News Flash

निमित्त : फाशी

फाशी देण्यातले एक समर्थन असते, ते म्हणजे गुन्हेगाराला दहशत बसली पाहिजे, धाक वाटला पाहिजे.

| August 2, 2015 02:00 am

फाशी देण्यातले एक समर्थन असते, ते म्हणजे गुन्हेगाराला दहशत बसली पाहिजे, धाक वाटला पाहिजे. हे खरंच होते का? िहसाचार, अनाचार, भ्रष्टाचार वाढतोय की कमी होतोय? अवघ्या पृथ्वीचेच भवितव्य धोक्यात यावे अशी परिस्थिती आज आहे की नाही? ‘खून का बदला खूनसे’ याने मूळ िहसेचे प्रश्न कुठे सुटले?
मी एक चित्रपट पाहिला होता. फक्त ८४ मिनिटांचा चित्रपट. चित्रपट संपला ८४ मिनिटांतच; पण माझ्या डोक्यात तो चित्रपट अजून सुरूच आहे. तो चित्रपट मला अनेक प्रसंगी आठवतो. तो मला ‘हिंसा’ या माणसाच्या मुख्य दुर्गुणाविषयी परत परत विचार करायला प्रवृत्त करतो. माझ्या स्वत:तली हिंसेची प्रवृत्ती मीच तपासत जातो. मीच माझे शब्द, माझे उच्चार, माझी हालचाल आणि माझे बघणे या दृष्टिकोनातून मला पाहत राहतो. प्रेक्षकाला अंतर्मुख करून विचार करायला लावणे ही कोणत्याही कलाकृतीची ताकद असते. माणसाला जगण्याचे शहाणपण प्रदान करते ती कलाकृती मग मोठीच होते. तुकारामबुवांचे अभंग आपण याच कसोटीवर मोठे मानतो. ते अभंग माणसाला दुभंगलेपणापासून वाचवतात. तर, असाच हा चित्रपट होता- वैचारिक दुभंगलेपणापासून वाचवणारा. त्याचे नाव ‘a short film about killing!’ पोलंडचा प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफ किस्लोव्हस्की यांचा हा १९८८ सालचा चित्रपट. नावसुद्धा किती समर्पक आहे पाहा- ‘a short film about killing!!’
तर या चित्रपटातल्या हिंसेविषयी! चित्रपटाच्या पूर्वार्धात एक मुलगा एका टॅक्सी ड्रायव्हरचा निर्घृण खून करताना दाखविला आहे. मुलाच्या भयानक हिंसाचाराने अंगावर अक्षरश: काटा येतो आणि पाहणाऱ्याचे मस्तक तडकते. या मुलाला पोलीस पकडतात. गुन्हा शाबीत होतो आणि फाशीची शिक्षा सुनावली जाते. आता चित्रपटाचा उत्तरार्ध सुरू होतो. न्यायालय, पोलीस आणि वकील सारे मिळून या मुलाला फाशीच्या तख्तापर्यंत ढकलतात. तरुण मुलगा जो सुरुवातीला खुनी वाटला होता, तोच आता पाहणाऱ्या प्रेक्षकाला चक्क निष्पाप वाटू लागतो. उलट, मुलाला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायालय आणि शिक्षेची अंमलबजावणी करणारी राज्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा निर्घृण खुनी वाटू लागते. मुलाला फाशी दिली जाते- अत्यंत थंडपणे आखून, ठरवून! प्रथम डोक्यात दगड घालून खून करणारा मुलगा गुन्हेगार असतो आणि शेवटी त्याला फासावर लटकवणारे आपण सारेच गुन्हेगार बनतो. खून आणि फाशी दोन्ही गुन्हे पाहणाऱ्याला तितकेच समान आणि भयानक वाटतात. व्यक्तीने केलेली हिंसा आणि समाजाने केलेली हिंसा या दोन्हीची पातळी एकच होते.
हा चित्रपट मी कधीच विसरू शकत नाही. चित्रपट पाहिलेल्या बहुतेकांची हीच अवस्था होते. या चित्रपटाने अनेक गहन मुद्दे पुढे आणले. फाशी देण्याचे कृत्य करणे हे निर्घृण खून करण्याच्या कृत्याइतकेच लांच्छनास्पद आहे.. माणसाच्या अप्रगत, असंस्कृत आणि अडाणीपणाचे लक्षण आहे असे हा चित्रपट दाखवतो. खून करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा ही व्हायलाच हवी. पण अशी? खुनाइतकीच क्रूर?
