अमेरिकेसारख्या संपन्न देशात- जिथे आधुनिक तंत्रज्ञानाधारित सर्व प्रकारच्या सुखसुविधा सहज उपलब्ध आहेत, अशा अत्याधुनिकतेच्या झगमगाटातही साधारण तीन लाख लोकांचा एक समाज या आधुनिक सोयीसुविधांविना अगदी व्रतस्थपणे जगतोय. आश्रमीय पद्धतीची जीवनशैली पिढय़ान् पिढय़ा अट्टहासाने जगणाऱ्या या अ‍ॅमिश समाजाविषयी..
जगातील बाकी लोक स्वयंचलित वाहने, विजेवर चालणारी यंत्रे, टेलिफोन्स, टीव्ही, शेतीची यंत्रे इत्यादींचा वापर त्यांच्यामुळे होणाऱ्या सोयींसाठी वापरतात. अ‍ॅमिश मनुष्य मात्र या सर्व तंत्रज्ञानाला थारा देत नाही. अमेरिकेतील इतर लोकांच्या शहरापासून दूरवर अ‍ॅमिश लोकांच्या वस्त्या असतात. पेनसिल्व्हानिया, ओहिओ, इंडियाना, अल्बामा वगरे २८ अमेरिकन संघराज्यांमध्ये अ‍ॅमिश वस्त्या आहेत. कॅनडातील ऑन्टारियो येथेही अ‍ॅमिश वस्ती आहे. या वस्त्यांमधून राहणाऱ्या अ‍ॅमिश लोकांची संख्या सुमारे तीन लाख आहे. विजेचा वापर व अधिक यांत्रिकीकरणामुळे मनुष्य सुखासीन बनतो व त्यातून मोह वाढतो. समाजात स्पर्धा वाढते व असमतोल वाढतो. या सर्वातून नराश्य वाढते, असे ते मानतात. त्यांच्याशिवाय अमेरिकेत राहणाऱ्या इतर लोकांना ते ‘आऊट सायडर्स’ समजतात.
अ‍ॅमिश लोक ख्रिश्चनधर्मीय असून मूळ जर्मनी व स्वीत्र्झलडचे रहिवासी आहेत. तेथे निर्माण झालेल्या ‘एॅनाबाप्टिस्ट’ या पंथाचे आहेत. अ‍ॅमिश हा एॅनाबाप्टिस्ट पंथाचा उपपंथ आहे. अ‍ॅमिश लोकांच्या साध्या राहणीचे मुख्य कारण बायबलच्या काही वचनांमध्ये सापडते. हे लोक बायबलचे काटेकोर पालन करतात. जर्मनी व स्वीत्र्झलडमध्ये ख्रिश्चनधर्मीयांचा मेनोनाट्स नावाचा एक पंथ साधारणत: १२व्या शतकापासून आहे. या पंथातील फेलिक्स मांझ आणि कोनराड ग्रेबल या दोन स्वीस माणसांनी ‘एॅनाबाप्टिस्ट’ ही चळवळ उभी केली. ख्रिश्चन धर्मात बाप्तिमा हा विधी मुलांच्या लहान वयातच केला जातो. परंतु त्या वयात मुलाची समज कमी असते. एॅनाबाप्टिस्ट धर्माचारांमध्ये लहान वयात बाप्तिमा झालेल्या व्यक्तीचा, तो थोडा प्रौढ म्हणजे २०-२२ वर्षांचा झाल्यावर त्याला ख्रिश्चन धर्माची शिकवण, तत्त्वे, श्रद्धा नीट समजावून सांगितली जाते. त्याला काही प्रश्न विचारून मग परत एकदा बाप्तिमा केला जातो. १८९३ साली जेकब अमान या अतिकर्मठ माणसाने या पंथात आणखी एक चळवळ उभी केली. त्याच्या अनुयायांच्या गटाचे नाव संस्थापक जेबक अमानवरून अ‍ॅमिश असे पडले.
