बाळकृष्ण कवठेकर

‘समीक्षक भालचंद्र नेमाडे’ हे डॉ. सुधीर रसाळ यांचे नवे पुस्तक नेमाडे यांच्या समग्र समीक्षालेखनाचे समतोल, तर्कशुद्ध आणि परखड असे मूल्यमापन करणारे आहे. नेमाडे यांच्या समग्र समीक्षालेखनाची अन्य कोणी इतक्या चिकित्सकपणे समीक्षा केल्याचे माझ्या तरी वाचनात नाही. त्यामुळे आणि नेमाडे यांचा मराठी साहित्य क्षेत्रातील एकूण दबदबा पाहता हे पुस्तक अभ्यासकांसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरणारे झाले आहे. नेमाडे यांच्याविषयीचे दोन पूर्वप्रकाशित लेख या पुस्तकात एकत्र करण्यात आले आहेत. पहिला लेख नेमाडे यांनी साहित्यासंबंधी मांडलेल्या विविध मतांचा परामर्श घेणारा असून दुसरा लेख नेमाडेंनी केलेल्या तुकाराममीमांसेचा साकल्याने चिकित्सक धांडोळा घेणारा आहे.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

शास्त्रशुद्ध समीक्षालेखनाच्या कसोटीवर न उतरणारे लेखन करणे, निराधर असणारी विधाने ठामपणे करणे आणि अंतर्गत विसंगती भरपूर असणे हे नेमाडेंच्या समीक्षालेखनातील प्रमुख दोष आहेत. रसाळ यांच्या विवेचनाचे हे सार असून विवेचनाच्या ओघात आणखी काही त्रुटीही त्यांनी नोंदवल्या आहेत.

‘प्रस्थापित ललित साहित्य आणि समीक्षा सिद्धांत यांच्याविषयी संतापून आपण समीक्षालेखन करत होतो’ असे नेमाडे यांनीच सांगितल्याचे रसाळ संदर्भ देऊन नोंदवतात. साहित्याला चुकीच्या दिशेने नेणारे समीक्षक आणि साहित्यिक यांना गुन्हेगार मानून नेमाडे त्यांना कसे वाक्ताडन करतात, याचे काही नमुने रसाळांनी दिले आहेत. त्यापैकी एकच येथे देतो- ‘काही लेखक तर प्रकाशकांच्या रखेल्याच आहेत.’ (‘टीकास्वयंवर’, पृष्ठ क्र. २२) या विधानातील अपशब्दाप्रमाणे अनेक अपशब्दांचा भरपूर वापर नेमाडे यांनी केल्याचे रसाळ सोदाहरण दाखवतात.

तेव्हा अपशब्दांचा वापर करणे आणि पुराव्याशिवाय हेत्वारोप करणे हे आणखी दोन दोष नेमाडे यांच्या समीक्षालेखनात कसे आढळतात, हे ध्यानात येते. इतिहासाच्या कसोटीवर पारखून न घेता ऐतिहासिक सत्य म्हणून काही विधाने नेमाडे करतात. उदाहरणार्थ, ‘हिंदू ही कॅटेगरी फार उशिरा आली’ आणि ‘‘मराठा’ ही कोटी जात म्हणून १९११ पूर्वी आपल्याकडे नव्हती’ या नेमाडे यांच्या विधानांची उदाहरणे देत ती चुकीची कशी आहेत, तेही रसाळ साधार स्पष्ट करतात. नेमाडे यांच्या समीक्षालेखनात परस्परविरोधी विधाने कशी येतात, हेही रसाळांनी दाखवून दिले आहे.

नेमाडे यांचे जातिसंस्थाविषयक विवेचनही आत्मविसंगत विधानांनी युक्त आहे. चर्चा कोणत्याही विषयाची असो, जे मांडायचे असते ते संदर्भ नसतानाही नेमाडे मांडतात. ब्रिटिशांनी केलेले नुकसान, रूपवादी – सौंदर्यवादी लेखन आणि समीक्षा, देशीवाद, नीतिवाद अशा आपल्या आवडत्या विषयांवरच.. मग लेखाचा, भाषणाचा किंवा मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचा विषय कोणताही असो.. नेमाडे बोलत वा लिहीत राहतात. हे सगळे विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लेखनाशी जुळणारे आहे असे रसाळ म्हणतात. एवढेच नव्हे, तर नेमाडे यांच्या समीक्षालेखनाचा प्रारंभच मुळी चिपळूणकरांच्या लेखनशैलीच्या अनुकरणातून झाला आहे हे ‘निरस्तपादपे देशे..’ या नेमाडेंच्या १९६१ सालच्या पहिल्या लेखाचे उदाहरण देऊन रसाळ स्पष्ट करतात.

‘नेमाडे यांचे बहुतेक समीक्षालेखन वाङ्मयीन राजकारणातून झालेले आहे’ असा एक गंभीर आक्षेप रसाळ यांनी घेतला आहे. नेमाडेंनी समीक्षेची उद्दिष्टे आणि स्वरूप यासंबंधी केलेले विवेचनही असेच आत्मविसंगतीने युक्त असल्याचेही रसाळांनी दाखवून दिले आहे. नेमाडेंचे समीक्षालेखन वकिली पद्धतीने युक्तिवाद करणाऱ्या अग्रलेखासारखे असल्याचे रसाळ म्हणतात.

पुढे डॉ. रसाळ नेमाडे यांच्या देशीयता आणि देशीवादाच्या सिद्धांताची चिकित्सा करतात. नेमाडेंच्या दृष्टीने लेखनात देशीयता आढळणाऱ्या कवी-लेखकांविषयी त्यांनी मांडलेल्या मतांची चिकित्साही रसाळ करतात. त्यातही नेमाडेंच्या मांडणीतील अनैतिहासिकता, मर्यादितपणा आणि अंतर्गत विसंगती दाखवण्यावरच रसाळांचा भर आहे. देशीयतेच्या सिद्धांताबद्दल मात्र रसाळ मौनच पाळताना दिसतात. रसाळ यांच्या अन्य समीक्षालेखनातून त्यांना हा सिद्धांत मान्य असल्याचे जाणत्या वाचकांच्या लक्षात येतेच. परंतु येथे मात्र त्यांनी स्पष्टपणे तसे म्हटलेले नाही आणि त्यांच्या दृष्टीने देशीयता असणारे लेखक कोण, हेही त्यांनी स्पष्ट केलेले नाही. देशीयता आणि वैश्विकता या दोन्ही बाबी एकाच वेळी एखाद्या साहित्यकृतीत असतात का, याविषयीचे रसाळांचे विवेचन ठाम आहे. आणि ते होकारार्थीच आहे!

नेमाडेंची शैलीविज्ञानविषयक मते उद्धृत करून रसाळांनी नेमाडे ‘शैली’ कशाला म्हणतात, ते नेमकेपणाने स्पष्ट होत नसल्याचा आक्षेप घेतला आहे. रूपवादाला तीव्र विरोध करून रूपवादी समीक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या नेमाडे यांच्या मांडणीतूनच रूपवाद सुप्तपणे कसा प्रकट होतो, ते रसाळ दाखवून देतात. ‘नेमाडे हे कादंबरी समीक्षेत वास्तववादी आणि काव्यसमीक्षेत रूपवादी भूमिका घेतात’ असे निष्कर्षांत्मक विधान ते करतात.

नेमाडे यांच्या उपयोजित समीक्षेवरही असाच आक्षेप रसाळांनी घेतला आहे. नेमाडे यांना आवडणाऱ्या कादंबरीकाराच्या एकाही कादंबरीची समीक्षा नेमाडेंनी केलेली नाही असे नमूद करून पु. शि. रेगे, अनुराधा पाटील यांच्या कवितेवरील नेमाडे यांच्या लेखनातील भूमिका रूपवादीच असल्याचे रसाळ दाखवून देतात! एकुणात, नेमाडेंच्या समीक्षालेखनातील अंतर्गत विसंगती दाखवून देऊन रसाळांनी- ‘नेमाडे यांनीच समीक्षेकडून केलेल्या अपेक्षांच्या कसोटीवर त्यांची स्वत:ची समीक्षा मात्र उतरत नाही’ असा निष्कर्ष काढलेला आहे.

