‘कट्टा म्हटलं की गप्पांचा अड्डा’ असंच समीकरण मनात येतं, ते काही फारसं खोटं नाही. पण काही काही कट्टे मात्र भाग्यवान असतात. सांगलीजवळील हरीपूर गावात असाच एक भाग्यवान कट्टा आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर हा कट्टा आहे. आजूबाजूला वडाचे, पिंपळाचे मोठाले वृक्ष आहेत. त्यावर शेकडो, हजारो पक्षी गोड चिवचिवाट करत असतात. हिरव्यागार पोपटांचे थवे विमानांच्या कवायतीसारखे शिस्तीत मधेच एकदम भुर्रकन् उडत जातात. अशा निसर्गरम्य ठिकाणी एक कट्टा आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या नावाने तो ओळखला जातो. त्याची कथा थोडक्यात अशी : सांगली परिसरातील एक गरीब बाप केवळ पैशाच्या लोभापोटी आपल्या नुकत्याच वयात येत असलेल्या मुलीला एका श्रीमंत, पण वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या नवरदेवाच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नात असतो. त्या तरुण मुलीच्या मनात होत असलेल्या घालमेलीने नाटककार देवल अस्वस्थ होतात. त्यावेळी भावनांच्या उद्रेकातून देवलांचं अजरामर काव्य जन्माला येतं. ती दुर्दैवी मुलगी रडत रडत आईला सांगते, ‘‘चिरून टाक ही मान, करू नको अपमान.’’ त्यातूनच जरठ-कुमारी विवाहाची समस्या समाजापुढे मांडणारे ‘शारदा’ हे देवलांचे एकेकाळचे गाजलेले नाटक जन्माला आले. त्या अजरामर काव्यपंक्तीचा एक शिलालेख या कट्टय़ावर समारंभपूर्वक कोरण्यात आला.
ठाण्यातील लेखिका संपदा वागळे यांना हा कट्टा दाखवला तेव्हा त्या भारावून गेल्या. त्यांनी आणखीन एका भाग्यवान कट्टय़ाची माहिती सांगितली. तो म्हणजे ठाण्याचा ‘अत्रे कट्टा’! या विषयावरचे पुस्तकच त्यांनी दिले.
सुसंस्कृत, संवेदनशील माणसं एकत्र आली की एखादं कार्य कसं मनापासून आणि सातत्याने करतात त्याचं लोभस उदाहरण म्हणजे हा ‘अत्रे कट्टा!’ काय आहे ही संकल्पना? मुख्यत: हे एक मुक्त व्यासपीठ आहे. समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींना आपले विचार मांडण्याची संधी या व्यासपीठावर मिळते. परंतु लंडनमधील हाईड पार्कसारखा मात्र हा प्रकार नाही. इथे एक प्रकारची अखंड ज्ञानोपासना चालते. साहित्य, संगीत, नाटक यांपासून ते आरोग्य, इच्छापत्र, स्वास्थ्य, न्याय, वैद्यकशास्त्र, खगोल निरीक्षण.. असा प्रचंड मोठा अवकाश असणारे विविध विषय या अत्रे कट्टय़ावर मांडले जातात.
आपण मराठी माणसं अनेकदा आरंभशूर ठरतो; पण ठाण्याच्या या अत्रे कट्टय़ावर प्रत्येक बुधवारी एक कार्यक्रम याप्रमाणे ८ मे २००१ पासूनच्या बारा वर्षांत तब्बल ६०० कार्यक्रम झाले, ही वस्तुस्थिती स्तिमित करणारी आहे.
एखाद्या डोंगरशिखरावर चढून गेलं आणि त्या ठिकाणाहून खाली नजर टाकली की गिर्यारोहकांच्या मनात पहिल्या प्रथम विचार येतो- ‘अबब! कसे चढून आलो असू आपण इतक्या उंचीवर?’ ६०० कार्यक्रम झाल्यावर अशीच काहीशी समाधानाची आणि जास्तकरून विलक्षण आनंदाची भावना हा कट्टा स्थापन करणाऱ्या मूळ वीस कार्यकर्त्यांच्या मनात आली. त्या विचारमंथनातूनच या कट्टय़ावर ज्या ज्या मान्यवरांनी जे विचारधन मुक्तकंठाने प्रदान केले त्याचा दस्तावेज पुस्तकरूपाने प्रकाशित करावा अशी कल्पना मांडली गेली. ती फलस्वरूप झाली आणि ‘आमचा कट्टा, आमची माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले. विदुला ठुसे आणि संपदा वागळे या दोघींनी त्याचे संपादन केले आहे.
