News Flash

स्त्रीकेंद्री नातेसंबंधांच्या कथा

कथासंग्रहाची सुरुवातच ‘रुक्मिणी’ या उत्कृष्ट कथेपासून होते. रेणुका ही इनामदारांच्या आश्रित कीर्तनकाराची मुलगी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जुई कुलकर्णी

ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांच्या निवडक कथा प्रभा गणोरकर यांनी संपादित केल्या आहेत. अशा प्रकारचा कथासंग्रह वाचणे नेहमीच आनंद देणारे असते, कारण त्यात वाचकाला पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. या कथा वाचताना तीस-चाळीस वर्षांपूर्वीची आयुष्याची जी एक संथ लय होती तिची लख्ख जाणीव झाली. ही लय आता आपल्या वर्तमान डिजिटलमय आयुष्यातून पुसूनच गेली आहे. या कथा स्त्रीकेंद्री आहेत. स्त्रीसंघर्षांचे या कथांमधले मुद्दे आता थोडेसे कालबा झाले आहेत, तरी या कथा वाचकाला आनंद देतात.

कथासंग्रहाची सुरुवातच ‘रुक्मिणी’ या उत्कृष्ट कथेपासून होते. रेणुका ही इनामदारांच्या आश्रित कीर्तनकाराची मुलगी आहे. त्या काळाच्या मानाने रेणू जरा बंडखोरच म्हणायला हवी. तिचं आणि आजीचं नातं मोकळं आहे. आजीला तिच्या श्रद्धेवरून डिवचायला रेणूला आवडतं. इनामदारांचा मुलगा अनंता तिचा बालमित्र आहे. अनंता नवरा झाल्याने तिला जरासा धक्काच बसला आहे. आपण ‘आश्रित’ हे काही तिच्या मनातून अजूनही सरलेलं नाही. रेणूच्या अनंताकडून जरा हळुवार सेक्शुअल अपेक्षा आहेत. कीर्तनकार वडिलांचं रुक्मिणी आख्यान ऐकत मोठी झालेली ही रेणू. रेणूचा हा मुलीपासून बाई होण्याचा प्रवासच या ‘रुक्मिणी’ कथेत रेखलाय आणि बाई म्हणून अंगावर पडणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या- बायकोच्या भूमिकेत शिरताना ती आपल्याला दिसते, तेव्हा जणू आपल्या डोळ्यासमोर वाढलेली कुणी लहानगीच आपल्याला स्त्री म्हणून मोठी होताना दिसते. ‘रुक्मिणी’ ही अतिशय परिपूर्ण कथा आहे. कथावस्तू, बांधणी, मांडणी सगळं काही परिपूर्ण आहे. या कथेचं बोट धरून आपण जुन्या काळात जातो.

‘महावस्त्र’ ही कथादेखील याच काळातली. इथं आयुष्यभर एकाच मालकाशी सेवा रुजू करणाऱ्या आचार्याची गोष्ट येते. एक दरिद्री, अशिक्षित, पण त्याच्या कामात पारंगत असणारा माणूस वर्षांनुवर्षे एकाच कुटुंबाची चाकरी करतो. त्याच्या आयुष्याचे महावस्त्र जणू सेवेत वापरून वापरून झिजत विरून जाते. या मोरेश्वर आचार्याची कुरूप, पण सुशिक्षित बायको आणि मुलगा असा परिवार असणं- ही या महावस्त्राला असलेली भरजरी किनारच म्हणायला हवी. हा मोरेश्वर घराचाच भाग बनत जातो. त्याने केलेल्या छोटय़ा चोऱ्याही समजून घेऊन दुर्लक्षित केल्या जातात. बदलत्या काळानुसार मोरेश्वरला त्या घरात जागा नसणं हेदेखील अपरिहार्य होतं. सरंजामशाही या दुर्गुणासोबत सर्वसमावेशक सहिष्णुता हे कदाचित त्या इनामदारी व्यवस्थेचं लक्षण असावं. अर्थात, हे काही सद्गुणी घरांच्या बाबतीतच शक्य असेल.

‘प्रदीर्घ’ ही कथा मृत्यूची वाट पाहत जगणाऱ्या नानांची. ही कथा वाचताना प्रत्येकाला आपापली आजी, आजोबा किंवा आई, वडील आठवतील. भरल्या घरात सेवेला सगळे असले तरी म्हातारपण हाच एक भयंकर रोग असतो. रोजच्या जगण्यातून वृद्ध माणसं बाहेर फेकली जातात. नवरा-बायको आणि सोबतचे सारे मरतात आणि शरीर साथ सोडतं. मृत्यूची प्रदीर्घ वाट बघत जगणं ही मृत्यूपेक्षा वाईट गोष्ट असते.

‘निवडुंग’ ही कथा पुन्हा एकदा इनामदार कुटुंबातली. गायत्री ही नवऱ्याने टाकलेली तरुणी आश्रित म्हणून जान्हवीबाई आणि दादासाहेबांच्या आश्रयाला येते. त्यांचा मद्यपी मुलगा- विश्वाससोबत विनाकारणच तिचे नाव जोडले जाते. गायत्री एखाद्या निवडुंगासारखी आहे. खरं तर प्रत्येक बाईच अशी निवडुंगागत चिवट असते. कथा वाचून झाल्यावर गायत्री मनात राहून जाते. ही गायत्री देखणी नाही, पण स्वाभिमानी आहे. थोडीशी शिकलेली आहे. स्वत:चं काटेरी आयुष्य विश्वासच्या पत्नीच्या संसारात घुसून- तो संसार नष्ट होऊ नये म्हणून ती घर सोडून बाहेर पडते. ही कथा वाचकाला सकस अनुभव देते.

