प्रदीप मुळ्ये

‘पीडीए ते आविष्कार.. व्हाया रंगायन’ असा सुमारे सत्तर वर्षांचा नाटय़प्रवास करून दिगंताच्या दिशेने गेलेले अरुण काकडे तथा काकडेकाका.. त्यांच्यासोबतचे विलोभनीय क्षण..

प्रवेश एक

स्थळ : छबिलदास शाळा. दुसऱ्या मजल्यावरचं ‘आविष्कार’चं ऑफिस.

पांढरं धोतर, अंगात पांढरा बनियन, दाढीला अर्धवट लावलेला साबण अशा वेशातली व्यक्ती रजिस्टर उघडून त्यात आम्हाला नाटकाचा प्रयोग करण्यासाठी हवी असलेली तारीख नोंद करून ठेवत होती. हा त्यांचा वेश ‘पाहिजे जातीचे’ नाटकातील ईश्वरभाई या व्यक्तिरेखेचा होता. स्टेजवरून एक्झिट घेतल्यावर ‘आविष्कार’चं दैनंदिन काम करून पुन्हा एन्ट्री घेण्यास तयार असलेले काकडेकाका.. हे काम ते नित्यनेमाने करत असत.

प्रवेश दोन

स्थळ : माधव साखरदांडे आणि प्रेमाताईंचं घर.

समोर ऋषिमुनींसारखे बसलेले गुरू पार्वतीकुमार, रमेश पुरव सर, अरिवद- सुलभा देशपांडे, भाऊ साखरदांडे- प्रेमाताई, संगीतकार शशांक- सुनील कट्टी, प्रकाशयोजनाकार चंदर होनावर, मी आणि जणू ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटय़ात काम मिळेल या आशेने निरागस चेहऱ्याच्या मुलासारखे बसलेले काकडेकाका.. मधे मधे उठून कुणाला पाणी, कुणाला चहा असं त्याच निरागस चेहऱ्याने विचारणारे.. आणि ते मिळतंय की नाही याची काळजी घेणारे..

प्रवेश तीन

स्थळ : छबिलदास रंगमंच.

‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटय़ाची तालीम सुरू आहे. गुरुजी संध्या पुरेचाकडून दुर्गाच्या बुडण्याच्या नृत्याची तालीम घोटवून घेतायत. दोन्ही बाजूंच्या विंगांमध्ये- टीव्हीच्या शोरूममध्ये सगळ्या टीव्हींवर एकच चित्र दिसतं तशा सर्व भावी दुर्गा दिसतायत. आणि एका ६२ इंची टीव्हीप्रमाणे या सगळ्या लहान मुलांबरोबर तालीम करणारे काकडेकाका.. ‘दुर्गा’मधील गौळणी, माळणी, पक्षी, मधमाश्या, मुंग्या.. सगळ्यांच्या तालमी चालू असताना काकाही विंगेत लहान मुलांबरोबर त्यांना हुरूप यावा म्हणून तालमी करायचे.

प्रवेश चार

स्थळ : छबिलदास रंगमंच.

स्टेजच्या समोरच्या प्रेक्षागृहातल्या पायऱ्यांवर बसून गप्पा मारणारे आम्ही. कुणी एक इसम ‘मि. काकडे कहॉं मिलेंगे?’ असं विचारत आत येतो. तितक्यात काका ऑफिसमधून बाहेर येतात. आम्ही त्या इसमाची गाठ घालून देतो. तो इसम कसले तरी पेपर्स व एक चमकदार पेन पुढे करतो. काका त्या कागदांवर त्या इसमाने पुढे केलेल्या पेनने सह्य करतात. पेन व पेपर्स त्याला देतात. तो सहेतुक फक्त पेपर्स घेतो व निघू पाहतो. काका त्याला थांबवतात. विसरण्याचं नाटक केलेलं पेन त्याला देतात. तो काकांना ‘आपके लिए ही है’ असं सांगतो. काका बळजबरीने त्याच्या खिशाला ते पेन अडकवतात. अभिमानास्पद हसत त्याला सांगतात, ‘अगर आप कोई गैर काम के लिए ये पेपर्स लेके यहाँ आते तो मं साईन भी नहीं करता.’ सोन्याचं पेन देणारा इसम ‘आज मुझे आपने करोडो रुपयों के नुकसान से बचाया..’ म्हणत काकांच्या पाया पडतो. काका कस्टम्समध्ये कामाला होते. ऑफिसच्या ठरलेल्या वेळेव्यतिरिक्त ते ऑफिसमध्ये थांबत नसत. पण कार्यालयीन वेळेत काम पूर्ण न झालेली बरीच मंडळी काकांना भेटायला ‘आविष्कार’मध्ये येत.. काकांची सही मिळावी म्हणून. अशाच एका इसमाने छबिलदास नाटय़गृहासाठी नवीन खुर्च्या भेट दिल्या होत्या, तर दुसऱ्याने हॉलच्या रंगरंगोटीची जबाबदारी उचलली होती.

