नंदा खरे

तरुणांना ‘शिका’ असे सांगणे हा सर्वच विचारवंतांचा आवडता छंद; आणि तोही पूर्वीपासून. आज तर माध्यम-समाजमाध्यमांच्या कृपेने सर्व राजकारणीही विचारवंतांमध्ये मोजले जाऊ  लागले आहेत. परंतु तरुणांना जास्त जास्त प्रमाणात शिकूनसवरूनही फार काही मिळत नाही. समाधान, मान वगैरे सोडाच; शिकण्यातून पोट भरणेही जमत नाही आहे. उलट तरुणांना त्यांची निवड कशी चुकली ते विचारवंत सांगू लागले आहेत. ‘‘तू सिव्हिलला (किंवा बायोलॉजीला) जायला नको होतंस. आज आयटी (किंवा व्यवस्थापन) हीच खरी लाइन आहे.’’ आता हा सल्ला मानून चालतो, की प्रत्येक तरुण हवे ते शिकू शकतो व तेही सारख्याच वेळेत आणि खर्चात. तर, हे ठार चुकीचे आहे.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

‘‘काही तरी कौशल्य कमवा रे! नुसतेच प्रमाणपत्र आणि पदव्या घेत बसू नका!’’ आता पदव्या आणि कौशल्यांचा ‘घटस्फोट’ काय विद्यार्थ्यांनी केला? ते पाप विचारवंत, समाजधुरीण आणि राजकारण्यांचे आहे. मग फिर्यादीला आरोपी का मानले जात आहे?

तर आज व्हिजन २०२० च्या उंबरठय़ावर फसवल्या गेलेल्या तरुणांची नाराजी आपण वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहत आहोत. हमीभाव-कर्जमाफी आणि आरक्षणाच्या मागण्या, अगदी नक्षलवाद, आतंकवाद आणि गोमांसाभोवतीची हिंसा; सारा आक्रोश एक जुनाच राग आळवतो आहे- ‘‘मला पोटभर खायला मिळेल, अंगभर ल्यायला मिळेल, तब्येतीने राहता येईल, कोणी उगीच डाफरणार नाही, अधूनमधून तरी मजा करता येईल, असे काही तरी करायला द्या. मेहनत आणि अक्कल कमी नाही आहे हो! अखेर आम्ही तुमचीच मुले आहोत!’’

आता यात नवे काहीच नाही. तुकडय़ा तुकडय़ाने असे काही तरी बोलले, लिहिले जात असतेच. आता तर ते ऐकणाऱ्या कानांना, पाहणाऱ्या डोळ्यांना जाणवेनासे व्हायला लागले आहे. उलट रात्री नऊची टीव्हीवरची कावकावच ‘विचारमंथन’ वाटू लागली आहे. शिक्षणाचा दर्जा हलकाच ठेवल्याने आपल्या बळीच्या बकऱ्यांची बोलती बंदच राहील याची खात्री असल्याने मालक लोक रेटून ‘आपले सत्य’ सांगताहेत.

ज्यांच्यापाशी लिहिण्याचे कौशल्य किंवा शब्दकळा नाही, त्यांच्यातर्फे लिहिणे हे लेखकाचे कर्तव्यच आहे, असे गेल्या पिढीतच आल्बेर कामू म्हणून गेला. त्याचे म्हणणे अशोक शहाणेंनी मराठीत आणले. त्यांचा सल्ला मानून लिहिणारे किरण गुरव हे कोल्हापूर जिल्ह्यातले लेखक.

महाराष्ट्रभरात तंत्रशिक्षण घेतलेले तरुण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादला जातात. सोबत प्रमाणपत्रे आणि पदव्यांच्या फाइली असतात. आशा-आकांक्षा आणि स्वप्ने असतात. ती स्वप्ने नुसत्या पदवी-पदविकाधारकांचीच नसतात. नातलग, सगेसोयरे, मित्र-स्नेही सारेच स्वप्ने पाहत असतात- आता आपला शशा पर्मनंट होईल. मग क्रमश: स्वप्ने उलगडत जातील. पण पर्मनंट नोकऱ्या गुलबकावलीच्या फुलांपेक्षा दुर्मीळ. मग तगून राहायला घ्याव्या लागतात चार-सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नोकऱ्या. बकाल लॉजमध्ये राहत, स्वस्तातल्या स्वस्त खानावळी शोधत, अधूनमधून सहकारी तत्त्वावर ओल्ड मंकचा धुल्ल्या करत जगावे लागते.

अशा तात्पुरत्या नोकऱ्या लावून देत पर्मनंटची स्वप्ने दाखवणारे लांडगे असतात. चापलुसी करून तात्पुरते ते पर्मनंट प्रवास करू पाहणारे असतात. चांगल्या कामगारांनाही कधी तरी कमी करावे लागेल म्हणून घाबरतच जीव लावणारे वरिष्ठ असतात. किरण गुरवांचे वैशिष्टय़ हे की, ते या सगळ्या अमानुष मानवी व्यवहाराचे चित्रण करताना ना कधी तुच्छतावादी होतात, ना त्यांचे माणसांवरचे प्रेम कधी कमी होते.

