05 April 2020

News Flash

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे कथाकार

सुप्रसिद्ध लघुकथाकार वामन कृष्ण चोरघडे यांचे १६ जुलै रोजी जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत चोरघडे यांनी त्यांच्या जीवनातील अप्रकाशित घटनांवर 

| July 13, 2014 01:15 am

सुप्रसिद्ध लघुकथाकार वामन कृष्ण चोरघडे यांचे १६ जुलै रोजी जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत चोरघडे यांनी त्यांच्या जीवनातील अप्रकाशित घटनांवर  टाकलेला प्रकाशझोत..
बाबांचा जन्म नागपूर जिल्हय़ामधील नरखेड या गावी झाला. त्यांच्या एकूण बारा भावंडांमधली चार जगली. त्यातलं शेंडेफळ म्हणजे बापू ऊर्फ वामन. घरची आíथक परिस्थिती हलाखीची होती. बाबांना शिकण्याची दुर्दम्य इच्छा होती. पण आजोबांनी सांगितलं की, तुला शिकविण्याची माझी कुवत नाही. मग मोठय़ा भावानं पुढाकार घेऊन जबाबदारी घेतली. जवळच्या काटोल गावाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पार पडल्यावर बाबा पुढील शिक्षणासाठी नागपुरात दाखल झाले. परीक्षेत चांगले गुण असल्यामुळे त्याकाळच्या नागपुरातील पटवर्धन हायस्कूल या नावाजलेल्या शाळेत त्यांना प्रवेश मिळाला. तीन रुपये महिन्याच्या भाडय़ाच्या खोलीत दोघे भाऊ राहत. घरून धान्य यायचं; पण वरण, भात, भाजीसाठी काय करायचं? दोघा भावांनी उसाच्या रसाची गाडी घेतली. त्यावर चरितार्थ चालविला. कधी खाण्याची अडचण असली तर घरी लाल भोपळा ठेवलेला असायचा. त्याकाळी एक पशाला मोठा भोपळा मिळायचा. पोट भरण्यासाठी भोपळा शिजवून मिठासोबत खायचे. पुढे मोठय़ा भावानं शिक्षण सोडून नोकरी धरली. बाबा मॅट्रिकनंतर मॉरिस कॉलेजमध्ये दाखल झाले. त्याकाळी खेळायला वेळ नसायचा आणि मनोरंजनासाठी पसा लागायचा. मलभर चालत कॉलेजला जायचं. वाचन हेच मनोरंजन. त्यांनी अधाशासारखं वाचन केलं. त्यातूनच त्यांची पहिली कथा ‘अम्मा’ १९३२ साली जन्माला आली. ती कथा प्रसिद्ध झाली. लेखक म्हणून त्यांच्यावर शिक्का लागला. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढं लेखिका डॉ. वेणू साठे हिच्याशी परिचय झाला. नंतर तिच्याशी विवाह झाला.
बाबांना वध्र्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याच सुमाराला स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. अनेक तरुणांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, त्यात बाबाही होते. दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा सहवास घडला. विचारांना नवी दिशा मिळाली. आचारांत बदल घडला. तेव्हापासून घेतलेलं खादीचं व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलं. खादीचा कुडता, पजामा अशा स्वत: धुतलेल्या स्वच्छ पांढऱ्या-शुभ्र वेषातील बाबा आजही अनेकांच्या स्मृतीत आहेत. त्यांना व्यायामाची आवड होती. एखाद्या पहेलवानासारखी त्यांची शरीरयष्टी होती. स्पष्ट व शुद्ध उच्चार, वाचनामुळे समृद्ध झालेली भाषा, अभ्यासामुळे आलेली विचारांची श्रीमंती आणि प्रचंड आत्मविश्वास यामुळे बाबा एक वक्ते म्हणूनही त्यांच्या काळी गाजले. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलं त्यावेळी बंदिवासातून मुक्ती मिळाली आणि गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वध्र्याच्या वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य म्हणून रुजू झाले आणि तिथूनच प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले. त्यानंतर काही काळ महाराष्ट्राच्या विद्यापीठ पाठय़पुस्तक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि पुढे दोन वर्षांनी तिथूनही निवृत्त झाले.