प्रवेश पाच

स्थळ : गिरगावातील प्रख्यात ड्रेसवाला.

‘आर्य चाणक्य’ नाटकाच्या वेशभूषेसाठी मी आणि काकडेकाका या ड्रेसवाल्याच्या मॅनेजरबरोबर माझी स्केचेस समोर ठेवून चर्चा करतोय, इतक्यात मालक येतो आणि अत्यंत रागात मॅनेजरला सांगतो, ‘यांचं काम करायचं नाही.’ मला धक्काच बसतो. कारण ‘दुर्गा झाली गौरी’पासून ‘अश्मक’, ‘सखी, प्रिय सखी’, ‘उघडले स्वर्गाचे दार’ इत्यादी नाटकांच्या वेशभूषेचं काम याच ड्रेसवाल्याकडून मी करून घेतलेलं. काकडेकाकांनी खुलासा करायला सांगितल्यावर कळतं, की ‘आविष्कार’च्या आधीच्या आणि वरच्या नावांपैकी दोन नाटकांचे पूर्ण पैसे त्याला मिळाले नव्हते. काकांनी त्याक्षणी त्याचे राहिलेले पैसे दिल्याबरोबर तो काम करण्यास राजी झाला. पण काकांनी मला हाताला धरून दुकानाबाहेर काढले आणि पुन्हा या ड्रेसवाल्याकडे काम न करण्याची शपथ घातली. त्यानंतर आमची वणवण सुरू झाली नवीन ड्रेसवाला शोधण्यासाठी. शोधता शोधता छबिलदास शाळेजवळ ‘पवार ड्रेसवाले’ आहेत, त्यांच्यापाशी आलो. त्यांनी असमर्थता दर्शविली, पण एक नामी कल्पना दिली. त्यानुसार मी, विनोद पंडित आणि काकांनी दादर आणि माटुंगा पूर्व अक्षरश: पिंजून काढला. इथल्या वेगवेगळ्या दुकानांतून संपूर्ण सामग्री जमा करून त्या नाटकाची वेशभूषा संकल्पनेप्रमाणे अमलात आणली. धन्यवाद पवार ड्रेसवाला!

प्रवेश सहा

स्थळ : छबिलदास रंगमंच.

‘आर्य चाणक्य’ नाटकाची पहिली रंगीत तालीम. वेगवेगळ्या विभागांची मंडळी काकांकडे येऊन ‘काका, झांज आणायला पैसे हवेत..’ काका- ‘अरे, किती खर्च करताय..’ म्हणत खिशातून पैसे काढून देतात. दुसरा कोणी प्रॉपर्टी बघणारा ‘काका, संकासुराच्या गळ्यात घालण्यासाठी हार हवाय, पैसे द्या.’  पुन्हा काका- ‘अरे, किती खर्च करताय..’ म्हणत पैसे काढून देतात. अशीच आणखी काही मंडळी येऊन काकांकडे पशाची मागणी करतात. प्रत्येक वेळेस काका ‘अरे, किती खर्च करताय..’ म्हणत पैसे देतात.. हे सगळं बाजूला उभा राहून पाहणारा मी अचानक बिथरतो. ‘काका, कमी खर्चाची नाटकं करायची असल्यास सामाजिक विषयावरची नाटकं निवडा- म्हणजे घरच्याच कपडय़ांत व कमी खर्चात करता येतील,’ असं म्हणून मी तिथून निघून जातो.

प्रवेश सात

स्थळ : शिवाजी मंदिर.

