|| सुरेश नाईक

अमेरिकेने चंद्रावर ‘अपोलो- ११’ हे समानव अवकाशयान पाठविल्याच्या घटनेस येत्या आठवडय़ात ५० वर्षे होत आहेत. त्याचवेळी योगायोगाने भारताचे ‘चांद्रयान- २’ हे पहिले अवकाशयान चंद्रावर उतरणार आहे. गेल्या पन्नास वर्षांत या अवकाश मोहिमांनी काय साध्य केले याचा ताळेबंद मांडणारा लेख..

आजपासून पाचशे वर्षांनंतरही अवकाश क्षेत्रातील एक घटना पृथ्वीवासीयांना निश्चितच आठवेल. ती म्हणजे ‘अपोलो- ११’ या अवकाशयानातून मानवाचे पृथ्वीपल्याडच्या विश्वात पडलेले पहिले पाऊल! केप कॅन्व्हेरलवरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तीन अवकाशवीरांसह ‘अपोलो- ११’ यानाने चंद्राकडे झेप घेतली. तीन दिवसांनंतर १९ जुलै रोजी चंद्राभोवतीच्या १०० कि. मी.च्या कक्षेत ठरल्याप्रमाणे ते फिरू लागले. भारतीय वेळेनुसार २१ जुलै रोजी तेराव्या प्रदक्षिणेदरम्यान नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन ‘ईगल’मध्ये (चंद्रावर उतरणाऱ्या घटकाचे नाव) बसले आणि ‘ईगल’ संचालक घटकापासून वेगळे झाले. या संचालक घटकाचे नामकरण ‘कोलंबिया’ असे करण्यात आले होते. तिसरा अंतराळवीर कॉलिन्स हा कोलंबियामध्येच थांबून पृथ्वीप्रदक्षिणा करीत राहिला. दोन तास नऊ मिनिटांनी ‘ईगल’ चंद्रावरील ‘सी ऑफ ट्रँक्विलिटी’ या पूर्वनियोजित जागेवर हळुवारपणे उतरले तेव्हा अवघे २५ सेकंदांचे इंधन शिल्लक राहिले होते. म्हणजे चंद्रावर उतरायला अर्ध्या मिनिटाचा जरी उशीर झाला असता तरी ‘ईगल’ चंद्रावर आदळून अंतराळवीरांवर मृत्यूचा प्रसंग ओढवला असता. त्यानंतर सुमारे सहा तासांनी तो ऐतिहासिक क्षण आला- ज्याची सबंध जग श्वास रोखून वाट पाहत होतं. ‘ईगल’चा दरवाजा उघडून शिडीच्या नऊ पायऱ्या उतरून नील आर्मस्ट्राँग या पृथ्वीवासीयाचे पहिले पाऊल चंद्राच्या भूमीवर पडले. त्याचे त्यावेळचे उद्गार होते : ‘माणसाचे एक छोटे पाऊल.. पण मानवजातीची एक प्रचंड झेप!’ हे त्याचे उद्गार अवकाश इतिहासात अमर झाले आहेत. जगातील लक्षावधी लोकांनी ही घटना टीव्हीवर पाहिली. त्यानंतर ऑल्ड्रिनही आर्मस्ट्राँगला येऊन मिळाला. दोघांनी मिळून २२ तास चंद्रावर घालविले. त्यानंतर ‘ईगल’मधून चंद्रावरून उड्डाण करत त्यांनी कोलंबियाकडे कूच केले. कोलंबियात दोघे परतल्यानंतर ‘ईगल’चा त्याग करण्यात आला आणि तीन अंतराळवीरांसह कोलंबिया पृथ्वीच्या परतीच्या प्रवासाला निघाले. पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करण्याआधी सेवा-घटकाचाही त्याग करून ‘कोलंबिया’ साठ तासांच्या या ऐतिहासिक अवकाश मोहिमेनंतर २४ जुलै १९६९ रोजी हवाई छत्र्यांच्या साह्यने प्रशांत महासागरात सुखरूपपणे उतरले.

अपोलो- ११ च्या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर मानवासहित आणखी सहा चांद्रीय उपक्रम अपोलो अभियानाअंतर्गत राबविण्यात आले. त्यापैकी अपोलो- १३ व्यतिरिक्त इतर पाच उपक्रम यशस्वी झाले. अपोलो- १३ मोहिमेतील अंतराळवीरांना प्रवासात झालेल्या एका अपघातामुळे चंद्रावर न उतरताच परतावे लागले. डिसेंबर १९७२ मधील ‘अपोलो- १७’ या शेवटच्या मोहिमेपर्यंत अमेरिकेचे एकूण १२ अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. शेवटच्या तीन मोहिमांमध्ये अवकाशवीर बगीमधून (रोव्हर) चंद्रावर फिरले.

