News Flash

संमेलनाचे सीमोल्लंघन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रवास आता शतकी संमेलनाच्या दिशेने सुरू झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शफी पठाण

shafi.pathan@expressindia.com

उस्मानाबादचे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अनेकार्थाने वेगळे ठरले. त्यात जसा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा जागर उच्चरवाने झाला, तसेच अनेक नवे पायंडेही पडले.. हेतुत: पाडले गेले. त्या साऱ्याचा एक मागोवा..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रवास आता शतकी संमेलनाच्या दिशेने सुरू झाला आहे. साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल ९३ संमेलने अखिल भारतातील मराठीजनांनी पाहिली आहेत. त्यात काळानुरूपझालेली स्थित्यंतरेही अनुभवली आहेत. परंतु नुकतेच उस्मानाबादेत पार पडलेले साहित्य संमेलन सर्वार्थाने वेगळे अन् संमेलनाच्या प्रचलित पारंपरिक सीमा ओलांडणारे ठरले. या संमेलनात अनेक गोष्टी पहिल्यांदा घडल्या. अर्थात यापैकी काही गोष्टी  सकारात्मक होत्या, तशाच काही नकारात्मकही होत्या. या दोन्हींचा संमेलनावरील प्रभाव जवळपास सारखाच होता. मात्र, संमेलन संपता संपता यातली सकारात्मकता कांकणभर सरस ठरली. ती कशी, याचा हा मागोवा..

दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील उस्मानाबादसारख्या अतिशय छोटय़ा शहराला अ. भा. मराठी साहित्य संमेलन कसे काय मिळाले याची चर्चा अद्याप संपलेली नाही. तशात संमेलनाध्यक्षपदी इतर वजनदार नावे मागे पडून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. संमेलनाध्यक्ष म्हणून फादर दिब्रिटो यांची निवड ही या संमेलनाच्या सीमोल्लंघनाची सुरुवात होती. फादर दिब्रिटो हे धर्मगुरू आहेत, ते साहित्याच्या व्यासपीठावरून धार्मिक व्याख्यानच देतील, त्यांना अध्यक्ष का केले, ही निवड रद्द करावी, अशी मागणी एका गटाने लावून धरली होती. या मागणीचे स्वरूप प्रत्यक्ष संमेलनाच्या दिवसापर्यंत अधिकच तीव्र होत गेले. परंतु गेल्या वर्षी नयनतारा सहगल प्रकरणात केलेली चूक साहित्य महामंडळाने यंदा केली नाही. महामंडळ अध्यक्षीय निवडीसंबंधीच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. एरवी या ना त्या दबावाखाली बोटचेपी भूमिका घेणाऱ्या साहित्य महामंडळाने फादर दिब्रिटोंच्या निवडीसंदर्भात अजिबात तडजोड केली नाही. महामंडळाचा हा ठामपणा साहित्यविश्वाने पहिल्यांदाच इतक्या कणखरपणे अनुभवला. परंतु त्यामुळे विरोधाची धार आणखीनच तीव्र झाली. संमेलन उधळण्याचा अप्रत्यक्ष इशारा असलेले मोबाइल संदेश वेगाने फिरू लागले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा वेग प्रचंड वाढला. इतका, की संमेलनाध्यक्ष व महामंडळाचे पदाधिकारी उस्मानाबादेत ज्या हॉटेलात थांबले होते त्या हॉटेलला चक्क पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत: तसे आदेश दिले होते. संमेलनाच्या मांडवात सारस्वतांच्या मांदियाळीत आणि साहित्यरसिकांच्या गराडय़ात मुक्तपणे फिरणारा संमेलनाध्यक्ष पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेत व्यासपीठाची पायरी चढताना महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले. अभिव्यक्तीच्या निर्भयतेचे प्रतीक असलेले भारतीय संविधान ज्या साहित्य- पालखीत ठेवले होते ती ग्रंथदिंडी पोलिसांच्या बंदोबस्तात सावधपणे पुढे जाते आहे, हे धक्कादायक चित्रही उस्मानाबादच्या या संमेलनात पाहिल्यांदाच दिसले. तथापि संमेलनाच्या व महाराष्ट्रातील उदार संस्कृतीच्या सुदैवाने विरोधाची ही धार मोबाइल मेसेजेसच्या पल्याड जाऊ शकली नाही. परंतु या अनपेक्षित अन् अकारणच्या ताणाने संमेलनाध्यक्षांना प्रचंड मन:स्ताप दिला. त्यात पुन्हा त्यांचे शारीरिक दुखणे उफाळून आले. त्यामुळे ते कसेतरी व्हीलचेअरवरून संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला आले, त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले आणि उपचारांसाठी म्हणून ते जे मुंबईला परतले ते पुन्हा संमेलनाला आलेच नाहीत. संमेलनाध्यक्षांशिवाय संमेलन ही गोष्टही या संमेलनाची एक विशेषता ठरली. संमेलनाचा अध्यक्ष एकदा का ‘माजी’ झाला की तो सहसा पुढील संमेलनांत फिरकत नाही. उस्मानाबादचे संमेलन मात्र यास अपवाद ठरले. या संमेलनात तब्बल चार माजी संमेलनाध्यक्ष पूर्णवेळ उपस्थित होते. यामध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख व अरुणा ढेरे यांचा अंतर्भाव होता. आजारपणामुळे फादर दिब्रिटोंना संमेलन अर्ध्यावर सोडावे लागले, परंतु ती उणीव या चार माजी संमेलनाध्यक्षांकडून भरून काढण्याचा प्रयत्न झाला. मावळत्या संमेलनाध्यक्षांकडून नूतन संमेलनाध्यक्षांना सूत्रे सोपविण्याचा सोपस्कारही यावेळी ‘चंदेरी’ रंगात रंगला. सराफा व्यवसायात प्रसिद्ध असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ’चे अभय गाडगीळ यांनी या संमेलनासाठी खास चांदीचे पदक तयार केले होते. त्यावर संमेलनाचे ठिकाण, वर्ष व संमेलनाध्यक्षांचे नाव अंकित होते. अरुणाताईंनी या चंदेरी पदकाद्वारे फादर दिब्रिटो यांना संमेलनाची सूत्रे सोपविली. संमेलनाच्या व्यासपीठावर असाही एक प्रकार पहिल्यांदा घडला, ज्याला दबक्या आवाजात विरोधही झाला. यापूर्वी आसाराम लोमटे, श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसेच वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले; परंतु त्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर गौरवण्याचा मोठपेणा दाखवला गेला नव्हत. परंतु यंदा मात्र अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कारासाठी संमेलनात सन्मानित करण्यात आले. आता ही परंपरा सुरू झालीच आहे तर व्यक्ती बदलली म्हणून त्यात यापुढे खंड पडू नये, ही साहित्यविश्वाची अपेक्षा आहे.

