News Flash

अरतें ना परतें.. : अदृष्टाचं बोट कपाळावर..

पुरुषांपेक्षा स्त्रिया आसपासच्या सगळ्या चराचराशी, पंचमहाभूतांशी जास्त उत्कटतेने जोडलेल्या असतात. कदाचित त्यामुळे त्यांना हे संकेत अधिक ठळकपणे मिळत असावेत.

प्रवीण दशरथ बांदेकर – samwadpravin@gmail.com

प्रसंग एक :

टी. एस. एलियटच्या ‘मर्डर इन द कॅथ्रेडल’ या नाटकाचा प्रारंभ. कॅन्टरबरी गावातल्या बायकांचा घोळका तिथल्या कॅथ्रेडलपाशी जमला आहे. तिथं एकत्र जमायला त्यांना कुणी सांगितलेलं नाहीये. एकमेकींशी आधी बोलून, आपापसांत काही ठरवूनही त्या तिथं आलेल्या नाहीयेत. आपण इथं का आणि कशासाठी आलो आहोत याचं त्यांनाही आश्चर्य वाटतं आहे. त्या सगळ्या सर्वसामान्य घरांतल्या, बिनचेहऱ्याच्या म्हणता येतील अशा स्त्रिया आहेत. त्यांच्या एकूणच देहबोलीमध्ये कसली तरी भीती स्पष्ट जाणवते आहे. हळुवार आवाजात खाली माना घालून त्या आपापसांत काहीतरी कुजबुजतायत. ‘अ‍ॅक्शन इज सफरिंग अ‍ॅण्ड सफरिंग अ‍ॅक्शन..’ असे काहीसे ते शब्द आहेत. आपण कसल्या तरी अघटित घटनेला साक्षीदार राहण्यासाठी इथं आलो आहोत असं त्यांना वाटतं आहे.

अशा कुठल्या बरं भयंकराच्या दरवाजात त्या उभ्या आहेत? कसल्या अज्ञाताची चाहूल लागली असावी त्यांना? की कसल्या अशुभाचं सावट जाणवतं आहे? नाटकात शिरल्या शिरल्या त्यांच्याइतकेच आपणही अस्वस्थ होतो. आपल्या मनात प्रश्नांचं मोहळ उठतं. कुठल्या अंत:प्रेरणेने या बाया इथे जमल्या असाव्यात, याचा शोध घेण्याचं कुतूहल आपल्या मनात जागं होतं. पुढे सबंध नाटकभर हा बायकांचा कोरस आपल्याला पुन:पुन्हा भेटत राहतो.. अस्वस्थ करत राहतो. ते जे काही त्यांना जाणवत होतं, दिसत होतं, त्या भविष्यातल्या अज्ञात भयाची जाणीव आपल्यालाही नकळत होऊ लागते. त्यांचं बोट पकडून आपणही आपल्या आयुष्यातील संभाव्य भीतीचा शोध घेऊ लागतो.

प्रसंग दोन :

सकाळी उठल्या उठल्या मोगाआजी आईला सांगते : ‘गो कालिंदी, आज पावशेर तांदूळ जास्तीचे घाल. पावणे येतंहत जेव्क..’

घरातल्या सगळ्यांना या गोष्टीची सवय झाली होती. त्यामुळे कुणालाच या गोष्टीचं नवल वाटत नसे. आजीसाठी निरोप घेऊन कुठला कावळा आलेला नसे की स्वयंपाकघरात मुंग्यांचं रिवान आलेलं नसे, तरीही तिला बरोबर कळायचं. स्वप्नात दृष्टांत झाल्यासारखी सकाळी उठल्या उठल्या ती हे असं काहीतरी सांगायची नि दिवसभरात पुढे तसंच घडून येत असे. हे पाहुण्याबिवण्यांचं एक वेळ ठीक होतं. त्यात काळजी वाटावी, हातापायांना कापरं भरावं असं काही नसायचं. पण एखाद्या सकाळी म्हातारी आरडओरडा करीत सगळा आवाठ डोक्यावर घ्यायची : ‘धावा रे! धावा रे! डोंगाराक्आग लागली.. काजी-आंबे जळान् जातंहत.. कायतरी करा रे. माज्या डोंगराक वाचवा रे..’