अपोलो अभियानाचे साध्य

अपोलोच्या एकूण अवकाश मोहिमेकरता जवळजवळ ३० अब्ज डॉलर्स एवढा खर्च आला. चंद्राची वारी केलेल्या या १२ अंतराळवीरांनी मिळून सुमारे ३६५ किलो वजनाचे चंद्रावरील मातीचे आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले. अनेक देशांच्या वस्तुसंग्रहालयांना तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळांना अभ्यासासाठी आणि लोकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी त्यातले काही तुकडे भेट म्हणून देण्यात आले. भूगर्भशास्त्रज्ञांसाठी ही एक पर्वणीच होती. अमेरिकेच्या ‘अपोलो’नंतरच्या अवकाश अभियानासाठी- म्हणजे ‘स्कायलॅब’ या अवकाशस्थानकासाठी (स्पेस स्टेशन) अपोलो यानाकरिता विकसित केलेल्या घटकांचा खूपच उपयोग झाला.

अपोलो अभियानाचा प्राथमिक उद्देश हा राजकीय होता हे इथे ध्यानी घ्यायला हवे. कारण अमेरिका आणि त्यावेळचे सोव्हिएत युनियन यांच्यामधील शीतयुद्ध तेव्हा शिगेला पोहोचले होते. १९५७ मध्ये ‘स्पुटनिक- १’ हा जगातील पहिला उपग्रह अवकाशात सोडून आणि त्यानंतर १२ एप्रिल १९६१ रोजी पहिली मानवी अवकाश मोहीम यशस्वीरीत्या साध्य करून सोव्हिएत युनियनने अमेरिकेवर अवकाश क्षेत्रात कुरघोडी केली होती. त्यामुळे आपली अवकाश क्षेत्रातील श्रेष्ठता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेला जगात सनसनाटी निर्माण करेल असे एखादे नवे अभियान हाती घेण्याची नितांत गरज होती. या पार्श्वभूमीवर त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ‘ती’ प्रसिद्ध घोषणा केली.. ‘१९७० च्या आत अमेरिकन अवकाशवीराला चंद्रावर पाठवून त्याला सुरक्षितपणे परत आणू.’ जुलै १९६९ मध्ये अमेरिकेने अपोलो-११ मोहीम यशस्वी करून आपलं हे राजकीय उद्दिष्ट साध्य केलं असं म्हणायला हरकत नाही.

याखेरीज विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रालाही या मोहिमेचे अनेक फायदे झाले. ‘हाय रेझोल्युशन ७० एमएम फोटोग्राफी’चा विकास झाला. तसेच चंद्रावर कोठे उतरायचे यासाठी केलेल्या पूर्वप्रयत्नांतून ‘रिमोट सेन्सिंग’ किंवा ‘सुदूर संवेदन’ क्षेत्रात क्रांती झाली. ‘लँडसॅट’चा मौल्यवान कार्यक्रम अपोलो अभियानासंदर्भात विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानातूनच जन्माला आला. अपोलोमुळे मिळालेल्या प्रचंड प्रेरणेमुळे मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्रांती घडविणाऱ्या तंत्रज्ञानाचा उदय झाला. शिवाय ‘इंटेल’सारख्या जगप्रसिद्ध कंपनीची स्थापना झाली आणि संगणकाच्या आकारात अकल्पित फरक पडला.

अपोलो अभियानात मिळालेल्या ‘डेटा’चा अधिकाधिक अत्याधुनिक सुविधा वापरून केलेल्या अभ्यासामुळे चंद्राच्या उत्पत्तीविषयक माहितीत मोलाची भर पडली. अपोलो- ११ नंतरच्या प्रत्येक यशस्वी मोहिमेत चंद्रावरील नवीन आणि वेगळ्या ठिकाणांचा शोध घेतला गेला. तसेच न्यूक्लिअर पॉवर्ड उपकरणे चंद्रावर ठेवण्यात आल्याने अनेक वर्षे चंद्राबद्दलची माहिती पृथ्वीवर मिळत राहिली. आणखी एक मोठा लाभ झाला तो असा की, १९७५ मध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांनी पहिल्यांदा संयुक्तपणे एक अवकाश मोहीम राबवली. (अपोलो-सोयुझ टेस्ट प्रोजेक्ट) आणि १९५७ मध्ये ‘स्पुटनिक- १’ने सुरुवात झालेल्या या दोन महासत्तांमधील ‘स्पेस रेस’चा शेवट झाला.

