नरेन्द्र चपळगावकर

‘हिंद स्वराज्य’ या महात्मा गांधींनी लिहिलेल्या छोटय़ाशा पुस्तिकेची शताब्दी नऊ वर्षांपूर्वी साजरी झाली. भारताच्या त्यावेळच्या स्थितीबद्दलचे गांधीजींचे आकलन आणि त्यात कोणते बदल व्हावेत, याबद्दलचे त्यांचे मत या पुस्तिकेत प्रकट झाले आहे. या दृष्टीने तिचे महत्त्व आहे. अनेकांनी या पुस्तिकेबद्दल आपले विचार आणि विशेषत: त्यातील गांधीविचारांची आज असलेली प्रसंगोचितता सांगणारी पुस्तके लिहिली. त्यात कोणते बदल व्हावेत, याबद्दलचेही लेखन केले आहे. प्रा. फकरूद्दीन बेन्नूर हे मुस्लीम समाजाच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे एक अभ्यासक. त्यांचे ‘हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ’ हे पुस्तक म्हणजे त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ‘गांधी अभ्यास केंद्रा’त गांधीजींच्या पुस्तिकेतील प्रतिपादनाबद्दल केलेल्या अभ्यासाचे फलित आहे.

‘हिंद स्वराज्य’ लिहिले त्या वेळी गांधीजींचे वय ४० च्या आसपास होते. ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या सल्ल्यानुसार वर्षभर भारतभर फिरून भारताची तत्कालीन लोकस्थिती समजून घेतलेले गांधीजी अजून निर्माण झालेले नव्हते. ती संधी त्यांना १९१५ नंतर मिळाली. १९१२ साली नामदार गोखल्यांनी या पुस्तिकेचा अनुवाद वाचला. त्या वेळी त्यांना हे लेखन अवघड वाटले आणि त्यातील विचारही अपरिपक्व वाटले. गांधीजीच कालांतराने या पुस्तिकेतील विचारांचा त्याग करतील, असेही त्यांना वाटले; प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही.

गांधीजींच्या मनातील भारताचे भावी चित्र स्पष्ट करण्यासाठी या पुस्तिकेचे महत्त्व अर्थातच आहे. परंतु ही पुस्तिका म्हणजे एखादा अपरिवर्तनीय धर्मग्रंथ नव्हे. स्वत: गांधीजींचीच मते अनेक बाबतींत बदलत गेली आणि या बदलांची त्यांनीही वेळोवेळी कबुली दिली आहे. गांधीजी हे प्रयोगशील नेते आणि विकसनशील विचारवंत होते. या त्यांच्या महत्त्वाच्या गुणामुळे गांधीजी बदलत्या परिस्थितीतही प्रसंगोचित राहतात. गांधीजींच्या या पुस्तिकेत काही मूलभूत मूल्यात्मक प्रतिपादन आहे; ते बदलण्याचा प्रश्नच नाही. तो गांधीविचारांचा पाया आहे. कोणत्याही विकासाचा व बदलाचा केंद्रबिंदू माणूस हाच असला पाहिजे; हिंसा ही कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय असूच शकत नाही आणि प्रेम हाच माणसा-माणसांना जोडणारा धागा आहे, त्यावरच समाजाची इमारत उभी राहिली पाहिजे, असे त्यांचे मूल्यात्मक प्रतिपादन आहे.

गांधीजींनी या पुस्तिकेत पाश्चिमात्य राजकीय संस्कृतीत अपरिहार्यपणे येणाऱ्या दोषांचे दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यंत्रांना त्यांनी (शोषणाचे साधन असल्यामुळे) ‘पाप’ म्हटले आहे. नंतरच्या काळात गांधीजींनी माणसांना बेकार न करणाऱ्या यंत्रांना आपली मान्यता दिली. राष्ट्रांनी सैन्य बाळगण्याची गरज नाही, असे प्रतिपादणाऱ्या गांधीजींनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी सैन्य पाठविण्याला मान्यता दिली. त्यांच्यात होणारी ही परिवर्तने लक्षात घेऊनच ‘हिंद स्वराज्य’चा विचार केला पाहिजे.

राज्यव्यवस्थेचे प्राथमिक एकक म्हणून खेडय़ांना मान्यता द्यावी आणि ही खेडी शक्यतो स्वयंपूर्ण असावीत, असे गांधीजींना वाटत होते. विकासाची जी संकल्पना नंतरच्या काळात मान्य झाली, त्यात आपल्या गरजा अत्यंत कमी ठेवणारे व त्या स्वत:च भागविणारे खेडे बसतच नव्हते. गांधीजींच्या कल्पनेतले खेडे आज अस्तित्वात नाही आणि परस्पर द्वेशाचे, कटूतेचे व शोषणाचे केंद्र असेच त्याचे स्वरूप झाले आहे, असे मत घटना समितीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. घटना समितीच्या रचनेची तयारी चालू होती, त्या वेळीच ‘हिंद स्वराज्य’मधील ‘राज्यव्यवस्था’ व ‘विकास’ यांबाबतच्या मताला आपला असलेला विरोध पं. जवाहरलाल नेहरूंनी गांधीजींना स्पष्ट कळवला होता. घटना समितीने पुढे ब्रिटिश पद्धतीची संसदीय लोकशाही स्वीकारली व नंतरच्या काळात आर्थिक विकासासाठी पायाभूत उद्योगांनाही मान्यता देण्यात आली, हे सर्वश्रुत आहे.