तिला लागणारी अशुभाची चाहूल काळजात धडकी भरवत असे. मोगाआजी असं काहीतरी सांगतेय म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट घडून येणार आहे, कुणावर तरी घाला पडणार आहे. सगळं गाव धास्तावून जायचं. नेमकं व्हायचंही तसंच. कधी काहीच हासभास नसताना बाबी परबाच्या गोठय़ातल्या म्हशी एकाएकी तोंडाला फेस येऊन मरून जायच्या. तर कधी नदीच्या कोंडीत मासे गरवायला गेलेला शंभा काळसेकरचा धाकला पोरगा अचानक आलेल्या लोंढय़ात वाहून गेल्याची खबर यायची. सगळं गाव सुन्न होऊन जायचं. बायाबापडय़ा मोगाआजीच्या नावानं बोटं मोडायच्या.

अस्वस्थ वर्तमान :

हे खरंच असं काही असतं का, हा मला नेहमीच छळणारा प्रश्न आहे. सामान्य दिसणाऱ्या त्या कॅन्टरबरीच्या बायकांकडे खरोखरच काही ‘सिक्स्थ सेन्स’ वगैरे होता असेल का? येऊ घातलेल्या काळात आपल्या आयुष्याला वेढणाऱ्या एखाद्या कुट्ट काळ्या सावटाचे काही पूर्वसंकेत वा इशारे (telepathy) त्यांना मिळाले होते का? आणि मग मोगाआजीचं काय? तिच्याबाबतीतही असंच काही होत असावं का? कसं दिसत होतं तिला नजीकच्या वर्तमानात किंवा भविष्यात घडणाऱ्या गोष्टींविषयी? आजीला विचारल्यावर ती म्हणायची, ‘हांव तें कितेंच जाणां ना रे ! माजो येतोबाच माज्या मुखात्सून बोलत असतलो..’

परामानसशास्त्राविषयी (parapsychology) कुतूहल म्हणून मी थोडंफार वाचलं आहे. त्यानुसार निसर्गाच्या अगदी निकट असलेल्या आणि निसर्गनियमांना अनुसरत जगत असलेल्या पशुपक्ष्यांना, किडय़ामुंग्यांना भविष्यात येऊ घातलेल्या भूकंप, वादळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांची जाणीव होते, ऋतुबदलाची चाहूल लागते, हे समजण्यासारखं आहे; पण असं काही माणसांच्याही बाबतीत घडू शकतं हे मानणं थोडं अतिशयोक्तीचं वाटतं. या विषयातल्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली तर ते सांगतात, ‘अतिंद्रिय शक्ती प्रत्येकात असते. आपण निसर्गाशी किती एकरूप होतो यावर तिची कार्यक्षमता अवलंबून असते. तीच आपल्याला आतून संकेत देत असावी. पुरुषांपेक्षा स्त्रिया आसपासच्या सगळ्या चराचराशी, पंचमहाभूतांशी जास्त उत्कटतेने जोडलेल्या असतात. कदाचित त्यामुळे त्यांना हे संकेत अधिक ठळकपणे मिळत असावेत. त्यातल्या त्यात अतिसंवेदनशील असलेल्या एखादीच्या बाबतीत हे अधिकच स्पष्ट जाणवून येतं. स्त्रीतत्त्व अधिक प्रभावी असलेले पुरुषही असे असू शकतात.

म्हणजे सरसकट सगळ्याच नसेल, पण काही लोकांच्या बाबतीत हे असं काही घडत असतं असं म्हणता येतं. आपले अनुभव काय सांगतात?  मी तसा बऱ्यापैकी चिकित्सक आणि आमच्या मालवणी भाषेत बोलायचं झालं तर, एक प्रकारचा ‘शंकासुर’ आहे. पण अनेकदा अशा गोष्टी माझ्याही बाबतीत घडलेल्या मी अनुभवल्या आहेत नि भयचकित झालो आहे. बरेवाईट संकेत या ना त्या स्वरूपात आपल्याला मिळाले होते, हे अनेकदा एखादी विशिष्ट घटना घडून गेल्यावर विचार करताना अनपेक्षितपणे जाणवून आलं आहे. कदाचित कावळा बसायला नि फांदी मोडायला असाही प्रकार असू शकतो. पण मग प्रत्येक वेळी हे असं कसं असेल, असंही मनात येत राहतं; नि नकळतच आपण अशा संकेतांमागचे अर्थ लावायचा खेळ खेळू लागतो.