समानव चांद्रमोहिमांचा अंत

१९६० चे दशक हे अमेरिकेच्या अवकाश उपक्रमांचा सुवर्णकाळ होता. धैर्यशीलतेची अंतिम सीमा आणि अवकाशातले चित्तथरारक नाटय़ यांनी भारलेल्या अपोलो मोहिमांनी जगाचे चित्त आकर्षून घेतले. जेव्हा मानवी धैर्याची कसोटी पाहणाऱ्या भव्य ध्येयपूर्तीसाठी माणूस आपले सर्व चित्त केंद्रित करतो तेव्हा त्या पिढीलाच नव्हे, तर येणाऱ्या अनेक पिढय़ांना ते यश कसे प्रेरणादायी ठरते याचे या अवकाश मोहिमा म्हणजे ज्वलंत उदाहरण होय.

अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी ठरविलेल्या ध्येयाची पूर्तता झाल्यानंतर अमेरिकन जनतेमध्ये असा एक वर्ग होता, की ज्याला चंद्रावर अमेरिकेची मानवी वसाहत स्थापन करावी आणि त्यादृष्टीने मानवी मोहिमा चालू ठेवाव्यात असे वाटत होते. परंतु याच्या अगदी उलट अत्यंत खर्चीक अशा या समानव चांद्र-मोहिमांच्या विरोधात बहुतांश जनतेचे मत होते. राजकीय मानसिकता आणि जनमतामुळे अमेरिकेच्या अवकाशविषयक धोरणात बदल झाला आणि आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) आणि स्पेस शटल (पुनर्वापर करता येणारे अवकाशयान) या अभियानांवर अमेरिकेने लक्ष केंद्रित करायचे ठरवले.

चांद्रमोहिमांचे पुनरुत्थान

१९९९ मध्ये अमेरिकेच्या ‘ल्यूनार प्रॉस्पेक्टर’ या उपग्रहाने केलेल्या निरीक्षणामुळे चंद्रावर पाणी असावे अशी आशा दाखविणाऱ्या खुणा आढळल्या आणि विज्ञानजगतात एकच सनसनाटी निर्माण झाली. चंद्राच्या ध्रुवीय भागातील बर्फाच्या शेतांपासून मानवी वसाहतीस अनेक वर्षे पाणीपुरवठा होऊ शकेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला. चंद्रावरील खनिजांच्या खाणकामाच्या आर्थिक फायद्याविषयीही बरेच लिहिले गेले. विशेषत: पृथ्वीवर दुर्मीळ असलेल्या मौल्यवान अशा ‘हिलीयम- ३’च्या उत्खननाबद्दल! ‘हिलीयम- ३’ हे प्रदूषणमुक्त असे उत्कृष्ट प्रतीचे इंधन समजले जाते. चंद्रावरील मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या हिलीयम- ३ च्या साठय़ांचा वापर करून सबंध जगाची वाढत्या ऊर्जेची गरज शेकडो वर्षे भागू शकेल असा अंदाज आहे. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागाची अतिसूक्ष्म नियोजनाची (रेझोल्यूशन) त्रिमिती छायाचित्रे घेऊन चंद्राशी संबंधित विज्ञानाची रहस्ये उलगडण्याची शक्यतासुद्धा निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर दूर मंगळावर स्वारी करण्याचे आव्हानही मानवाला आकर्षित करीत आहे. मंगळावर पाणी असल्याचा पुरावा मिळाला आहे. तेथे बारीक किडय़ासारखे जीव असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पृथ्वीखेरीज इतर ग्रहांवर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जीवसृष्टी अस्तित्वात आहे का, या गूढाचे उत्तर शोधण्याची प्रेरणा हेही अवकाशातील अन्य ग्रहांचा शोध घेण्यामागचे कारण आहे. मंगळावर जायचे तर आधी चंद्रावर मानवी तळ प्रस्थापित केल्यास तिथे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यावर आपले जीवन कसे चालवायचे याबाबत ज्ञान, कला आणि कौशल्य आत्मसात करावे लागेल. नवीन उद्दिष्टे गाठण्याची चंद्र ही एक पायरी आहे. अमेरिकेत ‘स्पेस-एक्स’सारख्या खासगी कंपन्यांनी चंद्रावर मानवी मोहिमा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत.

