९९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी येत्या शंभराव्या नाटय़संमेलनाचे स्वरूप कसे असावे, त्या संमेलनाकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याबद्दल केलेले मुक्त चिंतन..

९९ वे अ. भा. मराठी नाटय़संमेलन फेब्रुवारीत नागपुरात भरगच्च कार्यक्रम नि परिसंवादांनी संपन्न झाले. या संमेलनाचा अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी म्हणजेच अस्मादिक आणि उद्घाटक होते ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार. ९९ व्या संमेलनातील अधिक-उण्याविषयी मी इथे काहीच म्हणणार नाही. मी इथे चर्चा करणार आहे ती येत्या १०० व्या नाटय़-संमेलनाविषयी!

कसं असावं शंभरावं अ. भा. मराठी नाटय़- संमेलन? अनेकांच्या अनेक कल्पना आणि संकल्पना असू शकतील. माझं म्हणणं- हे शंभरावं नाटय़संमेलन १९०५ ते २०१९ पर्यंत झालेल्या ९९ संमेलनांपेक्षा अत्यंत आगळंवेगळं व्हायला हवं. केवळ दिमाखदार नव्हे, तर विचारपरिपोषपूर्ण व्हायला हवं. पारंपरिक कालबाह्य़ गोष्टी पूर्णपणे बाजूला सारून! उदा. नव्या अध्यक्षाला सूत्रं देताना डोक्यावर घालण्यात येणारी पगडी. पगडी पुणेरी असो वा फुले पगडी असो किंवा शाहू पगडी अथवा शिंदेशाही; कुणाला हवी ही पगडी, तर कुणाला ती! मग हवीच कशाला पगडी? अशी मतभिन्नता निर्माण करण्यापेक्षा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि संमेलनाध्यक्षपदाचा गौरव म्हणून अध्यक्षाच्या गळ्यात सुवर्णपदक घातलं जातंच की! अ. भा. मराठी नाटय़संमेलन हे अखिल मराठी माणसांचा मानबिंदू आहे. ते संकुचितता निर्माण करणाऱ्या कुठल्याही प्रतिकूल प्रतीकांत अडकवू नये. आजवर हे शक्य नसेल झालं, तर ते या शंभराव्या संमेलनापासून सुरू करावं.

मराठी नाटय़सृष्टीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकापासून झाली असे मानले जाते. जोपर्यंत भावेंच्या पूर्वी मराठी नाटक लिहिले गेले हे माहीतच नव्हते तोवर हे खरेच होते. पण १६५० च्या कालखंडात तंजावरमध्ये शहाजीराजे भोसले वा सरफोजीराजे भोसले मराठी नाटक लिहीत होते आणि ते रंगमंचावर सादरही केले जात होते याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. (पाहा : ‘मराठी रंगभूमी- उगम आणि विकास’ : कॅ. मा. कृ. शिंदे, पृष्ठ- २४; आणि ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’- मकरंद साठे, खंड पहिला, पृष्ठ- १३) शहाजीराजेंची नाटकं महाराष्ट्रात कुठं सादर झाली असं म्हणणं म्हणजे एका मराठी नाटककारावर अन्याय करणं होय. त्यांची ‘लक्ष्मीनारायण कल्याणम्’सह ३०-३५ नाटकं उपलब्ध झाली असून ती तंजावरच्या मराठा पॅलेस लायब्ररीत सुरक्षित आहेत. खरं तर सर्वप्रथम मराठी नाटककार म्हणून नाटय़-संमेलनाच्या पूर्वसंध्येला पहिलं अभिवादन केलं पाहिजे ते शहाजीराजे भोसलेंना आणि दुसरं वंदन विष्णुदास भावेंना- ज्यांनी व्यावसायिक रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. आणि तिसरं वंदन ‘तृतीय रत्न’कार जोतिराव फुलेंना- ज्यांनी पहिलं सामाजिक आणि प्रायोगिक नाटक लिहिलं. नाटय़ परिषदेला ही माझी विनंती : १०० वं नाटय़संमेलन या महनीय व्यक्तींचं स्मरण करूनच साजरं केलं पाहिजे. आणि पहिली स्त्री-नाटककार काशीबाई फडके (‘संगीत सीताशुद्धी’- १८८७) यांना कसं विसरता येईल? त्यांनाही पहिलेपणाचा मान स्त्री-नाटककार म्हणून दिला पाहिजे. इतकंच काय, पण पहिला नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, संगीतकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार आदी सगळे पहिले- सर्वानाच अभिवादन केलं पाहिजे.. शंभराव्या नाटय़ संमेलनाच्या निमित्तानं!