कालचंच सांगतो. गणेश वसईकर या माझ्या कविमित्राचं करोनामुळे निधन झालं. अतिशय धक्कादायक अशी ही घटना होती आम्हा मित्रांसाठी. गणेशशी आमचे घरोब्याचे संबंध होते. आठवडाभर आधी त्याच्या पत्नीचंही करोनामुळेच निधन झालेलं. हादरून जावं असंच हे वर्तमान होतं. अस्वस्थ करणाऱ्या अशा बातम्या गेल्या वर्षभरापासून सतत कानावर येत आहेत. मृत्यू कधी कुणाचं दार ठोठावेल नि घरात घुसेल, काही कळू नये अशा एका विचित्र आणि अनिश्चित काळात आपण जगतो आहोत असं वाटत राहिलंय. गणेशच्या बाबतीत हे असं घडून आलं आणि मृत्यूची पावलं आता आपल्याही आसपास रेंगाळू लागली आहेत याची जाणीव प्रकर्षांने झाली. भयंकर अस्वस्थ होतो मी दोन- तीन दिवस. असं कसं घडू शकतं? एक कवी इतक्या सहजासहजी असा कसा मरून जातो? कुणीतरी सूड उगवल्यागत ‘डिलिट’ची कळ दाबावी नि मेहनतीने उभं केलेलं आपलं आयुष्यभराचं संचित इंद्रायणीत वाहून जावं क्षणार्धात- इतकं सोपं कसं काय असू शकेल हे? त्या कवीलाही याविषयी जराही काही कळलं नसेल का? कसलेच संकेत मिळाले नसतील? संवेदनशील कविमनाला तर सगळ्यात आधी या अदृष्टाची चाहूल लागायला हवी होती!

आपण हे असं म्हणतोय खरं, पण आपणाला तरी कुठे कळलं- असं काही आपल्या एका जवळच्या माणसाबाबत होणार आहे हे? का नाही कळलं? की कळलं असेल, पण आपणच लक्ष दिलं नसेल? ही शक्यताही असू शकत होती. मी मग खूप काळजीपूर्वक गेल्या काही दिवसांत घडलेल्या, जाणवलेल्या, खटकलेल्या, अस्वस्थ करून गेलेल्या बारीकसारीक गोष्टी आठवू लागलो. हे असेल का? याचा काय अर्थ होतो? या अमक्याचा या घटनेशी काही संबंध असावा का? हे आणि ते. दमछाक करणारा आणि तरीही पदरी काहीही न टाकणारा प्रकार होता तो. भयंकर चिडचिड होत राहिली होती. आजूबाजूच्या, जवळच्या प्रिय माणसांवर उगाचच भडकणं, वस्तूंची विनाकारण फेकाफेक करणं, खाण्यापिण्यावर राग काढणं सुरू होतं. तशातच अचानक चार्जिगसाठी लावलेला मोबाइल फोन माझाच धक्का लागून खाली पडला. हे असं याआधीही दोनदा झालेलं नि फोनचा डिस्प्ले गेला होता, या आठवणीने चरकलो. तसं काही झालं नसेल ना, म्हणत साशंकपणे फोनचं निरीक्षण करू लागलो. अचानक लख्खपणे आठवलं, गेल्या आठवडय़ात आपल्याला चष्मा फुटल्याचं स्वप्न पडलं होतं! कसल्या तरी खूप मोठय़ा गर्दीत घुसून वाट काढत मी पुढे जात होतो. रेटारेटीत अचानक माझ्या डोळ्यांवरचा चष्मा कुणाचा तरी धक्का लागून खाली पडला. आधी ते कळलंही नाही. काही वेळातच लक्षात आल्यावर अस्वस्थपणे मी त्या गर्दीत खाली वाकून चष्मा शोधू लागलो. चष्मा मिळाला, पण साहजिकच गर्दीच्या पायांखाली तुडवला जाऊन तो तुटून, फुटून गेला होता.

मी या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. चष्मा आपल्याला जास्तकरून कशासाठी लागतो? लिहिण्या-वाचण्यासाठी! चष्मा फुटून गेलाय म्हणजे आपलं लिहिणं, वाचणं नष्ट होऊन गेलंय असं समजायचं का? कशामुळे नष्ट झालं ते? तर गर्दीमुळे! गर्दी-लिहिणं-वाचणं आणि चष्मा फुटणं.. मला काहीतरी संगती लागतेय असं वाटू लागलं. हे खूप काहीतरी सूचक आहे हेही जाणवत होतं. मग वाटलं, अरेच्चा! हीच तर आपल्याला मिळालेली सूचना होती. माझा लिहिणारा, वाचणारा जवळचा मित्र.. बऱ्या-वाईटाचं भान आणून देणारी माझी दृष्टीच म्हणता येईल असा- या वर्तमानाच्या कोलाहलात हरवून जाणार आहे! हे आपल्याला आधी का कळलं नाही? या प्रश्नाला आता उत्तर नाही.

