News Flash

जगण्याचा पन्नाशीपार पाला‘पाचोळा’! 

वयाची ऐंशी वर्ष पार केलेल्या बोराडेंचा फेसबुकसारख्या आधुनिक समाजमाध्यमावर वाचकांशी नियमित संवाद सुरू असतो.

रा. रं. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीची ‘गोष्ट’ गेल्या पन्नास वर्षांत कालबा झालेली नाही; तर तिच्या कक्षा उलट रुंदावल्या आहेत. करोनाकाळाने हे वास्तव अधिकच ठळक केले आहे.. ‘पाचोळा’च्या पन्नाशीनिमित्ताने..

दासू वैद्य dasoovaidya@gmail.com

‘प्रत्येक पिढी आपल्या आधीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांपैकी नव्याण्णव टक्के पुस्तकांना विस्मृतीत टाकून एक टक्का पुस्तकांनाच पुढच्या पिढीपर्यंत पोचवते,’ असा एक निष्कर्ष भालचंद्र नेमाडे यांनी एका लेखात अधोरेखित केला आहे. आपल्या ग्रंथव्यवहारात असंख्य पुस्तकं प्रकाशित होतात आणि अल्पावधीतच विस्मरणात जातात. गाजलेल्या आणि गाजवलेल्या पुस्तकांपेक्षा वाचकांच्या मनात घर करून राहिलेली पुस्तकंच दीर्घायुषी ठरतात. चोखंदळ वाचकांची पसंती लाभलेल्या आणि समीक्षकांनी गौरविलेल्या पुस्तकांत ‘पाचोळा’ या रा. रं. बोराडे यांच्या कादंबरीचा समावेश होतो. मराठी साहित्यात नवकथेचा बोलबाला सुरू असताना त्याच तोडीचं कथालेखन करणाऱ्या मराठवाडय़ातील बी. रघुनाथांची दखल घेण्याचीही तसदी कुणाला घ्यावीशी वाटली नव्हती. त्याच मराठवाडय़ातील ताज्या दमाच्या नव्या लेखकाची पहिलीच कादंबरी ‘पाचोळा’ ही १९७१ साली मौज प्रकाशनासारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली, हे उल्लेखनीय आहे. ‘पाचोळा’ कादंबरीच्या सुवर्णमहोत्सवी प्रवासात हा आरंभबिंदूही महत्त्वाचा ठरतो. पुस्तक कुठल्या प्रकाशनातर्फे प्रकाशित होतं याला मराठीत आजही असणारं महत्त्व बऱ्याचदा नाकारता येत नाही.

रा. रं. बोराडे हे मराठी साहित्यातील महत्त्वाचं नाव आहे. कथा, कादंबरी- लेखनाबरोबरच ग्रामीण रंगभूमीसाठी नाटय़लेखन करून बोराडे यांनी स्वत:ची ठळक नाममुद्रा उमटवली. ग्रामीण साहित्य चळवळीतही आनंद यादवांबरोबर त्यांचा सक्रिय सहभाग होता. आजही नव्या लेखकांचं साहित्य वाचून त्यांना प्रोत्साहन देण्याचं त्यांचं काम सुरूच आहे. वयाची ऐंशी वर्ष पार केलेल्या बोराडेंचा फेसबुकसारख्या आधुनिक समाजमाध्यमावर वाचकांशी नियमित संवाद सुरू असतो.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. गांधींनी त्याच काळात ‘खेडय़ाकडे चला’ असा संदेश दिला. स्वयंपूर्ण गाव त्यांना अपेक्षित होता. जानपद साहित्य, प्रादेशिक  साहित्य अशा नावाने आरंभी ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण साहित्याची सुरुवात याच काळात- म्हणजे १९२० पासून झाली. आज ग्रामीण साहित्याची शंभरी पूर्ण झालेली असताना ‘पाचोळा’ची पन्नाशी साजरी होत आहे. मराठी ग्रामीण कादंबरीचा विचार करताना ‘फकिरा’, ‘धग’, ‘इंधन’, ‘टारफुला’, ‘बनगरवाडी’, ‘माणूस’, ‘गोतावळा’, ‘पाचोळा’ अशी ठळक परंपरा समोर येते. ‘पाचोळा’च्या निमित्ताने मराठवाडय़ातील लातूरजवळच्या खेडय़ातील एक गोष्ट मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आली.. चर्चिली गेली. आज जिल्ह्याचं ठिकाण असलेलं लातूर जेव्हा तालुकावजा गाव होतं तेव्हाचं वातावरण या कादंबरीत आहे. गतीनं पुढं सरकलेल्या आजच्या काळात जुन्या साहित्यातील विनोद फारसे फलद्रुप होत नाहीत. बाला-जरठ विवाह समस्येचं गांभीर्य लक्षात येतं, पण नाटकातील संघर्ष आज मनाला भिडत नाही. याला कारण प्रचंड गतीनं पुढं सरकलेला काळ हे आहे. पण पन्नास वर्षांनंतर आज ‘पाचोळा’ आपण वाचतो तेव्हा त्या कथानकातील ताण जाणवतो. अर्थात त्यातले तपशील, वातावरण बदललं आहेच. तरीही कादंबरीतला संघर्ष वाचकाला जखडून ठेवतो. याचं श्रेय आशय-विषयाला तर आहेच, तद्वत गोष्टीवेल्हाळ अभिव्यक्तीलाही आहे. प्रवाही कथानक हे या ९४ पानी छोटेखानी कादंबरीचे सामर्थ्य आहे. घटनांमागून घडणाऱ्या घटना कथानकाला प्रवाही ठेवतात. पाणवठय़ावर किंवा शेतात निंदणी करताना दुपारची भाकरी खायच्या वेळेला खासगीत गप्पागोष्टी व्हाव्यात तेवढय़ा सहज ही गोष्ट उलगडत जाते. ही गंगाराम शिंप्याच्या कुटुंबाची दु:खवेल्हाळ गोष्ट आहे. गंगारामची बायको पारबती या कादंबरीची प्रथमपुरुषी निवेदिका आहे. नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कव्हरी चॅनलवर साहसी सूत्रधार न डगमगता अवघड साहसाला सामोरा जात असतानाच त्या प्रसंगाचं जिवंत निवेदन आपल्यासाठी करत असतो. तद्वत पारबती एक पात्र म्हणून कुटुंबातल्या ताणतणावांतून मार्ग काढत असतानाच आपल्याला गोष्ट सांगत असते. या गोष्ट सांगण्यात आविर्भाव नाही, तर जबाबदार ग्रामीण बाईचा स्वभाव आहे. पारबती गोष्ट सांगायला लागते.

कादंबरीचं पहिलंच वाक्य ‘बरं चाल्ल व्हतं’ हे भूतकाळाबद्दल ख्यालीखुशाली सांगतं, पण भविष्यातील अरिष्टाचं सूचनही करतं. कादंबरीतली गोष्ट तशी साधी-सरळ आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या लातूरजवळील एक छोटंसं गाव. गावात कुठंही ‘खुट्ट’ वाजलं तरी गावभर ऐकू जावं, एवढे लोक एकमेकांशी जोडलेले. शेतीवर चालणारा गावगाडा. शेतीशी बांधलेले आलुतेदार-बलुतेदार, गावकामगार, कारागीर गावाला पुढं ढकलणारे. त्यात गावातला एकुलता एक गंगाराम शिंपी कादंबरीचा नायक. गंगारामचं चौकोनी कुटुंब. पारबती नावाची घराच्या चिंता वाहणारी जबाबदार बायको (जी आपल्याला गोष्टही सांगतेय.), सातवीत शिकणारं पोरगं- भाना आणि कायम भुकेली असलेली तीन वर्षांची तानी. या कुटुंबाची गोष्ट पुढं जाताना प्रसंगानुरूप काही पात्रं येतात; पण तेवढय़ापुरतीच. कुटुंबातील चार व्यक्तिरेखांशिवाय इतर व्यक्तिरेखा ठळक होत नाहीत. नाही म्हणायला कथानकातील अदृश्य खलनायक गरड पुन: पुन्हा डोकावत राहतो. पण प्रत्यक्ष नाही, तर संदर्भातूनच. बरं चाल्लेलं विस्कटून जातं, त्याला एक क्षुल्लक घटना कारणीभूत ठरते. गरडाचं पोरगं फाटलेलं जुनं धोतर शिवण्यासाठी गंगाराम शिंप्याच्या अंगावर आणून टाकतं. या धोतर फेकण्यातही सरंजामी वृत्तीचा एक अदृश्य माज आहे. (हा माज ‘ख्वाडा’ या मराठी चित्रपटात फार प्रभावीपणे आला आहे.) हे जुनं धोतर शिवून द्यायला नकार देण्यामागे गंगारामचा या माजाला सुप्त विरोध तर आहेच; पण त्यापेक्षा गावातले लोक नवे कपडे लातूरच्या फॅशनबाज शिंप्याकडे टाकतात आणि जुने कपडे शिवायला आपल्याकडे आणतात याचा गंगारामला अधिक संताप आहे. गंगाराम शिंप्यानं गरडाचं जुनं धोतर शिवायला नकार दिला, इथं संघर्षांची ठिणगी पडते. प्रत्यक्ष काही न बोलता कृतीतून बदला घेणं हा गरडाचा स्वभाव आहे. गंगारामच्या बोकांडीवर लातूरवरून नवा फॅशनबाज शिंपी आणून बसवायची खेळी गरड करतो. आधीच जुनाट ठरत चाललेल्या गंगाराम शिंप्याकडं राबता कमी झालेला होता. चढीवर आणलेल्या नव्या शिंप्यामुळं तर गंगारामची मशीनच थांबायची वेळ आली. आपलं शिवणकाम सचोटीनं करणारा गंगाराम त्यामुळे दुखावला गेला. त्याचा स्वाभिमान जागा झाला. गरडाच्या नवा शिंपी आणण्याच्या खेळीला शह देण्यासाठी गंगाराम तेरा वर्षांच्या भानाला डावावर लावतो. त्याला नवं शिवणकाम शिकण्यासाठी लातूरला पाठवायचं ठरवतो. भानाला मात्र शाळेची आवड असते. अभ्यासात भानाची प्रगतीही आहे. पण गंगारामच्या हट्टापायी तेरा वर्षांच्या भानाला शाळा सोडून लातूरला जावं लागतं. नाराजीनं गेलेला भाना शिंप्याशी भांडण करून गावी पळून येतो. पुन्हा बळेच लातूरला पाठवल्यावर बार्शीला पळून जातो. भानाला शिवणकाम शिकवण्याची योजना धुळीला मिळाल्यावर गंगाराम आणि भानाच्या नात्यातील तणाव अधिकच स्फोटक होतो. शिक्षण सुटलेला भाना गावभर फिरत राहतो. वडिलांना टाळत राहतो. गंगाराम आणि भाना ही वायरची दोन टोकं एकत्र आली की ठिणग्या उडणार, वातावरण तापणार हे पारबतीनं हेरलं होतं. त्या दोघांत समेट घडवण्याचा पारबती अयशस्वी प्रयत्नही करते. नव्या शिंप्याचा बोलबाला गावात वाढतोय याचा धुमसणारा राग डोक्यात घेऊन गंगाराम स्वत: शिवणकाम शिकायला लातूरला जातो. तिथंही हेकटपणामुळं गंगाराम भांडणं करतो. पोलीस केस होते. हे कळल्यावर दोन लेकरांना घेऊन पारबती लातूर गाठते. गंगारामला परत घेऊन येते. पारबती लातूरला गेल्यावर बंद घरातून गंगारामची शिलाई मशीनच गरड गायब करतो. (चोरीला जाते.) तरीही गंगाराम पुन्हा एकदा जिद्दीनं शिवणकाम करायला लातूरला जातो. यावेळी मात्र आजारी पडल्यामुळं गंगारामला परत फिरावं लागतं. अंगातलं त्राण गेलेल्या गंगारामला क्षयरोगानं गाठलेलं आहे. या कुटुंबावर असे आघातावर आघात होत जातात. मानसिक, आर्थिक खच्चीकरण वाढत राहतं. यात न डगमगता पारबती उभी असते. आर्थिक हातभारासाठी ती शेतावर मजुरीला जाते. चुलीसमोर खपते. गरडावरच्या रागातून बिथरलेल्या गंगारामचं तऱ्हेवाईक वागणं निमूट सहन करते. भानाचं शिक्षण थांबलं याचं शल्य पारबतीच्या जिव्हारी लागलेलं आहे. गावगाडय़ात बलाढय़ असणाऱ्या धूर्त गरडाशी दुश्मनी घेतल्यामुळं सर्वार्थानं कमजोर असणारा गंगाराम नुस्ताच आतून धुमसतो आहे. तो गरडाचा राग कुटुंबीयांवर काढतो. आजारपणामुळं आपण कुचकामी झालो आहोत याचं शल्य गंगाराममध्ये उफाळून येतं. तीन वर्षांची पोरगी तानी रडतेय म्हणून तिला मारहाण करतो. त्या लेकराला खोलीत कोंडतो. चहा वेळेवर मिळाला नाही म्हणून पेटत्या चुलीत पाणी ओततो. चुलीत पाय ठेवून झोपतो. स्वत:बरोबर घरादाराला दिवसभर उपाशी ठेवतो. गरडाच्या धूर्त खेळीमुळे असहाय झालेला गंगाराम क्षयरोगामुळे अधिकच गलितगात्र होतो. कमावते नसल्यामुळे विक्षिप्त वागतो. अशा वातावरणात पारबतीला उलटय़ा सुरू होतात. ती गरोदर राहते. दुष्काळात तेरावा महिना यावा तसं हे पारबतीचं गरोदर राहणं कळत्या वयाच्या भानाला खटकतं. मुलाहिजा न ठेवता भाना ते बोलून दाखवतो. पोरासमोर अवघडलेली पारबती संकोचून अर्धमेली होते. पोराच्या बोलण्यामुळं दुखावला गेलेला गंगाराम संतापतो. हे तापलेलं वातावरण थंड करण्याचा पारबती प्रयत्न करीत राहते. प्रत्येक वेळी स्वत:कडे कमीपणा घेते. त्यातच कोळ्याची तरणी पोरगी उगाच टोमणे मारते म्हणून भाना तिला उत्तर देतो. त्यातून नवं संकट ओढवतं. कोळी पोरीला सोबत घेऊन सरळ गंगारामच्या घरात येतो. पोरीला सून करून घ्या म्हणून राग व्यक्त करतो. या घटनेमुळं गंगारामचा साठलेला संताप बिथरतो. गंगाराम भानाला मारत सुटतो. भानाच्या तोंडातून रक्त येईपर्यंत त्याला मारतो. अंधारात स्वत: ओसरीवर येऊन पडतो. भेदरलेली पारबती रक्तबंबाळ भानाला सावरते. पांघरूण घेऊन झोपलेल्या गंगारामला पाहून स्वत:ही झोपते. सकाळी चहा करून द्यायचा म्हणून गंगारामला लगबगीने उठवते. गंगाराम उठत नाही म्हणून पांघरूण उघडून पाहते तर गंगारामच्या मानेखालून वाहिलेलं रक्त वाळलेलं असतं. गंगाराम त्याच्या हेकटपणासह शांत झालेला असतो. ‘भाना, तुझा बाप गेला की रं..’ असं म्हणत पारबती हंबरडा फोडते तेव्हा तानी हातातली जर्मनची वाटी आपटत ‘द्दे..द्दे’ म्हणत असते.

‘द्दे..द्दे’ म्हणत जर्मनची वाटी आपटणारी तीन वर्षांची तानी ही या कादंबरीतली अफलातून व्यक्तिरेखा आहे. तानीला वयामुळं कुटुंबात घडणाऱ्या घटनांची समज नाही. बोलून व्यक्त होता येत नाही. आईला चिकटून असणारी, मार खाल्ल्यावर  भोकाड पसरणारी तानी कायम ‘द्दे..द्दे’ म्हणत जर्मनची वाटी आपटत राहते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तानीचं वाटी आपटत ‘द्दे..द्दे’ म्हणणं शहारे आणणारं आहे. खेळत्या वयानुसार तानीला सारखी भूक लागणं स्वाभाविक आहे. वाटी आपटत ‘द्दे..द्दे’ म्हणणाऱ्या तानीची तुलना महेश एलकुंचवारांच्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकामधील ‘व्यंकटेशा, किती वाजले रे बापा?’ हे एकच वाक्य नेहमी उच्चारणाऱ्या मरणासन्न म्हातारीशी करण्याचा मोह मला होतोय. नाटकात मधे मधे ‘किती वाजले रे बापा?’ विचारणारी जख्ख म्हातारी काहींना काळाचं प्रतीक वाटली. त्या धर्तीवर ‘पाचोळा’मधील ‘द्दे..द्दे’ म्हणत वाटी वाजवणारी तानी महाकाय भुकेचं प्रतीक ठरू शकते.