या पुस्तकात (१६८ पानी) एकूण ४१ लेख आणि सहा कविता समाविष्ट केलेल्या आहेत. या कट्टय़ाला ‘अत्रे कट्टा’ नाव कसे मिळाले, याचा कुठेही खुलासा नाही; तथापि तर्क करता येतो. आचार्य अत्रे यांनी कथा, कविता, पाठय़पुस्तके, नाटय़, चित्रपट, वक्तृत्व, राजकारण अशा विविध क्षेत्रांत अत्यंत स्पृहणीय कामगिरी बजावली. ते स्वत: उत्तम संभाषक होते. या कट्टय़ावर जे जे हजेरी लावून गेले ते विविध क्षेत्रांतील मान्यवर आहेत. म्हणूनच ‘अत्रे कट्टा’ हे नाव सुयोग्य आहे. त्या नावाचा महिमा अगाधच. म्हणूनच तर हा उपक्रम यशस्वी झाला!
आचार्य अत्रे यांचं नाव दिल्यामुळे त्यांच्यावर दोन-तीन लेख असणे स्वाभाविकच. द्वैभाषिक राज्याच्या तिढय़ातून महाराष्ट्राची स्वतंत्र मराठी राज्याची निर्मिती व्हावी म्हणून आचार्य अत्र्यांसारख्या मराठी सारस्वतानं जे प्रचंड कष्ट उपसले त्याला खरोखरीच तोड नाही. कुष्ठरोगी म्हटलं की कित्येकांना अंगावर पाल पडल्यासारखं वाटतं. अशा वाचकांनी डॉ. भारती आमटे यांचा बाबा आमटय़ांवरील लेख वाचावाच. भावसंगीताची- म्हणजेच भावगीतांची जडणघडण कशी होते, कविता आणि गीत यातील फरक, गेयता म्हणजे काय, अशा अनेक गोष्टींचा उलगडा यशवंत देवांच्या लेखातून होतो. डॉ. नीतू मांडके यांचा ‘मी हृदयाचा कलावंत’ हा लेख खरोखरच हृदयस्पर्शी आहे. लहानपणी ते स्वत: अतिशय अशक्त आणि दुबळे होते. कोणालाच- खुद्द त्यांच्या आईलाही त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती. अशा परिस्थितीत ते निष्णात हार्ट सर्जन कसे झाले, त्यांच्या माईने (आजीने) त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण केला, हे सारे मुळातूनच वाचायला हवे. माधवी घारपुरे यांच्या लेखातून ‘श्वास’ या गाजलेल्या चित्रपटाची कथा उलगडते. दा. कृ. सोमण यांच्या लेखातून अवकाशातील आश्चर्ये वाचल्यावर खगोलशास्त्रात रुची असणाऱ्या तरुणांना आपणही त्या क्षेत्रात काहीतरी करावं अशी ऊर्मी निश्चितच निर्माण होईल. ही काही नमुन्यादाखल पेश केलेली उदाहरणे. विस्तारभयास्तव अधिक उदाहरणे देत नाही. त्यासाठी सर्वानीच, विशेषत: तरुणांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे. पुन:पुन्हा वाचावे. त्यांच्यातील ज्ञानकुंडलिनी नक्कीच जागृत होईल.
सांस्कृतिक, सांगीतिक, सामाजिक विषयांवरील हे ४१ लेख वाचून प्रत्येक रसिकाला त्याच्या त्याच्या मनातील ‘सा’ नक्कीच  गवसेल आणि काहीतरी सकारात्मक कार्य करायला निश्चितच तो सिद्ध होईल. तेच या पुस्तकाचे मोठेच यश असेल. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या ठिकाणी असे कट्टे उभे करण्याची प्रेरणाही मिळेल. त्यादृष्टीने ठाण्याच्या या अत्रे कट्टय़ाने उत्तम मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यासाठी विदुला ठुसे आणि संपदा वागळे या संपादकद्वयीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. पूर्वी राजू परुळेकर यांच्या ‘संवाद’ कार्यक्रमातून चंद्रसेन टिळेकरांनी असा प्रयत्न केल्याचे स्मरते. ‘या कट्टय़ावर जो आला तो रमला..’ असे पुस्तकात जे म्हटले आहे तेच या कट्टय़ाचे मोठे यश आहे.

‘आमचा कट्टा, आमची माणसं’- संपादक : विदुला ठुसे- संपदा वागळे, शारदा प्रकाशन, पृष्ठे – १६८, मूल्य- १५० रुपये.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Couple Romance On Running Bike Viral Video Internet is Angry Since Police Arrested Only Boyfriend Calling It Shameless that Girl Ran Away
Video: धावत्या बाईकवर बेभान जोडप्याचा रोमान्स; कारवाईनंतर पोलिसांवरच लोकांचा संताप म्हणाले, “यांना मुलं..”
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा