News Flash

अंतर्नाद : बुद्धं सरणं गच्छामि

बुद्ध अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच्या राजपुत्र गौतमाच्या वर्णनात तो संगीतकुशल, वीणावादनपटू असल्याचा उल्लेख आहे.

डॉ. चैतन्य कुंटे keshavchaitanya@gmail.com

भारतातील प्राचीनतम दर्शन परंपरांपैकी एक म्हणजे बौद्ध परंपरा. जवळपास अडीच हजार वर्षांचा इतिहास या धर्मास आहे. आणि आजही मानवता जिवंत ठेवण्यासाठी हा धर्म पथदर्शक आहे. पंचशीलांचा, अष्टांगिक सम्यक मार्गाचा संदेश देणारा बौद्ध धर्म म्हणजे ‘मध्यममार्ग’! हा धर्म भारतात उत्पन्न झाला.. यथावकाश आशिया खंडात पसरला. आज तिबेट, श्रीलंका, भूतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, मंगोलिया या राष्ट्रांचा हा अधिकृत धर्म आहे, तर जपान व चीनमध्येही त्याचा मोठा वारसा आहे.

बौद्ध धर्माचा गाभा असलेल्या त्रिपिटकांसह पाली भाषेतील जातककथा, थेरगाथा, थेरीगाथा, धम्मपदअट्ठकथा इ. साहित्य, संस्कृतमधील दिव्यावदान, ललितविस्तर, बुद्धचरित, इ. ग्रंथांत संगीतविषयक उल्लेख विखुरले आहेत. सांची, भरहुत, अमरावती इ. स्तूपांवरील शिल्पांकने, अजिंठादी लेण्यांतील चित्रांकने हेही संगीताचे दर्शन घडवतात. हे सारे केवळ बौद्ध धर्मसंगीताचे निदर्शक नसून, तत्कालीन जनजीवनात प्रचलित एकंदर संगीताचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच भारतीय संगीताच्या इतिहासाभ्यासात या बौद्ध साधनांचे महत्त्व आहे. भारतीय बौद्ध साहित्य, चित्र-शिल्प आणि अन्य देश, संस्कृतींतील बौद्ध सामग्रीतील संगीताच्या आरेखनाचा अभ्यास करणे हा तर एखाद्या विस्तृत संशोधन प्रकल्पाचा विषय आहे.

बुद्ध अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच्या राजपुत्र गौतमाच्या वर्णनात तो संगीतकुशल, वीणावादनपटू असल्याचा उल्लेख आहे. (त्याकाळी राजघराण्यातील सर्वानाच संगीतादी कलाविद्यांचे शिक्षण देऊन सुसंस्कृत करण्याचा प्रघात होता. आजच्यांनी ही बाब ध्यानात घेण्यासारखी आहे!) संबोधिप्राप्तीच्या पश्चात संघ स्थापून धर्मोपदेश करणाऱ्या भगवान बुद्धांच्या शब्दांचे म्हणजे कंठध्वनीचे, त्यांच्या वाणीतील अमोघ शक्तीचे वर्णनही मिळते. त्यापैकी काही गुणांतून वाणीची संगीतपरता कळते. उदा. स्निग्धा, शुद्धा, वल्गु, श्रवणीया, अपरुषा, सिंहस्वरवेगा, मेघस्वरघोषा, किन्नरसंगीतिघोषा, दुन्दुभिस्वरा, अनन्नुता, अनवनता, सरिता, सर्वस्वरपूरिणी, इत्यादी. असे असले तरी बुद्धांनी संगीत हे विकारजनक व अग्रा मानले. ‘गाथा, मंत्र यांना संगीताने सजवून गाऊ नये. त्या नादात भिक्षूंचे, श्रोत्यांचे, गृहस्थांचे मन विचलित होते. शिवाय शब्दांचा मूलार्थ समजत नाही. आणि त्यातून बोध न होता केवळ रंजनच होते. संगीत हे ध्यानात विघ्न आणते,’ अशा आशयाचे बुद्धवचन अंगुत्तर निकायात आहे. अर्थातच बौद्ध संघाने, विशेषत: हीनयान पंथाने धर्माचरणात संगीत अत्यल्प ठेवले.

आज बौद्ध धर्म आणि संगीत यांचे नाते कसे आहे?

