वर्जेश सोलंकी

जागतिकीकरण व त्याचे समाजमनावर झालेले परिणाम आणि त्यातून कवी-लेखकांच्या पुढय़ात आलेले जगण्याचे पेच म्हणजे आजचे साहित्य. त्यामुळे ऐंशीच्या दशकातील साहित्यिक फूटपट्टय़ा आजच्या साहित्याला लावणं योग्य होणार नाही. त्याचं फार तर ‘महानगरीय’ आणि ‘महानगरेतर’ संवेदनांचं साहित्य असं विभाजन करता येईल..

ravi jadhav shares post for chinmay mandlekar
“महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट, म्हणाले…
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
amravati, politics, sanjay khodke, navneet rana, ncp, bjp, lok sabha election 2024
अमरावतीत राजकीय वैरत्‍वाचा दुसरा अंक

‘आजची महानगरीय कविता’ म्हणजे आता आताची कविता काय? म्हणजे अगदी ह्य़ा ह्य़ा क्षणी असा याचा ढोबळ अर्थ घेऊन चालणार नाही. मान तिरकस करून, आळोखेपिळोखे देऊन ‘जा जरा पूर्वे’कडे म्हणत १९९० च्या तबकडीवर बोट ठेवावे लागेल. म्हणजे या १९९० सालालाही आज २८ वर्षे उलटून गेलेली आहेत. या काळात आलेलं जागतिकीकरण, लालकृष्ण अडवाणी यांची भारतभरची रथयात्रा, उद्ध्वस्त केली गेलेली बाबरी मशीद, बॉम्बस्फोट, व्हॅट करार, मंडल आयोग, आरक्षणाचा मुद्दा, माफियांचं जग, गुजरात दंगल, सांप्रदायिकता.. असं बरंच पाणी वाहून जाताना दिसलं. या काळात कोण कोण कवी लिहिते झाले, काय काय स्थित्यंतरे त्यांच्या कवितेत झाली, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

२००१ वा २००२ साली लोकवाङ्मय गृह प्रकाशनाने आठ कवितासंग्रह काढून एकदम धुरळा उडवून दिला होता. ही पुस्तकं छोटेखानी होती. कवीसुद्धा तसे अपरिचित होते. पण त्यातून नवं काही लिहिण्याचा, मांडण्याचा अट्टहास होता. जागतिकीकरण आणि त्याचे समाजमनावर झालेले परिणाम, कवीच्या पुढय़ातले पेच यांचा आरसा म्हणजेच हे कवितासंग्रह असं म्हणायला हरकत नाही. आल्हाद भावसार, नितीन कुलकर्णी, नितीन अरुण कुलकर्णी, नितीन रढे, रमेश इंगळे-उत्रादकर, रमेश इंगळे-चावरेकर, मंगेश नारायणराव काळे हे ते कवी. आणि संपादन होतं अभिजीत देशपांडे यांचं! हे सगळेच कवी भिन्न प्रवृत्तीचे, प्रयोगशील मांडणी करणारे. काही मुंबई-पुणे या महानगरांतले, तर काही बुलढाणा-शेगाव या शहराकडे वळणाऱ्या प्रदेशांतले. यातले नितीन कुलकर्णी- ज्यांच्या संग्रहाचं नाव होतं- ‘सगळं काही सैफनाए’- त्यांची कविता मला लक्षणीय वाटलेली. हे अंगावर येणारं महानगर त्यांच्या कवितेतून अस्वस्थ करत राहिलेलं.

अशातच श्रीधर तिळवेंसारखा कवीही लक्ष वेधून राहिलेला. अनवट विषय व आशय, रांगडी भाषा, रोखठोक विचारशैली ही त्यांच्या कवितेची वैशिष्टय़े! ‘चौथी नवता’ म्हणून त्यांनी एक संकल्पना मांडलेली. त्यांच्या या मांडणीमुळे किंवा ती नेमकी काय आहे, हे न समजल्यामुळे बरेच लोक काकुळतीला येताना दिसले. दुसरीकडे ही चौथी नवता कशाशी खातात, कवितेत तिचं प्रयोजन काय, आणि ती नसली म्हणून ती कविता नाही का, अशीही चर्चा होताना दिसलेली. अलीकडे नितीन वाघ यांनीही काळ व अवकाश अशी मांडणी करून धुरळा उडवला होता.

