संशोधनासारख्या वेळखाऊ, आर्थिकदृष्टय़ा बेभरवशाच्या कामाकडे वळण्याचं स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, असं अनेक अहवालांतील आकडेवारींतून समोर आलं आहे. विज्ञान शाखेत अभ्यास, संशोधन करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाणही कमी आहे. विसाव्या शतकात तर मेरी क्युरीसारख्या एखाद्या महिला शास्त्रज्ञाचा अपवाद. यामुळेच विज्ञान, आरोग्य या क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्याबद्दल समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. निरंजन घाटे यांनी लिहिलेलं ‘आरोग्यक्षेत्रातील महिला संशोधक’ हे चरित्रनिबंधपर पुस्तक आरोग्य क्षेत्रातील महिला संशोधकांच्या जगाची सफर घडवून आणतं. मेंदूच्या रचनेचा अभ्यास करून त्याबाबतचं सत्य उलगडणाऱ्या मेरियन डायमंड यांच्यापासून ते निद्रा अभ्यासक कॅरॉल वर्थमन या शास्त्रज्ञापर्यंत अनेकींच्या कार्याबाबत नेमकेपणाने आणि सुबोधपणे माहिती देण्याचं काम हे पुस्तक करतं.

किरणोत्सर्गी सूक्ष्ममापन यंत्राची जनक रोझालिन यालो यांच्याबाबत माहिती देणारा चरित्रनिबंध अप्रतिम आहे. स्त्री-संशोधक या स्त्रियांच्या, लहान मुलांच्या आजारांबाबतच बहुतांश संशोधन करतात, ही धारणा यामुळे मोडून पडते. जगभरातल्या नामवंत महिला शास्त्रज्ञांनी आरोग्याच्या क्षेत्रात केलेलं महत्त्वपूर्ण संशोधन व त्याची उपयुक्तता, त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, आलेल्या आव्हानांचा चिकाटीनं केलेला सामना, तसंच या शास्त्रज्ञांनी समाजातील लिंगभेदावर आधारित मानसिकतेला कसं तोंड दिलं, इ. महत्त्वाचे पैलू अत्यंत ओघवत्या शैलीत घाटे यांनी आपल्या चरित्रनिबंधांतून मांडले आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रात जगातील अनेक विद्वान स्त्रियांनी अनोखे काम केले आहे. या संशोधनांमध्ये त्याच्या स्त्री-जाणिवांमुळे अनेकदा मोलाची भर पडलेली आहे. वेगळे दृष्टीकोन समाविष्ट झालेले आहेत. ते कसे व त्याची उपयुक्तता काय, हेदेखील या चरित्रनिबंधांमधून समजते.

निरंजन घाटे यांच्यासारख्या सिद्धहस्त आणि अनुभवी विज्ञान लेखकानं लिहिलेलं हे पुस्तक केवळ विज्ञानप्रेमीच नव्हे, तर सर्वच वाचकांना आवडेल असं आहे.

‘आरोग्यक्षेत्रातील महिला संशोधक’-

निरंजन घाटे, साकेत प्रकाशन,

पृष्ठे- १५२, मूल्य- १७५ रुपये