रमेश इंगळे-उत्रादकर

आपले भाषिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक पर्यावरण अनेक अंतर्विरोधांनी भरलेले आहे. या पर्यावरणात एकीकडे आपली भाषा, आपली वाचनसंस्कृती याविषयी चिंतेचे सूर आळवले जातात; तर दुसरीकडे अनेक छोटी-मोठी संमेलने, चर्चासत्रे, भाषिक उत्सव व्यापक प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात. एकीकडे पुस्तके विकली जात नाहीत, वाचक दुर्मीळ झालाय असे म्हटले जाते; तर दुसरीकडे पुस्तकांच्या एकामागून एक आवृत्त्या काढल्या जातात. अशा अंतर्विरोधांनी भरलेल्या वास्तवात लिहिल्या जाणाऱ्या नव्वदोत्तर कालखंडातील साहित्याचे स्वरूप तपासण्याचा प्रयत्न करणे हा या लेखाचा हेतू आहे. त्याकडे ‘साहित्यातले वर्तमान’ अशा नजरेनेही बघता येईल.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
riche class Nariman Point Air India Economy Tata Group
नवश्रीमंत वर्गाचा नवा मंत्र!

२१ व्या शतकाचे दुसरे दशक सरत असतानाच्या या काळात लिहिल्या जात असलेल्या साहित्याचे मूल्यमापन आधीच्याच प्रचलित, पारंपरिक निकषांनी करणे कालसुसंगत ठरणार नाही. साहित्याची निर्मिती, आस्वाद आणि मूल्यमापन या तिन्ही प्रक्रियांवर काळाची म्हणून एक मुद्रा कायम उमटत असते. आपल्या मानसिक, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय आदी अवकाशांत होणाऱ्या घुसळणीचे, अभिसरणाचे संदर्भ त्या-त्या काळाला लगडलेले असतात आणि त्यांचा साहित्य व्यवहारावर इष्ट-अनिष्ट परिणाम होत असतो. म्हणून साहित्याची चर्चा, मूल्यमापन त्या-त्या काळाच्या परिप्रेक्ष्यात करणे कालसंगत ठरते. समकालात लिहिणाऱ्या लेखक-कवींना विशिष्ट वर्गवारीत, कप्प्यांत बंदिस्त करता येणे शक्य नाही. कधीकाळी साहित्यविश्वात जोरकसपणे वाहणारे दलित, ग्रामीण, आदिवासी, मार्क्‍सवादी, स्त्रीवादी वगैरे प्रवाह आज अगदीच क्षीण झाले आहेत. ते प्रवाह खळाळत ठेवणाऱ्या चळवळी उरलेल्या नाहीत. वाङ्मयीन, सामाजिक पर्यावरणात त्या आवाजांचे अवशेष तेवढे उरले आहेत. अशात लेखक-कवींचा केवळ ग्रामीण, दलित, आदिवासी किंवा मार्क्‍सवादी, स्त्रीवादी म्हणून विचार करणे म्हणजे वर्तमानाकडे पाठमोरे होऊन उभे राहण्यासारखे आहे.

ग्रामीण अवकाशात लिहिणारे आणि शहरी-ग्रामीण अशा दोन्ही अवकाशांत प्रकर्षांने वाचले जाणारे आसाराम लोमटे, प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत, किरण गुरव हे आजच्या काळातले महत्त्वाचे लेखक स्वत:ला ग्रामीण लेखक म्हणवून घेत नाहीत. त्यामागे त्यांचा ग्रामीण जाणिवांचा, संवेदनांचा अनादर करावा हा हेतू नाही, तर काहीएक वाङ्मयीन दृष्टी आहे. स्वत:च्या निर्मितीला विशिष्ट चौकटीत बंदिस्त करून घेणे त्यांना योग्य वाटत नाही. आपले साहित्य एकूण मराठी साहित्याच्या व्यापक पटावर जोखले आणि वाखाणले जावे, अशी त्यांची त्यामागे भूमिका आहे आणि ती सर्वथा योग्यच आहे. आजच्या काळातला कोणताही लेखक हीच भूमिका घेईल. विशिष्ट समूह, वर्ग आणि इझमच्या जाणिवा- संवेदनांचा आज बोलबाला नाही. जात, धर्म, पंथांच्या अस्मिता सामाजिक-राजकीय पातळीवर टोकदार झालेल्या दिसत असल्या तरी वाङ्मयीन पातळीवर तसे चित्र नाही. हा अंतर्विरोधही बदललेल्या काळाचाच परिपाक आहे. अशा परिस्थितीत विशिष्ट समूह, वर्ग किंवा इझमचे बिरुद लेखकाच्या नावामागे जाणीवपूर्वक लावावे, लावले जावे अशी या काळाची मागणी आणि गरजही नाही. याचा अर्थ असा मुळीच नाही, की जात, वर्ग आणि लिंगवास्तवात आमूलाग्र बदल झाले आहेत किंवा त्या वास्तवातले प्रश्न आणि गुंते सुटले आहेत, त्यावर आधारित विषमतेच्या दऱ्या बुजल्या आहेत. उलट, त्यांचे स्वरूप अधिक क्लिष्ट व गुंतागुंतीचे झाले आहे. बदललेल्या काळाने नवे प्रश्न, गुंते निर्माण केले आहेत. अवस्थांतराची ही प्रक्रिया वेगवान आहे. ती समूहनिष्ठेकडून व्यक्तिनिष्ठतेकडे नेणारी असल्यामुळे कवी-लेखकांच्या निर्मितीची केंद्रे ढळली आहेत. त्यांच्या ‘आयडेंटिटी’ची रूपे बदलली आहेत.

आजच्या कवी-लेखकांचा त्यांच्या निर्मितीच्या सोयीसाठी/ अभ्यासासाठी वर्गवारीत विचार करायचाच झाल्यास तो फार तर ‘महानगरीय’ आणि ‘महानगरेतर’ किंवा ‘नागर’ व ‘अनागर’ असाच करता येईल. अर्थात, ही वर्गवारीसुद्धा खूप ठळक आणि स्पष्टपणे करता येईल अशी परिस्थिती नाही. कारण जाणिवांची- संवेदनांची सरमिसळ ही इतक्या व्यामिश्र स्वरूपाची आहे, की त्याचे पृथक्करण ढोबळ लेबल लावून करता येणे शक्य नाही. तरीही महानगर आणि गाव यांतल्या जगण्याची गती, जगण्यासाठीचा संघर्ष, अस्तित्वाला वेढून असलेले प्रश्न, गरजा, वाटय़ास आलेले पारंपरिक संचित यांच्यात जाणवणाऱ्या तफावतीमुळे अशी वर्गवारी करता येण्याइतकी जागा अजून शिल्लक आहे.

काळ बदलला, काळाची परिमाणे बदलली. त्याचाच परिणाम म्हणून चळवळी क्षीण झाल्या. परंतु लिहिणाऱ्यांची संख्या घटली असे मात्र झाले नाही. आज साहित्यनिर्मिती जितक्या तीव्रतेने महानगरांतून, तितक्याच तीव्रतेने गावाकडच्या मातीतूनही होत आहे. जागतिकीकरणाने दोन्ही वास्तवांत उलथापालथ घडवली आहे. आपल्या अवकाशातील उलथापालथीला आपापल्या पद्धतीने दोन्हीकडचे लेखक-कवी प्रतिक्रिया देत आहेत. बदलत्या काळाची, वास्तवाची स्पंदने दोन्हीकडे आहेत. फक्त त्यांचे स्वरूप वेगळे आहे. साहजिकच दोन्हीकडच्या लेखनाची आशयसूत्रे एकसारखी असणे शक्य नाही. परंतु ते एकाच काळात एकाच पिढीकडून लिहिले जात असलेले साहित्य आहे.