एक लघुकथाकार म्हणून बाबांचं नाव साहित्य क्षेत्रात आजही आदरानं घेतलं जातं. वि. स. खांडेकर यांनी त्या- काळच्या पाच कथाकारांत बाबांची गणना केली होती. त्याआधीच्या कथा लांबलचक असत. मराठी लघुकथेचा इतिहास बाबांपासून सुरू होतो असं जाणकारांचं मत आहे. पहिल्या लघुकथासंग्रहाचा मानही बाबांना मिळाला आहे. ‘सुषमा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर १२ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘सुषमा’, ‘हवन’, ‘यौवन’, ‘प्रस्थान’ ‘पाथेय’, ‘संस्कार’, ‘नागवेल’ ही काही लोकमान्य नावं. त्यांचा शेवटला कथासंग्रह ‘साद’. बाबांचं लेखन केवळ कथालेखनापुरतं सीमित नव्हतं, तर विचारप्र्वतक लेख, चरित्रे, प्रबंध, पाठय़पुस्तकांचे संपादन अशा विविध लेखनप्रकारांतील त्यांच्या पुस्तकांची संख्या ९२ भरते.
त्या काळातील मान्यवर लेखकांचा बाबांशी संपर्क असायचा. कधी त्यातली मंडळी घरी मुक्कामाला असायची. एकदा कथाकथनाचा कार्यक्रम नागपुरात झाला. त्यानिमित्त मराठी कथालेखकांची मांदियाळी आमच्या घरी जमली. आम्हा भावंडांसाठी ती पर्वणी होती. त्यांच्या गप्पा ऐकणं हा आमच्या लेखी समृद्ध अनुभव होता. ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, वि. आ. बुवा, द. मा. मिरासदार, बाजीराव पाटील ही मान्यवर लेखक मंडळी एकत्र आली होती. तो पहिलावहिला कथाकथनाचा कार्यक्रम खूप गाजला. तसे कार्यक्रम पुढे सर्वदूर होऊ लागले.
बाबांची एक वक्ता म्हणून तर ख्याती होतीच, पण कॉलेजमध्ये त्यांच्या शिकवण्याची हातोटीही असामान्य होती. इतर वर्गातीलच काय, पण इतर महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या तासाला हजेरी लावत. हसतखेळत गप्पा मारल्यासारखं त्यांचं शिकवणं असे.
वर्धा येथील वास्तव्यामुळे व स्वातंत्र्यलढय़ामधील सहभागामुळे त्या काळातील मान्यवर गांधीवादी व सर्वोदयी विचारांच्या व्यक्तींमध्ये बाबांची ऊठबस असे. मी लहान असताना वर्धा ते सेवाग्राम हा प्रवास बाबांसोबत सायकलवर कितीतरी वेळा घडला. गांधीजी, विनोबा, जवाहरलालजी अशा व्यक्तींना जवळून पाहता आलं. त्याकाळी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात रामकृष्ण पाटील होते. बाबांवर त्यांनी मानद अन्नपुरवठा अधिकारी म्हणून जबाबदारी टाकली. त्यांनी ती उत्तम प्रकारे निभावली.
पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यावेळी विविध  शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बाबांनी श्रमसंस्कार पथक स्थापन केलं. या विद्यार्थ्यांनी श्रमदानाने नागपूर विद्यापीठाच्या परिसरात ओपन एअर थिएटर बांधून घेतलं.
विविध जीवनानुभवांतून बाबांची कथा समृद्ध झाली. नुकत्याच त्यांच्या निवडक कथांचा संग्रह संपादित करण्याचा प्रसंग आला. माझ्यासोबत आजच्या आघाडीच्या कथालेखिका आशाताई बगे होत्या. त्यांच्या मते- ‘वामनरावांच्या कथेचं संपूर्ण आकाश कवेत घेणं अशक्य आहे.’ त्यांच्या कथेतील काव्यात्मकता, नाद, लय यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. कमी शब्दांमध्ये मोठा आशय हे बाबांच्या कथांचं वैशिष्टय़ आहे. त्यांच्या काही कथा तर अध्र्या पानाच्याच आहेत, पण विचार करायला लावणाऱ्या, आशयघन आहेत. म. ना. अदवंत यांनी बाबांच्या कथेबद्दल दिलेलं मत उल्लेखनीय आहे- ‘चोरघडय़ांचे हृदय कवीचे आणि त्यांनी माध्यम निवडले कथेचे. कथा हाच त्यांच्या लेखनप्रकृतीचा विशेष. त्यांची जीवनाकडे बघण्याची निर्मळ दृष्टी होती. त्यातूनच त्यांच्या कथेचा उगम झालेला आहे.’ सूक्ष्मता हे बाबांच्या कथेचं वैशिष्टय़. मराठी कथेनं कात टाकली ती या सूक्ष्मतेच्या अननुभूत स्पर्शानं. नवकथेनं स्थूल, ढोबळ, पसरट कथानकांची काचणारी बंदिस्तता झुगारून दिली, ती या सूक्ष्मतेच्या शोधातच. सूक्ष्मता हा त्यांच्या नवकथेचा मूलकंद होता.