संगीताला उपासनेचे साधन म्हणून मर्यादित प्रमाणात मान्यता द्यायची; मात्र मनोरंजनपर संगीताला त्याज्य मानायचे असे धोरण सामान्यत: सर्वच धर्मानी बाळगले, हे गेल्या काही लेखांत आपण जाणून घेतले. बौद्ध धर्मही याला अपवाद नाही. बौद्ध उपासनेत मंत्रोच्चारांना अपार महत्त्व आहे आणि धर्माचारांत काही मोजक्या वाद्यांचा वापर अवश्य मानला आहे. ‘अट्ठसील’ प्रार्थनेत ‘नच्च गीत वादित विसुक दस्सन माला गंधविलेपन धारणमंडन विभूसनट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी’ (नाच, गाणे-बजावणे, नाटक-तमाशे, मालागंधविलेपन, दागदागिने या सर्वापासून मी अलिप्त राहीन.) अशी शपथ प्रत्येक बौद्धधर्मीय घेतो. तरीही निसर्गत: मानवी कान आणि मन हे संगीताकडे खेचले जातेच! त्यामुळे उपासनेतर संगीताला नाकारले तरी जीवनातून ते पूर्णत: वजा करणे कोणत्याही धर्माला साधले नाही. अर्थातच बौद्ध धर्मातही धर्मसंगीताच्या नाना परी कमी-अधिक प्रमाणात दिसतात. भारताखेरीज अन्य देशांत बौद्ध धर्मसंगीताच्या परंपरा अधिक वैविध्यपूर्ण, व्यापक आणि दीर्घकाळ रुजलेल्या आहेत. त्यांचा विचार न करणे अपुरे ठरेल. म्हणून इथे बौद्ध धर्मसंगीताचा आढावा घेताना अन्य परंपरांचाही उल्लेख करत आहे.

हीनयान वा श्रावकयान तथा थेरवाद हा आद्य बौद्ध पंथ. तो आज प्रामुख्याने श्रीलंका व काही आग्नेय आशियाई देशांत आहे. या पंथात मंत्रपठणाखेरीज अन्य संगीत जवळपास वर्ज्य आहे. तुलनेने महायान पंथाने आणि त्यानंतरच्या वज्रयान इ. उपपंथांनी संगीताला अधिक वाव दिला. म्हणूनच तिबेट, भूतान, नेपाळपासून चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम, मलेशिया येथील बौद्ध कर्माचारांत तुलनेने अधिक संगीतवत्ता आहे. हीनयान, महायान, मंत्रयान किंवा वज्रयान, तंत्रयान अशी वाकवळणे घेतलेला हा धम्म अनुक्रमे संगीताचा समावेश आधिक्याने करत गेला. आंबेडकरप्रणीत नवयान चळवळीपर्यंत या धर्माची यात्रा जारी आहे. आणि या नवयानात संगीताचे स्वरूप काय आहे याचा विचारही नव्याने करावा असा आहे.

आदिम संगीताचा आविष्कार म्हणावे अशा मंत्रपठणापासून कलासंगीताला जवळ जाणाऱ्या चर्यापदांपर्यंत आणि अलीकडच्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या वापरातून ‘निओ-म्युझिक’ धाटणीचे संगीत असा व्यापक पट बौद्ध संगीतात दिसतो. असे असले तरी बौद्ध धर्मसंगीताचा भर पाठय़संगीतावरच राहिला आहे.

परित्त वा धारिणी म्हणजे दैनंदिन आणि नैमित्तिक पठणाच्या मंत्र, स्तोत्र इत्यादीचा संग्रह. त्यात बुद्धाभिवादन, त्रिसरण, पंचशील, पंचवंदना, उपज्झट्ठान, खमायाचना, मंगलसुत्त, रतनसुत्त, मेत्तसुत्त, महामंगल जयगाथा यांचा समावेश असतो. परित्तपाठाचे ‘संगायन’ (सामूहिक पठण) करतात. एकल, युगल व प्रतिसादी पद्धतीनेही संगायन होते. प्रामुख्याने पाली तसेच संस्कृत, तिबेटी, अन्य आशियाई भाषांतील बौद्ध प्रार्थनांच्या श्रवणातून त्यांतील पठणप्रधानता अधोरेखित होते. पठणातील ध्वनीत मोठे सामर्थ्य असते. या नादाने दुष्ट शक्तींचा नाश होऊन चित्त एकाग्र होते, आध्यात्मिक प्रगती होते असा विश्वास असतो.