याच कालखंडात अशोक नायगावकर होते. ‘सरकारने जगण्याची नाही, तर हगण्याची तरी सोय केली..’ अशा ओळींतून त्यांनी या महानगराची चिरफाड केलेली. नामदेव ढसाळ यांनी जे अधोविश्वाबद्दल लिहिलं, त्या महानगराला नायगावकरांनी आपल्या तिरकस शैलीत मांडलं. १९६० च्या दशकात नारायण सुर्वे, सतीश काळसेकर, राजा ढाले, गुरुनाथ धुरी, मनोहर ओक यांची कविता महानगरीय जाणिवा आणि त्याचबरोबर चळवळींशी नाते जोडणारी होती. वसंत दत्तात्रेय गुर्जर यांनी ‘गोदी’ या संग्रहातील आपल्या कवितेतून महानगरातले छक्केपंजे, बजबजपुरी प्रकर्षांनं मांडली. मलिका अमरशेख यांची कविताही अशीच महानगरात वावरतानाची आपली घुसमट आणि एकांताचा पर्दाफाश करताना दिसते. वसंत आबाजी डहाके यांची कविता तर आमच्यासारख्या नवख्या कवींसाठी बेंचमार्कच होती. ‘बसमध्ये समुद्र माझ्या बाजूला येऊन बसला’ किंवा ‘दहशत प्लेटमध्ये आलेली’ अशा रोजच्या जगण्यातल्या असंख्य प्रतिमांतून त्यांनी आपलं संवेदन व्यक्त केलेलं. मात्र, या सगळ्या धबडग्यात अस्सल महानगरीय कवी म्हणून विवेक मोहन राजापुरे यांची नोंद करावी लागेल. त्यांच्या नावावाचून महानगरीय कवितेचा इतिहास पूर्ण होणार नाही.

‘आजची कविता’ म्हणजे मी गेल्या ३० वर्षांचा कालखंड घेतलेला आहे. या काळात अनेक कवींनी आपल्या मर्यादा व कुवतीनुसार मराठी कवितेचा विकास केली. या काळात हेमंत दिवटे यांचे ‘चौतिशीपर्यंतच्या कविता’ आणि ‘थांबताच येत नाही’ असे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. जागतिकीकरण हा प्रमुख मुद्दा त्यांच्या कवितेत दिसून येतो. त्यांच्या दुसऱ्या संग्रहातून महानगरीय जाणीव प्रकर्षांने येत राहते. ‘नेट डाऊन आहे, आपला पत्ता काय?/ कित्येक दिवस भेटलोच नाही, फोनही नाही/ टीव्ही बंद आहे, क्यूं की सांस भी कभी बहू थी’ अशा ओळींतून हा कवी कित्येक दिवस न भेटलेले आप्त, त्यांचे पत्ते शोधतोय. बाजूला कोण राहतंय हेही माहीत नसतं- अशी अगतिकता तो आपल्या कवितेतून मांडतो. त्यांच्या कवितेतून जगण्याचा कुंथलेला रेटा सतत दिसत राहतो.

‘पाऊस पब्लिक’ म्हणून गणेश वसईकरांची कविता आहे, तीही येथे तपासता येईल. हेमंत दिवटे हे शहराच्या मध्यभागी राहताहेत, तर गणेश वसईकर हे गाव व शहराच्या वेशीवर. ते म्हणतात- ‘मेणबत्त्या लावू नका/ मेणबत्त्या पाहिल्या की बॉम्बस्फोटाची आठवण येते’ म्हणजे महानगर अगदी ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. येथे कुठल्याही क्षणाला काहीही होऊ  शकतं. पावसाची काही खात्री नाही. ऋतू हरवलेले आहेत. माणसांचाही येथे काही ठिकाणा नाही.. आज आहे, तर उद्या नाही! पण वसईकरांची कविता आवाजी नाही, तर संवादी आहे.

अरुणचंद्र गवळी यांचेही नाव टाळता येणार नाही. महानगरातील तृतीयपंथीयांचं जग त्यांनी कवितेतून ताकदीने उभं केलं आहे. ढसाळ, मनोहर ओक ज्या रीतीने कवितेतून फसफसतात, तसाच उद्वेग गवळींच्या कवितेतूनही व्यक्त होतो.

त्यांच्या पहिल्या संग्रहातून दुसऱ्या संग्रहातले संक्रमण सजग आहे. त्यात एक चीड आहे.

‘पाऊस पब्लिक’ म्हणून गणेश वसईकरांची कविता आहे, तीही येथे तपासता येईल. हेमंत दिवटे हे शहराच्या मध्यभागी राहताहेत, तर गणेश वसईकर हे गाव व शहराच्या वेशीवर. तसं पाऊस पडण्याचं या शहरात काहीच कारण नाही. ते म्हणतात- ‘मेणबत्त्या लावू नका/ मेणबत्त्या पाहिल्या की बॉम्बस्फोटाची आठवण येते. महानगर अगदी ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. येथे कुठल्याही क्षणाला काहीही होऊ  शकतं. पावसाची काही खात्री नाही. ऋतू हरवलेले आहेत. माणसांचाही येथे काही ठिकाणा नाही.. आज आहे, तर उद्या नाही!’ वसईकरांची कविता आवाजी नाही, तर संवादी आहे. ती कधी दीर्घही होते. ‘‘पप्पा मला का ठेवतात पाळणाघरात?’ हा आजच्या प्रत्येक बापाला मुलीने विचारलेला सवाल आहे..’ असे लिहून ते भल्याभल्यांना आव्हान देतात.

अरुणचंद्र गवळी यांचेही नाव टाळता येणार नाही. महानगरातील तृतीयपंथीयांचं जग त्यांनी कवितेतून ताकदीने उभं केलं आहे. ढसाळ, मनोहर ओक ज्या रीतीने कवितेतून फसफसतात, तसाच उद्वेग गवळी यांच्या कवितेतूनही व्यक्त होत राहतो. ‘ऑल दॅट आय वाना डू’ ही संजीव खांडेकर यांची दीर्घपल्ल्याची कविता. ते जातिवंत चित्रकार आहेत. त्यामुळे अनेक चित्रप्रतिमा त्यांच्या कवितेत येत राहतात. त्यांची भाषा बिनधास्त आहे. अगदी ढसाळांशी नातं सांगणारी! अशी भाषा वापरताना ते कचरत नाहीत. हा काळच असा विलक्षण व अनवट आहे, की यातून सुटकाच नाही.

आजची ही महानगरीय कविता काही प्रमाणात गाव व शहर यांच्यामध्येसुद्धा सापडलेली दिसते. झपाटय़ानं होणारं शहरीकरण, नातेसंबंधांतील यांत्रिकता याचंही प्रतिबिंब त्यात पडलेलं आहे. प्रणव सखदेवसारखा कवी आपल्या कवितेतून वेगवेगळी आशयसूत्रे शोधत असतो. संत- तंत-पंत काव्य किंवा केशवसूत- मर्ढेकर- कोलटकर यांच्या कवितेला चकमा देणारी! ‘तुझं कस नं बाई/ जोवर तुझ्यात पडत नाही/ शूचा पहिला थेंब/ तोवर तू व्हर्जिनकोरी’ अशा कविता लिहून प्रणव जणू ‘सारस्वतांनो, होशियारऽऽ’ म्हणतो!

महानगर म्हटलं म्हणजे उंचच उंच इमारती, त्या इमारतींना टक्कर देणाऱ्या लांबलचक झोपडपट्टय़ा, रस्त्यांचं २४ तास चालू असलेलं खोदकाम, रहदारी, गल्लीबोळ, मॉल्स, फेरीवाले, पदपथावरील वस्तुविक्रेते, नाइट क्लब,डान्सबार.. हे सारं सारं डोळ्यांसमोर येतं. कमी-अधिक हाच धागा पकडून रमेश रावळकर हा कवी ‘बार संस्कृती’ या कोणी फारशा न हाताळलेल्या आणि शहराचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या विषयावर म्हणतो- ‘हॉटेलमधी काम करतो म्हटल्यावर/ बदलून जातो लोकांचा नजरिया/ जणू काही मी माणसात वावरण्यालायक नाही/ ही अघोषित शिक्षा मारली जाते माझ्या कपाळावर/ तरीही मी लपवत नाही माझा चेहरा/ मांड ठोकून जातो टेबलवर ऑर्डर द्या, हे सांगायला..’

धम्मपाल रत्नाकर यांनीही ‘हॉटेल माझा देश’ या संग्रहातून अशीच आपली अभिव्यक्ती मांडलेली दिसून येते. ‘निद्रानाशाची रोजनिशी’ हा अलीकडेच प्रसिद्ध झालेला कवी महेश लोंढे यांचा संग्रह. लोंढे हेही हॉटेल संस्कृतीवर बोलताना दिसतात. ते लिहितात- ‘हॉटेलात भीतीचा मेनू/ मॉलमध्ये पॅकेज्ड भीती/ भीतीवर भीती फ्री/ चकाचक चटपटीत चिक्कार भीती..’ भीतीची अशी अनेक रूपं हा कवी मांडताना दिसतो. टेबलावर भीतीचा मेनू आलेला आहे म्हणजे भीती अगदी घरात पोचलेली आहे. ती विविध वेष्टनांत गुंडाळून ठेवलेली आहे. एकावर एक फ्री आहे. तुम्हाला हाडूक टाकण्यात आलेलं आहे. जाळं पसरवलेलं आहे. उरली आहे शेवटात तुमची तडफड. शहरात आल्यावर टॉयलेटमध्ये पाणी फ्लश करायलाही हा कवी भितो. या महानगरीय रोगट पर्यावरणानं त्याला ग्रासलेलं आहे.