‘एका पावसाळी संध्याकाळी’ ही नराश्य विषयावर असलेली कथा. इथं रक्ताचं नातं नसलेल्या दोन व्यक्तींचा समावेश आहे. सुमित्रेचा दूरचा भाऊ असलेला गुणवंत एकेकाळी तिच्या मनातला नियोजित वर होता. त्यांचं लग्न होऊ शकलं नाही; पण दोघांचं मत्रीचं नातं तुटलेलं नाही. आता गुणवंतचा विशीचा मुलगा जय डिप्रेशनमध्ये आहे, तेव्हा तो सुमित्रेला मदतीसाठी हाक मारतो. सुमित्रा आता तिच्या संसारातून मोकळी झाली आहे. ती जयला खंबीरपणे स्वत:च्या मुलाप्रमाणे बरं करते. ही कथा अवास्तविक वाटते.

‘दर्पण’ कथा मानवी स्वभावाचे नमुने दाखवणारी आहे. नवरा पळून गेल्याने सरूताई ही बाई लहान पोरीसोबत डॉक्टरीण सुधाबाईंकडे आश्रित म्हणून येते. स्वयंपाकीण म्हणून घरातच राहू लागते. सरूताई स्वभावाने मग्रूर, बोलायला उर्मट आणि चोरटय़ा प्रवृत्तीची आहे. सुधाबाईंचे जे जे आहे ते ते आपल्याला मिळालं नाही म्हणून सरू तळतळते. ती स्वत:ला सुधाचं प्रतिबिंबच समजते. या कथेत या दोघींचं अनेक वर्षांचं नातं तयार होतं, ते वाचनीय झालं आहे. सुधाबाईंच्या यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ असण्याचा आणि त्यांना मूल नसण्याचादेखील एक कंगोरा त्यात ठळकपणे दिसतो.

‘प्रस्थान’ ही एकत्र कुटुंबातल्या नानींची कथा आहे. नानी वृद्धत्वाला कंटाळलेली असली तरी तिची जगण्यावरची वासना ओसरलेली नाही. कुटुंबीय नाइलाजाने नानीचं सगळं करत आहेत; पण खरं तर तिच्या मृत्यूचीच वाट बघत आहेत.  मुलं, सून, नातवंडं, नातसुना सगळेच तिच्या मृत्यूची वाट पाहतात.

अशीच एक उत्तम कथा आहे ‘नातं’. आई आणि मुलाचं नातं तसंही विलक्षण असतं. इथं अमेरिकेत राहणारा, लग्नाला आलेला मुलगा आणि त्याची स्वतंत्र विचारांची बुद्धिवादी प्राध्यापक आई असं जरासं वेगळं नातं आहे. या कथेतील आई पारंपरिक नसल्याने कथा रंगतदार झाली आहे.

‘शेजारधर्म’ हा प्रकार आजकाल शहरांमध्ये तरी दुर्मीळच झाला आहे. यातील ‘मैत्रीण’ ही कथा यावरच भाष्य करते. कथेतील उत्तर भारतीय शेजारीण मिसेस मिश्रा घरगुती हिंसाचाराची पीडिता. याच मिसेस मिश्रांबद्दल कथा नायिकेला स्त्रीसुलभ आपुलकी वाटते; पण  दोघींमधील सांस्कृतिक- सामाजिक फरकामुळे मिसेस मिश्राला स्वत:ची स्थिती वाईट आहे, हेच उमगत नाही. त्यामुळे ती नायिकेची मदत नाकारते. परिणामी त्या दोघींचं नातं हे अन्न वाटून घेण्यापलीकडे जात नाही.

नागपुरी लहेजाची मराठी हे आशा बगेंच्या भाषेचं वैशिष्टय़! आशा बगे स्त्रीत्वाचे सगळे कंगोरे या कथांमध्ये दाखवतात. अपवादात्मक पात्र सोडता त्यांना खंबीर, बुद्धिमान, सुशिक्षित, कर्तृत्ववान स्त्रिया रंगवायला आवडतं. काळानुसार त्या स्त्रिया पारंपरिक पद्धतीने जगतात तरी त्या मजबूत आहेत, कमकुवत नाहीत. स्त्रीकेंद्रीपणापलीकडे बदलत जाणाऱ्या नातेसंबंधांचे चित्रण हा या कथांचा विशेष आहे.  पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आणि निर्मिती दर्जेदार झाली आहे.

‘आशा बगे यांच्या निवडक कथा’

संपादक : प्रभा गणोरकर

पद्मगंधा प्रकाशन,

पृष्ठे – २५६, मूल्य – ३३० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:14 am

Web Title: article on asha bage yanchya nivadak katha by prabha ganorkar book review abn 97
Next Stories
1 निखळ निर्मळतेचा शोध
2 सांगतो ऐका : मोझार्ट एक जिवंत आख्यायिका
3 या मातीतील सूर : ब्रह्मकमळ : आनंदघन
Just Now!
X