नव्या काळाची, तंत्रज्ञानाची, वस्तूंच्या आक्रमणाने रुजलेल्या नव्या चिन्हसंस्कृतीची भाषा आता महानगरीय परिघ ओलांडून महानगरेतर लेखनातही झिरपू लागली आहे. ही भाषा या काळाचीच देण आहे. परंतु केवळ ही भाषा लेवून अवतरलेले साहित्यच तेवढे आजच्या काळाचे समजणे म्हणजे काळाचा आणि साहित्याचाही खूप वरवर विचार केल्यासारखे होईल. नव्या जाणिवा फक्त नव्या भाषेचा पोशाख घालूनच व्यक्त करता येतात असे नाही. पोशाखाच्या खाली खूप काही दडलेले असते. ते बोलीत, प्रचलित भाषेतही व्यक्त करता येते. म्हणूनच नव्या साहित्याचा विचार आंधळेपणाने करता येणार नाही.

कोणत्याही कालखंडात कविता विपुल प्रमाणात लिहिली जाते. कथा-कादंबरी लिहिणाऱ्यांची संख्या मोजकीच असते. कथा- कादंबरी हे लेखनप्रकार दीर्घ बैठक आणि प्रदीर्घ ऊर्जेची मागणी करतात. त्यामुळे अनेक लिहिणारे त्यांच्या वाटेस किंवा त्या वाटेने जात नसावेत. गंमत म्हणजे कवितेसारखा अवघड, अनघड प्रकार कुणीही उठतो आणि सहजपणे हाताळतो. आजचा काळही याला अपवाद नाही. परंतु या विपुल कवितेत सकस काव्यप्रत्यय देणाऱ्या अस्सल कवितांची आणि तशी क्षमता बाळगणाऱ्या जातिवंत कवींची संख्या मोजकीच आहे. आणि हे चित्र महानगरीय व महानगरेतर अशा दोन्ही प्रांतांत समान आहे.

कथा-कादंबरी हे कथनात्मक प्रकार हाताळणारे लेखक मोजकेच असले तरी त्यांनी लक्षवेधी निर्मिती केली आहे. त्यात महानगरापेक्षा महानगरेतर लेखकांची संख्या तुलनेने अधिक आहे. विषय, आशय आणि रचनेच्या रूढ चौकटी मोडून नव्या वास्तवाला नव्या पद्धतीने भिडण्याचा प्रयत्न नवे लेखक करताना दिसतात. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने बदललेले, विखंडित झालेले जगणे, संवेदना-मनोव्यापाराची बदललेली स्पंदने, मूल्यऱ्हासाच्या टोकावर येऊन थांबलेली समाजजीवनाची अगतिक वळणे त्यांच्या लेखनातून आविष्कृत होत आहेत. आत-बाहेरच्या पडझडीला एक व्यक्ती म्हणून प्रतिक्रिया आणि लेखक म्हणून कलात्मक आकार देण्याची त्यांची धडपड सुरू आहे.

आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवावेसे वाटते. या काळात कविता, कथा, कादंबरी या तिन्ही प्रकारांत महानगरांतून लिहिणाऱ्या कवयित्री/ लेखिका जशा आहेत, तशा ग्रामीण भागातून लिहिणाऱ्या लेखिका दिसत नाहीत. कविता लिहिणारे एखाद् दुसरे नाव अपवाद म्हणून घेता येईलही; परंतु कथा-कादंबरीच्या प्रांतात मात्र एकही उल्लेखनीय नाव सापडत नाही. आपले जगणे, सोसणे मांडण्यासाठी अनुकूल भूमी असतानाही ग्रामीण अवकाशातून लिहिणाऱ्या स्त्रिया पुढे येऊ नयेत ही गोष्ट आपला सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक परिघ अजून विस्तारला नसल्याचे द्योतक आहे.

आणि शेवटी एक महत्त्वाची नोंद : नव्वदोत्तर कालखंडात सकस, दर्जेदार कविता, कथा, कादंबरी लिहिणाऱ्या कवी-लेखकांकडून मात्र अजूनही आपल्या पूर्वसुरींनी निर्माण करून ठेवलेले मैलाचे दगड ओलांडून नव्या वाटा साकारण्याचे काम झाले आहे असे म्हणता येत नाही. नवे कवी-लेखक तशा क्षमता निश्चितच बाळगून आहेत. येणाऱ्या काळात तसे काही मन्वंतर हे कवी-लेखक घडवतील अशी आशा करायला हरकत नाही!

ramesh.utradkar@gmail.com