अ‍ॅमिश पंथ स्वीकारल्यावर जी व्यक्ती पंथाचे नीतीनियम व धार्मिक संस्कारांचे काटेकोर पालन करणार नाही, तिच्याविरुद्ध कारवाई करून तिला वाळीत टाकण्याची त्यांची पद्धत आहे. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या व त्यातून प्रोटेस्टंट हा ख्रिश्चनधर्मीयांचा आणखी एक पंथ निर्माण झाला. जेकब अमान व त्याच्या अ‍ॅमिश अनुयायांनी ल्यूथरच्या या धार्मिक सुधारणांना कडवा विरोध केला.
अ‍ॅमिश लोकांचे प्रमाण दक्षिण जर्मनी आणि स्वीत्र्झलडमध्ये अधिक होते. पूर्व युरोपात प्रोटेस्टंट पंथियांचे प्रमाण वाढल्यावर धार्मिक युद्धे व दुसऱ्या पंथियांचा छळ सुरू झाला. युरोपातल्या अशा वातावरणामुळे त्रासून अ‍ॅमिश लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. हे लोक प्रथम पेनसिल्व्हनियातील लँकेशायर काऊंटीमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर आलेले लोक ओहिओ, अलबामा, देलाबेर, केंटुकी, इंडियाना वगरे राज्यांमध्ये राहावयास आले. अमेरिकेत आल्यावर अ‍ॅमिश समाजात दोन गट तयार झाले. त्यापकी एका गटाने जुने रीतीरिवाज न मोडता त्यांचे कठोरपणे पालन करण्याचे ठरवले.
त्या गटाला ‘ओल्ड ऑर्डर अ‍ॅमिश’ असे नाव पडले. ज्या लोकांना थोडय़ाफार नियंत्रित सुधारणा हव्या होत्या, अशा लोकांच्या गटाला ‘अ‍ॅमिश मेनोनाइट’ असे नाव पडले. अ‍ॅमिश पंथाचा मुख्य धर्मग्रंथ बायबल हाच आहे. परंतु बायबलवर आधारित असे त्यांचे काही खास नीतीनियम आणि रूढी आहेत. त्यांना ‘आर्डनंग’ असे म्हणतात. ठिकठिकाणच्या वस्त्यांमधील नीतीनियमात किरकोळ फरक आहेत. उदाहरणार्थ घोडागाडीला द्यावयाच्या रंगात फरक, डोक्यावरील हॅटच्या घेरात फरक, टेलिफोन्स व स्वयंचलित वाहनांचा अगदी नियंत्रित वापर इत्यादी. सर्व अ‍ॅमिश लोक जर्मन भाषा अधिक वापरतात. काही लोक जर्मनमिश्रित स्वीस भाषा बोलतात. चर्चचे विधी, प्रार्थना, चर्चची कागदपत्रे हे सर्व जुन्या जर्मन भाषेत असतात. सर्व अ‍ॅमिश  कुटुंबात मुले अधिक असणे हे सौख्याचे लक्षण समजून प्रत्येक घरात कमीत कमी सात मुले असतात. त्यामुळे अ‍ॅमिश लोकसंख्या वेगाने वाढते आहे. आज जगातील कुठल्याही समाजापेक्षा लोकसंख्या वाढीचा दर अ‍ॅमिश समाजात अधिक आहे. १९९२ ते २००८ या काळात अ‍ॅमिश लोकसंख्या ८४ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात अ‍ॅमिश  समाजाच्या १८४ नवीन वसाहती निर्माण झाल्या. १९२० मध्ये अमेरिकेत फक्त पाच हजार अ‍ॅमिश होते तर २०१२ मध्ये त्यांची संख्या तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे.