‘प्रेमाच्या गावा जावे’ नाटकाचा प्रयोग. त्यात अरिवद देशपांडे काम करायचे. मध्यांतरामध्ये मी त्यांना गाठतो. आदल्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल सांगतो. माझी तक्रार- ‘काका काल असे का वागत होते?’ अरिवद देशपांडे माझ्या खांद्यावर हात टाकून मला बाजूला नेतात. ‘‘प्रदीप, चांगल्या संस्थाचालकाचं हेच तर संघटनचातुर्य असतं. पैसे ते देणारच. पण कुणी अवाजवी खर्च करू नये म्हणून घेतलेली दक्षता आहे ती.’’ माझी समजूत पटते.

प्रवेश आठ

स्थळ : ‘आविष्कार’ ऑफिस.

त्या दिवशी मी जरा उशिराच ‘आविष्कार’च्या ऑफिसमध्ये गेलो होतो. कधी नव्हे ते वातावरण जरा गंभीर. अरिवद पपा शो संपवून आले होते. चेहऱ्यावर उदासी, खिन्नता, नाराजी आणि काळजी अशा अनेक भावनांचं मिश्रण. समोर काकडेकाका. तेही गंभीर. मी येऊन बसतो. पपांची नजर माझ्याकडे जाते. मी हसतो. प्रतिसाद नाही..

‘‘काय मुळ्येसाहेब?’’प्रथमच मला ते अशा नावाने संबोधत होते. खरं तर इतक्या वर्षांत त्यांच्याशी माझी घनिष्ठ मत्री झालेली. एरवी ते मला ‘प्रदीप’ या एकेरी नावानेच हाक मारायचे. ‘‘परवा थर्टी फर्स्टला आला नाहीत आमच्याकडे?’’.. दरवर्षी त्यांच्याकडे थर्टी फर्स्टला सेलिब्रेशन असायचं. ‘‘नाही येता आलं..’’ मी पुटपुटतो. ‘‘तुम्हीसुद्धा त्या दुसऱ्या ग्रुपसोबत होतात?’’ – पपा. ‘‘नाही पपा, मी घरीच होतो.’’ ते ताडकन् उठले. ‘‘मी निघतो,’’ म्हणत चालू लागले. काका त्यांच्या मागोमाग.. या सगळ्या गोष्टीचा उलगडा दुसऱ्या दिवशी झाला. त्या वर्षीच्या थर्टी फर्स्टला ‘आविष्कार’मधल्या काही मंडळींनी पपांकडच्या पार्टीला न जाता वेगळ्या ठिकाणी सेलिब्रेशनचा बेत ठरवला होता. पपा- त्यांचा प्रयोग मध्यरात्री असल्यामुळे स्वत:कडच्या पार्टीला उशिराच जॉइन होणार होते. काका, चंदर होनावर व इतर काही मंडळी थोडय़ा वेळासाठी पपांच्या पार्टीला जाऊन नंतर ‘त्या’ वेगळ्या पार्टीला गेले होते.. आणि ही गोष्ट पपांना समजली होती. त्यामुळे ते नाराज होते. ‘‘मी येईपर्यंत तरी थांबायला हवा होता तुम्ही..’’ मी येण्याअगोदर त्यांनी ही नाराजी काकांकडे उघडपणे बोलून दाखवली होती.. कसलं वाईट वाटलं असेल त्यांना? एवढी कसली काळजी वाटली असेल? काकांसारख्या जिवलग मित्रावर एवढय़ा क्षुल्लक कारणावरून का नाराज झाले असतील ते? माझ्याशीही ‘मुळ्येसाहेब’ अशा उपरोधाने बोलण्याएवढं कसलं दु:ख झालं असेल त्यांना?.. पण हे सर्व प्रश्न अनुत्तरितच राहिले.. दोनच दिवसांत पपा गेल्याची वाईट बातमी आली. आपल्या जिवलग मित्राचं जाणं काकांच्या जिव्हारी लागलं..

प्रवेश नऊ

स्थळ : ‘आविष्कार’ ऑफिस.

एके दिवशी काका मला सांगतात, ‘‘प्रदीप, आपण अरिवदचा स्मृतिदिन साजरा करतोय. कशा प्रकारे करायचा याचा विचार करायला सुरुवात कर. त्यानिमित्ताने एक पुस्तकही काढायचा विचार आहे.’’

दोन दिवसांनी मी भेटतो.. नवीन नाटकांचा महोत्सव? महाराष्ट्रभरच्या नाटकांचा महोत्सव? किती दिवस? किती नाटकं?

‘‘येतील तेवढी!’’ – काका.

आणि मग एक महिना चालला २७ नाटकांचा अभूतपूर्व महोत्सव! विजय केंकरेचं ‘चारशे कोटी..’, अजित भगतचं ‘जय जय रघुवीर समर्थ’, हर्ष शिवशरणचं ‘डफ’, नीलकांती पाटेकरचं ‘एक डोह अनोळखी’, मंगेश कदम-संजय सूरकर यांचं ‘वंश’, ड्रॉपर्स- पुणेचं ‘वाटा पळवाटा’, चंद्रकांत कुलकर्णीचं ‘पौगंड’, शफाअत खानचं ‘भूमितीचा फार्स’, तुषार भद्रेचं ‘कारान’ वगैरे वगैरे.. नुसत्या दिग्दर्शकांच्या नावांवरूनही कल्पना येईल, की हा महोत्सव कसा झाला असेल याची.. आणि त्याच्या आयोजनासाठी काकांनी किती श्रम घेतले असतील याची! हॅट्स ऑफ काका..

‘‘आता पुस्तकाच्या मागे लागा.’’.. काकांचं समन्स.

मी माझा मित्र राजीवकडे पुस्तकाची कल्पना मांडतो. राजीवचा होकार. ‘‘तापसलाही घेऊ या बरोबर.’’ – राजीव.

संपादक मंडळ : राजीव नाईक, विजय तापस, प्रदीप मुळ्ये.

अरिवद देशपांडे माणूस म्हणून.. नातेवाईक, मित्रमंडळी व सहकारी यांच्या नजरेतून.

अरिवद देशपांडे नट म्हणून.. नाटककार, दिग्दर्शक व सहकलाकार यांच्या नजरेतून.

अरिवद देशपांडे दिग्दर्शक म्हणून.. नाटककार, नटमंडळी व तंत्रज्ञ यांच्या नजरेतून..

आणि परिशिष्ट.

पुस्तकाचा ढाचा ठरला.. एक-दोन अपवाद वगळता सर्वाचे लेख आले. पुस्तक मुद्रण, छपाई यात काकांनी अजिबात ढवळाढवळ तर केली नाहीच; पण त्यांनी आपल्या या मित्राविषयी अप्रतिम लेखही लिहिला- ‘अरिवद आणि अरिवद’! अरुण काकडेंचं- म्हणजे काकांचं खरं नाव- ‘अरिवद’!!

प्रवेश दहा

स्थळ : पुन्हा ‘आविष्कार’चं ऑफिस.

आदल्या वर्षीच्या महोत्सवाच्या यशाने काकांचा ‘‘या वर्षी काय करू या?’’ हा पुन्हा प्रश्न. मी म्हटलं, ‘‘महाराष्ट्र सोडून देशात इतरत्र भारतीय रंगभूमीवर चालणाऱ्या नाटकांचे महोत्सव होतात. त्यामुळे आपल्याकडच्या नाटक करणाऱ्यांना किंवा प्रेक्षकांना भारतीय रंगभूमीवर काय चाललंय याची काहीच कल्पना येत नाही. आपण असा महोत्सव केला तर..?’’

‘‘करू या.’’ – काका.

‘‘पण काका, हे खूप खर्चीक प्रकरण आहे. शिवाय आपल्याकडे कार्यकर्त्यांचीही वानवा.’’ – मी.

‘‘तुम्ही मंडळी तयार आहात ना काम करायला? पशांसाठी हात पसरू या शुभचिंतकांकडे.’’ – काका.

आणि काका कामाला लागले..

भारतातल्या महोत्सवांमध्ये नाटक सादर करणाऱ्या सर्व संस्थांना पत्रं गेली. काहींचा होकार, काहींचा नकार.

त्यांच्या येण्या-जाण्याची, राहण्याची, जेवणाची, मुंबईतल्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी येणारा खर्च.. कुठून कुठून, कुठे कुठे फिरून काकांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी फंड जमा केले. आपला महोत्सव देशात होणाऱ्या कोणत्याही महोत्सवांपेक्षा कमी दर्जाचा होऊ नये म्हणून त्याच्या पब्लिसिटी-डिझाइनचं काम रमेश मुळ्ये या जाहिरात क्षेत्रात नावाजलेल्या डिझायनरवर सोपवलं. त्यांनी केलेलं महोत्सवाचं तिकीट, पोस्टर, ब्रोशर अजूनही लोकांच्या संग्रही आहे.

नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ‘आविष्कार’-‘आंतरनाटय़’च्या सहयोगाने सादर केलेलं अभिजात नाटक ‘मातीच्या गाडय़ाचं प्रकरण ( मृच्छकटिकम् )’, रत्नाकर मतकरींच्या ‘बालनाटय़’ने सादर केलेलं ‘ढग ढगोजीचा पाणी प्रताप’ हे बालनाटय़, ‘शब्दवेध, पुणे’ या संस्थेने सादर केलेला संतरचनांवर आधारित संगीताचा कार्यक्रम- ‘अमृतगाथा’ या महाराष्ट्रातील संस्थांनी सादर केलेल्या प्रयोगांबरोबरच के. एन. पण्णीकर, हबीब तन्वीर, बी. जयश्री, पंडवानी महाभारत सादर करणाऱ्या तिजनबाई, बंगालचे प्रसिद्ध पपेटीअर सुरेश दत्ता बाबूंनी सादर केलेला ‘सीता’ हा पपेट शो, प्रोबीर गुहांनी सादर केलेला ‘अहिल्या’ हा मुक्त रंगमंचावरचा प्रयोग असे विविध प्रांतांतले, विविध भाषांमधले नाटय़प्रकार सादर झाले. ही जंत्री विस्तृतपणे देण्याचं कारण त्याचा आवाका, त्याची व्याप्ती आपल्या लक्षात यावी. आणि हे फक्त माझ्यासारख्या अजून पाच-सहा कार्यकर्त्यांना हाताशी धरून एकटय़ा काकांनी साध्य करून दाखवलं होतं. पपांनी मला सांगितलेल्या काकांच्या संघटनकौशल्य आणि चातुर्याचा हा दाखला आहे.

प्रवेश अकरा

स्थळ : तेच..

दोन वर्षांनी काकांच्या मनाने पुन्हा उचल खाल्ली. या वेळेस संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नाटकांचा महोत्सव करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याचबरोबर पुन्हा एकदा पुस्तक. विजय तेंडुलकरांवरचं.

जवळजवळ १३ नवीन दिग्दर्शकांनी विजय तेंडुलकरांच्या नाटकाचं अगदी नव्याने सादरीकरण केलं. विजय कुलकर्णी- ‘माणूस नावाचे बेट’, हर्ष शिवशरण- ‘सरी ग सरी’, श्रीरंग गोडबोले- ‘मी जिंकलो मी हरलो’, चंद्रकांत कुलकर्णी- ‘गिधाडे’, तुषार भद्रे- ‘दंबद्वीपचा मुकाबला’, विजय केंकरे- ‘श्रीमंत’, चेतन दातार-‘बेबी’.. या नाटकांबरोबरच ‘मादी’- विक्रम वाटवे, ‘अजगर आणि गंधर्व’- लक्ष्मण देशपांडे, ‘वैऱ्याची रात्र’- अजित भुरे- या एकांकिका तसेच ‘चांभारचौकशीचं नाटक’- विद्या पटवर्धन, ‘बाबा हरवले आहेत’- रामनाथ थरवळ, ‘चिमणा बांधतो बंगला’- द्रौपदी रोहेरा, ‘राजा-राणीला घाम हवा’- आलोक चौधरी यांनी सादर केलेली बालनाटय़े, कमलाकर सारंग, बी. व्ही. कारंथ, राजेंद्रनाथ आणि सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेलं ‘सफर’ हे तेंडुलकरांचं नवंकोरं नाटक. हे सगळं कमी की काय म्हणून ‘मंथन’, ‘आक्रीत’, ‘आघात’, ‘सामना’, ‘कमला’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या तेंडुलकरांनी लिहिलेल्या सिनेमांचा महोत्सवही. आणि त्यावर कडी म्हणून तेंडुलकरांवरचं पुस्तक. छाती दडपून जाईल एवढा कार्यक्रम. आयोजन व खर्चाची बाजू काकडेकाका! कार्यकत्रे पुन्हा हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच.

महोत्सवाच्या उभारणीत या वेळेस राजीव नाईक बरोबर होतेच. पुन्हा पुस्तकाची जबाबदारी राजीव, तापस आणि मी यांच्यावर. मुद्दाम नमूद करतो.. राजीव नाईक यांनी लिहिलेली या पुस्तकाची प्रस्तावना जरूर वाचावी.