पुण्याजवळची बाजारपेठ असते अत्यंत विषम. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मेगा कंपन्या आणि ग्रामीण भागातून हातावर पोट घेऊन आलेले तांत्रिक कामगार यांच्यात कोण आपले म्हणणे खरे करणार? तर, कादंबरीचे मध्यवर्ती पात्र असलेला ‘शशा’ वेगळ्या वाटा शोधू लागतो. फसवला जातो. फसतच राहतो.

अखेर एक त्याच्या मूळ गावाजवळची नोकरीची शक्यता दिसते. एक नवा कारखाना उभा राहणार असतो. कारखान्याचा मालकही धडाडीचा स्थानिक राजकारणी. बरीच यंत्रे वेगवेगळ्या पायांवर उभारायची असतात. यंत्रांचे पुरवठादार, बांधकाम करणारे, यंत्रे उभारणारे, अनेक कंत्राटदार असतात. त्यांच्यावर देखरेख करून कामात सुसूत्रता आणायला इंजिनीअर हवा असतो. पुढे कारखाना चालवण्यातही इंजिनीअर लागणारच. पर्मनंट होण्याची शक्यता बरीच! तर शशा ही नोकरी धरतो. प्रथमच जबाबदारी दिलेली. प्रथमच काम करण्यातली आव्हाने आणि आनंद अनुभवता येत असलेला. बांधकामाची समांतर जबाबदारी एका ताज्या इंजिनीअर मुलीवर असते. ती बहुधा वशिल्याने लागलेली, अनुभवातही कच्ची, पण सुस्वभावी असते. तर त्याही ‘फ्रंट’वर चित्र आशादायी होऊ  लागते. पण मेगा कंपन्या जर अमानुष असतात तर लहान उद्योजकांतही बदमाशीचे प्रमाण मोठे असते. मालक ना पगार धड देत, ना कंत्राटदारांची देणी वेळेवर चुकवत. पूर्णतेच्या जवळ येऊन काम बंद पडते.

..आणि शशाला भांडवली उद्योगव्यवस्थेतली नवीच बाब कळते. मालकाला कारखाना पूर्ण करून चालवायची इच्छाच नसते! कारखान्याची परवानगी, त्याच्यासाठीच्या खाणकामाची परवानगी वगैरे नुसतेच घेऊन ठेवायचे असते. मोठे उद्योजक या गोष्टी विकत घ्यायला भरपूर पैसे देतीलच. मग कुणी सांगितली आहे कारखाना उभारायची आणि चालवायची झगझग करायला!

मला संस्कृत भाषा येत नाही, पण एक श्लोक मात्र लोकांकडून ऐकून ऐकून समजला आहे. अर्थ असा : ‘(बळी द्यायला) घोडा नको, हत्ती नको, वाघ तर नकोरे बाबा! बकरीच्या पोराचा बळी द्या, असा देवही दुबळ्यांचाच घात करतो!’ तर, किरण गुरवांनी अत्यंत समजुतीने, नजाकतीने, सच्चेपणाने ‘बकरीच्या पोरा’च्या नजरेतून आजच्या उद्योगविश्वाचे चित्र ‘जुगाड’ या कादंबरीत रेखले आहे.

एरवी मराठी लेखक पांढरपेशे तरी असतात, नाही तर शुद्ध ग्रामीण कास्तकार तरी. पण हळूहळू अर्धग्रामीण-अर्धनागरी तंत्रशिक्षित तरुण घडून वाढले आहेत. आज तर खऱ्या अर्थी महाराष्ट्राचे भवितव्य तेच घडवताहेत. त्यांचा आवाज इतर जास्त आवाजी वर्गापर्यंत पोचवणारे किरण गुरवांसारखे लेखक हवेच आहेत. त्यांची तरल निरीक्षणशक्ती आणि शब्दकळा तर थोरच म्हणायला हवी.

खोलवरची सहानुभूती, पण शैली मात्र अलिप्त. प्रत्यक्ष कामे करण्याने वर्णनांत, भाव नोंदण्यात आलेले नेमकेपण. कापडाच्या रुमालाएवढय़ा तुकडय़ातून पूर्ण समाजाच्या महावस्त्राची वीण सुचवण्याची धडाडी. अशी आशा करतो की, दोन (तरी) कथासंग्रहांनंतर (‘श्रीलिपी’, ‘राखीव सावल्यांचा खेळ’) कादंबरीकडे वळलेले गुरव नवनवे आनंददायी आणि महत्त्वाचे प्रयोग करतच राहतील.

‘जुगाड’- किरण गुरव,

दर्या प्रकाशन, कोल्हापूर,

पृष्ठे – २४७, मूल्य – २५० रुपये

nandakhare46@gmail.com