17 January 2021

News Flash

अंतर्नाद : नमन : ‘कजरारे’ ते ‘दिगंबरा’

‘धर्मसंगीत’ या शब्दानं बिचकून जाऊ नका. खरं तर प्रत्येक व्यक्ती धर्मसंगीताशी कुठे ना कुठे जोडली गेलेली असते

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. चैतन्य कुंटे

डॉ. चैतन्य कुंटे.. संगीतकार, संगीत अभ्यासक. संगीताच्या मानवी संस्कृतीशी असलेल्या संबंधांचे चिंतक. संगीताने माणसाचं आयुष्य व्यापले आहे, त्याला धर्म कसे अपवाद ठरणार? भजन, कीर्तन, अभंग, गुरुबानी, सुफी संगीत अशा नानाविध प्रकारे विविध धर्मानी संगीत जोपासलं, फुलवलं.. त्याचा धांडोळा घेणारं पाक्षिक सदर..

‘कजरारे कजरारे तेरे प्यारे प्यारे नैना’ हे ‘बंटी और बबली’ चित्रपटातील गाणं काही वर्षांपूर्वी खूप गाजलं होतं. त्याच्या मुखडय़ाच्या चालीचं विलक्षण साम्य दत्त संप्रदायातील ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या पारंपरिक गजराच्या धुनेचं आहे, हेही सर्वश्रुत आहे. उन्मुक्त, शारीर आवाहन असलेलं हे ‘आयटेम साँग’ आणि भक्तांचं मन एकाग्र करून त्यांना उन्मनी अवस्थेपर्यंत नेण्यासाठी योजण्यात येतो असा हा ‘गजर’ हे दोन भिन्न प्रवृत्तींचे आविष्कार. मात्र, त्यांत सुरावट आणि एक प्रकारची तंद्री निर्माण करणारी लय यांत असणारं साम्य लक्षणीय आहे.

केवळ ‘सा-रे-ग’ या तीनच सुरांची असूनही (किंबहुना, तीन सुरांची असल्यामुळेच!) तेच सूर पुन्हा पुन्हा गुणगुणायला लावणारी, पुनरावर्तनक्षम अशी ही धून ऐकणाऱ्याला गुंगवते. आणि यातील लय आपल्या कानातून आत- मनात संचारते आणि देहाचाही ताबा घेऊन डोलायला, टाळ्या वाजवायला भाग पाडते.

तसे पाहता केवळ ‘संगीत’ म्हणून पाहायला गेलं तर धून आणि ठेका या दोन्ही बाबतींत साम्य असलेलं हे एक चित्रपटगीत आणि एक भक्तीमार्गी गजर- म्हणजे दोन विरुद्धअक्षांवर उभी असलेली गीतं! स्वर-लय यांत साम्य असूनही त्यांना पूर्णत: वेगळे करणारे घटक कोणते?

एक तर काव्य, त्यातील शब्दयोजना.. एकाची शंृगारिक, तर दुसऱ्याची भक्तिपर.

दुसरं म्हणजे आविष्काराला दिला जाणारा नादरंग.

चित्रपटगीतात ‘आजच्या कानांना’ सुखावणारा नादरंग हा त्यातील वाद्यमेळ, त्याद्वारे मिळालेले सुरांचे बहुस्तरी पाश्चात्त्य अस्तर आणि तांत्रिक सफाईने दिलाय. मात्र, गजर हा कधी कुणा एकटय़ा भाविकाच्या मनात उमटेल, तर कधी तो समूहाने केलेला उच्चरवाचा घोष असेल. मात्र, त्यात नादरंगांचे असे अनेकपदरी गोफ आणि तांत्रिक सफाईने आलेला ध्वनींचा चकचकाट नसेल. पहिल्या प्रकाराला संगीत परिभाषेत ‘बहुस्वन संगीत’(पॉलीफोनी) म्हणतात, तर दुसऱ्याला ‘एकस्वन संगीत’ (मोनोफोनी) म्हणतात.

तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘संगीताचा उद्देश’!

