13 August 2020

News Flash

अफसाना लिख रही हूँ.. : ‘तेरी बिंदिया रे..’

हृषिकेश मुखर्जीना कलावंत मन नेमकं सापडलं होतं. त्यातूनच जन्माला आले- ‘अनुराधा’ आणि ‘अभिमान’!

सचिनदांनी या चित्रपटाची गाणी इतकी सुंदर दिली की मजरूह सुलतानपुरीजींच्या काव्यातून एक मेलडी वाहत राहिली.

मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

‘चांदणे पाण्यातले की वेचिता येईलही

आणि काळोखात पारा ये धरू चिमटीतही

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा

सूर नोहे- तीर कंठी लागलेला शापसा!’

– आरती प्रभू

गळ्यात सूर येतो तो काही शाप घेऊनच! सूर शोधण्यात जन्म जातो, सूर लागण्यात मोक्ष मिळतो आणि सूर हरवला तर अस्तित्वच संपतं. या गळ्यातल्या स्वराची, त्या आवाजाची जबर किंमत मोजावी लागते. एखादा घुसलेला बाण बाहेर काढता येऊ नये आणि ती आरपार जखम सोसून आजन्म त्या ठसठसणाऱ्या वेदनांचा उत्सव संगीतातून साजरा करावा हे गाणाऱ्याचं प्राक्तन असतं.. खरं तर गाणंच का? कुठलीही कला हा देखणा अभिशाप घेऊनच येते की! पाण्याबाहेर काढलेला मासा आणि सूर सापडत नसलेला गायक हे एकाच प्राणवायूसाठी तडफडत असतात. तीच आस, तीच तगमग.. पण गाणाऱ्याची तगमग त्यालाच समजते. आणि हा सूर फक्त गळ्यातलाच नाही, तर आयुष्याचाच गवसावा लागतो. कलाकार आणि सौख्य एका जागी नांदत नाहीत. अस्वस्थपणाचे एक वरदान मिळालेलं असतं त्याला. स्वत:च्या कलेवर नितांत प्रेम करणारा कलाकार आत्ममग्न असतोच; पण जेव्हा त्याचा कलाभिमान हा स्वाभिमानाच्या कक्षा ओलांडून अहंकारात रूपांतरित होतो, दुसऱ्या कलाकाराच्या तलवारीची धारही तेज असते, तेव्हा ठिणग्या उडतात. त्या प्रतिस्पध्र्याशी सरळ सामना करता येत नाही.. जेव्हा तो आपलाच एक भाग असतो. कधी कधी मूळच्या कलाकाराच्या इगोमध्ये पुरुषी अहंकार मिसळून अधिकच दाहक रसायन निर्माण होतं. नितांत प्रेम आणि पराकोटीचा अहंकार यांच्यातला हा संघर्ष! दोन मनस्वी पक्षी. अद्भुत सूर कंठात घेऊन आलेले.. त्याचा डौल मिरवणारे. त्यातल्या नर पक्ष्यानं पक्षिणीचे पंख ओरबाडून काढावेत.. पक्षीण घायाळ व्हावी. या संघर्षांमुळे घरटय़ात पिल्लानं जन्म घ्यायचंच नाकारावं.

हृषिकेश मुखर्जीना कलावंत मन नेमकं सापडलं होतं. त्यातूनच जन्माला आले- ‘अनुराधा’ आणि ‘अभिमान’! १९७३ साली आलेला अमिताभ बच्चन, जया भादुरी, असरानी, दुर्गा खोटे आणि ए. के. हंगल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अभिमान’! एकाच क्षेत्रातल्या कलावंत दाम्पत्यात उद्भवणारे संघर्ष आणि प्रेम,आत्यंतिक ओढ असूनही निर्माण होणारा दुरावा हा अतिशय नाजूक विषय हाताळताना त्यात संगीताची भूमिका अनन्यसाधारण होतीच. सचिनदांनी या चित्रपटाची गाणी इतकी सुंदर दिली की मजरूह सुलतानपुरीजींच्या काव्यातून एक मेलडी वाहत राहिली. सचिनदांना ‘एव्हरग्रीन संगीतकार’ का म्हणतात ते ही गाणी ऐकताना समजतं. सत्तरच्या दशकातल्या वातावरणातलीच ही गाणी वाटतात. आणि अगदी आजही ती कालबा वाटत नाहीत. स्टुडिओमधलं ध्वनिमुद्रण, स्टेज शो यांतले बारकावे टिपत एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारा, ग्लॅमरच्या मुखवटय़ांमागचे चेहरे, वरून सारं काही सुरळीत असल्यासारखं वाटत असतानाच आतून नात्याची होणारी पडझड यांचं परिपक्व दर्शन घडवणारा ‘अभिमान’!

