गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

सुदूर पश्चिमेकडच्या अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यातील जंगल जळत असल्याच्या बातम्या वाचून मन काळवंडलं. त्यात त्यांच्या राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधानांच्या अगोचर मुक्ताफळांची भर. जंगल जळत असता ‘दुसऱ्याची बायको कुरूप आहे,’ असं म्हणणं म्हणजे आमच्या माणूसपणाच्या एकूण समजुतीलाच चूड लावण्यासारखं. पण माणसं लवकर भ्रमिष्ट होण्याचे हे दिवस आहेत, तेव्हा नित्य नव्या मर्कटलीला पाहायला मिळतातच. खरं तर अशी इतर प्राण्यांशी तुलना करणारी विशेषणं वापरणंही अनुचित ठरावं, इतकी प्रगती आम्ही आमच्या वर्तणुकीबाबत केली आहे. पण ते असो.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

तर बरं का, जंगलच्या जंगल जळत असताना माणसं निरनिराळ्या व्यवहारांत रमली होती. कुणी पक्ष सोडत होते, कुणी अटक होत होते, कुणी चिमटे काढत आपडीथापडी खेळत होते, तर कुणी भल्याथोरल्या सभागृहात प्रबोधन करीत होते. हे सारे ‘हुज हू’ किंवा वृत्तपत्रांत मथळा पटकावू शकणारे सत्ताधीश. बाकी आम जनता म्हणून तुम्ही-आम्ही तर साऱ्याच भवतालाबद्दल ‘इग्नोरंट’ असतोच. मुद्दाम परभाषेतला शब्द वापरला. त्यातली यथार्थता ‘निष्काळजी’पेक्षा जास्त पोहोचते. तर आम्हीही श्रावणातल्या फुगडय़ा घालण्यात अन् नित्याची रहाटगाडगी ओढण्यात मश्गूल होतो. आमची पिढीजात सामुदायिक संपत्ती लुटली जात असताना आम्ही आम आदमी कायम गाफील, निष्काळजी असतोच. त्यातूनच आमचं ‘आम’पण सिद्ध होतं. कुणी म्हणेल, की तिकडे लांब जळतंय आणि आपण का तडतडताय? तर याचं उत्तर : राहवत नाही म्हणून! जगभरात असे तडतडणारे अनेक असतीलच. तरीही मला माझ्यात निर्माण होणारी असहायता, राग, दु:ख सहन होत नाही आणि त्याकरताच हा लेखनप्रपंच. एक झाड पडणं, कोसळणं, जळणं म्हणजे माणसानं आपल्या ‘माणूस’ होण्याच्या हजारो वर्षांच्या धडपडीत मागे पडण्यासारखं आहे. माणूस म्हणून इतर सजीवांहून निराळ्या अस्तित्वाची, महत्तेची समजूत करून घेतलेले आम्ही हर कोसळत्या वृक्षाबरोबर आमच्यातलं जनावर जागं करीत राहतो असं वाटतं मला. आणि हे खास माणूसतत्त्वातून जन्मलेलं जनावर. इतर प्राणी-पक्ष्यांपाशी ती कलाही नाही. निसर्गाची पंचतत्त्वे आणि माणूस याशिवाय दुसरं कुणी झाड तोडत नाही. आम्हीच तेवढे समर्थ आहोत.. निसर्गाइतके. आमच्या सृजनातून फक्त माणसांचे सामर्थ्य वाढते वा तथाकथित कल्याण साधते. आणि आमच्या विध्वंसातून माणसासकट सकल पृथ्वीचेच नष्टचर्य घडते. विध्वंस, विनाशाबाबत आम्ही निसर्गाशी बरोबरी साधलीये. सृजनाबाबत मात्र आम्ही अत्यंत तोकडे पडलोय. आमच्या निर्मितीला करुणेची मिती नाही. अत्यंत निसर्गपूरक घरातही कुणी चिमणीला घरटं बांधू देत नाही. किंबहुना, तिलाही त्याची ओढ वाटत नाही. सृष्टीनं एक झाड उगवून आणलं तर अन्य सजीवांना आसरा मिळतो, त्यांचा प्रतिपाळ होतो. आम्हीही काही काळ ती दृष्टी राखून होतो. त्या दृष्टिरेषेत चालतही होतो. आमच्या निवाऱ्यात इतर सजीव स्वमर्जीनं सुरक्षितता मिळवीत होते. आम्हाला असं एकत्र राहणं आवडत होतं.. मानवत होतं. यातून आमच्या मोठमोठाल्या संस्कृत्या उभ्या राहिल्या. सामुदायिक वा सार्वजनिक चालीरीतींतली करुणा परस्परांच्या वाढीस पोषक होती. या अवस्थेतच आम्ही अस्तित्वविषयक प्रश्नांना सामोरे गेलो. खंडकाव्यं लिहिली. आकर्षक अन् टिकाऊ वास्तुरचना उभारल्या. आमच्या या वाढीत, अभिव्यक्तीत नैसर्गिक उत्स्फूर्तता होती. अगदी भूक भागली असता शिकार न करण्याइतकी प्राणीज. इथेच कधीतरी मग आमच्या सृजनाच्या परमोच्च क्षणी आम्ही देव निर्मिला. आमच्याकडची सारी करुणा त्याला दिली अन् निसर्गाचे स्पर्धक बनलो. आता आमचा देव आमचे सारे अपराध पोटात घालत होता. त्याला वळणच लावलं होतं तसं. अर्थात हे करणारे काहीच जण होते. ते आमच्यातलेच; तरीही सत्ताधीश बनले. आणि आम्ही अनेक त्या सत्ताधीशांच्या देवांची करुणा भाकत सत्तेच्या खेळाबाबत निष्काळजी बनलो. आमचं सारं आमचा देवच करत होता. त्यामुळे सत्ताधीशांनी चाळे केले की चौर्य, यांत आम्हाला काडीमात्र रस नव्हता. त्यांची स्पर्धा मात्र जोशात येत गेली. अपार खस्ता खात, नृशंस नरसंहार करीत गाद्यांवर गाद्या बदलत राहिल्या. गादीवर बसणारे ठराविकच होते. त्यांनी कदाचित स्वत:ला प्राणीच समजलं असावं. ‘माणूस’ बनण्याची दुष्प्राप्य हाव त्यांनी ठेवली नाही. त्यांच्या या त्यागातून त्यांनी सिहासनं पटकावली. देवाच्या साक्षीनं ते तुमच्या-माझ्या कल्याणाकरिता झटत राहिले. असो.