बाबा गेले तेव्हाही असंच झालेलं. नंतर कधीतरी महिन्या- दोन महिन्यांपूर्वीचं स्वप्न आठवलेलं. आमच्या जुन्या घराच्या देवघरात मी अडकून पडलो आहे.. धडाधड पुस्तकं कोसळताहेत आपल्या अंगावर.. आपण त्याखाली दबले जातोय.. गुदमरतोय.. श्वास घेता येत नाहीये..

बाकी इतिहास :

सुप्रसिद्ध कवयित्री सिल्विया प्लाथला मृत्यूचं ऑब्सेशन होतं. तिला म्हणे स्वप्नात मृत्यू दिसत असे. तिने तीन वेळा आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न केले. चौथ्या वेळी तिला यश आलं. मृत्यू असा दिसत असावा का? कळत असावा का? अनेकांकडून अनेकदा ऐकायला आलं आहे : अमका तमका कसा आपलं मरण कळल्यासारखं वागला होता. ती कदाचित योगायोगाची गोष्ट असू शकते. एखाद्या कवीने समजा मृत्यूविषयी एक कविता लिहिली नि पुढच्या काही दिवसांत अनपेक्षितपणे त्याचा मृत्यू झाला, तर लोक त्याला श्रद्धांजली वाहताना त्याची ती कविता वाचून म्हणतात, ‘बघा, किती द्रष्टा कवी होता! त्याला आपलं मरण कळलं होतं.’ गमतीचा भाग सोडून देऊ; पण असेही काही कवी खरोखरच असू शकतात ना, त्यांना आपल्या कपाळावर टेकलेल्या अदृष्टाच्या भयकारी काळ्या बोटाची जाणीव आधीच होऊ शकते! मला गुरुनाथ धुरी आठवतात, आरती प्रभू आठवतात. ग्रेसच्या कवितेत तर नेहमीच पावसाच्या मंद सुरांसारखे बॅकग्राऊंडला मृत्यूचे सूर वाजत असतात. भाषा कुठचीही असो, जगातल्या प्रत्येक चांगल्या कवी-लेखकाने एकदा तरी मृत्यूचे दूरात वाजणारे पदरव ऐकून त्यांना शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. हेमिंग्वेच्या ‘फॉर हूम द बेल्स टोल’मधल्या कॅथीला पावसाची स्वप्नं पडायची. ती आपल्या प्रियकराला म्हणायची, ‘आय सी मायसेल्फ डेड इन रेन.’ आणि शेवटी तसंच होतं. मुलाला जन्म देऊन कॅथी मरते तेव्हाही बाहेर वेड लागल्यासारखा पाऊस कोसळत होता; आणि त्या पिसावल्या पावसातून चालत फ्रेडरिक डोळे सावरत युद्धावर जायला निघालेला असतो.

माहीत नाही, गोष्टी कशा घडत आणि बिघडत जातात; पण अदृष्टाच्या या चाहुलीने अस्वस्थ झालेला गुरुनाथ धुरींसारखा कुणी लिहून जातो..

‘घडय़ाळ टिकटिकतंय / क्षणभरातच ते थांबेल टिकटिकायचं / आणि काळ्या केंद्रांतून एक शुभ्रसतेज पक्षी / कवितेसारखा उडेल अंधारात..’

किंवा हिंदीतील विश्वनाथप्रसाद तिवारी म्हणतात-

‘आखिरी बार/ जब उससे बचने के लिये / मैं भाग रहा था / तेज और तेज / और अपनी समझ से / सुरक्षित पहुँच गया जहाँ / वहाँ वह मेरी प्रतीक्षा में / पहले से खडी थी / मेरी मृत्यु!’

तुम्हाला आधी संकेत मिळोत- ना मिळोत, अदृष्टाचं तुमच्या कपाळावर टेकलेलं बोट तुम्हाला टाळता येत नाही, हेच शेवटी खरं असावं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 1:05 am

Web Title: arten na parten obsession of death life after death telepathy zws 70
Next Stories
1 मोकळे आकाश.. : रंगुनि रंगांत साऱ्या..
2 अंतर्नाद : मन कुंतो मौला
3 वननीती, वनकायदा आणि पर्यावरणाचा ऱ्हास
Just Now!
X