आघाडीचा पाश्र्वगायक सुबीरकुमार हा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रचंड यश आणि फक्त यश.. चाहत्यांचा गराडा.. फिदा होणाऱ्या स्त्रिया असं सुपरस्टारचं आयुष्य तो जगतोय. त्याला साथ त्याच्या मित्राची.. चंद्रूची- जो त्याचे सगळे व्यवहार चतुराईनं सांभाळतोय, फिल्म इंडस्ट्रीचे सगळे बारकावे ओळखून पैसा मिळवतोय. बंगला बांधून तयार होतोय. फॅन-मेल्सचा ढीग संपता संपत नाहीये. त्याच्या गाण्यावर, त्याच्यावर प्रेम करणारी मैत्रीण चित्रा. या सगळ्या गराडय़ात असूनही आतून मात्र सुबीर एकटा आहे. त्याच्या आत्म्याला शोध आहे तो त्याच्या ‘असण्यावर’ निस्सीम प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा.

‘मीत न मिला रे मन का..’ हे त्याचं एक लोकप्रिय गाणंच नाही, तर त्याची खंतसुद्धा! या एका गाण्यात हृषिदा सुबीरकुमारची लोकप्रियता दाखवून जातात. त्यानं संगीतविश्व किती व्यापलंय हे एका गाण्यात समजतं. मुंबईतल्या रोजच्या कामाच्या एकसुरीपणाला कंटाळून एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुबीर आपल्या मौसीच्या गावी जातो. गावात फेरफटका मारताना त्याच्या कानावर येतो- ‘ओंकारं बिंदु संयुक्तं..’(अनुराधा पौडवाल) हा श्लोक. आसमंतात भरून राहिलेला एक सच्चा सूर! त्या आवाजात एक निराळं पावित्र्य, एक आभा असते. निखळ, स्वच्छ स्वर. त्या आवाजानं सुबीर चमकतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा परत जायला निघताना पुन्हा तोच आवाज त्याला खेचून घेऊन जातो. ती असते उमा. शास्त्रीय संगीत गायक सदानंदभैयांची कन्या. नदीवर जाऊन घागर भरणं, शिवाच्या पिंडीला जलाभिषेक करणं.. आणि एकीकडे कुठल्याशा अनामिकेची लटकी तक्रार सांगणारं गाणं..

‘नदिया किनारे हेराये आई कंगना

ऐसे उलझ गये अनाडी सजना..’ (लता मंगेशकर)

