जुई कुलकर्णी

आपण बहुतांश पौर्वात्य आपली घट्ट विणलेली कुटुंबसंस्था आणि शिस्तबद्ध पितृसत्ताक व्यवस्था याविषयी अभिमान बाळगतो. पण हे मजबूत वाटणारे धागे मुळापासून गदागदा हलवले, उचकटून फेकून दिले तरीही उरतं माणसा-माणसांमधलं निखळ प्रेम, ममता आणि माणूसकी. हीच मूल्यं शेवटी महत्त्वाची असतात, हे ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ या कादंबरीत सांगितलंय. ‘द काईट रनर’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक खालिद हुसनी यांची ही तिसरी कादंबरी.

अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं. आपण अफगणिस्तानच्या भीषण अवस्थेकडे नीट पाहायला हवं. आपल्याला आपल्या सुस्थित घराची, अजूनही बऱ्यापकी घट्ट विण असलेल्या कुटुंबपद्धतीची कदर वाटत नाही. हे सगळं कायम असणार आहे असं गृहीत धरून आपण जगतो. मात्र, अचानक एके दिवशी कुटुंबातील आपलं सगळ्यात जवळचं असलेलं माणूस गमावणं ही कमालीची भयावह  गोष्ट असते. अचानक एके दिवशी आपल्याला आपला देशच नसणं ही अत्यंत भीषण गोष्ट असते. ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही या अशा भयानकतेची कादंबरी आहे. देश, भाषा, रक्त यांच्या आयुष्यभराच्या शोधाची ही कादंबरी आहे.

या कादंबरीत चितारलेला काळाचा पट मोठा आहे. प्रदेशविस्तार अफाट आहे. तीत अनेक पात्रं आहेत. मात्र, मूळ कथा आहे अब्दुल्ला व परी या भावा-बहिणीची. दहा-बारा वर्षांचा अब्दुल्ला हा तीन-चार वर्षांच्या परीचा भाऊ नसून जणू आईच आहे. त्यांची आई परीच्या जन्माच्या वेळेस वारली आहे. परवाना ही त्यांची सावत्र आई आहे. ती सावत्रपणा करत नसली तरी त्यांच्याशी तुटकपणे वागते. आपल्या अपत्यांमध्ये ती रमली आहे. अत्यंत गरिबीत हे कुटुंब कसंतरी जगतं आहे. अब्दुल्ला व परीच्या सावत्रमामाच्या कृपेनं परीचं आयुष्य बदलायची संधी चालून येते. नबी हा सावत्रमामा काबूलमधल्या अतिश्रीमंत सुलेमान वाहदाती परिवाराचा नोकर आहे. त्याची मालकीण- सुलेमानची तरुण बायको नीला वाहदाती अर्धी फ्रेंच आहे. ती अत्यंत सुंदर, बंडखोर आणि स्वैर स्त्री आहे. ती अपत्यहीन आहे. तिला काही  वैद्यकीय कारणामुळे मूल होऊ शकत नाही. नीला उत्तम कवी आहे. नबी परीला नीलाला देऊन तिच्या आयुष्यातली पोकळी भरू पाहतो. सुलेमान, नबी आणि नीला हा एक विचित्र प्रेमाचा त्रिकोण आहे. त्या काळात  अफगाणिस्तानात समलैंगिक असणं हे केवळ  गुपितच असू शकतं. सुलेमानचं नबीवर अव्यक्त प्रेम आहे. नबी नीलावर अव्यक्त प्रेम करतो. नीला मात्र फक्त स्वतवर प्रेम करते. नशिबाचे फासे असे पडतात, की नीला परीला घेऊन पॅरिसला कायमची निघून जाते. सतानी तालिबानच्या उदयापूर्वी हे घडतं. परी आणि नीलाची कथा पॅरिसमध्ये पुढे सुरू राहते. नीला वाहदाती, जुलिन आणि परी यांचाही प्रेमत्रिकोण आहे. नीला वाहदाती हे पात्र लेखक हुसनी यांनी फार प्रेमाने लिहिलंय. नीला मनस्वी, आत्मघाती प्रवृत्तीची आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण करून स्वतची पोकळी भरता येत नाही, याची जाणीव नीलाला फार उशिरा होते.