प्रा. बेन्नूर यांनी गांधींनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधामागे जागतिक साम्राज्यशाहीला असलेला त्यांचा विरोध आहे, असे सांगितले आहे. त्यांच्या पुस्तकात ठिकठिकाणी साम्यवादी पद्धतीने गांधीजींच्या विचारांची संगती लावण्याचा प्रयत्न आहे. प्रा. बेन्नूर लिहितात, ‘ब्रिटिश सत्तेच्या रूपाने भारतावर झालेले आक्रमण ही भांडवलशाहीप्रणीत साम्राज्यवादाची सुरुवात आहे, हे त्यांनी (गांधीजींनी) पूर्णपणे लक्षात घेतले नव्हते. म्हणून आधुनिक तंत्रवैज्ञानिक  सभ्यता आणि जागतिक साम्राज्यवाद यांच्यातील संबंध त्यांना स्पष्ट होऊ शकला नाही.’ गांधीजी हे स्वतंत्र विचारवंत होते. त्यांच्या विचारांवर ज्या मानवतावादी विचारवंतांच्या लेखनाचा प्रभाव पडला, त्यात साम्यवादी विचारवंतांचा समावेश नव्हता.

प्रा. बेन्नूर यांच्या पुस्तकातील महत्त्वाचा भाग म्हणजे गांधी विचारांचे मूळ त्यांच्यावरील कोणत्या संस्कारात असावे, याचा शोध त्यांनी घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘गांधीजींची धर्म, इतिहास, ब्रिटिशांची परकीय सत्ता यांबद्दलची मांडणी कौटुंबिक पर्यावरणातून विकसित झालेली आहे.’ आपल्या विधानाच्या समर्थनार्थ प्रा. बेन्नूर यांनी- गांधीजींचे वडील दिवाण असल्यामुळे विविध जातीजमातींशी येणारा संबंध, अरबस्तानातील व्यापाऱ्यांचे जाणे-येणे आणि त्यामुळे पोरबंदरमधील मोकळे व बहुरंगी वातावरण यांचा उल्लेख केला आहे. गांधीजींच्या आजोबांच्या तत्कालीन संस्थानिकांशी झालेल्या संघर्षांत मुस्लीम सैनिकांनी त्यांच्या घराचे रक्षण केले होते. प्रणामी पंथातून होणारा कुराण आणि गीतेचा वापर, सुफी संतांचा प्रभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम त्यांच्या धर्मविषयक जाणिवेवर झाला होता, असेही प्रा. बेन्नूर यांचे प्रतिपादन आहे. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करत असताना विविध पंथांच्या धर्मविषयक दृष्टिकोनांचा त्यांना परिचय झाला, याचाही उल्लेख प्रा. बेन्नूर यांनी केला आहे. ‘भारतात जे शिक्षण ब्रिटिश राज्यकर्ते देत होते, त्याच्या प्रभावातून गांधीजी मुक्त राहिले’ असे विधान करताना प्रा. बेन्नूर यांच्या मनात हीच पार्श्वभूमी असावी. ‘हिंद स्वराज्य’तील गांधीविचारांची प्रस्तुतता सांगताना गांधीविचारांचा शस्त्र म्हणून जागतिक-आर्थिक साम्राज्यवादाविरुद्ध वापर होऊ नये म्हणून त्यांना केवळ आध्यात्मिक चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे, असाही आरोप प्रा. बेन्नूर यांनी केला आहे. आपले म्हणणे मांडताना प्रा. बेन्नूर यांनी ठिकठिकाणी सद्य:कालीन राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आहे.

‘हिंद स्वराज्य’मधील गांधीजींचे विचार हे नंतर त्यांच्या विचारांत होत गेलेले बदल आणि वास्तवात असलेली परिस्थिती याचा विचार करूनच स्वीकारावे लागतात. यंत्रे असोत अगर वकिली आणि वैद्य यांसारखे सेवेचे व्यवसाय असोत, ती शोषणाची साधने न बनता लोकांच्या उपयोगाचीच साधने राहिली पाहिजेत असा गांधीजींचा आग्रह आहे. माणसाचे नैतिक उन्नयन करणे हाच धर्माचा उपयोग गांधीजींना अपेक्षित आहे. गांधीजींनी स्वायत्त व स्वयंपूर्ण खेडय़ाचे चित्र समोर ठेवले व आपली ‘स्वातंत्र्य’ कल्पना त्याच्याशी जोडली. परंतु वास्तव त्यापेक्षा निराळे होते. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या राज्यव्यवस्थेत ‘हिंद स्वराज्य’तील बऱ्याच कल्पना प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. प्रा. बेन्नूर यांनी त्याबद्दल फारसे काही लिहिलेले नाही. मात्र, निराळ्या दृष्टिकोनातून ‘हिंद स्वराज्य’कडे पाहण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला आहे.

‘हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ’

– प्रा. फकरूद्दीन बेन्नूर, लोकवाङ्मय गृह,

पृष्ठे – १६८, मूल्य – २५० रुपये