सुबीर न राहवून उमाच्या स्वरांचा मागोवा घेत घेत तिच्या मागे झपाटल्यासारखा जात राहतो. तिचा तो नैसर्गिक वावर, आवाजातला निरागसपणा त्याला भारावून टाकतो. मुक्तपणे स्वच्छंद विहरत असलेल्या पक्ष्यासारखी उमा.. स्वत:च्या आनंदासाठी गाणारी.. बोलण्याइतकंच तिच्या ओठात सहजपणे गाणं उमटलेलं आहे आणि त्या आवाजात एक निराळा कसाव आहे, सुरांचा पक्केपणा आहे. एखादी तयारीची गाणारी मुलगी सहज म्हणून गातानासुद्धा काही जागा अशा घेते, की त्यातून तिची ‘पहुंच’ दिसावी! संगीतकार म्हणून बर्मनदा किती बारकाईनं विचार करतात बघा. सुरुवातीला आलाप आहे. शास्त्रीय संगीत गाणारी व्यक्ती शक्यतो एकदम गाणं सुरू करणार नाही. एक तरी छोटासा आलाप असेल तिथे. ‘अभिमान’मध्ये जवळजवळ सगळ्या गाण्यांची सुरुवात आलापाने होते. दुसरं फार महत्त्वाचं वैशिष्टय़.. या गाण्याची रचना अशी आहे की शब्द सलग येत नाहीत. चालता चालता म्हटलेलं गाणं असल्यामुळे त्यात पॉजेस खूप आहेत.. ‘अब तो.., सूनी कलांऽऽऽई, लईके, चोरी चोरी जाना.. नदिया किनारे.. हेराये.. आयी कंगना..’ अशी थबकत येणारी वेगळीच शब्दमांडणी आहे. गाताना ज्या पद्धतीने दादरा खेळवलाय, ते विलक्षण आहे. त्यात ‘काहे पनघट उपर’मधला ‘उकार’ जास्त लांबतो, पण कानाला खटकत नाही. तशीच ‘अकेली’मधल्या ‘ली’ची लकेरसुद्धा. हे सगळं शास्त्रीय गायनातलं उपज अंगच की! ‘कंगना’मधल्या ‘ना’वरची जागा तयारी दाखवून जाते. त्यावेळचा जया भादुरीचा अभिनय अप्रतिमच. या गाण्यात जो तबला वाजलाय तो केवळ भन्नाट. शब्दांच्या अंगानं तबल्याचे बोल वाजतात. लग्गी जाते. दादरा इतक्या अंगांनी खुलू शकतो? आणि ‘भारी पडा रे पिया से मिलना’ ते ‘नदिया किनारे’ या धृवपदापर्यंतचा जो एक पूल आहे तो त्या तबल्याच्या पॅटर्ननेच खुलवलाय. मारुतीराव कीर या जादूगाराचं हे कसब आहे. ‘अब खडी खडी सोचू’वर गाणंही क्षणभर उभं राहतं. तबलाही थबकतो. ‘गोरी और जाओ.. न मानो कहना..’ ही ओळ पंचम.. मध्यम.. शुद्ध गंधार अशी क्रमानं खाली येताना त्या आकारातच पटकन् तेजाळणारा, ‘नदिया’वर नेऊन सोडणारा कोमल गंधार हिरव्या गर्द पानांमधून अवचित दिसणाऱ्या सोनचाफ्यासारखा दरवळतो.

उमाची पहिली भेट.. तिचं बोलणं, गाणं यातून सुबीरला असं काहीतरी गवसतं, ज्याचा तो शोध घेत असतो. ज्या गाण्याकडे आपण लोकांना खूश करण्याचं, पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पाहिलं, ती तर सृष्टीतले रसरंगरूप ल्यालेली, एक दैवी ताकद असलेली भाषा आहे. रंजनाच्या पलीकडे जाऊन आत्मानंद नावाचा काही प्रकार गाण्यात असतो, हे सहज सांगून जाणारी उमा त्याला भावते. तानसेनचे गुरू स्वामी हरिदास देवाला खूश करण्यासाठी गात. इथे ‘अंतरात्म्याला आनंद देणारं गाणं हे सर्वश्रेष्ठ..’ असं सांगणारी उमा भेटते. मनमंदिरात शुभसूचक घंटानाद होतो. उमाशी लग्न करूनच सुबीर मुंबईला येतो..

सुबीर आणि उमाच्या विवाहाप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या पार्टीत दोघांनाही गाण्याचा आग्रह होतो. शास्त्रीय संगीतातली बडी असामी असलेले ब्रजेश्वरलालही आमंत्रित असतात. संगीत- मग ते शास्त्रीय असो की पॉप म्युझिक.. सात स्वरांचीच जादू असं मानणारे. बुजुर्ग ब्रजेश्वरलाल उमाच्या गाण्याचा दर्जा अचूक ओळखतात. हे ‘तयार’ गाणं आहे, हा ‘रियाजी’ आवाज आहे, हे त्यांच्यातला जाणकार क्षणार्धात ओळखतो.