अ‍ॅमिश लोकांचे एक मध्यवर्ती चर्च नसते. वस्त्यांमधील प्रत्येक चर्चच्या कार्यक्षेत्रात २० ते ४० कुटुंबे येतात. प्रत्येक वस्त्यांसाठी एक बिशप, दोन पाद्री व एक डिकन्स असतो. बिशप हाच त्या वस्तीचा मुख्य धर्माधिकारी असतो. अ‍ॅमिश हा शब्द वंशसूचक नसून त्यांचे नीतीनियम, चर्च व ठराविक जीवनशैली यांवरील श्रद्धासूचक आहे. सर्व पूजाविधी एखाद्या अ‍ॅमिशच्या घरी फक्त रविवारीच होतात. मुला-मुलींना फक्त आठवीपर्यंतच शिक्षण घेण्यास परवानगी असते. त्यांच्या विचारसरणीनुसार अ‍ॅमिश पद्धतीचे जीवन जगण्यासाठी आठवीपर्यंतचे शिक्षण पुरेसे असते. इतर ख्रिश्चन समाजाप्रमाणे हे लोक लहान मुलांचा बाप्तिमा करीत नाहीत. मुलगा साधारणत: १७-१८ वर्षांचा झाला, त्याला समज आली की, त्याला त्याचे पालक अनेक नीतीनियमांमधून मोकळीक देतात. ही मोकळीक काही काळापुरतीच असते. या काळात तो बाहेरच्या अमेरिकन माणसाप्रमाणे पेहराव करू शकतो. सिगारेट व इतर तंबाखूचे सेवन करू शकतो. मोबाइल फोन व स्वयंचलित वाहनांचा उपयोग करू शकतो. या मोकळीकीच्या काळास ते ‘रमिस्प्रग’ असे म्हणतात. या शब्दाचा अर्थ सभोवती फिरणे असा होतो. या काळात तो मुलगा त्याच्या भावी आयुष्यात अ‍ॅमिश जीवनशैली स्वीकारायची की इतर अमेरिकन पद्धतीचे जीवन जगायचे हे ठरवतो. यानंतर तो एकतर अ‍ॅमिश समाजातच राहायची इच्छा व्यक्त करून त्याचा बाप्तिश्मा करण्याची विनंती त्याच्या पालकांना करतो किंवा पुढील जीवनात तो कायमसाठी अ‍ॅमिश  समाजाचा त्याग करतो. बहुतेक मुले अ‍ॅमिश समाजातच राहणे पसंत करतात.
अ‍ॅमिश व्यक्तीचे लग्न त्यांच्या समाजातील व्यक्तीशीच होते. त्यांची लग्ने फक्त मंगळवारी व गुरुवारीच होतात. लग्नाचे विधी लांबलचक असतात व ते १०-१२ दिवस चालतात. साधेपणाने होणाऱ्या अ‍ॅमिश विवाहात फोटोग्राफी व व्हिडीओ शूटिंग यास बंदी असते. अ‍ॅमिश समाज त्यांचे नीतीनियम आर्डनंग यांनी बांधला गेला आहे. अिहसा, माणुसकी, चर्चचे सर्व विधी यांचे काटेकोर पालन करणे याला अ‍ॅमिश लोक महत्त्व देतात. अिहसावादी असल्याने हे लोक लष्करात भरती होत नाहीत. ओल्ड ऑर्डर अ‍ॅमिश लोकांचे स्वत:चे प्रकाशनगृह आहे. त्यातून त्यांची शाळांची क्रमिक पुस्तके, वर्तमानपत्रे वगरे साहित्य प्रकाशित होते. ते कोणत्याही प्रकारची सार्वजनिक सुरक्षा म्हणजेच पोलीस, देशाचे संरक्षण खाते यांचे संरक्षण घेणे अनावश्यक समजतात. विमा उतरवणे त्यांच्या नियमात बसत नसल्याने विमा उतरवत नाहीत.