ते, ते गीत ऐकताच कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्याचा नेमका उद्देश काय आहे ते जाणवेल. त्यासाठी ती व्यक्ती संगीताची जाणकार असणं जरुरीचं नाही. कारण ते ‘गीत’च काहीतरी ‘सांगते’! इथे ‘गीत’ म्हणजे केवळ ‘गायले गेलेले काव्य’ वा ‘गेय रचना’ एवढाच मर्यादित अर्थ नाही; तर भारतीय संगीत परंपरेनं ‘गीत’ या संज्ञेला बरेच व्यापक अर्थक्षेत्र दिले आहे. ‘स्वरलयीच्या माध्यमातून अपेक्षित असा अर्थ व्यक्त करणारे ते गीत’ अशा अर्थाकडे इशारा आहे. इथे गीतात सार्थ शब्दांची अनिवार्यता मानलेली नाही, हे लक्षात घ्यावे. म्हणजेच कंठाखेरीज वाद्यांतूनही गीत व्यक्त होते, तुम्हा-आम्हाला काही ‘नेमके’ सांगते, संप्रेषण (म्हणजे आपल्या साध्या मराठी भाषेत ‘कम्युनिकेशन’!) करते.

एखाद्या भजनाच्या चालीतूनही चावट इशारा केला जाऊ शकतो; आणि वरकरणी चावट वाटणाऱ्या एखाद्या लावणीचे संगीत गूढ तत्त्वज्ञान व्यक्त करू पाहतेच ना! संस्कृती-संगीतशास्त्र असे मत मांडते की, केवळ स्वरलयीला स्वत:चा असा कोणताही निश्चित अर्थ नसतोच. तो अर्थ (आणि नंतर आशयही) लाभतो त्याला असणाऱ्या सांस्कृतिक संदर्भामुळे! संगीताने काय, कसे आणि केव्हा सांगावे हे ठरवण्याचे सार्वभौम अधिकार स्वत: संगीताला (आणि पर्यायाने संगीतकारांस) नसतात, तर तसे अधिकार हे संस्कृतीने आपल्या हाती ठेवलेले असतात. म्हणून तर त्याच स्वरलयीच्या बंधांचा अन्वय विविध स्थल-कालांत वेगवेगळा लागतो, त्यांचा मानसिक परिणामही वेगळा होतो आणि अर्थही निराळा प्रतीत होत असतो. (हे सूत्र लक्षात घेतले तर ‘संगीत ही वैश्विक भाषा आहे’ अशी भोंगळ आणि अतिव्याप्त विधाने केली जाणार नाहीत.. नाही का! मात्र, इतका विचार करण्याचे कष्ट घेण्यापेक्षा बरेच लोक हे सहजपणे संगीताच्या वैश्विकतेच्या गोडगुलाबी कल्पनेत डुंबत बसण्यात धन्यता मानतात!)

संगीताचा असा विशिष्ट अर्थ, हे ‘सांगणं’ हे संस्कृतीजन्य असतं. म्हणूनच ते ‘सांगणं’ नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी ‘संस्कारित कान आणि मन’ हवं.

हे संस्कार नेमके कोण करतं? तर आपला भवताल हे संस्कार करतो. हा भवताल कोण नियंत्रित करते? या भवतालास नियंत्रित करणाऱ्या दोन यंत्रणा असतात : एक- प्रकृती आणि दुसरी- संस्कृती. प्रकृती म्हणजे निसर्गाचे वास्तव जग, तर संस्कृती म्हणजे माणसाने निर्माण केलेले मानसिक, भावनिक आणि बौद्धिक जग. भारतीय परंपरेने ‘धर्म’ हे संस्कृतीचे सर्वोच्च अंग मानले आहे. तसे पाहता माणसाच्या जगण्यातील सर्व आयामांना धर्माचे कोंदण देऊन हे जगणे नियंत्रित करण्याचा घाट घालणे, हे जगभरातील सर्वच ठिकाणी झाले आहे. मग भारताचे वेगळेपण काय? तर, जगातील अन्य परंपरांपेक्षा अधिक प्राधान्याने भारतीय धर्मपरंपरेने कलेशी हातमिळवणी केली. त्यामुळे एकीकडे कलेद्वारे धर्मकल्पना दृढमूल केली व धर्म सर्वदूर पोहोचवला, तर दुसरीकडे धर्माच्या चाकोरीतून कलांची व कलाविषयक शास्त्रांची उभारणी होऊन कला वृद्धिंगत होत गेली. त्या, त्या कलाविष्काराचे ग्रहण करण्यासाठी जे संस्कारित मन हवं, तेही तयार करण्याचं काम भारतीय धर्मपरंपरेनं केलं आहे.

