15 October 2019

News Flash

बारकुल्या ष्टोऱ्या, मोठाले अवकाश

लौकिकार्थानं या कादंबरीत नेहमीचा फॉर्म नाही. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे अगदीच बारकुल्या अशा एकतीस गोष्टी आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

प्रसाद नामजोशी

कुठल्याही नव्या लेखकाची पहिली कादंबरी येते आणि तिची चर्चा होते तेव्हा त्या लेखकाला मनातल्या मनात गुदगुल्या होत असतात. ते स्वाभाविकच आहे. अशा लेखकावर पुस्तक खपल्यास ‘यशस्वी’, न खपल्यास ‘आश्वासक’ वगैरे विशेषणं लावली जातात. त्यांचं ओझं खांद्यावर बाळगत मोठय़ा उमेदीनं लेखक पुढच्या कादंबरीकडे वळतो आणि इथेच त्याच्यातल्या ‘लेखकरावा’ची परीक्षा सुरू होते. आपणच निर्माण केलेल्या साहित्याच्या नव्या अवकाशात अधांतरी अडकण्याची त्याची शक्यता बळकट होऊ  लागते. अशा वेळी ‘पहिल्यांदा त्यांना आवडल्या होत्या’ या नावाखाली पहिल्यांदा दिलेल्या जुन्याच भाजणीच्या चकल्या नव्या उत्साहानं पाडायला सुरुवात होते. ‘आश्वासक’ लेखक ‘यशस्वी’ होण्याच्या मागे लागतो आणि सुजाण वाचकांच्या मनातली जागा गमावून बसतो. ‘बगळा’ या आश्वासक पहिल्या कादंबरीनंतर लेखक प्रसाद कुमठेकर यांनी सुदैवानं ही वाट टाळण्यात यश मिळवलेलं आहे आणि नव्या मांडणीची ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही आपली दुसरी कादंबरी लिहिलेली आहे.

लौकिकार्थानं या कादंबरीत नेहमीचा फॉर्म नाही. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे अगदीच बारकुल्या अशा एकतीस गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट तीन-साडेतीन पानांत आटोपते. प्रथमपुरुषी आणि ‘पुरुषी’ निवेदनात मांडलेली ही प्रत्येक गोष्ट शब्दश: ‘बारकुली’ आहे. या बारकुल्या गोष्टी म्हटलं तर स्वतंत्र वाचता येतात आणि म्हटलं तर त्यांच्यामध्ये एक समान अदृश्य धागा आहे, जो एका कादंबरीचा फॉर्म आपल्या नकळत आपल्या मनामध्ये धारण करतो. प्रस्तुत कादंबरीत एवढी सशक्तता निश्चित आहे आणि अशा स्वतंत्र बारकुल्या गोष्टींमध्ये असलेलं एक समान सूत्र हे या कादंबरीचं एक महत्त्वाचं बलस्थान आहे.

‘उदगिरी’ बोलीत लिहिलेल्या या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ वाचताना आपण एका निराळ्याच विश्वात प्रवेश करतो. म्हटलं तर हे आपल्या अवतीभवतीचंच विश्व आहे. फक्त अशा सूक्ष्म निरीक्षणाने ते यापूर्वी आपल्याला कुणी दाखवलं नव्हतं. कादंबरीची प्रस्तावना म्हणून उदगिरी बोलीच्या सोदाहरण वैशिष्टय़ांवर लेखकानेच सुरुवातीला एक स्फुट लिहिलेलं आहे. त्यातून आपल्याला या लडिवाळ बोलीची ओळख होते आणि हळूहळू आपण या उदगिरी ‘ष्टोऱ्या’ लेखकानं गप्पा मारल्यासारख्या त्याच्या शब्दांत वाचता वाचता ऐकू लागतो. बोलीभाषा लेखी पद्धतीने वाचताना आगगाडीने रूळ बदलताना केलेल्या खडखडाटाप्रमाणे होणारा एक नैसर्गिक खडखडाट सुरुवातीच्या एक-दोन ष्टोऱ्या वाचताना होतो; पण मग मात्र गोष्टीची आगीनगाडी तिच्या गतीने धावू लागते. आपण त्या निवेदनात, भाषेच्या सूक्ष्म अंतरंगात आणि माणसांच्या मनांच्या खोलवर आत जाऊ  लागतो. वरकरणी बारकुल्या वाटणाऱ्या या ष्टोऱ्या हळूहळू आभाळ कवेत घेऊ  लागतात.

