प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. श्रीधर दत्तात्रेय महाजन यांनी ११ नोव्हेंबर  रोजी वयाच्या ८१व्या वर्षांत पर्दापण केलं आहे.  निव्र्याज मनाच्या महाजन सरांचा ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें’ हा जीवनधर्म आहे. ते अनेक निसर्गप्रेमी तरुणांचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याविषयीचा विशेष लेख..
१९ ९५ साली मुंबईहून स्थलांतर करून मी पुणे नामक विद्यानगरीत स्थायिक झाले आणि लगोलग एका बृहत्कोशाच्या जुळवाजुळवीस प्रारंभ केला. १९९६-९७च्या सुमारास केव्हातरी मी वनस्पतिशास्त्रीय नामसंज्ञांच्या शोधात होते. त्यासाठी मी प्रथम गरवारे महाविद्यालयातील प्रा. प्र. के. घाणेकर यांना भेटले. त्यांनी बऱ्याच अंशी माझं शंकासमाधान केलं. पण काही प्रश्न अनुत्तरित राहिले; तेव्हा उदार मनानं त्यांनी मला विख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. श्रीधर दत्तात्रेय महाजन यांच्याकडे जाण्याचा रस्ता दाखवला आणि त्याप्रमाणे मी त्यांची समक्ष भेट घेतली.
त्या भेटीत मला त्यांच्या ऋजु व्यक्तिमत्त्वाचा जो साक्षात्कार घडला, त्याची मोहिनी आजतागायत माझ्या मनावरून उतरलेली नाही. त्यांनी आयुष्यभर ज्ञानसाधना करण्याच्या निमित्ताने ज्या तरुलतांवर निरपेक्ष प्रेम केलं त्यांचीच उपमा देऊन वर्णन करायचं तर – भवन्ति नम्रास्तरव: फलागमै:। या सुभाषिताचा साक्षात् पडताळा म्हणजे महाजन सर. केव्हाही कुठलीही शंका मी त्यांना विचारावी आणि त्यांनी अत्यंत आनंदाने शंकानिरसन करावं, तत्काळ समर्पक उत्तर देता आलं नाही तर वेळ मागून घ्यावा आणि संदर्भग्रंथ पाहिल्यावर मागाहून आपण होऊन फोन करून योग्य उत्तर कळवावं. आपलं अज्ञान लपवण्यासाठी थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. कधी त्रासिकपणा नाही की चिडचीड नाही. दिसायला साधीसुधी असूनही ही व्यक्ती अवतीभोवती वावरणाऱ्या अनेक निसर्गप्रेमींचे आणि जिज्ञासु विद्यार्थ्यांचे आदरणीय ‘बापू’ आहेत, हे मला हळूहळू उमगत गेलं.
त्यांच्या जीवनाचा आलेख पाहिला तर, एका व्यक्तिमत्त्वाला किती विविध पैलू असू शकतात ते प्रत्ययाला येतं. पुण्यातील नू. म. विद्यालय आणि फग्र्युसन महाविद्यालय ही त्यांची ज्ञानभूमी आणि पुणे व मुख्यत्वेकरून कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी. बालपणी मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांच्या विविध परीक्षा देऊन त्यांनी जसं भाषांमध्ये प्रावीण्य मिळवलं, त्याचप्रमाणे मोठेपणी मुख्यत: वनस्पतिशास्त्रात त्यांनी अव्वल दर्जाचं यश संपादन केलं. शैक्षणिक कर्तुकीच्या काळात व त्यानंतरही त्यांना ‘निसर्गमित्र,’ ‘वनमित्र’ यांसारखे मानाचे अनेक पुरस्कारही मिळाले. पण वनस्पतिशास्त्र हा त्यांच्या निव्वळ विद्याभ्यासाचा विषय राहिला नाही, तर ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें’ हा त्यांचा जीवनधर्म बनला.
काही वर्षांपूर्वी डॉ. अनिल अवचट यांनी एका दिवाळी अंकात महाजन सरांवर एक लेख लिहून त्यांचं हळुवार व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवताना, त्यांच्या बालपणीचा एक किस्सा वर्णन केला होता. घराच्या छपरावर चढलेल्या एका वेलाच्या तणाव्याचं निरीक्षण करण्यासाठी बाल श्रीधर रात्रभर माळ्यावर चढून बसला आणि त्यानं स्वत:चं बोट त्या तणाव्यात गुंतवलं. हळूहळू त्या तणाव्यानं श्रीधरच्या बोटाला वेढे द्यायला सुरुवात केली आणि श्रीधर हरखून गेला. त्या वेलानं श्रीधरच्या बोटालाच नव्हे, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वालाच जो विळखा घातला तो आजतागायत सुटलेला नाही. निसर्गाचा हा चमत्कार निरखण्यात देहभान विसरणाऱ्या त्या बालकानं आजही ‘प्रौढत्वीं निज शैशव’ जपलेलं आहे.