भारतीय संगीत परंपरेने वैदिक गायनाच्या संदर्भात आर्चिक (एकस्वरी), गाथिक (द्विस्वरी), सामिक (त्रिस्वरी), स्वरांतर (चतु:स्वरी), औडव, षाडव, संपूर्ण असे भेद दिले होते. बौद्ध पठणात यांपैकी आर्चिक ते औडव यांचा वापर ठळक आहे. ‘नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स’ ही प्रार्थना, तसेच जपानी निचिरेन पंथातील ‘नमम्योहो-रेंगे-क्यो’ (गोंग्यो), वज्रयान पंथातील ‘ओं मणी पद्म्ो हुं’ ही आर्चिक पठणाची उदाहरणे आहेत. ‘मेत्तसुत्त’चा पाठ हे गाथिक प्रकारचे आहे. त्रिसरण, पंचशील, मंगलसुत्त यांत सामिक गायन आहे. रतनसुत्तसारख्या काहींचे स्वरांतर गायन होते. बऱ्याचदा या स्वरांतर गायनात ‘मगरेसा’ असा अवरोही स्वरक्रम दिसतो आणि वैदिक पद्धतीशी असलेले तिचे साम्यही जाणवते. जयमंगल अट्ठगाथा, प्रज्ञापारमिता हृदयसूत्र यांचे गायन औडव, षाडव सुरावटींत होते. ईशान्य आशियातील संगीत हे प्रामुख्याने औडव, षाडव आहे. संपूर्ण स्वराग्राम तेथे क्वचित असतात. अर्थातच या भागातील बौद्ध धर्मसंगीतही मुख्यत्वे औडव आहे.

जपानमधील तेन्दाई आणि शिंगोन या बौद्ध पंथांतील शोम्यो (बोन्बाई, बोन्नोकू अशीही नावे) ही खास गायनाची परंपरा. त्यात ऱ्योक्योकू आणि रिक्कोकू या अनुक्रमे स्मरणदुर्गम आणि स्मरणसुलभ अशा दोन गायनशैली आहेत. सहाव्या शतकात भारतातून चीनमध्ये गेलेल्या भिक्षूंनी भारतीय संगीतही तिकडे नेले. चीनमधून हा पंथ व संगीत जपानमध्ये पोहोचले. आणि म्हणूनच भारतीय संगीत हा जपानी शोम्योचा मूलस्रोत मानतात. आपल्या मधमादसारंगशी साम्य असलेल्या जपानी संगीतातील ‘यो’ या औडव स्वरग्रामात शोम्योचे गायन होते. केवळ एका वाडग्यासारख्या पोलादी भांडय़ावर आघात करून आधारस्वर घेत हे गायन संथ गतीने, गंभीर घोषाने केले जाते. जपानमधील झेन पंथात कोमुसो भिक्षूंनी शाकुहाची वंशीच्या साथीने गायलेल्या होन्क्योकू गीतांची परंपरा १३ व्या शतकापासून आहे आणि अशा ३६ गीतांचा ‘किन्को-ऱ्यू होन्क्योकू’ हा संग्रह आजही प्रचलित आहे.

मंगोलियापासून तिबेटपर्यंत गायनाचे ‘हूमेई’ हे खास तंत्र आढळते. याला ‘थ्रोट सिंगिंग’ किंवा ‘ओव्हरटोन सिंगिंग’ असेही म्हणतात. मंद्र सप्तकातील मूलस्वन गाताना स्वयंभू स्वन व उच्चस्वनांश निर्माण करत एका वेळी दोन-तीन नाद निर्माण करण्याचे हे तंत्र फारच रोचक आहे. हे तंत्र बौद्ध पठणात वापरले जाते तेव्हा अत्यंत गूढगंभीर परिणाम साधतो. तिबेटी बौद्ध संगीतात अतिमंद्र सप्तकात, दीर्घ दमश्वासाचा वापर करून अत्यंत संथ, विनाताल पठण केले जाते. त्यात स्वरव्यंजनाच्या गुंजनाचा अद्भुत परिणाम असतो. या गायनाच्या साक्य, गेलुग, न्यिंग्मा, काग्यू अशा शाखा आहेत. या गायनात, विशेष धर्माचार आणि मिरवणुकीत डमरू, लाग्ना, द्यानग्रो अशी अवनद्ध वाद्ये, गाँग, रोल्मो, सिलन्येन, शांग व द्रील-ब्रू या घंटा, तिन्ग्शा अशी घनवाद्ये, गेकू हे शिंग, कांगलिंग, ऱ्या-ग्लिंग, डुंगच्येन, झांग-डांग ही सुषिर वाद्ये वाजवली जातात. तिबेटी परंपरेत ‘यांग’ म्हणजे स्वरलयमेल आणि ‘यिग’ म्हणजे मंत्रपठण. ‘यांग-यिग’ ही मंत्रसंगीताचे स्वरालेख चितारण्याची फार सुंदर, अलंकारिक पद्धती आहे.