१०० व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाच्या निमित्तानं- शंभरावं संमेलन संपन्न होण्यापूर्वी महाराष्ट्रभर एक-दिवसीय ९९ नाटय़संमेलनं घेऊन (शक्य असेल तर जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं- अगदी तंजावरसह बडोदा, भोपाळ, हैदराबाद, इंदोर आदी ठिकाणीही!) मगच शंभरावं संमेलन घेतलं जावं, असं पत्र मी अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना २५ एप्रिल २०१९ रोजी दिलं आहे. हेतू हा, की ९९ संमेलनं महाराष्ट्रभर आयोजित करण्यास पुरेसा वेळ मिळावा. पण अजूनही या पत्रासंदर्भात परिषद नेमकं काय करणार आहे हे कळलेलं नाही. कदाचित नाटय़ परिषद यापेक्षा उत्तम असं वेगळं काही करणार असेल. या वेगळेपणाचं अर्थातच स्वागत.

पण आमच्या मराठी रसिकतेला प्रश्न पडू शकतो की, ९९ संमेलनं घ्यायची म्हणजे काय चेष्टा आहे? पण माझ्या मनात ती कशी दिसतात ते आधी सांगतो, म्हणजे ही संकल्पना राबवणं अवघड नाही हे लक्षात येईल. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मिळून नाटय़ परिषदेच्या एकूण ६० नाटय़शाखा आहेत. यातल्या ५० शाखा तरी कार्यरत आहेत असं मानू. या पन्नास शाखांना मध्यवर्ती शाखेनं प्रत्येकी दोन नाटय़संमेलनं घेण्यास सांगावं. शाखेनं एकाच वेळी दोन संमेलनं आयोजित करण्याची जबाबदारी घ्यावी. या संमेलनात मध्यवर्ती शाखेनं दूरस्थ नजर ठेवावी. शाखांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. गरज असेल तर विचारविनिमय करावा. ही संमेलनं केवळ एकच दिवसाची करावी. सकाळी दहा ते रात्री दहा. संमेलनाचा अध्यक्ष शाखांनी निवडावा. किंवा केंद्रीय समितीच्या मदतीनं ९९ अध्यक्षांची- जे यापूर्वी या सन्मानापासून दूर राहिले अशांची- निवड करावी. उद्घाटन, खुलं अधिवेशन- जिथं रंगकर्मी आपल्या व्यथा आणि वेदना सांगतील, काय नवं व कालसुसंगत घडायला हवं ते सांगतील, एखादा परिसंवाद आणि रात्री एक नाटक.. झालं संमेलन! शिवाय  शाखांना नवं वेगळं काही सुचलं तर ते त्यांनी या संमेलनात समाविष्ट करावं.