प्रवेश बारा

स्थळ : ममता- डी, प्रभादेवी (माझं घर )

दारावरची बेल वाजते. दारात काकडेकाका. त्यांना दारात बघून मी अचंबित! (अलीकडे माझ्या इतर व्यवधानांमुळे ‘आविष्कार’मध्ये माझं येणं-जाणं बऱ्यापैकी कमी झालेलं. महोत्सव, काही नाटकं बघण्यापुरताच मी तिथे जात असे. ) चहापाणी झाल्यावर काकांनी नवीन बॉम्ब टाकला. ‘‘चंद्रकांत कुलकर्णी एक प्रोजेक्ट घेऊन आलाय. महेश एलकुंचवारांनी ‘वाडा चिरेबंदी’च्या पुढचे दोन भाग लिहिले आहेत. त्यांची इच्छा आहे ते ‘वाडा’बरोबरच सलग सादर करावेत. ‘आविष्कार’ने त्याची निर्मिती करावी अशी चंद्रकांतची इच्छा आहे. मी त्याला ‘हो’ म्हटलंय..’’

बराच वेळ शांतता..

‘‘माझी अशी इच्छा आहे की, त्याचं नेपथ्य, प्रकाशयोजना व वेशभूषेची जबाबदारी तू घ्यावीस.’’

‘‘विचार करून सांगतो..’’ मी म्हटलं.

बराच वेळ ते माझ्याकडे बसून होते. मी एका सेटचं मिनीएचर मॉडेल करत होतो. टक लावून ते मी करत असलेल्या मिनीएचरकडे बघत होते. जवळजवळ पाऊणएक तास. जशी त्यांची ‘आविष्कार’मध्ये जाण्याची वेळ झाली तसे ते उठले. माझा हात हातात घेऊन म्हणाले, ‘‘आपण हे नाटक करतोय.’’ हसले आणि निघून गेले.

ते गेल्यावर मी विचार करू लागलो.. ‘‘काय माणूस आहे हा? याचा घरसंसार, मुलंबाळं.. सगळं काही फक्त नाटक एके नाटकच आहे? काकडेकाकू, धनंजय यांनी कधी यांच्याकडे कुठल्या प्रापंचिक, कौटुंबिक गोष्टींसाठी हट्ट धरला नसेल? धरला जरी असेल, तरी यांनी तो हट्ट पुरा केला असेल का? यांनी कधी धनंजयला लहान असताना शाळेत नेलं असेल? बाजारात जाऊन कधी भाजी खरेदी केली असेल? स्वत:चे कपडे तरी..

पुढे ‘न भूतो- न भविष्यती’ असं सलग नऊ तास चालणारं देखणं प्रॉडक्शन चंद्रकांत कुलकर्णी व त्याच्या टीमने सादर केलं. काकांच्या संघटन कौशल्याशिवाय आणि न झेपणाऱ्या स्वप्नांशिवाय हे शक्य झालं असतं? हेच काय, याच्या आधी पाहिलेलं ‘दुर्गा झाली गौरी’चं, वर उल्लेख केलेल्या तिन्ही महोत्सवांचं स्वप्न.. पण हे सगळं काकांनी यशस्वी करून दाखवलं.

प्रवेश तेरा

स्थळ : माहीमची शाळा.

नुकतंच मी ‘राजा सिंह’ हे लहान मुलांसाठीचं नाटक दिग्दर्शित केलं होतं. वर्तमानपत्रं, प्रेक्षक, छोटे-मोठे सगळ्यांनाच ते आवडत होतं. सहज भेटायला गेलो काकांना. बघताक्षणी त्यांनी फर्मान सोडलं.. ‘‘या महोत्सवात तू ‘आविष्कार’साठी एक नाटक करायचं.’’ झालं.. कुठेही, कधीही दिसलो की यांचं म्हणणं- ‘‘तालमी कधी सुरू करतोस?’’ (त्यावेळी माझ्या डोक्यात ‘इंदू काळे व सरला भोळे’  या पत्रात्मक कादंबरीला नाटय़रूप देता येईल का, याचा विचार घोळत होता.)

‘‘करतो.’’