तर असं सगळं पुराण आठवायचं कारण- ते जळणारं जंगल. अतीच जुनं आहे म्हणे ते. आमच्या साताठ-दहा पिढय़ांमागचं की त्याहूनही जुनं? कुणास ठाऊक. ते इतकी वर्ष जर टिकून उभं होतं तर मग आताच अचानक शेतकऱ्यानं दमून आत्महत्या करावी तसं स्वत:च जळायला लागलं का ते? सृष्टीच्या समतोल राखण्याच्या रचनेचा भाग म्हणून होणारा लयही प्रमाणबद्ध असतो. आमचा विध्वंस मात्र प्रमाण सोडून कुरूप होणाऱ्या आजच्या माणसांप्रमाणेच आत्मरत. त्यास स्व-अस्तित्वापलीकडे दुसरे काही दिसत नाही. लयात उत्पत्तीची बीजं पेरणारा निसर्ग आमच्याहून अनेक योजनं पुढेच राहिला. आमच्या पराभवाचं उट्टं आम्ही विक्राळ जनावर होऊन काढतोय. झाडाआडोशाने राहणाऱ्यांना हवं तसं कधी भुकेकरिता, कधी सत्तेकरिता मारत आमच्यातल्या जनावराने देवालाही कंडम करून टाकलं. तोही आता मदतीला धावेना. त्याला यांनी धंद्याला जुंपून ठेवलं. चतु:ष्पादांची जबाबदारी त्याच्यावर कधी नव्हतीच. त्यामुळे बिनबोभाट प्रजातींमागून प्रजाती निखंदून टाकता आल्या. गेलाबाजार बळी जाणाऱ्या द्विपादांकरिता शिल्लक राहणाऱ्यांच्या कल्याणाची सबब शोधावी लागली. मग मात्र देवानं खूपच मदत केली. बळी मागून बळी घेत आमच्यातली हिंसा आमचं व्यवच्छेदक लक्षण बनली. जंगल जळत असतानाच ‘जो जास्त हिंसक तो राजा’ हा जंगलचा कायदा मात्र आम्ही आमच्या वस्त्यांत पाळला. वाढीस पोषक होण्याची सुसंस्कृतता आमच्या देदीप्यमान संस्कृतींसह आम्ही एकत्रच जाळली. आणि आज आमचे सांप्रत सत्ताधीश म्हणताहेत की, हा ग्रह सोडावा लागेल. आम्हाला आमच्या अमरत्वाच्या शोधाकरिता याचा विध्वंस करावा लागणार आहे. आमच्या या शोधात निसर्गावर मात करणारा रामबाण आहे. या साऱ्याची धग असह्य़ होते आहे. कधी आमच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याकरिता हे झाडं तोडणार, तर कधी माणसाला सुखसंपन्न करण्याचं कारण सांगत वणवे लावणार. कुठून कमावलीये ही मूर्खता? आम्ही उभारलेली शहरांची जंगलं गुदमरवून टाकतात. माणसांना भ्रमिष्ट अन् हिंसक बनवतात. याचे तुम्ही स्वत:च उदाहरण बनला आहात. आमच्या सुखाचं अन् कल्याणाचं भजन पुरे झालं. आम्ही मरूच इच्छितो. आम्हाला नको आहे ती सुखासीनता. नका राबवू कृत्रिम प्रज्ञा आमच्याकरिता. नका बनवू रॉकेटं आम्हाला मंगळावर पाठवायला. आम्ही जळू इथंच. आताही लटकतोच लोकलला मधमाश्यांगत. नका तोडू ती हजारो झाडं.. त्या आरे कॉलनीतली. असे आहोत तरी कोण आम्ही- की ज्यांच्या सुखाकरता एवढे श्रमताय तुम्ही? माणसासाठीचे सुखसोहळे नका रचू. आम्हाला चुकून गुळगुळीत रस्ता सापडला तर उलटय़ा होतात. मणके वरखाली करून घेतच आम्ही राबू. घटितांचे कार्यकारणभाव समजून घेण्यामधल्या नैसर्गिक कुतूहलातून आम्ही विज्ञान घडवलं ते केवळ मनुष्यकेंद्रित उपयोजनाकरिता नाही. केवळ सोयीसुविधा निर्माण करणे म्हणजे विकास असा आमचा तरी समज आता उरलेला नाही.