या पुस्तकातील दुसरा लेख नेमाडे यांच्या तुकाराममीमांसेची चिकित्सा करणारा आहे. या लेखातही रसाळांनी प्रथम नेमाडेंची मते संदर्भासहित उद्धृत केली असून त्यांचे क्रमश: खंडन केले आहे. शिवाजी महाराज ते गांधीजी या काळातील बंडखोर चळवळीवर – नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे- वारकरी चळवळीचा प्रभाव पडलेला नाही हे रसाळांनी साधार स्पष्ट केले आहे. मात्र, असा प्रभाव‘प्रार्थना समाजा’वर पडल्याचे ते मान्य करतात. तुकाराम महाराजांचा ब्राह्मणविरोध आणि १९ – २० व्या शतकांतील काही चळवळींतील ब्राह्मणविरोध हे भिन्न प्रकारचे आहेत हेही रसाळांनी स्पष्ट केले आहे.

एकेश्वरवाद, समानता आणि बंधुभाव ही वारकरी पंथातील मते इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म यांच्या संस्कृतिसंयोगाचा परिणाम नव्हता हेही रसाळ नमूद करतात. वारकऱ्यांची समानता ही अध्यात्म क्षेत्रापुरतीच मर्यादित असल्याचे सांगून रसाळांनी ‘वारकरी पंथ हा एकेश्वरवादी होता’ हे नेमाडे यांचे मत सप्रमाण खोडून काढले आहे. महात्मा बसवेश्वर यांचा पंथ आणि नंतरचा शीख पंथ हे सोडल्यास, मध्ययुगातील कोणत्याही पंथाने एकेश्वरवाद स्वीकारलेला नव्हता हेही रसाळांनी नोंदवले आहे. वारकरी पंथ वेदप्रामाण्य आणि वर्णव्यवस्थाही मानणारा होता हेही त्यांनी दाखवून दिले आहे.

‘वारकरी पंथाने मौखिक संस्कृतीचा पुरस्कार केला’ हे नेमाडे यांचे मतही रसाळांनी चुकीचे ठरवले आहे. एकूणच ‘वारकरी चळवळीची आविष्कारशैली’ या लेखातील नेमाडेंची मते इतिहासाच्या कसोटीवर उतरत नाहीत असा रसाळांचा निष्कर्ष आहे. तसेच नेमाडेंनी तत्कालीन राजकीय स्थितीसंबंधी मांडलेली मते अनैतिहासिक असून त्यातील ‘हिंदुत्ववादा’चा मुद्दा हा २० व्या शतकातील असल्यामुळे वारकरी चळवळीच्या आणि पर्यायाने तुकोबांच्याही संदर्भात अप्रस्तुत ठरतो, असे रसाळांचे प्रतिपादन आहे.

‘वारकरी संप्रदाय १३ व्या शतकात स्थापन झालेला होता’ हे नेमाडे यांचे मत चुकीचे असून वारकरी संप्रदाय त्यापूर्वीपासूनच अस्तित्वात होता हे रसाळांनी सप्रमाण मांडले आहे. संत तुकारामांच्या धर्मग्रंथांच्या अभ्यासाविषयी नेमाडेंचे प्रतिपादनही चुकीचे असल्याचे रसाळ दाखवून देतात. ‘तुकाराम हे सामाजिक पातळीवरील विद्रोही संत होते’ हे नेमाडेंचे केंद्रवर्ती प्रतिपादन चुकीचे असल्याचे सांगून रसाळांनी नेमाडे यांच्या तुकाराममीमांसेवरील लेखाचा समारोप केला आहे.

या पुस्तकाविषयी दोन बाबी स्पष्ट कराव्या लागतील. एक म्हणजे, रसाळांनी नेमाडेंच्या समीक्षेतील सिद्धांताची सैद्धांतिक चिकित्सा करणे टाळले आहे. उदाहरणार्थ, नेमाडेंच्या देशीवादाची वा ‘कथा हा गौण वाङ्मयप्रकार आहे’ वगैरे मतांची चिकित्सा करून पर्यायी सिद्धांतन करणे रसाळांनी टाळले आहे. तसे केले असते तर रसाळांचे हे विवेचन अधिक मूल्यवान आणि परिपूर्ण झाले असते. दुसरे असे की, रसाळांची ही समीक्षा किमान पाव शतक आधी आली असती तर तिचे महत्त्व अधिक वाटले असते. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास – ‘मंदावता सगळी उन्हे, आलीस का उशिरा अशी?’

‘समीक्षक भालचंद्र नेमाडे’ – सुधीर रसाळ,

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे – ११५, मूल्य – १४० रुपये.