धर्म म्हणजे काय आणि त्याची सर्वसमावेशक व्याख्या काय, किंवा त्याची अंगोपांगे कोणती, यांची चर्चा इथे करत नाही. (ते काम चांगल्या प्रकारे ‘लोकसत्ते’मध्ये अलीकडे राजोपाध्येशास्त्रींनी केलंच आहे.) मात्र, ‘धर्मसंगीत’ म्हणजे काय आणि संगीताच्या या दालनात कोणती रत्नं आहेत, त्यांचं रंगरूप कसं आहे, हे आपण या लेखमालते पाहणार आहोत.

‘धर्मसंगीत’ या शब्दानं बिचकून जाऊ नका. खरं तर प्रत्येक व्यक्ती धर्मसंगीताशी कुठे ना कुठे जोडली गेलेली असते. मात्र त्या संगीताला ‘धर्मसंगीत’ म्हणतात हे अनेकांना ठाऊक नसतं. धर्म ही संस्थाच नाकारणाऱ्या अत्यल्प माणसांखेरीज भारतातील बहुसंख्य जनतेच्या दैनंदिन जीवनाचा भाग हे धर्मसंगीत आहे. असे असूनही धर्मसंगीताची स्थिती ही ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ अशी झाली आहे. सामान्य लोकच काय, पण संगीताभ्यासकांनीही या विषयाकडे फारसं आस्थेनं वा पुरेशा गंभीरपणे पाहिलेलं नाही. ‘ही भजनं वगैरे ‘तोंडी लावायला’ ठीक आहेत, पण यात आमच्या ध्रुपद, खयालसारखं उच्च ‘संगीत’ कुठे आहे?’ असा जरासा तुच्छतादर्शक शेरा आमचे तथाकथित ‘क्लासिकल म्युझिक’वाले देतात, तर सामान्यांची काय बात! आजचा शहरी समाज एक तर लता मंगेशकर, अनुप जलोटा, अजित कडकडे, इ. इ. प्रभृतींच्या काहीशा फिल्मी वेशभूषेतील (‘ध्वनिभूषे’!) भक्तिसंगीतात रमतो, नाहीतर विविध धार्मिक उत्सवकाळांत उद्भवणाऱ्या गोंगाटभरल्या ‘डीजे भजनां’च्या कल्लोळाने वैतागतो तरी! त्याच्या भावजीवनात चित्रपटगीत किंवा भावगीत फॉम्र्युल्यातील भक्तिगीतं एवढंच धर्मसंगीत उरलं आहे की काय अशी दाट शंका वाटावी, इतका तो ‘पारंपरिक धर्मसंगीता’पासून दूर सरकत चालला आहे. मात्र, शहरांपलीकडे नांदणाऱ्या या विशाल देशात धर्मसंगीताचे अनेकरंगी आविष्कार जिवंत आहेत. त्यांच्याकडे एक नजर टाकणं हे आपल्याला समृद्ध करणारं ठरेल.

म्हणूनच या लेखमालेतून संस्कृती-संगीतशास्त्राच्या ‘पैसाच्या खांबा’ला टेकून ‘धर्मसंगीता’चं आख्यान लावलं आहे. नमनाला एका लेखाचं घडाभर तेलही वाहिलेलं आहेच. पुढल्या लेखात पूर्वरंग सुरू करू महाराजा!

‘keshavchaitanya@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 12:02 am

Web Title: antarnaad article by dr chaitanya kunte abn 97
Next Stories
1 संभाव्य महासत्तांची तौलनिक चिकित्सा
2 मोकळे आकाश.. : फिटे अंधाराचे जाळे
3 पेरणी आंदोलनांची!
Just Now!
X