13 August 2020

News Flash

केल्याने होत आहे रे..

मागच्याच वर्षीची ही गोष्ट! माझ्या अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठातल्या सहकाऱ्यांबरोबर मी आणि माझी बायको एका सहलीला गेलो होतो.

| August 9, 2015 01:01 am

मागच्याच वर्षीची ही गोष्ट! माझ्या अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठातल्या सहकाऱ्यांबरोबर मी आणि माझी बायको एका सहलीला गेलो होतो. आम्ही दोघेही एकाच विद्यापीठात काम करत असल्याने सगळेच ओळखीचे होते. शाळेनंतरची ही बहुधा माझी पहिलीच सहल असावी. माझा बॉस होर्न (Hoorn) या गावी (अ‍ॅमस्टरडॅमहून साधारण ३०-३५ कि. मी.) राहतो. होर्न स्टेशनवरून एका स्वतंत्र लाइनवर वाफेच्या इंजिनावर चालणारी छोटी रेल्वे चालते; ज्याने आम्ही होर्नवरून मेदम्ब्लिक या गावी पोहोचलो. या रेल्वेचं इंजिन बेल्लो ७७४२ हे नेर्दलड्समधलं जपलेलं आणि वापरात असलेलं एकमेव वाफेचं इंजिन आहे. या इंजिनास साजेसे लाकडी डबेही आहेत; ज्यामध्ये बसून आपण आरामात प्रवास करू शकतो. या डब्यांची रचना अत्यंत साधी व सोपी होती. गंमत म्हणजे या गाडीच्या टी. सी.चा गणवेश पारंपरिक होता. पण तो तिकिटं तपासण्याऐवजी सर्व प्रवाशांशी गप्पा मारत, हसत पुढे जात होता. अशा अनोख्या गाडीतून प्रवास करताना आणि आजूबाजूचा निसर्ग पाहताना इतिहासातून एक चक्कर मारून आल्यासारखं वाटत होतं. मेदम्ब्लिकमध्ये जिथे ही रेल्वे थांबते तिथे एका बाजूस छोटंसं स्टेशन आणि दुसऱ्या बाजूस बंधाऱ्याच्या पलीकडे अथांग जलाशय! तिथून पुढे एंकहौझेन या गावी (डच ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक बंदरांपैकी एक!) बोटीनं जायचा बेत होता. बोटीला अवकाश असल्याने त्या पावसाळी वातावरणात मेदम्ब्लिकच्या निसर्गरम्य परिसरात आम्ही सगळे वाफाळलेल्या कॉफीचे घोट घेत एक चक्कर मारून आलो. एंकहौझेनला जाणारी बोट जणू आमच्यासाठीच होती. कारण आम्ही सर्वजण आत शिरल्यावर लगेचच तिने बंदर सोडलं. बोटीवर खाण्या-पिण्याची उत्तम सोय होती. एव्हाना सगळ्यांना भुका लागल्याच होत्या. त्यामुळे सगळ्यांनी जेवून घेतलं.
आमचं आवरेतो पाऊस थांबला होता आणि ढगही गडप झाले होते. तळपणारा सूर्य आणि घोंघावणारा वारा आमची सोबत करत होते. एके ठिकाणी बोटीनं वळण घेतलं आणि समोर अनेक छोटय़ा बोटी आणि एका रेषेत तीन उंच भट्टय़ा (kilns) दिसल्या. एका सहकाऱ्याला मी त्याबद्दल विचारलं तर तो म्हणाला, ‘हेच ते झाऊदरझे संग्रहालय. ती एक गंमत आहे. बघशीलच तू!’ बोट किनाऱ्याला आली आणि उतरताना त्या तीन भट्टय़ांनी सर्वाचं लक्ष वेधलं. तिथल्या माहिती केंद्रावर कळलं की, त्या भट्टय़ा अगदी आत्तापर्यंत वापरात  होत्या. समुद्रात मिळालेले शंख-शिंपले जाळून त्यापासून बांधकामासाठी उपयुक्त चुन्याची निवळी बनवण्यासाठी या भट्टय़ांचा वापर केला जायचा. असंही लक्षात आलं की, आम्ही एका संग्रहालयामधूनच चालतो आहोत. एक असं संग्रहालय- ज्यामध्ये खरी घरं, खऱ्या इमारती होत्या. आणि वर निरभ्र आकाश.
