चंद्रकांत काळे

येत्या वर्षी होणाऱ्या ऐतिहासिक शतकमहोत्सवी अ. भा. मराठी नाटय़-संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या नाटय़कर्तृत्वाचा त्यांचे सुहृद असलेल्या ज्येष्ठ कलावंताने घेतलेला मार्मिक वेध..

आगामी अ. भा. मराठी नाटय़संमेलन हे शंभरावे ऐतिहासिक नाटय़संमेलन आहे. ते येत्या वर्षी होईल. या शतकमहोत्सवी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रायोगिक रंगमंचावरील प्रतिभाशाली व प्रगल्भ दिग्दर्शक आणि अभिनेते (होय. मी त्यांचा जबरदस्त अभिनय पाहिलेला आहे.) डॉ. जब्बार पटेल यांची निवड व्हावी हा एक छान योगायोग आहे. मराठी नाटय़संमेलन जर ‘अखिल भारतीय’ असं बिरुद मिरवते आहे तर मराठी नाटक भारतीय रंगावकाशात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉ. जब्बार पटेल या निर्वाचित अध्यक्षानं नक्की केलेलं आहे. आणि तेही मोठय़ा प्रमाणात! थोडासा अती प्रशंसेचा दोष पत्करून मी असेही म्हणू शकतो, की १९८० ते १९८९ या कालखंडातील त्यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या अकरा देशांतील साठ प्रयोगांद्वारे मराठी नाटकाची नाममुद्रा पदेशातही त्यांनी व्यवस्थितच उमटविली आहे. त्या साठ प्रयोगांतील ३०-३५ प्रयोग हे केवळ युरोपियन प्रेक्षकांसमोर सादर झाले आणि जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आदी देशांमधल्या वृत्तपत्रांनी या मराठी नाटकाचा- पर्यायानं भारतीय नाटकाचा वृत्तपत्रांतून खूप मोठा गौरव केला. ‘गार्डियन’नं तर ‘A controversial indian play now in London, could be inspiration to western drama’ अशा शब्दांत जब्बार पटेलांच्या या महत्त्वपूर्ण नाटकाला खुली दाद दिली.

जब्बार पटेल यांची रंगमंचीय कारकीर्द साधारणत: १९६५ ते १९८५ अशी वीस वर्षांची. तशी म्हटली तर छोटीशीच; पण अत्यंत झगमगती. ४०-४० वर्षे काम करून १००-१५० नाटकं करायची, पण वेळेला पाच नावंसुद्धा आठवत नाहीत असं पटेलांचं नाही झालं. पुण्यात पुरुषोत्तम करंडकला

बी. जे. मेडिकल कॉलेजचा दबदबा डॉ. पटेलांपासूनच सुरू झाला होता. विजय तेंडुलकरांनी रूपांतर केलेलं ‘लोभ नसावा, ही विनंती’ हे नाटक त्यांनी बी. जे.तर्फे राज्य नाटय़स्पर्धेतही केलं आणि ते अंतिम फेरीपर्यंत गेलं होतं. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पी. डी. ए.) या पुण्याच्या नामवंत प्रायोगिक संस्थेत भालबा केळकर, श्रीराम खरे, डॉ. श्रीराम लागू, वासुदेव पाळंदे यांच्यासारख्या नामवंत नाटकवाल्यांच्या सहवासात पटेल तयार होत होते. त्या काळातील त्यांची ‘जादूगार’, ‘देवाचे मनोराज्य’, ‘खून पहावा करून’, ‘तू वेडा कुंभार’ इ. नाटके मी पाहू शकलो नाही. कारण मी शाळकरी विद्यार्थी होतो तेव्हा. पण त्यांचं नाव गाजत होतं, एवढं खरं.

जब्बार पटेलांशी थेट संपर्क आला तो ‘घाशीराम कोतवाल’च्या निमित्तानं. पुरुषोत्तम करंडकमधली काही तरुण पोरं पटेलांनी नीटपणे पारखून आपल्या स्टडी सर्कलमध्ये सामील करून घेतली. त्यात मी आणि मोहन गोखले (एस. पी. महाविद्यालयातले)! आमची पण निवड झाली होती. या स्टडी सर्कलमध्ये आणि पुढे ‘घाशीराम कोतवाल’च्या तीन-साडेतीन महिने झालेल्या तालमीमध्ये लक्षमोलाचे नाटय़प्रशिक्षण आम्हा सर्वाना मोफत मिळत होतं. रंगभूमीवरील भाषा, प्रकाश, नृत्य, संगीत, नेपथ्य याविषयी ते फार मन:पूर्वक बोलत असत. एक समर्पित दिग्दर्शक आणि नाटय़प्रशिक्षकही एकत्र एका व्यक्तीत असणं आणि तिनं तुम्हाला काही शिकवणं हा योग सामान्य नव्हताच.