या ९९ संमेलनांना पैसा कसा आणि कुठून आणायचा? तर प्रत्येक नाटय़शाखेला ते अवगत असतेच. प्रत्येक गावांत, शहरांत अनेक नाटय़प्रेमी धनिक असतात. नगरसेवक, आमदार, खासदार वगैरेही असतात. ही संमेलनं भपकेबाज न करता, जेवणाच्या पंगती न उठवता, साधेपणानं, हजारएक लोक बसू शकतील अशा नाटय़गृहात वा हॉलमध्ये करावीत; जेणेकरून हा भार शाखांना पेलवेल. ही सर्व संमेलनं घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी केंद्रीय परिषदेनं आखून द्यावा. ही ढोबळ माहिती इथं देत आहे, ते एक अंदाज यावा म्हणून. सविस्तर चर्चा एकत्रित बसल्यानंतर एकमेकांच्या मदतीनं साकार होऊ शकते आणि दुर्मीळ अशी, शतकातून एकदाच मिळणारी ही संधी ९९ नाटय़संमेलनं महाराष्ट्रभर साजरी करून शंभरावं संमेलन जोरकसपणे साकार करण्याची किमया नाटय़ परिषद करू शकते. किंवा हे शंभरावं संमेलन असल्याने शंभर कोटींची मदत महाराष्ट्र शासनानं केली तर..? इच्छा तेथे मार्ग निघतो. मराठी माणूस नाटकाचं वेड जिवापाड जपत आलेला आहेच. ९९ नाटय़संमेलनांची दुर्मीळ संधी परिषद वाया घालवणार नाही असे वाटते.

माझ्या मनात आणखी एक घालमेल सुरू आहे. खरं म्हणजे ती घालमेल हे सगळं लिहीत असताना सुरू झालेली आहे. ती घालमेल अशी : हे १०० वं संमेलन असेल. साहजिकच आजवरच्या शंभर संमेलनाध्यक्षांची भाषणं एकत्रित प्रकाशित करून संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा ऐवज नाटय़रसिकांना उपलब्ध करून दिला तर..? मागील वर्षी संपन्न झालेल्या ९९ व्या नाटय़संमेलनात नागपूरकरांनी ९९ नाटय़- संमेलनाध्यक्षांची एकेक झलक दाखवली आहेच. या सर्व संमेलनाध्यक्षांची भाषणं म्हणजे रंगभूमीचा इतिहास. तो नाटय़ परिषदेनं उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे.

आणखी एक : नाटय़ परिषद आणि तिच्या शाखांबरोबरच महाराष्ट्रात अनेक नाटय़संस्था कार्यरत आहेत. काही तर अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. या शंभराव्या संमेलनात या सर्व संस्थांना सहभागी करून घेतलं तर सर्व नाटय़संस्थांचं  एक उत्तम नाटय़जाळं नाटय़ परिषद सिद्ध करू शकेल. आणि भविष्यात या सर्व नाटय़संस्था सरकारनं ‘कंपल्सरी’ रजिस्टर केल्या पाहिजेत; जेणेकरून महराष्ट्रदेशी किती नाटय़संस्था आहेत हे कळेल. नव्हे, तशी डायरीच प्रकाशित केली पाहिजे. यामुळे महाराष्ट्रात नाटय़संस्थांबरोबरच एकूण किती रंगकर्मी आहेत हेही कळेल.

या वर्षी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नाटय़-संमेलनाध्यक्ष म्हणून मी मतं मांडत आलो आहे. प्रत्येक नाटय़लेखन कार्यशाळेत मराठी नाटक जे एकारलेलं आहे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या चौकटीत वर्षांनुर्वष अडकलेलं आहे, त्यातून ते बाहेर काढलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. सबंध शेक्सपिअर मराठीत येतो, पण आमचा एकही लेखक अख्खाच्या अख्खा परभाषेत जात नाही. का जात नाही? याचा विचार आमच्या मनात का येत नाही? आणि येत असेल तर काहीच हालचाल का नाही? अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आमच्या मराठी नाटकात विशेषत: व्यावसायिक रंगभूमीवर का येत नाहीत? आणीबाणीचा कालखंड, अयोध्या रथयात्रा आणि बाबरी पतन, भारतीय लोकशाहीची स्थिती, आंतरराष्ट्रीय धोरण, जागतिकीकरण असे प्रश्न आमच्या लेखकांना दिसतच नाहीत. याचं कारण आमची वर्षांनुवर्षे एकारलेली दृष्टी.. यातून बाहेर पडायचं तर आपल्याला वाङ्मयाची अकरा ज्ञानसूत्रे समजून घ्यावी लागतील आणि समग्र जागतिक भान देणारं नवं स्वतंत्र नाटक लिहावं लागेल. त्यासाठी बोधी- म्हणजे ज्ञानदर्शी वाङ्मयमूल्ये समजून घ्यावी लागतील..