साऱ्या मुंबईत अत्यंत नेटक्या व्यवस्थापनानं मेट्रो बांधली जाते आहे. माझ्या हयातीत मी या देशात इतकं नेमकं अन् नेटकं सार्वजनिक काम पाहिलं नाही. या साऱ्या कामाला एक मानवी चेहराही आहे. पर्यायी रस्ते बनवणे असो की वाहतूक वळवणे असो की पुनर्वसन असो; सगळीकडेच ती सहिष्णुता, समजूत प्रत्ययास येते आहे. या कामाच्या आवाक्याने, धडाक्याने अन् नेमकेपणाने स्तिमित व्हावे असे हे अभिमानास्पद काम आहे. मात्र, हे सारे देखणे असताना त्या आरे कॉलनीमधली झाडे तोडण्याचा डाग या कामावर लागू नये असे मनापासून वाटते. अर्थात ज्यांच्या समृद्ध हाताळणीने हे काम लक्ष वेधून घेते, ती शीर्षस्थ मंडळी खचितच कष्टली असतील. कदाचित साऱ्या पर्यायांचा त्यांनी विचारही केला असेल अन् निरुपायाने ते या निर्णयाप्रत आले असतील. या सगळ्यावर मी विश्वास ठेवायला तयार आहे. मात्र, तरीही मला असे वाटते की निरुपाय म्हणून एखाद्या प्रकल्पाकरिता आम्ही माणसे मारतो का? मग झाडांना वेगळा न्याय का? राहिला इथला माणूस सुखसोयीविना, तर असा कुठला प्रलय येणार आहे? झाडे जाळल्याने, तोडल्याने मात्र तो येतो, हे आम्ही अनुभवतो आहोत जगभर. अजूनही माणसाठायी त्या सृष्टिकर्त्यांच्या निर्मितीबद्दल पुरेशी कृतज्ञता नाही. त्याच्या निर्मितीचं मोल केवळ संख्येत करणं योग्य नाही. जे मी उगवलं नाही ते मी तोडणार नाही, इतकी साधी मांडणी आहे. तसंही आम्ही उभारलेली काँक्रिटची जंगलं माणसांना बुद्धिदारिद्य््रा आणत आहेतच. तेव्हा किमान त्याला श्वास घेता यावा एवढी पालवी ठेवायला काय हरकत आहे? झालेच असले आमचे जनावर- तर भूक भागल्यावर शिकार न करण्याचा प्राणीधर्म पाळू; आणि उरलेच असले आमच्यात माणूसपण- तर वृक्षाखाली बसून करुणेचा नेमका अर्थ शोधू. बहरहाल, रे ब्राझीलियन बोलसोनारो (किंवा जो कोण), तुझी बायको सुंदर. मात्र, काही कर अन् ते जंगलातले वणवे सावर.

girishkulkarni1@gmail.com