आजचा कवी महानगरात जरी नोकरीच्या निमित्तानं आलेला असला तरी त्याची पाळंमुळं ही गावातच पसरलेली दिसतात. आपण जेथे राहतो ते गाव आहे की शहर, अशा विमनस्कतेत तो आहे. गाव अजून पुरतं शहर झालेलं नाही. मात्र, त्याचं आगमन गावाकडे तीव्रपणे होताना दिसत आहे. कौलारू घर, विहिरीवरचा रहाट, चिंचेच्या झाडावरली बगळ्यांची शाळा, हिरवीगार शेतं, केळीच्या सुशेगात बागा, माणसांचे पेहराव, त्यांची नावं, लग्नसराईतले रीतिरिवाज यांचा धांडोळा कवी फेलिक्स डिसोझा आपल्या कवितेतून घेताना दिसतात. अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘नोंदीनांदी’ या संग्रहात या गावगाडय़ाच्या नोंदी. इथला गाव, तिथल्या प्रकाशानं दिपून गेलेलं तिथलं शहर, इथल्या घामानं चकाकणारं असं भयाण वास्तव फेलिक्स आपल्या कवितेतून व्यक्त करताना दिसतात.

अशाच प्रतलावरले कवी इग्नेशियस डायस म्हणतात- ‘मुंबईच्या बोर्डावर/ थुंकलो पचाक्कन/ आणि करून घेतले मुंबयदर्शन..’ कवीचा तिळपापड झालेला आहे. राग अनावर झालेला आहे. थुंकून त्याने शहराचा निषेध नोंदवला आहे. असं करताना तो म्हणतो- ‘लोकलमध्ये/ चिकटलेला समोरच्याला..’ मुंबई महानगरातली लोकल ट्रेन ही या शहराचा अविभाज्य भाग आहे. बाहेरच्या प्रदेशातून येथे दिवसाला लाखोंनी माणसं ये-जा करत असतात. शहरातल्या गर्दीचं शास्त्र गावाकडच्या माणसाला सहजासहजी समजत नाही. या शहराची, इथल्या वातावरणाची लस त्याला पहिल्यांदा टोचून घ्यावी लागते. अशीच री कवी पी. विठ्ठल ओढताना दिसतात. ‘कचराकुंडीत सकाळी अर्भक मिळते..’ इतक्याच ओळीतून ते आजचं समाजवास्तव आपल्या पुढय़ात आणून ठेवतात. आज वैद्यकशास्त्र प्रगत झालेलं आहे. रोज नवनवीन नुक्से येताहेत. ज्या कुंडीत कचरा असला पाहिजे, तीत एखादा मानवी जीव वळवळताना दिसतो. महानगरातली ही एक रोजमर्राची गोष्ट आहे.

येथे हेही समजून येतं, की कवी हा आधी वाचक आहे. त्यांनी पूर्वसुरींना पचवलेलं आहे. थांबा घेतलेला आहे. कवी महेश लीला पंडित म्हणतात- ‘तृतीय श्रेणी/ लोअर मिडल क्लास/ पगारावरलं जीवन..’ ही शहरातल्या मध्यमवर्गाची लोककथा आहे. असं लिहिताना त्यांची भाषा प्रयोगशील होते. वाचकांना संभ्रमित करते. अशाच पठडीतून मन्या जोशीही अभिव्यक्त होतो. ‘मिस्टर लिमये, आप कहॉं हो?’ अशी रेल्वे अनाऊन्समेंट दिवसभर ऐकिवात येत असते. तो चिन्हसृष्टीचा वापर आपल्या कवितेतून करतो. खूप काही तत्त्वज्ञानाची फेकाफेक करत नाही. एक कोलाज तयार करतो.

आजची महानगरीय कविता ही इतकीच आहे का? इतकेच कवी आहेत का? या प्रश्नांना उत्तर ‘नाही’ असेच असेल. गणेश विसपुते, अविनाश गायकवाड, स्वप्नील शेळके, बाळासाहेब लबडे, यांनीही महानगराचा धांडोळा घेतलेला आहे. हा मला समजलेला लेखाजोखा आहे. अंतिम असे काही नाही. पण यानिमित्ताने सुशेगात चर्चा होऊ  शकते. विचारवंत व समीक्षक यात अधिक भर घालू शकतात. तूर्त इतकेच!

varjesh12ka4@gmail.com