ही कादंबरी वाचताना गंगाराम शिंप्याच्या जागी अनेक गावकारागीर आपल्या डोळ्यासमोर येतात. गावातील कुठल्याही गावकारागीराची ही दर्दभरी कहाणी असू शकते. गंगाराम शिंप्याची गोष्ट वाचत असताना माझ्या डोळ्यासमोर आमच्या गावातील कोंडबा न्हावी येत होता. धोपटी घेतलेला कोंडबा न्हावी गावात घरोघर जाऊन हजामती करायचा. जेवणाचे आवतन गावभर द्यायचा. धान्याबरोबर पैसेही मिळायचे. हे असं बरं चाल्लेलं होतं. अचानक गावातल्या गुजरीत (चौकीत) चकचकीत सलून उघडलं. सिंहासनासारख्या गुबगुबीत खुर्च्या, संपूर्ण माणूस दिसेल एवढे मोठे आरसे, बाटलीतल्या पाण्याचे तुषार फुसफुस करीत केसावर उडवले जायचे. लावताना उडालेली पावडर दुकान सुगंधी करायची. वाचायला पेपर. पाहायला ‘मायापुरी’चा रंगीत फिल्मी अंक. रेडिओवर ऐकायला गाणी. या नव्या दुकानामुळं कोंडबा न्हावी कुचकामी ठरू लागला. त्याच्या धोपटीला जास्तच विश्रांती मिळू लागली. ही कादंबरी वाचताना असे कुचकामी ठरणारे गावकारागीर आठवत राहतात. या कादंबरीत शेवटी परिशिष्टात कादंबरीची जन्मकथा दिलेली आहे. हे रा. रं. बोराडे यांचं प्रांजळ कथन आहे. त्यात त्यांनी पहिला खर्डा लिहिला तेव्हा कादंबरीचा नायक शिंपी नसून सोनार होता असं नमूद केलंय. हा सोनार शिंपी कसा झाला त्याची कारणं मुळात वाचण्यासारखी आहेत. थोडक्यात काय, तर प्रत्येक गावकारागीराची थोडय़ाफार फरकानं नव्या व्यवस्थेत अडचणच झालेली आहे.

‘पाचोळा’नंतरची पन्नास वर्षे पाहता पुलाखालून नुस्तं पाणीच वाहून गेलं नाही, तर काही पूलही वाहून गेले आहेत. जगणं आमूलाग्र बदललं. ज्यांनी नवं तंत्रज्ञान स्वीकारलं ते टिकले. बाकी कुचकामी ठरले. ‘पाचोळा’च्या शेवटी गंगाराम संपला. आता उरलाय १३ वर्षांचा भाना. भानाला केंद्रस्थानी ठेवून ‘पाचोळा’ची गोष्ट पुढं न्यायचं ठरवलं तर भानालाही नव्या संकटांना सामोरं जावंच लागेल. मुळात भाना पारंपरिक शिंप्याचा व्यवसाय स्वीकारेलच असं नाही. पण कुठलाही व्यवसाय भानाने स्वीकारला तरी पुन्हा एकदा नवा गरड (संकट) नव्या रूपात आडवा येईलच. शिंप्याचाच व्यवसाय घेतला तर रेडिमेड (आयत्या) कपडय़ांची चलती असल्यामुळं अनेक शिंप्यांचा व्यवसाय आज बसलाय. या रेडिमेड कपडय़ांच्या व्यवसायात अनेक बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. शर्टच्या शिलाईच्या पैशात रेडिमेड शर्ट बाजारात मिळतो. अशावेळी हा बदल शांतपणे समजून घेऊन स्वीकारणेच शहाणपणाचे ठरते. नाहीतर जगण्याचा पालापाचोळा व्हायला वेळ लागत नाही.