बौद्ध धर्मसंगीतात उपासना संगीतच प्रामुख्याने आढळते. काही अंशी धर्माचारसंबद्ध संगीत आहे. मग ‘भक्तिसंगीत’ म्हणावे असे काही त्यात नाही का? आहे, पण फार कमी. आणि ते धर्माच्या केंद्रस्थानी नाही. त्यास गौण स्थान आहे. कंबोडियात स्मोत हा पाली, ख्मेर भाषांतील भक्तिगीतांचा प्रकार आहे. ही गीते सामूहिक प्रार्थना, ‘प्चूम बेन’सारखे उत्सव, अंत्ययात्रा इ. वेळी गायली जात. राजकीय सत्तांतराच्या घडामोडींत हे स्मोत नामशेष झाले होते. मात्र भिक्षू हून होर्म, गायिका फ्योऊन स्रे पोव् अशांनी त्याचे पुनरुज्जीवन केले. चीन, जपान, तैवान इ. भागांत ‘पॉप’ शैलीतही बौद्ध भक्तिगीते गायली असून चीनमधील ली ना, फाये वुंग या पॉप गायिका, तैवानमधील च्यी यू ही इ. गायिकांची अशी ‘पॉप बौद्धगीते’ विलक्षण लोकप्रिय आहेत.

नेपाळमधील नेवारी बौद्धांची ‘ग्यानमाला भजन खल’ ही भजन मंडळी आहे. हे लोक ‘खिन’ (पखवाजसारखे), ‘ता’ (टाळ), हार्मोनिअम यांच्या साथीने ‘दापा’ भक्तिगीते गातात. त्यावर वैष्णव भजनांचा स्पष्ट प्रभाव आहे. नेवारी बौद्धांतला अजून एक महत्त्वाचा गीतप्रकार म्हणजे चर्यापदे. बौद्ध कलासंगीत म्हणावे अशी ही चर्यापदे १३-१४ व्या शतकातील असून धृपद गायनाशी समांतर आहेत. आरंभी तेनशब्दांचे गायन, उद्ग्राहानंतरच्या चरणास ‘धुया’ ही संज्ञा, त्यात प्रचलित सहा पुरुषराग, जतीसारखे प्राचीन ताल यांतून चर्यापदांचे प्राचीन संगीताशी असलेले नाते स्पष्ट होते. ही पदे तांत्रिक साधनेत ‘चचा’ नावाने गातात. त्यांच्या गायनामुळे अद्भुत सिद्धी प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. आगम-चे या तांत्रिक मंदिरांत गु कर्माचारांच्या वेळी ‘ता’ वाजवत एकल वा समूह चचागायन होते. नंतर पंचताल किंवा क्वाता (अवनद्ध वाद्य) आणि पाएता (सुषिर वाद्य) यांच्या साथीने नृत्यही करतात.

महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘नवयान’ चळवळीला प्रतिसाद देत लोकसंगीताशी जवळीक साधूनही ‘जनसंगीत’ या संगीतकोटीत समाविष्ट होईल अशा बुद्धगीते, भीमगीतांचा मोठा प्रवाह बनला. आंबेडकरी जलसे हा तर खास सामाजिक संगीत आविष्कार आहे. वामनदादा कर्डक यांची शेकडो गीते चळवळीत प्रेरक ठरली. त्यांचे शिष्य दादू साळवे यांना तर सुमारे २२०० गीते मुखोद्गत आहेत. अलीकडेच संजय मोहाड यांनी वामनदादांच्या गीतांना रागदारीच्या कोंदणात बसवून त्यांचे यूटय़ूबवर लोकार्पण केले आहे. कलासंगीत आणि जनसंगीताची सांगड घालण्याचा हा प्रयत्न या पंथाच्या संदर्भात विरळा आहे.

मात्र, नवयान पंथातील या साऱ्या संगीतातला सामाजिक आशय इतका प्रखरपणे पुढे येणारा आहे की त्याला धर्मसंगीत न म्हणता जनसंगीत म्हणावे लागते. या गीतांतील सांगीतिकतेपेक्षा त्यांचा सामाजिक आशय हा अधिक ठळक, लक्षवेधी ठरतो. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, आनंद व मिलिंद शिंदे इ. गायकांपासून अलीकडच्या कडूबाई खरातांपर्यंत अनेकांनी गायलेली ही केवळ बौद्ध भक्तिगीते नसून, ती विद्रोही सामाजिक चळवळीचा तेवढाच सशक्त उद्गार आहेत!

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:05 am

Web Title: antarnaad article about buddhism religion zws 70
Next Stories
1 मोकळे आकाश.. : टेक केअर..
2 पुस्तक परीक्षण : चित्रकाराची बोलकी शब्दचित्रे
3 पुस्तक परीक्षण : शेतीच्या गुजगोष्टी सांगणाऱ्या कविता
Just Now!
X