30 November 2020

News Flash

‘राग’दारी

‘राग’ या दोन अक्षरांत किती ऊर्जा सामावली आहे. नुसता शब्द उच्चारतानाच ती ऊर्जा आपल्याला जाणवते. तसं बघायला गेलं तर ती फक्त एक नकारात्मक, पण अनुरूप

| June 23, 2013 01:01 am

‘राग’ या दोन अक्षरांत किती ऊर्जा सामावली आहे. नुसता शब्द उच्चारतानाच ती ऊर्जा आपल्याला जाणवते. तसं बघायला गेलं तर ती फक्त एक नकारात्मक, पण अनुरूप भावना आहे असं म्हणता येईल. अगदी तान्हुल्या बाळापासून ते वृद्ध व्यक्ती- सर्वामध्ये दिसणारी ती एकमेव भावना आहे, असं विधान मी केलं तर ती नक्कीच अतिशयोक्तीचं ठरणार नाही. लहानग्या तान्हुल्याला भूक अनावर झाली व दूध मिळालं नाही तर ते रागाने रडायला लागतं, जोरजोरात रडायला लागतं व ‘माझी भूक भागवा, माझ्या मनासारखं करा,’ असं जणू सांगतं. आपली इच्छा/ हट्ट पुरवण्यासाठी ‘राग’युक्त रडणं हा मार्ग ते शिकत जातं.
थोडं मोठं झाल्यावरही लहान मुलांचे अनेक ‘हट्ट’ असतातच. ते हट्ट लगेच पुरवले जावेत असंच त्यांना वाटत असतं. तसं नाही झालं तर ते आपली ‘रागदारी’ सुरू करतात. रडणं, ओरडणं, आक्रस्ताळेपणा करणं असे आरोह-अवरोह त्यात असतात. लहान मुलाचं रडणं, ओरडणं म्हणजे कोण अपराध! असं आईला/ वडिलांना वाटतं. त्यांना नाही वाटलं तर आजी-आजोबांना तर ‘दुधावरची साय’ अशी तडकणे नक्कीच आवडत नाही. मग त्यांचे हट्ट पुरवले जातात. त्यातूनच ‘रागदारी’चं महत्त्व त्या मुलाला कळत जातं. बहुतेक त्यातूनच भारतीय संगीतात ‘राग’ या प्रकाराचा जन्म झाला असावा. प्रत्येक रागाचे वेगळे स्वर- आरोहाचे व अवरोहाचे- असे असंख्य राग! म्हणजे किती सुरावटींतून वेगवेगळ्या भावना व्यक्त होऊ शकतात. इतका स्वरांचा व भावनांचा उत्कट संबंध पाश्चात्त्य संगीतात नक्कीच नाही!
पुढे थोडं मोठं झाल्यावरही आपल्या मनासारखंच व्हावं, या ‘शिक्षणा’तून मग रागाचं क्रोधात रूपांतर होतं. कारण मोठं झाल्यामुळे मोठे हट्ट पुरवणं पालकांना कठीण होतं. त्यामुळे त्यांचं ‘बालक विरुद्ध पालक’ असं नाटय़ सुरू होतं. त्यामुळेच रागाची पुढची विरूप पायरी म्हणजेच क्रोध गाठणं त्या ‘बालकास’ आवश्यक होतं. मग हे पौगंडावस्थेतील ‘बालक’ आपला राग/ क्रोध एक तर आत दाबून टाकते किंवा विविध मार्गानी त्याला बाहेर काढते. मग अभ्यासात अधोगती, अभ्यास/ करिअरवरचं लक्ष उडणं, शाळा बुडवणं, वाईट संगत, व्यसनाधीनता, असामाजिक वर्तन, लंगिक दुर्वतन अशा विविध समस्या त्यातून निर्माण होऊ शकतात.
फ्रॉईडने वर्णन केल्याप्रमाणे मनाचे तीन स्तर असतात. इदम, इगो, सुपरइगो किंवा बालक, चालक, पालक! बालकांचा इदमचा राग चालकाकडून, पालकाकडून जोपासला जातो आणि त्याचं क्रोधात रूपांतर करायचं प्रशिक्षणच मिळत जातं. कोणाचा राग त्याने (फ्रॉईडने) म्हटल्याप्रमाणे ‘इनवर्ड’.. आत वळतो आणि नराश्य, त्यातून कामावर/ अभ्यासावर परिणाम होतो. कोणाचा बाहेर वळतो व असामाजिक वर्तनात परावर्तित होतो. मुळात आपल्या मनासारखं सर्व व्हायलाच पाहिजे असा जोपासलेला ‘अविवेक’ रागाची अनुरूप भावना सीमित करू शकत नाही आणि क्रोधाची विरूप भावना वाढीस लागते.