बाबांचं बालपण खेडय़ात गेल्यामुळे तळागाळामधील जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली होती. त्यामुळेच वऱ्हाडी, गोंडी, बलुची अशा विविध लोकांच्या राहणीमानाचं अवलोकन त्यांना करता आलं. ‘ऋव्याद’, ‘अतिथि देवो भव’ अशा कथांमधून तळागाळातील जनतेचं भावविश्व त्यांनी वाचकांपुढे उलगडून दाखविलं आहे.
बाबांच्या ‘जडणघडण’ या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या अनुभवाचे अनेक पलू उलगडले गेले आहेत. या अनुभवांमुळेच त्यांच्या कथांमध्ये वैविध्य आलं. ज्ञानेश्वरीचा अभ्यास, विनोबांचा सहवास या गोष्टींमुळे त्यांच्या कथा या केवळ अनुभवकथन ठरत नाहीत, त्या वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात.
‘जडणघडण’ या आत्मचरित्रात बाबांनी लिहिलं आहे- ‘मला माणसं दिसायला लागली, स्त्री दिसायला लागली. आई म्हणून, बहीण म्हणून मी स्त्री पाहिली होती; पण स्त्री म्हणून स्त्रीकडे मला जीवनानुभवामुळे पाहता आलं.’ यामुळेच स्त्रीच्या आणि पुरुषाच्या मानसिकतेचे विविध पदर बाबांच्या कथेमध्ये दिसतात.
पौगंडावस्थेमध्ये होणारी वाढत्या वयाच्या मुलामुलींची मानसिक आंदोलनं बाबांच्या काही कथांमध्ये प्रगट झालेली आहेत. आज एक बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ म्हणून जे मला अभ्यासातून जाणवतं, ते अनुभवांच्या शाळेत शिकलेल्या बाबांना त्या काळात टिपता आलं, याचं मला अप्रूप आहे. ‘संस्कार’, ‘आणभाक’, ‘काचेची किमया’ या कथांमध्ये पौगंडावस्थेतील मुलामुलीचं भावविश्व बाबांनी समर्थपणे उलगडलेलं आहे.
बाबांच्या हातून विविधांगी लेखन घडलं. त्यांच्या कथांमध्येही वैविध्य आहे. इंद्रधनुष्यासारखे अनेक रंग रसिक वाचकांना या कथांमधून अनुभवाला येतात. बाबांच्या साहित्याच्या विविधतेसारखं त्यांचं व्यक्तिमत्त्वसुद्धा बहुआयामी होतं. लघुकथालेखक, कथाकथनकार, उत्तम वक्ते, आदर्श गांधीवादी, अप्रतिम शिक्षक, नाटय़दिग्दर्शक, नट असे विविध पदर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. यासोबत वडील म्हणून त्यांनी आम्हा मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविली, व्यायामाची आवड निर्माण केली. बाबांबरोबर कौटुंबिक सहलीमध्ये हसतखेळत आनंद कसा घ्यायचा, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं कसं बघायचं याचे धडे मिळायचे. आज माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या पालकांशी मी जेव्हा बोलतो, तेव्हा अनेक संदर्भ बाबांनी जागरूक पालकत्वातून रुजविलेल्या संस्कारांमधून मी उचललेले असतात. कशालाही घाबरायचं नाही, प्रश्नामध्ये अडकायचं नाही, उत्तरं शोधायची- अशा तऱ्हेची मानसिकता त्यांच्या पालकत्वामधून घडलेली आहे.
आजसुद्धा वयाच्या पंचाहत्तरीमध्ये बाबांबद्दलच्या अनेक आठवणी, अनंत अनुभव आणि विविध विचार माझं अंतरंग समृद्ध करत आहेत.         

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2014 1:15 am

Web Title: all rounder short story writer vaman krushna chorghade
टॅग Lokrang Loksatta
Next Stories
1 भाषिक संघर्ष, राजकारण आणि वैर
2 विसरू म्हणता विसरेना..
3 मिश्र रागाची मैफल
Just Now!
X