१) वेदना : वेदनेशिवाय कला नाही. २) जाणीव : जाणिवेशिवाय वेदनेला अर्थ प्राप्त होत नाही. वेदना झाल्या, पण जाणीवच झाली नाही कलावंताला, तर कला जन्मणारच नाही. ३) नकार : वेदनेच्या जाणिवेशिवाय वेदना देणाऱ्या घटकाला नकार देता येणार नाही, म्हणजे वेदना देणारा घटक नाकारला पाहिजे. ४) विद्रोह : वेदना देणारी गोष्ट जाणीवपूर्वक नाकारून केवळ उपयोग नाही तर त्याविरुद्ध विद्रोह (बंड, क्रांती) करावा लागेल. ५) करुणा : विद्रोहानंतर जो विध्वंस होईल आणि विध्वंसानंतर जे उरेल.. खरं म्हणजे विध्वंसानंतर काय उरेल? पण जे काही उरेल त्यावर करुणेची फुंकर घालावी लागेल, तरच मानवी जीवन पुन्हा उभं राहील. आणि त्या वेदनेला विराम देईल.

वेदना केवळ मानवप्राण्यातच नसते, तर ती किडे-मुंग्यांतही असते आणि तरी आपण मानवी वेदनेचीच चिंता वाहत असतो. वेदना व्यक्तीची असते तसेच ती समाजाची आणि राष्ट्राचीसुद्धा असते. व्यक्तीमुळे समाज बनतो, समाजामुळे राष्ट्र आणि राष्ट्रामुळं जग.. याची काहीएक उकल करायला हवी. म्हणजे.. १) व्यक्ती विरुद्ध व्यक्ती : व्यक्ती-व्यक्तीमधील संघर्ष : राग, लोभ, मद, मत्सर आदी समग्र जाणीव. २) व्यक्ती विरुद्ध समाज : व्यक्ती समाजात राहते. व्यक्तीचा समाजाशी संबंध येतो. कधी प्रेमाचा, कधी रागाचा. व्यक्ती कधी कधी समाजाविरुद्ध काम करते. त्यामुळे समाजही व्यक्तीच्या विरुद्ध जातो. त्यातील ताणतणाव व्यक्ती विरुद्ध समाज या घटकामध्ये येतात. ३) समाज विरुद्ध समाज : व्यक्तींचा मिळून समाज होतो. पण असा एकच समाज नसतो. अनेक समाज असतात. वैदिक, बौद्ध, जैन, हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, ज्यू आदी. कधी कधी श्रद्धास्थानावरून कोणी काहीतरी बोलतो आणि दोन समाजांत विशिष्ट ताण तयार होतो. त्या ताणाचं सर्वागीण दर्शन इथं होतं. ४) समाज विरुद्ध राष्ट्र : अनेक समाजघटक मिळून राष्ट्र बनते. त्या राष्ट्रातील लोक, त्यांची भाषा, त्यांची दैवतं, त्यांचा धर्म, त्यांची श्रद्धास्थानं असे अनेक घटक ‘राष्ट्र’ या संकल्पनेत येतात. आपल्या राष्ट्रातील सर्व समाजघटक सुखी आहेत की दु:खी हे पाहणं राष्ट्राची जबाबदारी असते. राष्ट्र ही एक मौलिक संकल्पना आहे. जीवनातून राष्ट्र वजा केल्यास व्यक्ती वा समाज यांना काहीच अर्थ नसतो. त्याचप्रमाणे व्यक्ती वा समाज राष्ट्रातून वजा केल्यास राष्ट्रालाही काही किंमत उरत नाही. याचं दर्शन इथं अभिप्रेत आहे. ५) राष्ट्र विरुद्ध राष्ट्र : हे जग अनेक राष्ट्रांचं मिळून बनलेलं आहे. प्रत्येक राष्ट्र आपल्या सीमांचं रक्षण करीत असतं. ती त्या राष्ट्राची जबाबदारीच असते. राष्ट्राचं स्वत:चं आंतरराष्ट्रीय धोरणही असते. म्हणजे आपल्या शेजारील इतर राष्ट्रांशी असणारे संबंध कसे असावेत, हे ते- ते राष्ट्र बघत असते. तरीही एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी लढताना आपण पाहतो. कधी त्या राष्ट्राचं आंतरराष्ट्रीय धोरणही याला कारणीभूत असू शकतं. कधी हे संबंध एखाद्याच्या बेजबाबदार कृत्यातूनही बिघडू शकतात. अशा वेळी राष्ट्रा-राष्ट्रांतील संबंध बिघडून सीमेवर युद्धपरिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीतून मुक्त होणं किंवा न होणं याची काळजी घेणं वा न घेणं याचं दर्शन नाटकात अभिप्रेत आहे. ६) राष्ट्र विरुद्ध जग : आपण आपल्या राष्ट्रात राहतो आणि त्याच वेळी आपल्या राष्ट्राच्या बाहेर उर्वरित जग असते. शेजारी राष्ट्रांचे जसे संबंध असतात, तसेच एका राष्ट्राचे इतर अनेक राष्ट्रांशीही संबंध असतात. एका राष्ट्राची अनेक मित्रराष्ट्रे तसेच शत्रुराष्ट्रेही असू शकतात. त्यातून राष्ट्रांचे गटही तयार होतात. यातूनच दोन महायुद्धे झाली. अशा वेळी एखाद्या राष्ट्राची विशिष्ट कोंडी होऊ शकते. कुठल्या राष्ट्रगटात सामील व्हावं- युद्धप्रेमी की युद्धविरोधी, हे ठरवणं ती त्या राष्ट्राची जबाबदारी असते. याचं वस्तुनिष्ठ दर्शन आपलं आंतरराष्ट्रीय धोरण अधोरेखित करत नाटकाने घडवणं अपेक्षित आहे.

मुद्दा असा की, कलाकृती मराठी असो वा भारतीय- तिच्यातील एकारलेपणा जाऊन समग्रतेचं भान येणं महत्त्वाचं. त्यासाठी ही ज्ञानसूत्रे- थिअरी ऑफ नॉलेज- विचारार्थ ठेवली आहेत! यावर चर्चा होऊ शकते. त्रुटी दूर करून नवी भर टाकता येऊ शकते. यातूनच समग्रतेचं भान असणाऱ्या कलाकृती जन्म घेतील आणि मराठी नाटय़वाङ्मय जगभर जाईल.

शंभराव्या नाटय़संमेलनाच्या निमित्तानं- म्हणजे हे संमेलन सर्वागपरिपूर्ण व्हावं म्हणून जे मनात आलं ते रसिकांसमोर ठेवलं आहे. यात आपणही भर घालू शकता. शंभरावं संमेलन दिमाखदार, सर्व कलावंत, रसिकजणांना सोबत घेऊन आणि सरकारलाही कवेत घेऊन संपन्न होईल.. नव्हे ते आपण सगळे मिळून संपन्न करू अशी आशा. या शंभराव्या नाटय़संमेलनाचं स्वरूप खरोखरीच ‘अखिल भारतीय’ सिद्ध व्हायला हवं, तरच तमाम भारतीयांचं लक्ष मराठी रंगभूमीकडे वेधलं जाईल आणि मराठी नाटकं भारतभर पोहोचण्यास मदत होईल. तसं घडो, ही इच्छा!