कथा-कादंबऱ्यांत वाचलेली खेडी आज बदलून गेली आहेत. गावागावांत राजकारण घुसलं आहे. राजकारणामुळं गावाची विभागणी झाली. गट-तट मजबूत झाले. दुश्मन्या वाढल्या. जाती-धर्माच्या अस्मिता तीव्र झाल्या. अनेक ‘गरड’ (राजकारणी) पांढरेशुभ्र स्टार्च केलेले कपडे घालून स्वयंघोषित नेते झाले. गाडय़ांतून फिरू लागले. चौकाचौकातल्या फ्लेक्सवर झळकू लागले. चहा प्यायला चांगलं हॉटेल नव्हतं त्या गावात बीयर बारचा सुळसुळाट झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सवयीच्या झाल्या. घरोघर टीव्हीचे शेकडो चॅनल्स चमकू लागले. जीवन बदलून गेलं. घरी बनवलेल्या शेवया खाण्यापेक्षा झोमॅटो परवडू लागला. खेडवळ गावांत शाळेतल्या स्नेहसंमेलनात हनी सिंगची गाणी वाजू लागली. दुनिया मुठीत घेण्यासाठी दररोज मिळालेला दीड जीबी डाटा संपवणं हे तरुणाईचं इतिकर्तव्य झालं. विनाअनुदानाच्या शिक्षणात सैरभैर तरुणाई विमनस्क फिरू लागली. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी सर्वसामान्य माणसांचे हाल थांबणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालं. गावांना बाळसं नाही आलं.. सूज आली. लोकांचं राहणीमान सुधारलं, पण जगणं आहे तिथंच आहे. नव्या तंत्रज्ञानाशी, नव्या वातावरणाशी जुळवून घेता न आलेल्यांची आजही फरफट सुरूच आहे. जगणं अधिक अध:पतित होताना माणसं कोरडी होत चाललीयत.

त्यामुळे ‘पाचोळा’ची गोष्ट पन्नास वर्षांत कालबा झाली नाही, तर तिच्या कक्षा रुंदावल्या आहेत. आता करोनाच्या निमित्तानं मानवी जगण्यातील क्षुद्रता अधोरेखित झाली. व्यवसायाचं गणित बदलून गेलं. महानगरांबद्दलचे भ्रम दूर झाले. कामगारांना पुन्हा एकदा गाव गाठावं लागलं. काही जण प्राणवायूसाठी तडफडून मेले. काही जण दवाखान्याचं अवाजवी बिल भरून मेले. या महामारीत गंगारामच्या शिलाई मशीनसारखे व्यवसाय/ नोकऱ्या चोरीला गेल्या. घरोघर स्वत:चं दुखणं बाजूला ठेवून ‘पारबती’ चूल पेटवतेच आहे. आजही ‘गंगाराम’ची घुसमट सुरूच आहे. त्याच्या हाताला काम नाही. सत्तेच्या खुर्चीतले (‘गरड’) अधिक धूर्त नि निलाजरे झाले आहेत. ‘भाना’ दीड जीबी डाटावर दिवस काढतोय. भुकेमुळं पोटात खड्डा पडलेली सर्वसामान्य माणसं वाटी आपटत ‘द्दे..द्दे’ म्हणतच आहेत. थोडक्यात काय तर, सर्वसामान्यांच्या जिंदगीचा पालापाचोळा अव्याहत होतोच आहे. पन्नास वर्षांनंतरही..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:09 am

Web Title: article about pachola novel by raosaheb ranganath borade on occasion of completing 50 years zws 70
Next Stories
1 रफ स्केचेस् :  भय
2 अरतें ना परतें.. : थकलेल्या ययातीचं भय
3 अंतर्नाद : बुद्धं सरणं गच्छामि
Just Now!
X