भारतीय ‘चांद्रयान- २’ मोहीम

योगायोगाची गोष्ट ही की, पन्नास वर्षांपूर्वी १६ जुलै रोजी ‘अपोलो- ११’ यानाने ऐतिहासिक उड्डाण केले होते आणि बरोब्बर ५० वर्षांनी १५ जुलै रोजी ‘चांद्रयान- २’ या उपग्रहासह भारताचे जीएसएलव्ही मार्क- ३ (जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकल) हे सर्वशक्तिमान रॉकेट श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर येथील अवकाशतळावरून चंद्रावर स्वारी करण्यासाठी उड्डाण करणार आहे. ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान- १’ या मोहिमेद्वारे २००८ साली चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथमच जगापुढे आणून भारताने इतिहास रचला. ‘चांद्रयान- २’मध्ये लँडर, रोवर आणि ऑर्बिटर असे तीन भाग आहेत. ‘विक्रम’ या लँडरच्या आत ‘प्रग्यान’ हा रोवर बसविलेला आहे. ‘विक्रम’ लँडरला ऑर्बिटरच्या वरती ठेवण्यात आले आहे. लँडर (रोवरसह) आणि ऑर्बिटर यांना एकत्रितपणे जीएसलएलव्ही मार्क- ३ या प्रक्षेपकामध्ये हीट शिल्डच्या आत ठेवलेले आहे. ‘प्रग्यान’ रोवर ही एक प्रकारची बगी असून तिची लांबी एक मीटर आणि वजन २७ किलो आहे. ‘विक्रम’ या लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी ३.५ मीटर, तर ऑर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर असेल. ‘विक्रम’ची चंद्रावर उतरण्याची तारीख ६ किंवा ७ सप्टेंबर ही असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे ‘विक्रम’ हे भारताचे अवकाशयान जगातले पहिले यान असेल. ‘विक्रम’चे मूळ काम हे ‘प्रग्यान’ला चंद्रावर योग्य ठिकाणी उतरविणे हे असले तरी त्याच्यावरही दोन शास्त्रीय उपकरणे बसविण्यात आली आहेत. चंद्रावर पोहोचण्यासाठी ‘चांद्रयान- १’ मोहिमेच्या वेळी जी पद्धत वापरली गेली तीच ‘चांद्रयान- २’ या मोहिमेच्या वेळीही वापरली जाईल. पृथ्वीभोवतीच्या १७० x ४०,००० कि. मी. या अंडाकृती कक्षेत ‘चांद्रयान- २’ सोडल्यानंतर प्रक्षेपकाचे एकेक चरण अलग होऊन समुद्रात गळून पडतील. नंतर पृथ्वीपासूनच्या दूरच्या बिंदूला टप्प्याटप्प्याने चंद्राच्या दिशेने वाढवत नेऊन चंद्राजवळ हे यान आल्यानंतर त्याचा वेग कमी करून त्याला चंद्राच्या कक्षेत फिरते ठेवण्यात येईल. चंद्राच्या १०० कि. मी.च्या कक्षेत ते आल्यानंतर ऑर्बिटरपासून लँडर अलग होईल आणि हळुवारपणे ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यानंतर आतला रोवर चंद्रावर उतरेल आणि नेमून दिलेली कामे करण्यासाठी चंद्रावर फिरू लागेल. ऑर्बिटरवर पाच शास्त्रीय उपकरणे, लँडरवर चार आणि रोवरवर दोन उपकरणे बसवलेली आहेत. लँडरवर बसवलेले ‘नासा’चे एक उपकरण सोडले तर बाकीची सारी उपकरणे भारतीय आहेत.

या अभियानाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे चंद्रावर हळुवारपणे उतरण्याच्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष चाचणी घेणे हा आहे. शिवाय चंद्राच्या पृष्ठभागाचे मानचित्रण, चंद्रावरील खनिजे आणि पाण्याच्या साठय़ांचा शोध, तेथील पर्यावरणाचा अभ्यास हेही उद्देश आहेत. रोवरवर बसविलेल्या उपकरणाकडून मिळणारी माहिती लँडरद्वारे आणि ऑर्बिटरमार्फत इस्रोच्या बेंगलुरु येथील केंद्राकडे पोहोचविण्यात येईल. त्याचप्रमाणे लँडर आणि ऑर्बिटरकडूनही माहिती मिळत राहील. आर्बिटरचे आयुष्यमान एक वर्ष, तर लँडर आणि रोवरचे प्रत्येकी १४ दिवस असेल.

आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे तीनच देश चंद्रावर यान उतरविण्यात यशस्वी झाले आहेत. ‘चांद्रयान- २’ मोहीम यशस्वी झाल्यास या देशांच्या पंक्तीत गौरवास्पद स्थान मिळवणारा भारत हा चौथा देश असेल.

 (लेखक ‘इस्त्रो’चे माजी समूह संचालक आहेत.)