सामान्यत: एकांतात राहणाऱ्या समाजात अनेक आनुवंशिक दोष असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे सख्या व जवळच्या नातेवाईकांमुळे होणारे प्रजोत्पादन. अशा संततीत बहिरेपणा, रक्ताभिसरणातील दोष, लंगिक दोष बऱ्याच प्रमाणात पिढय़ान्पिढय़ा येऊन बालमृत्यूचे प्रमाणही वाढते. अशा प्रकारचे दोष हे अ‍ॅमिश माणूस देवाची इच्छा मानून त्यासाठी रक्तपरीक्षा करण्यासही नकार देतो. हे लोक आरोग्यविमा (मेडिक्लेम) उतरवत नाहीत. कुटुंबनियोजनाची औषधे घेत नाहीत. गर्भपात करून घेणे धर्मबाह्य समजात. वैद्यकीय व औषधांचा बराचसा खर्च त्यांना चर्चकडून मिळतो. अ‍ॅमिश लोकांचे आर्डनंग म्हणजे नीतीनियम अ‍ॅमिशची जीवनशैली ठरवतात. यातील काही आर्डनंग लिखित तर काही अलिखित आहेत. प्रत्येक अ‍ॅमिश समुदायातील नियमांमध्ये थोडाफार परक असला तरी त्यातील मूळ सूत्र एकच असते. ते म्हणजे स्वावलंबन, साधेपणा, चर्चचे सर्व विधी कठोरपणे पाळणे असे असते.
एका वस्तीमध्ये स्वचंलित वाहनाचा उपयोग अगदी अपवादाने, नियंत्रितपणे करायला परवानगी असेल तर दुसऱ्या वस्तीमध्ये पूर्ण बंदी असेल. काही वस्त्यांमध्ये पुरुषांनी दाढी वाढवणे सक्तीचे असेल तर काहींमध्ये फक्त मिशा ठेवणे सक्तीचे. अ‍ॅमिश लोकांचे कपडे अत्यंत साधे असतात. पुरुषांची साधी सरळसोट पॅन्ट, विना कॉलरचा शर्ट, पॅन्ट व शर्टला खिसे ठेवण्यास बंदी, पॅन्टला पट्टा लावायचा नाही. पॅन्टला बहुधा खांद्यावरून जाणारे बंद (सस्पेंडर्स) असतात. काही वस्त्यांमध्ये लग्नाआधी दाढी-मिशा काढण्यास बंदी. तर काहींमध्ये लग्नानंतर दाढी-मिशा काढण्यास बंदी. स्त्री-पुरुषांच्या कपडय़ांचे रंग बहुधा भडक असतात. स्त्रिया नेहमी फूल स्कर्ट व पूर्ण बाह्यांचे टॉप वापरतात. त्यांना केस कापण्यास मनाई असते. त्या केस मागे डोक्यावर बांधून डोक्यावर लहान मुलांना घालतात तशा टोपडय़ासारख्या सफेद टोप्या घालतात. स्त्री-पुरुषांची पादत्राणे फक्त काळ्या रंगाची असावी लागतात. सोन्या-चांदीचे, हिऱ्यांचे कुठलेही दागिने वापरणे हा मोठा गुन्हा समजला जातो. मृत्यूनंतर तीन दिवसांनी दफन करण्याची अ‍ॅमिश  प्रथा आहे. अंत्यविधी अगदी साधे असतात. बऱ्याच वेळा घराच्या मागेच दफन केले जाते. दफनाच्या वेळी फुले वापरण्यावर, मृताच्या गौरवपर भाषणे करण्यावरही बंदी असते. अ‍ॅमिश पंथाच्या शिकवणीनुसार जुन्या रूढी-परांपरा जोपासल्याने पिढय़ा एकेमकांशी जोडल्या जातात. परंतु त्यामुळे अ‍ॅमिश समाज इतर समाजापासून दूर दूर जात आहे. बऱ्याच वेळी अ‍ॅमिश वसाहती शेजारी राहणाऱ्या इतर अमेरिकन लोकांशी त्यांचे खटके उडतात. अ‍ॅमिश घरांवर, घोडागाडय़ांवर बऱ्याच वेळा त्यातून दगडफेकही झाली आहे.