या संमेलनाचे अतिशय महत्त्वाचे व दूरगामी परिणाम करणारे एक वेगळेपण होते- ज्याची फार चर्चा झाली नाही. ते वेगळेपण म्हणजे या संमेलनाचे अ-राजकीय व्यासपीठ! साहित्य संमेलनांच्या वाटचालीत कऱ्हाडसारखा एखाद् दुसरा अपवाद सोडला तर कायमच व्यासपीठावर राजकारण्यांची गर्दी दिसत आलेली आहे. या गर्दीचा आकारही इतका भव्य असतो, की ज्या सारस्वतांसाठी हे संमेलन असते, तेच तिथे अल्पसंख्य वाटायचे. नेत्यांच्या लंब्याचौडय़ा भाषणांमुळे संमेलनाध्यक्ष केविलवाणा होऊन जात असे. आणि एकदा का हे वलयांकित राजकीय नेते संमेलनाच्या मंडपातून बाहेर पडले की संमेलनाचा नूरच पालटून जायचा. परंतु यंदा पहिल्यांदाच संमेलनाच्या या ‘राजकीय’ प्रतिमेला साहित्य महामंडळाने अगदी ठरवून तडा दिला. यासाठी महामंडळ निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. ही परंपरा यापुढेही जोपासली जाईल अशी अपेक्षा आहे. व्यासपीठावर खुर्चीची खातीरदारी नसल्याने मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी निमंत्रण मिळृूनही या संमेलनाकडे पाठ फिरवली. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख अगदी ऐनवेळी आले, परंतु व्यासपीठाची बूज राखून त्यांनी स्वत:हून श्रोत्यांमध्ये बसणे पसंत केले. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे सरकारच्या अधिनस्थ असलेले अधिकारी व्यासपीठावर आणि प्रत्यक्ष सरकार श्रोत्यांमध्ये- हे चित्रही संमेलन व महाराष्ट्रासाठी नवे होते. राजकारण्यांना टाळून कोटय़वधीचे संमेलन उभे करणे ही सोपी गोष्ट खचितच नव्हती. धनाढय़ स्वागताध्यक्षांकडून राजकीय चमकोगिरी टाळून निधी मिळवणे हे मोठेच आव्हान होते. परंतु हे कटु आव्हान स्वत: उस्मानाबाद साहित्य संघाच्या शाखाध्यक्षांनी स्वीकारले आणि बाजरीची भाकरी व मेथीच्या पिठल्यावर संमेलन यशस्वी करून दाखवले, हीसुद्धा या संमेलनाची एक वेगळी फलश्रुती. इतक्यावरच उस्मानाबादच्या या संमेलनाचे आगळेपण संपत नाही. हे संमेलन उस्मानाबादला जाहीर झाले तेव्हापासूनच टीका, आक्षेप आणि आव्हानांची वादळे या शहराला त्रस्त करीत होती. परंतु आई तुळजाईचे आशीर्वाद आणि संत गोरोबाकाकांच्या समृद्ध शिकवणुकीत वाढलेले उस्मानाबादकर त्यामुळे क्षणभरही विचलित झाले नाहीत. लाख संकटे आली तरी घेतला वसा टाकायचा नाही, या एकाच ध्येयाने ते पुढे जात राहिले. दुष्काळी भूमीत अभावग्रस्त आयुष्य जगत असतानाही पदरमोड करून त्यांनी हे संमेलन अगदी तळहातावर तोलून धरले. पशांची कमी तर पडू दिली नाहीच, पण संमेलनाला ज्या रसिकांची गरज असते ती रसिकताही इथे भरभरून वाहताना दिसली. संमेलनाचे चारही मंडप सलग तीन दिवस श्रोत्यांनी गच्च भरलेले होते. शेजारपाजारच्या गावांतील शिक्षकांनी स्वखर्चाने वाहन करून विद्यार्थ्यांना ही साहित्याची वारी घडवली. दुष्काळग्रस्त, अभावग्रस्त, मागासलेला अशी संभावना केली जाणाऱ्या मराठवाडय़ाच्या भूमीतील या संमेलनात सुमारे चार कोटींची ग्रंथखरेदी झाली. संमेलनाला आलेल्या तरुणाईने हे शब्दधन अतिशय प्रेमाने घरी नेले. पैशांच्या तुंबडय़ा रिकाम्या असल्या तरी चिंता नाही, तर साहित्याची आस प्रामाणिक हवी. ती असली की उस्मानाबादसारख्या अत्यल्प सोयीसुविधा असलेल्या गावातही संमेलन यशस्वी होऊ शकते. त्यामुळे साहित्य महामंडळकरांनो, आता गावाकडे चला.. असा आश्वासक संदेशही या संमेलनाने दिला. इतक्या नवीन अन् विधायक गोष्टी उस्मानाबादच्या संमेलनाने साहित्यविश्वाला व एकूणच मराठी वाङ्मयाला दिल्या आहेत. त्या सकल साहित्यरसिकांसाठी सकारात्मक मार्गाने पुढे नेणे हे महामंडळाचा गौरव वाढविणारे ठरेल, तसेच मायमराठीच्या लखलखत्या वैभवाला आणखीन तेजांकित करणारे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 4:16 am

Web Title: article on 93 akhil bharatiya marathi sahitya sammelan abn 97
Next Stories
1 वेध.. वर्तमान अर्थ-घडामोडींचा!
2 ‘मौज’ला आकार देणारे संपादक
3 तत्त्वनिष्ठ जीवनाचा कलात्मक आविष्कार
Just Now!
X