१९६० साली एम. एस्सी. परीक्षेत पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन त्यांनी ‘वनस्पतिशास्त्र’ विषयात उज्ज्वल यश प्राप्त केलं तेव्हा, ‘सपुष्प वनस्पती’ (angiosperms) हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. त्यानंतर सुरुवातीची काही र्वष ‘भारतीय वनस्पति सर्वेक्षण संस्थे’त ‘हर्बेरियम क्युरेटर’ (शुष्कवानस अभिरक्षक) म्हणून काम केल्यानंतर, १९६३ ते १९९३ ही सलग ३० र्वष कोल्हापूरच्या ‘गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालया’त वनस्पतिशास्त्र व जीवशास्त्र या विभागांचं प्रमुखपद सांभाळलं. निवृत्तीनंतर पुणे विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ येथे ते ‘मानद प्राध्यापक’ म्हणून वावरले.
उपजीविकेचा व्यवसाय करत असतानाही, म्हणजे साधारणपणे १९५५ ते २०११ या काळात अनेक निमित्तानं त्यांनी महाराष्ट्र, गोवा, मध्यभारत, कर्नाटक, हिमालय, ईशान्येकडील राज्यं, याप्रमाणे जवळजवळ भारतभर भटकंती करून विविध जंगलांचा अभ्यास केला. तेथील औषधी व सपुष्प वनस्पतींचं संशोधन करून नामकरण व वर्गीकरण केलं, तेथील गवताळ कुरणं व जलमय भूमी यातील परिसंस्थांची पाहणी केली. त्या अनुषंगाने पर्यावरणशास्त्राचंही अध्ययन केलं. अनेक विद्यापीठीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत भाग घेऊन शोधनिबंध सादर केले, पर्यावरणविषयक संस्था स्थापन केल्या आणि जैवविविधता व तिचे संवर्धन यांविषयी लोकांचे प्रबोधन केलं. काही नियतकालिकांतून त्यांनी वनस्पतिविषयक ज्या लेखमाला लिहिल्या त्यातून अलीकडेच त्यांची ‘आपले वृक्ष’ (२००९) व ‘देशी वृक्ष’ (२०१०) (भाग १ व २) अशी दोन पुस्तकं साकारली. पाठोपाठ नुकतंच २०१२ साली त्यांचं ‘विदेशी वृक्ष’ हेही पुस्तक प्रकाशित झालं.
जनसामान्यासाठी पुस्तक लिहिताना ते जडजंबाळ होऊ नये याचं त्यांना पक्क भान असतं. त्यामुळे सामान्य वाचकांना वृक्षांची शास्त्रीय माहिती देऊन त्यांचं प्रबोधन करीत असतानाही, ललितसुंदर शैलीच्या योगानं ते वाचकांना वृक्षवनांची मानसिक सफर घडवून आणतात. जोडीला गुळगुळीत कागदावर सर्व वृक्षांची नयनमनोहर छायाचित्रंही आहेतच. ठायीठायी संस्कृत साहित्यातील वृक्षांच्या उल्लेखांसहित सुवचनं विखुरलेली आहेत. चंदन वृक्ष दुर्मीळ असतात असं सुचवणारं ‘चन्दनं न वने वने’ हे सुभाषित आता तितकंसं सार्थ राहिलेलं नाही असं सांगताना, महाजन सर एकदम ‘चन्दनं हि वने वने’ असं म्हणून त्या वचनाला सुखद कलाटणी देतात. कालिदासाच्या ‘रघुवंश’, ‘मेघदूत’ ‘कुमारसम्भवम्,’ ‘ऋतुसंहार’ आदी काव्यांतील सुंदर सुंदर पंक्तींचा तर त्यांच्या ठायी सुकाळ आहे. ‘अंजन’ आणि ‘अंजनी’ या दोन वृक्षांतील फरक समजावून देताना त्यांना गोविंदाग्रजांच्या श्रीमहाराष्ट्र गीतातील ‘अंजनकांचन – करवंदीच्या कांटेरी देशा..’ ही ओळ चटकन् आठवते. प्राकृत ‘गाथासप्तशति’शीही त्यांची ओळख आहे.
