पुस्तकात जो दिला आहे तो तसाच का दिला आहे, याचा संपादिकेनी खुलासा केलेला नाही. पण सर्व लेख वाचल्यावर लक्षात येतं की, यातील बरेचसे लेख हे अंतरकरांच्या निधनानंतर म्हणजे १९६६ नंतर लिहिले गेले असावेत. जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखांची संख्या त्या तुलनेत कमी असावी. इतक्या उशिरा लेख छापताना त्या लेखांची पूर्वप्रसिद्धी, वर्षे इत्यादी तपशील लेखासोबत दिला असता तर तो लेख वाचताना अधिक सोयीचं ठरलं असतं. संपादनाची शिस्त म्हणून ते गरजेचं होतं, पण तसं झालेलं नाही. (त्याचा अतिशय त्रोटक उल्लेख शेवटच्या विभागात केला आहे.) शिवाय लेखांचा क्रमही फारसा व्यवस्थित वाटत नाही. ना. सी. फडके यांचा पहिलाच लेख अतिशय जुजबी आणि सामान्य आहे. शिवाय त्यातली माहिती इतर लेखांतही आली आहे. तेव्हा हा लेख आणि मजकुराची पुनरावृत्ती व नावीन्य वाटावं असं काही नसल्यानं शं. ना. नवरे, भा. ल. महाबळ, श्रीराम शिधये आणि आशा काळे यांचे लेखही वगळता आले असते तर जास्त बरं झालं असतं. विजय तेंडुलकर, अरविंद गोखले, शि. द. फडणीस, यशवंत रांजणकर यांचे लेख अंतरकरांचे संपादक म्हणून आणि माणूस म्हणून वेगवेगळे पैलू प्रत्ययकारीरीत्या उलगडून सांगणारे आहेत. त्यातून अंतरकरांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची चांगल्या प्रकारे ओळख होते. आनंद आणि अरुणा या अंतरकरांच्या मुलांचे लेख तसे वाचनीय आहेत, पण त्यात काही अनावश्यक ठिकाणी अतिशयोक्ती, उपमा-अलंकार यांची भरमार झाल्याने ते विशेष पकड घेत नाहीत. वडिलांबद्दल लिहिताना फारसं तटस्थपणे पाहणं शक्य नसल्याने असं होणं साहजिक आणि समजण्यासारखंही आहे.
यानंतरचा तब्बल २४४ पानांचा दुसरा विभाग आहे अंतरकरांच्या निवडक साहित्याचा. सुरुवातीला ‘चोरटे हल्ले’ या पुस्तकातील निवडक लेख आहेत. त्यानंतर ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘विविधवृत्त’ या तीन नियतकालिकांमध्ये १९४० साली त्यावर आलेली परीक्षणे दिली आहेत. शिवाय नामवंतांची प्रशस्तीही. त्यानंतर ‘गाळीव रत्ने’ या पुस्तकातील निवडक लेख आहेत. त्यानंतर या पुस्तकावरील १९४३ साली ‘सत्यकथा’त प्रकाशित झालेला वि. ह. कुळकर्णी यांचा लेख आणि ‘विविधवृत्त’मधील एक परिच्छेद दिला आहे. त्यानंतर अंतरकरांच्या इतरत्र प्रकाशित झालेल्या एक हास्यकथा, एक सांगीतिका, दोन ललित लेख आणि एक रहस्यकथा या लेखनाचा समावेश आहे. १९४०-४३ साली लिहिलं गेलेलं विनोदी साहित्य आज तेवढं विनोदी वाटणार नाही ही उघड गोष्ट आहे. त्यामुळे ‘चोरटे हल्ले’ आणि ‘गाळीव रत्ने’ या पुस्तकातील निवडक लेख आता वाचनीय वाटत नाहीत. ‘संपादकांची सुखदु:ख’ आणि ‘घाईत घाई’ हे ललितलेख मात्र अंतरकरांच्या संपादकीय अनुभवांशी निगडित असल्याने ते चांगले जमले आहेत. या दोन लेखांतून मासिकाच्या संपादकाला कोणकोणत्या व्यवधानातून जावं लागतं, याची तोंडओळख होते.