नबी आणि सुलेमानची कथा काबूलमध्ये सुरू राहते. पुढे अफगाणिस्तानात तालिबानी येतात. अपार विध्वंसानंतर पुन्हा जीवन सुरू होतं. सुलेमान आता वारला आहे. नबी वाहदातींच्या खिळखिळ्या हवेलीचा मालक बनला आहे. मार्कोस वर्वरीस हा ग्रीक प्लास्टिक सर्जन नबीकडे भाडेकरू म्हणून येतो. मार्कोसची एक वेगळीच कथा आहे. थालिया ही त्याची घट्ट बालमत्रीण. थालियाचा लहानपणीच कुत्र्याने जबडा फाडला आहे. ती भीषण कुरूप आहे. ओडेलिया ही मार्कोसची आई. ती शिक्षिका होती. ती खंबीर व कणखर विधवा बाई आहे. थालिया ही ओडेलियाच्या बालमत्रिणीची मुलगी आहे. या दुर्दैवी मुलीला तिची अभिनेत्री आई चक्क ओडेलियाकडे टाकून पळून जाते. स्वतच्या कुरुपतेशी झगडणारी, तीक्ष्ण वैज्ञानिक बुद्धीची थालिया, भटक्या वृत्तीचा छायाचित्रकार (आता प्लास्टिक सर्जन झालेला) मार्कोस आणि आयुष्यभर  मार्कोस व थालियावर मूक प्रेम करणारी ओडेलिया हादेखील नातेसंबंधांचा एक विलक्षण त्रिकोण म्हणायला हवा.

या एका कादंबरीत अनेक कादंबऱ्या वेगवेगळ्या काळांत सुरू आहेत. तीत कॅलिडोस्कोपप्रमाणे प्रत्येक नातेसंबंधांची नक्षी अलग आहे. त्यामुळे मुख्य पात्रांखेरीज अनेक पात्रं येतात. अमेरिकेत स्थलांतरित होऊन यशस्वी आयुष्य जगणारे तमूर बशिरी आणि डॉ. इद्रिस बशिरी हे दोघे चुलतभाऊ आहेत. घरगुती भांडणात संपूर्ण कुटुंब गमावलेली आणि मेंदूवर घाव झेलून उभी राहिलेली लहानगी रोशी आहे. इस्टेटीच्या कामासाठी इद्रिस आणि तमूर काबूलमध्ये येतात. योगायोगाने रोशीला भेटतात. इद्रिस रोशीवर माया करू लागतो. पण तिला मदतीची गरज असते तेव्हा मात्र काहीच करत नाही. स्वार्थी वाटणारा तमूर मात्र रोशीला अमेरिकेत येऊन उपचारांसाठी, जगण्यासाठी मदत करतो. अब्दुल्ला आणि परीची सावत्र आई परवाना, वडील सबूर आणि परवानाची जुळी, देखणी बहीण मासुमाची एक वेगळीच कथा आहे. परवाना क्रूर स्वभावची स्त्री आहे. हा प्रेमाचा त्रिकोण मासुमाला आयुष्यभराचं पांगळेपण देतो. एकेकाळी अब्दुल्ला आणि परीचं जिथं घर होतं, ती जागा बळकावून तिथे हवेली बांधून राहणारा शादबागमधला अफू माफिया बाबाजान व त्याचा निरागस मुलगा आदेल आहे.

या सगळ्यांचे आपापसातले नातेसंबंध आणि कडय़ा जुळवताना वाचकाची पार दमछाक होते. अर्थात कादंबरी हा साहित्यातील बडा ख्याल असतो. सुरांच्या अनेक लडय़ा उलगडत जाव्यात तशी कादंबरी उलगडत जायला हवी. कधी कधी मात्र कादंबरी वाचकाच्या संयमाची परीक्षा बघते. विशेषत: अब्दुल्ला आणि परीच्या पुनभ्रेटीचा प्रसंग संताप येईतो ताणलाय.

या ३७० पृष्ठांच्या कादंबरीचा अनुवाद वैजयंती पेंडसे यांनी केला आहे. अनुवाद प्रवाही आहे, पण वाक्यरचना कधी कधी चमत्कारिक वाटते. तसंच ‘होष्यमाणाची चाहूल’, ‘नाका निपटली’ असे अगम्य शब्द वापरून नक्की काय साध्य करायचं आहे, ते समजत नाही. परंतु या उणिवांकडे दुर्लक्ष करून वाचावी अशी ही कादंबरी आहे. परीकथेपासून सुरू होणारी ही कथा वास्तव आयुष्यदेखील परीकथेपेक्षा कमी चमत्कारिक नसतं हे सांगते.

लेखक खालिद हुसनी यांनी ११ वर्षांचे असताना अफगाणिस्तान सोडला. काही र्वष त्यांनी फ्रान्समध्ये काढली. नंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथेच डॉक्टर होऊन स्थायिक झाले. २००१ नंतर स्वतच्याच देशात ते एखाद्या पर्यटकासारखे फिरले. तिथे त्यांना त्यांच्या कादंबऱ्या सापडल्या. अशावेळी परवीन कुमार अश्क यांचा एक शेर आठवतो :

‘तमाम धरती पे बारूद बिछ चुकी है खुदा,

दुआ जमीन कही दे तो घर बनाऊ मैं’

..आणि ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही संपूर्ण मानवजातीच्या निर्वासितपणाच्या दुखाची आणि ताटातुटीची कादंबरी होते.

‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’- खालिद हुसनी,

अनुवाद- वैजयंती पेंडसे,मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ३६८, मूल्य- ४४० रुपये.