खरं तर नुसत्या रागात सकारात्मक ऊर्जा आहे. न्या. महादेव गोिवद रानडे, महात्मा फुले यांना जुन्या रूढी, समाजाचं मागासलेपण, इंग्रजांचा जुलमी कारभार या सर्वाचा राग आला. पण तो त्यांनी किती सकारात्मकतेने वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून शांतपणे व्यक्त केला. स्वत:च्या पत्नीपासून स्त्री-शिक्षणाची सुरुवात, सार्वजनिक सभेची स्थापना, वाचनाचं महत्त्व वाढवण्यासाठी ग्रंथालय चळवळ.. किती सकारात्मक ऊर्जा होती त्यांच्या रागात! टिळक, गांधी यांनाही आलेला इंग्रजी परकीय सत्तेवरचा राग त्यांनी आंदोलने, सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग वगरे मार्गातून उभा करून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत नेला. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग वगरेंनी ‘िहसे’च्या मार्गाने, पण ‘संयमित’ िहसेच्या माध्यमातून व फक्त जुलमी राजवटींच्या प्रतिनिधींविरुद्ध लढून तो व्यक्त केला. सावरकरांनीही अंधश्रद्धा निर्मूलन, जातीनिर्मूलन, शिक्षणप्रसाराच्या माध्यमातून आपल्या सामाजिक व्यवस्थेविरुद्धचा राग सकारात्मक पद्धतीनेच व्यक्त केला.
पण आज नुसतीच आक्रस्ताळी, क्रोधयुक्त भाषणे करून भावना भडकवणं, विध्वंसातून राग नव्हे, तर क्रोध व्यक्त करणं, नेतृत्वानेही क्रोधात्मक वक्तव्ये करून त्यातून राजकारण करणं- एवढं नकारात्मक वळण त्याला मिळालं आहे. क्रोध, दहशतवाद व आपली पोळी भाजणं- इतकं असामाजिक, नकारात्मक वळण त्याला मिळालं आहे. परंतु शेवटी आपण काय घ्यायचं, हे आपणच ठरवायचं आहे. आपली विरूप भावना आपलं अध:पतन करते, हे निश्चित.
विनोबाजींनी ‘गीताई’त म्हटलंच आहे की,
क्रोधातून जडे मोह।
मोहाने स्मृती लोपली॥
स्मृती लोपे बुद्धीनाश।
म्हणजे आत्म-नाशचि॥
म्हणजेच क्रोधाची विरूप भावना आपल्याला जणू आत्मनाशाकडेच नेत असते असं विनोबाजींना म्हणायचं आहे. तर समर्थ रामदासांनीही म्हटलं आहे-
अभिमाने उठे मत्सर।
मत्सरे ये तिरस्कार।
पुढे क्रोधाचा विकार।
प्रबळ बने॥
म्हणजेच क्रोध हा विकार आहे. राग ही भावना आहे. या विकाराकडे जाणं म्हणजे आत्मनाशाकडे जाणं! हे टाळणं आपण ठरवलं तर शक्य आहे. त्यासाठी या भावनांचं नियंत्रण विचारांच्या भानातून करायला शिकणं अत्यावश्यक आहे. कारण प्रत्यक्ष भगवंतांनीच गीतेच्या कर्मसंन्यास योगात म्हटलं आहे- ‘काम, क्रोधादि प्राकृत भावनांचं जो नियंत्रण करू शकतो, तोच खरा सुखी मनुष्य होय!’ मग सुखी होण्यासाठी आपण एवढं केलं तर किती बरं होईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 1:01 am

Web Title: anger
Next Stories
1 योग्य दिशा
2 माझं अवकाश
3 कलावंत बना
Just Now!
X