झाऊदरझे हा नेदर्रलड्सच्या वायव्येला असणारा एक उपसागर! या भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी! परंतु १९३२ साली नेदर्रलड्समध्ये नॉर्थ हॉलंड प्रांतातील देन ऊव्हर ते फ्रीस्लंद प्रांतातील झुरीच या गावांना जोडण्यासाठी आणि पुरामुळे वरचेवर होणारी हानी टाळण्यासाठी बांधण्यात आलेल्या सुमारे ३२ कि. मी. लांबीच्या बंधाऱ्यामुळे (आफ्स्लाउतदैक) हा उपसागर विभागला गेला. या बंधाऱ्याच्या एका बाजूला उपसागर, तर दुसऱ्या बाजूला गोडय़ा पाण्याचा एक बंदिस्त जलाशय (आयसल्मेर) अशी विभागणी झाली. हा जलाशय गोडय़ा पाण्याचा बनण्यामागे त्याच्या आसपासचे कालवे आणि त्याच्या काही भागातील पाणी उपसून उपलब्ध झालेल्या जागेचा वास्तव्यासाठी केला गेलेला वापर कारणीभूत आहे.
या साऱ्या घडामोडींत इथली मासेमारी संस्कृती जपली जावी म्हणून १९४८ साली झाऊदरझे संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. संग्रहालयासाठीच्या खुल्या मैदानात (सुमारे १५ एकर जमिनीवर) पूर्वीच्या झाऊदरझे भागातील सुमारे १३० महत्त्वाच्या वास्तूंसाठी जागा राखीव ठेवली गेली. त्यानंतर स्थापन झालेल्या ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ द झाऊदरझे म्युझियम’च्या पुढाकाराने हे संग्रहालय नावारूपाला आलं. मात्र लोकांसाठी हे संग्रहालय १९८३ साली खुलं झालं. या संग्रहालयासाठीही त्या जागेवरील पाणी उपसून जमीन मिळवावी लागली होती.
त्यानंतर या संग्रहालयासाठी आवश्यक इमारतींचा शोध सुरू झाला. पूर्वीच्या झाऊदरझे प्रांतातील अनेक नगरपालिकांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आलं की, त्या- त्या नगरपालिकेच्या हद्दीत छोटय़ा-मोठय़ा, मोडकळीस आलेल्या, पण महत्त्वाच्या आणि मुख्य म्हणजे झाऊदरझेच्या पूर्वीच्या काळाच्या प्रतीक बनतील अशा इमारती असतील तर त्या संग्रहालयासाठी देण्यात याव्यात! आश्चर्य म्हणजे काही मोजक्याच इमारती संग्रहालयासाठी ‘खरेदी’ कराव्या लागल्या. बाकी इमारती काम्पेन, हार्दरवैकसारख्या अनेक नगरपालिकांनी दान म्हणून दिल्या. या इमारती मिळवण्यासाठी संग्रहालयाद्वारे जे प्रयत्न केले गेले ते केवळ डच लोकच करू जाणे!
प्रथम मिळालेल्या सर्व इमारतींची पाहणी करून संग्रहालयासाठीचा आराखडा बनविण्यात आला. त्यात कुठली इमारत कुठे उभारली जाईल आणि तिच्या आजूबाजूचा परिसर त्या इमारतीशी कसा जुळणारा असेल, त्यासाठी काय काय करावं लागेल, यावर भर देण्यात आला होता. पुढची पायरी अशक्यप्राय, परंतु महत्त्वाची होती. ती म्हणजे निवडलेल्या इमारतींचे स्थलांतर!  