‘तेरी बिंदिया रे..’ (मोहम्मद रफी, लता मंगेशकर)

संकोचलेली उमा सुबीरच्या सुरात सूर मिसळते आणि सगळे चपापतात.. अनपेक्षितपणे उमाचं गाणं सगळ्यांना आश्चर्याचा एक सुखद धक्का देऊन जातं. तिचा घरंदाज, लाजराबुजरा चेहरा, स्वराइतकेच नितळ डोळे आणि एकूण समर्पणभाव त्या गाण्यात उमटलाय.. ‘मेरा गहना बलम तू, तोसे सजके डोलू, भटकते है तेरे ही नैना, मैं तो कुछ ना बोलू..’ ही भावना तिच्या त्या देहबोलीतही दिसते. बिंदिया.. झुमका.. कंगना.. एक-एक दागिना घेत अतिशय नाजूक गुंफलेलं हे डय़ुएट त्याच्या वेगळ्या टोनमुळेसुद्धा मनावर ठसतं. गाण्याच्या सुरुवातीला एका नाजूक स्वरमंडळानंतर तबल्यावर दोन आवर्तनं फक्त सुंदर रूपक वाजतो. सुंदर सुरेल षड्जावर लावलेला तबला कानाला सुख देतो. त्यांच्या आयुष्याला एक नवी लय मिळवून देणारा हा ताल. त्यातून उमटणारा रफीसाहेबांचा हुंकार आणि त्यानंतरचा बासरीचा ‘पमपमरेसारेसानी’ हा गोड फिलर. हे गाणं म्हणजे एकमेकांवर अनुरक्त असलेल्या जोडप्याचा अत्यंत तरल, लाजराबुजरा संवाद.. दोघांच्या अभिनयालाही दाद द्यावी तेवढी कमीच. कारण ‘बिंदिया’वरची जागा घेताना एखादा गायक मानेची जी हालचाल करेल तशीच अमिताभची होते. या एका गाण्यात अनेक गोष्टी घडतात. दुखावलेल्या चित्राला उमाचं स्थान आणि योग्यता समजून येते. दिग्दर्शकाचं कसब हे, की अनेकांच्या देहबोलीतून हे गाणं प्रभावी होतं. ब्रजेश्वरलालजींनी आलेल्या वेटरला परत पाठवणं असो.. बावरलेल्या उमाला सुबीरनं ओठाकडे तर्जनी नेऊन खुलवणं असो.. चित्राच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव असोत! किती बोलकं असावं एखाद्या गाण्यानं! एकत्र गाण्याच्या सुबीरच्या निर्णयावर ब्रजेश्वरजींचा अनुभवी उद्गार येतो की, ‘हे चुकतंय.. उमा जास्त ‘तयार’ आहे. आणि तिचं यश सुबीरचा पुरुषी अहंकार स्वीकारू शकणार नाही. आणि उमानं संसारासाठी गाणं गुंडाळून ठेवलं तर ते त्याहूनही वाईट असेल.’

दोघांनी गायलेलं ‘लुटे कोई मन का नगर..’ उमाची अवस्था सांगणारी ‘अब तो है तुमसे’ आणि ‘पिया बिना..’ ही गाणी आणि चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू असलेलं ‘तेरे मेरे मिलन की ये रैना..’ या गाण्यांवर उत्तरार्धात..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:07 am

Web Title: anuradha abhiman hrishikesh mukherjee sachin da majrur sultanpuri afsana likh rahi hun dd70
Next Stories
1 खेळ मांडला.. : लिव्हरपूलची जर्मन ‘संस्कृती’
2 अस्तित्व आणि पुरोगामित्व…
3 आणीबाणी, मूलभूत स्वातंत्र्य आणि आज
Just Now!
X