उदगिरी बोलीतली सहज, पण थेट वाक्यं हे या कादंबरीचं वैशिष्टय़ मानावं लागेल. ‘मी गप्प बसून हातातल्या तुराटय़ाच्या ब्याटीनं भुंग्याला सिक्सर मारीत चाललेल्या बट्टय़ाला बघलालतो’, ‘मी पण हुशार इद्यर्थ्यांसारखा मसनातून वढून आनल्यावनी दिसलालतो’, ‘तेनी तसंच हस्तेत, उधार आनल्यावानी’, ‘रस्त्यात गाजरगवतासारखा निस्ता अंधार माजलता’.. यांसारखी चित्रवाही वाक्यं अर्थाला नव्या शक्यता प्राप्त करून देतात. लेखकाला जाणवणारी दृश्यं वाचकाच्या डोळ्यांपुढे भाषेच्या अडथळ्याशिवाय अगदी सहज उभी करण्याची ताकद अशा वाक्यांमध्ये आहे. अशी वाक्यंच या बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या आभाळाएवढय़ा मोठाल्या करत नेतात.

कादंबरीची प्रकरणं म्हणजेच या छोटय़ा छोटय़ा गोष्टी. त्यातल्या ‘गंगापाट’, ‘काळानिळा वळ’, ‘ती गेली’, ‘डाका’, ‘लक्ष्म्या’ या गोष्टी विशेष उल्लेखनीय. त्यांना ‘कथा’ असं लेखक जाणीवपूर्वक म्हणत नाही. त्या खरं तर गोष्टी म्हणजे ‘ष्टोऱ्या’च आहेत. त्यात ‘लिखाणा’पेक्षा ‘सांगण्या’ची अनावर ओढ जाणवते आणि म्हणून लेखीपेक्षा बोलीभाषा निवडण्याची गरज लेखकाला का भासली, ते लक्षात येते. अशा ष्टोऱ्या सांगायच्या आणि ऐकायच्या असतात. उदगिरी बोलीच्या जवळिकीनं त्या अधिक भावतात.

सदर कादंबरी लिखाणात आणि मांडणीतही नेटकी आहे. कादंबरीच्या शेवटी प्रत्येक कथेत खास उदगिरी बोलीत आलेल्या अनवट शब्दांचे अर्थही दिलेले आहेत. अर्थात, चाणाक्ष वाचकाला तिथपर्यंत जाण्याची गरज पडू नये; परंतु तक्रारीला जागा नसावी म्हणून हे कष्ट घेतलेले असावेत. नव्या वाचकाला त्याचा निश्चित उपयोग होईल. फक्त संपादनाकडे अधिक लक्ष दिले असते, तर जास्त बरे झाले असते. कारण यातली प्रत्येक गोष्ट स्वतंत्र असल्यामुळे त्यांना अनुक्रमणिका दिली असती तर आवडलेल्या, लक्षात राहिलेल्या आणि पुन्हा एकदा वाचाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी पानं मागेपुढे करत शोधण्याचे कष्ट कमी झाले असते. अक्षरजुळणी करताना झालेल्या अनावश्यक चुकाही टाळता येण्यासारख्या होत्या. अर्थात, लेखकाने लिहिताना कष्ट केलेले आहेत, तर जरा वाचकांनीही वाचताना घ्यावेत असा उद्देश असल्यास गोष्ट निराळी! प्रत्येक ‘ष्टोरी’च्या शीर्षकावर सजग रेखाचित्रे आहेत. त्या जाणत्या चित्रकाराच्या नावाचा उल्लेख करायचा राहून गेलेला आहे.

आता एकच वाटतं, ‘बगळा’पाठोपाठ ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’मधून लेखकानं उदगिरी बोलीची आणि गावातल्या बगळ्याएवढय़ा बारकुल्या गोष्टींची नवी वाट चोखाळलेली आहे. ती आता त्याने इतरांसाठी सोडावी, म्हणजे धोपटमार्गी लोकांना त्या मळलेल्या वाटेवरून चालता येईल आणि सदर लेखकाकडून मात्र काही नव्या वाटा निर्माण व्हाव्यात. तशी शक्यता या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’मध्ये जाणवते आहे. ती प्रत्यक्षात यावी. म्हंजे कसाय, जुन्यात फार रमुनी. बशेपोरं मारतेत तशा आपल्याच लिखानाच्या जिट्टय़ा मारुनी. तवाच आपलं जलजलाटी लिखान बेक्कार गुणिले गुणिले व्हतंय. पटतासल तं बगचाल नाही तं मुरकू मुरकू सोडचाल!

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’

– प्रसाद कुमठेकर,

पार पब्लिकेशन्स,

पृष्ठे – ११२, मूल्य – १८० रुपये

prasadnamjoshi@gmail.com

First Published on January 6, 2019 12:48 am

Web Title: article about barkulya barkulya storya novel