इमारतींवरचे त्यांच्या वापराचे, दुरुस्त्यांचे ठसे तसेच त्यांत हवामानामुळे झालेले बदल जसेच्या तसे ठेवण्यासाठी या इमारती तुकडय़ा-तुकडय़ांत स्थलांतरित केल्या गेल्या. इमारतींचे मोठाले भाग हुक असणाऱ्या मोठय़ा लोखंडी फ्रेम्समध्ये बांधून, तर इमारतींचा पुढचा दृश्य भाग मोठाल्या लोखंडी व लाकडी फ्रेम्समध्ये घालून ट्रक वा बोटींच्या साहाय्यानं हलविण्यात आले. १९७१ सालापासून काही दगडी वा लाकडी इमारती जशाच्या तशा उचलून आणल्या गेल्या. सर्वात प्रथम फोलन्होव गावातलं एका मच्छिमाराचं घर स्थलांतरित केलं गेलं. अशा घराच्या भिंतींच्या खाली लोखंडी फ्रेम्स घालण्यात आल्या व नंतर चहूबाजूंनी वायरी आणि इतर साहित्यांनी ती वास्तू घट्ट बसवून, दोन क्रेन्सच्या साहाय्याने उचलून बंदरावर आणली गेली. त्यानंतर मालवाहतूक करणाऱ्या मोठय़ा बोटीवर ती लादून संग्रहालयाच्या ठिकाणी आणण्यात आली व तिथे पुन्हा क्रेन्सच्या साहाय्याने तिच्यासाठी राखीव जागेवर तिला स्थापित केलं गेलं. अशा तऱ्हेनं चीजचं एक गोदामही हलविण्यात आलं.
ज्या इमारती स्थलांतरित होऊ  शकत नव्हत्या त्यांच्या प्रतिकृती संग्रहालयामध्ये उभारल्या गेल्या. संस्कृती- जतनाकरता केवढा हा आटापिटा! इथल्या इमारतींमध्ये मच्छीबाजार आहे, जुनी, रोजच्या वापरात असलेली घरं आहेत, औषधांची दुकानं आहेत. आधी म्हटलेल्या चुन्याच्या भट्टय़ादेखील आहेत. यातली काही राहती घरं अतिशय लहान, तर काही थोडी मोठी- घरमालक सुखवस्तू असल्याचं सुचवणारी होती. गमतीची गोष्ट अशी की, लहान घरांमध्ये झोपण्यासाठी एक कपाट असायचं. कपाटाच्या आत वर नवरा-बायको, तर खाली लहान मुलं झोपायची! परंतु एकूण सर्वच घरं सुंदर सजवलेली असायची आणि आहेत. आणखीन एक गंमत म्हणजे प्रत्येक औषधाच्या दुकानाबाहेर माणसाचा मानेपर्यंत एक पुतळा त्याकाळी असे. या संग्रहालयामुळे असे काही पुतळे आम्हाला पाहता आले. या पुतळ्यातील व्यक्तीची जीभ बाहेर काढलेली असायची किंवा तिचं तोंड उघडं असायचं. याचं कारण त्याकाळी रुग्णाची तपासणी करताना सर्वात पहिली गोष्ट डॉक्टर कुठली करत असे, तर रुग्णाची जीभ तपासणी! अजून एक वाखाणण्याजोगी जागा म्हणजे वाफेवर चालणारं लाँड्रोमॅट (लॉंड्री)! हे लाँड्रोमॅट १९ व्या शतकाचं प्रतीक आहे. जेव्हा वाफेचा उपयोग करून मशिनच्या साहाय्यानं अनेक उद्योग उभारणं शक्य झालं होतं.
खुल्या मैदानावरील या वास्तूसंग्रहालयाखेरिज झाऊदरझे प्रांतातील लोकांचं राहणीमान, कलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कलाकुसरीच्या वस्तू, भांडी, चित्रं, पोषाख, पादत्राणं, मासेमारीची साधनं अशा अनेक गोष्टींचा खजिना या संग्रहालयात बघायला मिळतो. इथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रोपमेकिंग (दोरखंड, दोऱ्या बनवणे), मासे व मासे वाळवण्याच्या प्रक्रियेबद्दलची माहिती अशा गोष्टीही आहेत. एकूण हे संग्रहालय अतिशय सुंदर, माहितीपूर्ण आहे. ते पाहताना थक्क व्हायला होतं. केवळ संस्कृती जपण्यासाठी उभारल्या गेलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने ‘केल्याने होत आहे रे..’ या उक्तीचा प्रत्यय आला.
डॉ. विश्वास अभ्यंकर, अ‍ॅमस्टरडॅम, नेर्दलड्स
wishwas2610@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2015 1:01 am

Web Title: amsterdam best museums
Next Stories
1 ब्रिटिश समर
2 हात : तिचे आणि त्याचे!
3 स्पर्धा.. जिवंत पुतळ्यांची!
Just Now!
X