प्रख्यात लेखक विजय तेंडुलकरांनी फाशीवर अभ्यास केला होता. या कैद्यांचे फोटोही काढले. तो त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. ‘फाशी’ हा नव्हे, तर त्यातून पुढे येणारी हिंसा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यावरील लेखही असाच हिंसेबाबत विचार करायला लावणारा होता. आजही अनेक वृत्तपत्रांतून, चॅनेलवर फाशी देण्याचे वर्णन रंगीत चौकटी टाकून केले जाते. फाशीचा दोर वळण्याची प्रक्रिया, जल्लादाची मुलाखत, फाशीचा कैदी किती वाजता उठणार, अंघोळ करणार, परमेश्वराला अथवा अल्लाला अथवा येशूला अथवा ज्या त्या धर्मातील देवाला आळवणार, आवडीचे पदार्थ काय खाणार, वगैरे वगैरे वगैरे.. ही वर्णने वाचकाने आणि पाहणाऱ्याने अगदी रंगून जावे अशीच केलेली असतात. ही रोमांचकारी वर्णने वाचताना, पाहताना आपणही चित्कारावे आणि बेभान व्हावे असेच असते. इंटरनेटवर तर गुन्ह्य़ांवरील शिक्षांच्या चित्रफितींचा पूर आहे. शिक्षा म्हणून डोके दगडाने ठेचून मारणाऱ्या आणि डोक्यात गोळी घालणाऱ्या काही चित्रफिती इथे आहेत. त्यांचे दर्शकही कोटींच्या संख्येत असतात. पॉर्न फिल्म आणि या फिल्म्सचे रेटिंग खूप वरचे आहे. फाशीची वर्णने वाचताना मन उद्दीपित होणे हीच क्रिया घडते. पॉर्न फिल्म बघतानाही तेच होते. मन उद्दीपित होणे, प्रक्षोभित होणे, चेकाळणे आणि चवताळणे या क्रिया अनुक्रमे घडत जातात.
गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते.. मुद्दा खतम!
मुद्दा खतम म्हणजे ‘सुडाचा बदला सूड’, इतकेच.
मूळ मुद्दा कुठे खतम होतो?
तो तर चालूच राहतो.
फाशी देण्यातले एक समर्थन असते, ते म्हणजे गुन्हेगाराला दहशत बसली पाहिजे, धाक वाटला पाहिजे. हे खरंच होते का?
हिंसाचार, अनाचार, भ्रष्टाचार वाढतोय की कमी होतोय?
अवघ्या पृथ्वीचेच भवितव्य धोक्यात यावे अशी परिस्थिती आज आहे की नाही?
‘खून का बदला खूनसे’ याने मूळ हिंसेचे प्रश्न कुठे सुटले?
हिंसेची कारणमीमांसा आपण करतो?
माणसे अशा टोकापर्यंत मुळात जातातच का, हा प्रश्न आपण ऐरणीवर घेतो?
‘फाशी द्या’ ही झाली तात्पुरती मलमपट्टी. मूळ रोग त्याने नष्ट होत नाही. िहसेची पाळंमुळं ही राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक प्रश्नांमध्ये दडलेली असतात. विषमता, असमानता आणि अव्यवस्था यांतून अनेक अस्वस्थ करणारे अवघड प्रश्न तयार होतात. फुललेल्या अस्मिता आणि विखारी अहंकार यातून हिंसाचारी बुभुत्कार बाहेर पडतो. आर्थिक, सामाजिक, भाषिक वाढत चाललेल्या दऱ्या माणसाला अधिकाधिक िहसेकडे लोटतात. त्यातून सहिष्णुतेला तिलांजली दिली जाते. रस्त्यातील दुसरे वाहन आपल्याला स्पर्श करून उभे आहे असे जरा जरी वाटले, तरी आपली नजर ही तीक्ष्ण होते. आईमाईवरून शिव्या तोंडी येतात. क्षणार्धात हातात धोंडा घेण्यापर्यंत मजल जाते. हे सारे चित्र आपल्या साऱ्यांच्याच अनुभवाचे आहे. प्रचंड गर्दी, गोंगाट आणि सतत पुढे जाण्याचा हव्यास ‘राडा’ संस्कृतीला उपकारकच ठरतो. माणसांची मनं आधीच थकलेली असतात. प्रश्नांची लड समोर असते. अशात फक्त एक भावनिक काडी पेटवायची गरज असते. ही प्रश्नांची लड मग फटाक्यांची लड होते. थकलेली मनं पेटतात. उद्दीपित होतात. टाळ्या पिटतात. रक्ताळलेल्या ओठांवरून जिव्हा फिरतात.