या पुस्तकाच्या मलपृष्ठावर अंतरकरांविषयीचे विविध लेखकांचे  अभिप्राय छापले आहेत आणि त्यांचेच पहिल्या विभागात अंतरकरांविषयीचे लेख आहेत. या सर्वानी अंतरकरांच्या संपादक असण्याविषयी भरभरून आणि अभिमानानं लिहिलं आहे. एका ध्येयनिष्ठ, कष्टाळू आणि निस्सीम वाङ्मयप्रेमी संपादक म्हणून अंतरकर कसे होते, याचं सम्यक आणि समतोल चित्रण त्यांच्या लेखातून उभे राहतं. पण इथेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या मान्यवरांनी अंतरकरांविषयी ज्या आदरानं आणि प्रेमानं लिहिलं आहे, तसं त्यांनी अंतरकरांच्या लेखनाविषयी लिहिलेलं नाही. किंबहुना, तो उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला असावा, असं त्यांचे लेख वाचताना वाटतं. ही गोष्ट बरीच सूचक आणि बोलकी आहे. अंतरकर संपादक म्हणून श्रेष्ठ होते, यात काही वाद नाही, पण ते चांगले लेखक होते का, याचा विचार करण्यासारखा आहे. किमान त्यांचं या पुस्तकातलं लेखन वाचून तसा प्रश्न नक्कीच पडतो. त्यामुळे त्यांच्या साहित्याला इतकी पाने देऊन निव्वळ पुस्तकाचा आकार आणि किंमत वाढण्यापलीकडे फार काही साध्य झालेलं नाही. पुस्तक लिहिताना किंवा संपादित करताना त्याचा आकार आणि किंमत यांचाही विचार करायला हवा. कारण पुस्तक विनाकारण मोठं केलं की त्याची किंमत वाढते आणि मग अशी पुस्तकं वाचक आकार आणि किमतीच्या निकषावर मागे टाकतात. परिणामी, संबंधित लेखकाचे वा संपादकाचे काम दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. या पुस्तकाचंही काटेकोरपणे संपादन केलं असतं तर किमान १००-१५० पानं कमी होऊ शकली असती. परिणामी पुस्तक अधिक वाचनीय झालं असतं.
तिसऱ्या विभागात संपादिकेनी आपल्या आईविषयी लिहिलं आहे. त्यात शेवटी संपादिका लिहितात- ‘‘तू तिथे मी’ जातीचं प्रेम तिनं अण्णांवर केलं. त्यांचं समरसत्व इतकं होतं की, ती त्यांच्याबरोबर सतीच जायची! पण शेवटी तिच्यातली आई जिंकली!’ या एकाच वाक्यातून या लेखाची जातकुळी लक्षात येते. आई-वडिलांचं एकमेकांवरील नितांत प्रेम सांगण्याच्या नादात सती जाण्यासारख्या अमानुष प्रथेचं आपल्याकडून नकळतपणे समर्थन केलं जात आहे, याचंही भान राखलं गेलेलं नाही.
चौथा विभाग हा परिशिष्टे, संकीर्ण, अनंत-पत्रे यांचा आहे. त्यातील शेवटचा भाग हा अंतरकरांच्या निधनोत्तर निवडक प्रतिक्रियांचा आहे. तो असला काय अन् नसला काय, त्यानं पुस्तकाच्या गुणवत्तेत काहीही फरक पडत नाही. पण आपल्या वडिलांविषयी मान्यवर साहित्यिक काय म्हणतात, याचा सोस अधिक असल्यानं या गोष्टी घेतल्या असाव्यात. ‘‘अनंता’ची फुलं’मधून जसा अनंत अंतरकर यांना पूर्ण न्याय मिळत नाही, तसा या स्मृतिगौरवग्रंथातूनही मिळत नाही. ‘अभिजात साहित्यिक रुचीमुळे अनंत अंतरकर मर्यादित अर्थबळावर मात करून व्यवसायात अग्रभागी पोचले आणि तसेच टिकून राहिले.’ असं अतिशय नेमकं आणि सार्थ वर्णन विजय तेंडुलकरांनी केलं आहे. ‘सत्यकथा’ ते ‘हंस’ असा अभिरुचीसंपन्न प्रवास करणाऱ्या, ‘हंस’सारखं दर्जेदार मासिक काढणाऱ्या आणि ‘मोहिनी’, ‘नवल’सारखे वेगळे प्रयोग करणाऱ्या अंतरकरांना आता एका समर्थ चरित्रकाराची नितांत गरज आहे. त्याशिवाय त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची ओळख पुरेशा गांभीर्यानं होणार नाही असं वाटतं. त्यासाठी ‘अनंत अंतरकर आमचे वडील’ या मानसिकतेतून त्यांच्या मुलांनी बाहेर पडायला हवं, असं नम्रपणे सुचवावंसं वाटतं. कारण त्याशिवाय तरणोपाय नाही.
‘अक्षरयोगी’ (अनंत अंतरकर : व्यक्ती आणि कार्य) – संपादन- अरुणा अंतरकर, प्रकाशक- अरुणा अंतरकर, पुणे,   पृष्ठे – ४१५, मूल्य – ४५० रुपये.

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Satyaki Savarkar
Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल
friendly fight nashik
नाशिकमध्येही मैत्रीपूर्ण लढत करावी – काँग्रेसची मागणी