मला जब्बार पटेलांचं सर्वात मोठं कर्तृत्व कसलं वाटत असेल तर ते हे, की त्यांनी मराठी ‘म्युझिकल’- ज्याला कै. मर्ढेकरांनी ‘संगीतक’ म्हटलं- या नाटकाच्या आकृतिबंधाची मराठी रंगमंचावर फार दमदारपणे सुरुवात केली.

‘अशी पाखरे येती’ या तेंडुलकरांच्या गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शक आणि नायक होते डॉ. जब्बार पटेल (१९७०-७१)! त्याच काळात तेंडुलकरांकडून ‘घाशीराम कोतवाल’चे सुतोवाच जब्बार पटेलांकडे झाले होते. ‘अशी पाखरे येती’ या नाटकाचे धुमधडाक्यात प्रयोग चालू असायचे. तोपर्यंत ‘संगीतक’ प्रकरण डॉ. पटेल यांनी हाताळलं नव्हतं. आपल्या रंगभूमीवर संगीत नाटकं खूप झाली, पण ‘संगीतकं’ नाही. मर्ढेकरांनी संगीतकाविषयी असं म्हटलं होतं की, संगीतकांत  नाटय़वस्तूचा सारा आविष्कारच संगीतरूपात असतो. थोडक्यात- संगीत नाटकात संगीत ही लाच असते, तर संगीतकांत तो एक नजराणा! मला जुन्या काळातल्या ‘सौभद्र’ आणि ‘शारदा’ या नाटकांविषयी- ती ‘संगीतक’ आहेत असं म्हणावंसं वाटतं. पण तेंडुलकरांनी ‘घाशीराम’मध्ये संवादांपासूनच एक भन्नाट लय आणली होती. पण ती लय केवळ संवादांत नव्हती, तर हालचालींतही तेंडुलकरांनी ती लेखनातूनच आणली होती आणि जब्बार पटेलांसारख्या बुद्धिमान दिग्दर्शकानं ती इतकी अचूक उचलली होती, की पुढे एक इतिहास घडला. पटेलांचे आणखी एक शक्तिस्थान म्हणजे त्यांची रंगमंचीय संगीताबद्दलची कमाल समज. ‘घाशीराम कोतवाल’नंतर जब्बार पटेलांची आणखी दोन गाजलेली संगीतकं म्हणजे पु. ल. देशपांडे यांचा ‘तीन पैशांचा तमाशा’ (१९७६) आणि अरुण साधू यांचं ‘पडघम’ (१९८५)! एखाद्या नाटय़- दिग्दर्शकाला संगीतविषयक विचक्षण जाण असल्याशिवाय ही तीन संगीतकं एवढी यशस्वी झालीच नसती. लेखनात ‘संगीतक’ म्हणून हुकलेल्या जागा शोधून काढून तो बेमालूमपणे त्या संगीतमय करीत असे. या सगळ्या वैशिष्टय़ांमुळेच कै. वसंतराव देशपांडय़ांनी १९८२ मध्ये अकोला नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मराठीतलं खऱ्या अर्थानं पहिलं संगीत नाटक म्हणून ‘घाशीराम कोतवाल’चा जाहीर गौरव केला. १९८५ ला ‘पडघम’ नाटक केल्यानंतर हा नाटय़-दिग्दर्शक पुन्हा कधीही मराठी रंगमंचावर प्रकटला नाही, हे दुर्दैव! त्याची कारणे कदाचित तेच देऊ शकतील.

आणि दुसरं.. नसेल त्यांच्या हातून १९८५ नंतर काही झालं, तर आपण कशाला काळजी करायची? कदाचित आता ते काही नवं करतीलही. नाही तर ‘आनंद’ चित्रपटातल्या संवादात थोडासा बदल करून आपणही म्हणू शकतोच ना.. ‘बाबूमोशाय, कारकीर्द बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’

अशा कर्तृत्ववान रंगकर्मीची शंभराव्या नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी अ. भा. मराठी नाटय़ परिषदेनं निवड केल्याबद्दल प्रसाद कांबळी टीमचं मन:पूर्वक अभिनंदन आणि जब्बार पटेलांना हार्दिक शुभेच्छा.