जिंकलेल्यांचे हात आकाशात जातात. ‘मारा, ठेचा, बदडा, ठोका!’ मन पेटते, मन चेतते, मन धडाडते.
तर, त्या चित्रपटाने मला असा हिंसेबाबत परत विचार करायला लावला. फाशी देणे हा त्या िहसेचाच नमुना. जे निष्पाप जीव स्वत:चा प्राण हकनाक गमावतात त्यांच्या नातेवाईकांना त्या फाशीने न्याय मिळाला असे वाटत राहते. मात्र, मुळात त्या निष्पापावर हल्लाच का झाला, आणि त्यामागचा ‘मास्टर माइंड’ कोण होता, हे प्रश्न गुप्त राहतात. हा ‘बोलविता धनी’ नेमका कोण असतो, आणि तो असे गुन्हे का घडवून आणतो, यातील राजकारण तपासण्यात आपल्याला काडीचाही रस नसतो. अनेक दंगली झाल्या. कारणं वेगवेगळी होती. काही कारणं कळली. बरीचशी अंधारात राहिली. काहींची कारणे सापडली, तर काहींची दडपली गेली. दंगल घडवणारे आणि खून करवणारे दोघेही अदृश्य. सोयीनुसार निष्पाप मारले जातात किंवा मारवले जातात. ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ हा प्रश्न अनुत्तरित आणि अबाधित राहतो. व्यक्ती मरते; प्रवृत्ती नाही!
‘फाशी म्हणजे सूड’ हा मुद्दा या चित्रपटात येताना मला मार्टिन ल्यूथर किंग यांचे प्रसिद्ध वाक्य आठवते ते असे – eye for an eye will make the whole world blind! the time is always right to do the right thing.  राष्ट्रांनी फाशीची शिक्षा देणे बंद केले आहे. त्यात मोठे देश आहेत, तसेच अत्यंत छोटे देशही आहेत. भारतानेही आता आपण विचारशील, विवेकशील आणि विज्ञाननिष्ठ आहोत हे दाखवून द्यायला हवे. ‘वाल्याचा वाल्मीकी होऊ शकतो’ ही आणि महात्मा फुले यांना मारून टाकायला आलेला एक माणूस मनपरिवर्तन होऊन विद्वान बनतो आणि दुसरा अंगरक्षक बनतो. ही आपली परंपरा आपण बिलकूल विसरता कामा नये. हिंसेचा पुरस्कार करणारे आणि त्याचे आचरण करणारे मानव हे पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात आदरणीय नाहीत. अिहसा आणि मानवता यांचे नाते जोडणारे मानव हेच आपल्या जगण्यात कायम आदराचे स्थान बाळगून आहेत. अहिंसेचे विचार करणारे आपले गौतम बुद्ध, भगवान महावीर, कबीर, तुकाराम, महात्मा गांधी हे आपल्याकरिता महामानव आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने विचार करता करता मी इथवर येऊन ठेपलो.
विचार की अविचार?
विवेक की अविवेक?
अिहसा की हिंसा?
आपण मार्ग निश्चित निवडू शकतो.. साऱ्यांच्या कल्याणाचा!!
अतुल पेठे -atulpethe50@gmail.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 2:00 am

Web Title: article about death penalty
टॅग : Capital Punishment
Next Stories
1 कर्मयोगी
2 उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
3 तो प्रवास सुंदर होता..
Just Now!
X