हे माझे शब्द ऐकल्याबरोबर ते नाचायलाच लागले. ‘करतो..’ एवढं म्हणताच त्यांना झालेला आनंद मी आजही विसरू शकत नाही. नाटक हे त्यांचं व्यसन होतं. ती त्यांची झिंग होती. तेच त्यांचं जीवन होतं! तसं नसतं तर काकडेकाकू आणि धनंजयच्या जाण्याचं दु:ख ते पचवू शकले असते?

प्रवेश चौदा

स्थळ : पेण येथील चित्रकुटीर कलाग्राम.

‘आविष्कार’ने नवोदित नाटककारांची कार्यशाळा या ठिकाणी विनोद पवार यांच्या सहकार्याने आयोजित केली होती. शफाअत खान, जयंत पवार व मी असे त्याचे संचालक होतो. कार्यशाळा सुरू झाल्यावर काकांनी तिथून निघावं अशी दीपक राजाध्यक्ष, रवी-रसिक व आम्हा सगळ्यांचीच इच्छा होती. कारण त्याआधी काही दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांनी फार दगदग करू नये असं आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. पण काकडेकाका तीनही दिवस तिथे थांबून प्रत्येकाच्या राहण्याची, अगदी शिबिरार्थीचीही सकाळच्या नाश्त्याची, जेवणखाण्याची व्यवस्था झाली की नाही हे जातीने पाहत होते.

मोन्टाज..

स्थळ : काकांचं नवीन घर.

काका अत्यवस्थ असल्याचा दीपकचा फोन. ‘‘हॉस्पिटलमध्ये आहेत. भेटून जा!’’ मुंबईत दोन दिवसांनी जाणार होतो. पोचल्या पोचल्या दीपकला फोन केला. तो म्हणाला, ‘‘कदाचित आज त्यांना घरी घेऊन जातील. अर्चनाला (काकांची सून) फोन करून जा.’’ फोन करून मी, शफाअत खान व विनोद पवार काकांच्या घरी पोचलो. काकांना नुकतंच घरी आणलेलं. ते ग्लानीत होते. माझं मन त्यांना त्या अवस्थेत बघायला धजावत नव्हतं. शफाअत आणि विनोदने पुढे होऊन त्यांना बघितलं. मी सोफ्यावरून उठूही शकलो नाही.

स्थळ : पुन्हा काकांचं घर.

‘‘काका बरे होतायत. माणसांना ओळखू लागलेयत. बोलू शकत नाहीत, पण खुणेने गप्पा मारतात..’’ असा दीपकचा फोन. मी आणि विजय केंकरे (माझी एकटय़ाची डेरिंगच होत नाहीए.) काकांकडे.

काका झोपेत. अर्चना सांगते, ‘‘दोन दिवस एक्साइटमेंटमुळे झोपले नव्हते.’’ त्यांना बळे बळे उठवण्याचा प्रयत्न करते. काका डोळे उघडतात. क्षीणसे हसतात.. थकतात.. झोपतात..

स्थळ : पारसीवाडा स्मशानभूमी.

काकांची बरीच मित्रमंडळी जमलेली.. काही उसनं अवसान आणून हसायचा प्रयत्न करताहेत.. मी बाहेरच गप्पा मारत थांबलोय.. आजही तेच.. नाही जाता येत त्यांच्या जवळ.. खूपच लांबून त्यांना पाहतोय..

स्थळ : रवींद्र नाटय़मंदिर.

सध्याचे प्रकल्प संचालक श्री. चवरे यांनी रवींद्रमध्ये बांधल्या जाणाऱ्या प्रायोगिक नाटय़गृहाच्या आराखडय़ावर चर्चा करण्यासाठी बोलावलंय.. याआधी सात वेळा अशीच चर्चा करण्यासाठी मी गेलोय.. प्रत्येक वेळेस काका बरोबर होते.. धीर, आधार होता.. आज पहिल्यांदाच काका बरोबर नाहीत.. पण या वास्तूत आहेत.. शेजारच्या मिनी थिएटरमध्ये आज त्यांचं स्मरण करण्याचा कार्यक्रम आहे.. योगायोग म्हणायचा? माहीत नाही. विश्वासही नाही.

मला वाटतं, स्मरण हे विस्मरणात गेलेल्यांचं करतात.. काका विस्मरणात जातील? त्यांचं स्मरण करण्यापेक्षा त्यांना सलाम करू या..

pradeep.mulye@gmail.com