भारतातील परंपरागत आयुर्वेदाचाही सरांना बऱ्यापैकी परिचय आहे आणि ‘आयुर्वेद’ म्हटला म्हणजे भारतीय वृक्षसंपदा आलीच. त्यामुळे जागोजागी सरांनी ‘धन्वन्तरि निघण्टु’ या ग्रंथराजातील संदर्भ दिलेले आहेत. दोन्ही खंडांत झाडांच्या वनस्पतिशास्त्रीय नामसंज्ञा तर आहेतच, शिवाय प्रारंभी वनस्पतींचं वर्गीकरण ((taxonomy) व नामकरण ((nomenclature) कसं केलं जातं त्याची शास्त्रीय माहिती दिलेली आहे. प्रत्येक  वृक्षावरील लेखात, जनमानसात रुजलेल्या त्या त्या वृक्षाशी निगडित अशा दंतकथा, समजुती यांचा निर्देश असल्याने लेखाची रंजकता तर वाढतेच, पण शिवाय त्या वनस्पतींची फुलं, फळं वा लाकूड यांचे व्यावहारिक वा औषधी उपयोगही सांगितलेले असल्याने त्यांची उपयुक्तताही जाणवते. येथे ज्ञानेश्वरमाऊलींच्या अजानवृक्षाबरोबर गोपीकृष्णांचा कदंब, तरुणींचा प्रियतम अशोक वृक्ष आणि वृद्धप्रिय धार्मिक रुद्राक्ष वृक्षही भेटीला येतो. थोडक्यात, ही पुस्तकं म्हणजे ललितरम्य शैलीतील छोटेखानी वृक्षज्ञानकोशच आहेत. त्यांनी synonym ला ‘सनाम’ व ‘जीवविविधता’ चा यथोचित संक्षेप (syncope) करून ‘जीविधता’ असे सुटसुटीत पारिभाषिक शब्दही प्रचारात आणले.
फुलपाखरांच्या पंखांवरील रंगकलाकुसर पुसली जाऊ नये म्हणून त्याला हातही न लावणारे महाजन सर-
कां कमळावरी भ्रमर। पाय ठेविती हळुवार।
कुचुंबैल केसर। इये शंका।। (ज्ञाने. १३.४७)
अशा ‘शिरीषकुसुमाहुनहि कोमल’ हृदयाच्या महाजन सरांच्या आयुष्यात २००६ साली प्रचंड उत्पात घडला. त्यांचा थोरला मुलगा डॉ. दीपक महाजन हा वडिलांसारखाच निसर्गप्रेमी, पण लौकिक आयुष्यात अस्थिव्यंगोपचार क्षेत्रातील एक कर्तबगार शल्यकर्मी. सवंग व्यापारी वृत्तीच्या दोन स्त्रियांच्या कपटकारस्थानाला बळी पडून अवघ्या ४३ वर्षांच्या दीपकची निर्घृण हत्या झाली. अवघं पुणं हादरलं. पुण्यात त्या काळी गाजलेला हा खून खटला. पण आपली (अ) न्यायव्यवस्था तर त्याहूनही पाषाणहृदयी. खालच्या कोर्टाने दोषी ठरवूनही त्या गुन्हेगार स्त्रिया उच्च न्यायालयाच्या कृपेनं अजूनही शिक्षेपासून मुक्त आहेत. महाजन पतिपत्नींवर तर वज्राघात झाला. ‘ओस झाल्या दिशा’ असं म्हणून महाजन सर दुखातिरेकानं सैरभैर झाले आणि जवळजवळ तीन र्वष विजनवासातच गेले. पण हळूहळू अत्यंत कष्टानं का होईना, पण त्या दुखावर सद्विचारानं मात करून त्यातून बाहेर आले आणि पुन्हा कार्यरत झाले. पण आता एकच ध्यास- जे जे करायचं ते ‘दीपकार्पण’ करायचं नि त्याच्या ‘स्मृतिवना’त विहार करायचा.
११ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांनी वयाच्या ८१व्या वर्षांत पर्दापण केलं आहे. आता त्यांचा खरा ‘वानप्रस्थाश्रम’ सुरू झाला आहे. दीपकच्या वयाच्या तरुण निसर्गप्रेमींना बरोबर घेऊन वनविहाराला जाणं, त्यांना मार्गदर्शन करणं, निसर्गनिरीक्षणाच्या अनेकविध उपक्रमांत सहभागी होणं, वृक्षसंपदाविषयक ग्रंथलेखन करणं अशा कामांत आताशा ते आपला वेळ व्यतीत करतात. किरण पुरंदरंेसारखे तरुण पक्षीवेडे आणि दुखतप्त कुटुंबीय यांचा ते आधारवडच आहेत. आपल्या सुंदर, सुकोमल हस्ताक्षरातून प्रतिबिंबित होणारे निव्र्याज मनाचे महाजन सर अनेक निसर्गप्रेमी तरुणांचे मार्गदर्शक आहेत. म्हणूनच म्हणते –
महाजनो येन गत: स पन्था:।

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन