प्रियांका तुपे

priyanka.tupe@expressindia.com

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

‘स्वामी अँड फ्रेंड्स’, ‘मालगुडी डेज’अशा अजरामर कथामालिका लिहिणारे  आर. के. नारायण हे भारतीय भाषांतील प्रभावशाली कथाकारांपैकी एक आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह अनुवादित साहित्यातील एक मौल्यवान ठेवा आहे.

या कथासंग्रहातील २८ कथा या काही दशकांपूर्वी लिहिलेल्या असल्या तरी सदाबहार आणि टवटवीत आहेत. भरपूर रंजन करणारी कथांमधली जिवंत पात्रं, खुमासदार शैलीतलं निवेदन, निखळ विनोद आणि दैनंदिन जगण्यातल्या गमतींसह टिपलेला विरोधाभास ही या कथांची ठळक वैशिष्टय़े आहेत. ‘नित्या’ ही यातील पहिलीच कथा आजच्या पिढीची वाटते. कथेचा नायक नित्या त्याच्या आई-वडिलांना प्रश्न विचारून भंडावून सोडतो. खरं तर नित्याच्या लहानपणी, त्याची प्रकृती सुधारण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी एक नवस केला होता. परंतु नित्या २० वर्षांचा झाला तरी नवस फेडणं काही शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आता त्याचे आई-वडील नवस फेडण्याची तयारी करत होते. नवसासाठी एका टेकडीवरच्या देवळात नेऊन त्याचं मुंडण करावं लागणार होतं. नित्याला हे कळताच तो खट्टू झाला. मुंडण करणं त्याला मान्य नव्हतं. त्यावरून त्याने आई-वडिलांना भरपूर प्रश्न विचारले. आई-वडिलांसोबत देवळात जाणं टाळण्यासाठी त्यानं भरपूर क्लृप्त्या केल्या. नवसाची गोष्ट कळल्यावर नित्या काय काय करामती करतो, आई-वडिलांना कसा चकवा देतो, याची ही कथा! वरवर पाहता अत्यंत साधीशीच. परंतु नित्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीतून लेखकाला अधोरेखित करायचा आहे तो – विवेकवाद. कोणतीही गोष्ट केवळ ज्येष्ठांनी सांगितली म्हणून करण्यापेक्षा प्रश्न विचारणं, संवाद करणं, तर्कबुद्धीचा वापर करणं अशा कित्येक बाबींची सुरेख गुंफण कथाकार चटकदार संवाद नि हलक्याफुलक्या विनोदाच्या आधारे करतो. कोणतीही गोष्ट सरधोपटपणे स्वीकारण्याऐवजी, असं का? असे प्रश्न विचारण्याची नित्याची वृत्ती आणि खूप निरागसपणे या कथेतून समोर येते. माणसातला निरागसपणा, सहजता नारायण यांच्या सर्वच कथांमध्ये दिसते.

या कथा म्हणजे बोधकथा नव्हेत, तरीही विचार-मूल्यांचा संघर्ष त्यात आहे. माणसांचे विविध मनोव्यापार त्यात सहजपणे येतात. नैतिक-अनैतिकतेच्या चौकटी ठरवण्यापेक्षा माणसाच्या दैनंदिन जीवनात काय घडतं, याची दृश्य चित्रणं यात केलेली आहेत. ‘अर्ध्या रुपयाची किंमत’सारखी कथा सुबय्या या धनदांडग्या तांदूळ विक्रेत्याच्या क्रूरपणावर भाष्य करते. अर्धा रुपया कमी आहे म्हणून अन्नान्नदशा झालेल्या एका व्यक्तीला तांदळांसाठी तिष्ठत ठेवणाऱ्या सुबय्याचा, त्याच तांदळाच्या गोदामात, धान्याच्या गोण्या अंगावर पडून होणारा मृत्यू चटका लावून जातो.

नुकताच चाळिशीत पदार्पण केलेला रामा राव स्वत:च्या वाढदिवसाची खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात जातो. पण घेतलेल्या नवीन कपडय़ांचे पैसे देताना त्याच्या लक्षात येतं, की त्याचं पाकीटच खिशात नाही. बहुतेक बसमधल्या गर्दीत पाकीट मारलं गेलं असावं, असा विचार करून तो निराशेनेच ते कपडे दुकानदाराला परत करतो. घरी जाण्यासाठी बसच्या तिकिटापुरतेही पैसे त्याच्याकडे उरत नाहीत, त्यामुळे त्याला चालत घरी जावं लागतं. दुसऱ्या दिवशी, सुटी घेतलेली असूनही तो कामावर हजर होतो. वाढदिवसाचा बेत सफल न झाल्याची घटना विसरून तो काम करू लागतो. सामान्य माणसाला, श्रमिक वर्गातील लोकांना साध्यासुध्या इच्छाही अनेकदा मारून टाकाव्या लागतात. जीवनाचा वेग, अभावग्रस्तता, असुरक्षितता यामुळे दु:ख करत बसणं त्यांना परवडत नाही. आनंद साजरा करणं आणि दु:ख करणं दोन्ही गोष्टी न परवडल्यानं कोटय़वधी सामान्य माणसं दररोज दिवस पुढे ढकलत राहतात. ती जिवंत असतात पण ‘जगत’ नाहीत. भांडवली जगातलं हे प्रखर वास्तव नारायण ‘चाळिशीतील फलप्राप्ती’ या कथेत अगदी सहजरीत्या सांगतात.

संवेदनशीलपणे पाहिलेला भवताल उपहासगर्भ शैलीत रेखाटणं, माणसांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्या प्रसंगांमधील अंतर्विरोध विनोदी शैलीत प्रकट करणं, ही नारायण यांच्या एकंदर सर्वच लघुकथांमध्ये आढळणारी लेखनशैली आहे. माणसांच्या वर्तनव्यवहारांचं बारकाईने केलेल निरीक्षण, अनुभवांना कथात्मकतेची जोड देण्याची अफाट क्षमता यामुळे नारायण यांच्या कथा प्रचंड वाचनीय आहेत.

‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ या संग्रहातील कथांमधली पात्रं जितकी जिवंत, तितकंच रसरशीत वर्णन येतं ते यातल्या भौगोलिक प्रदेशांचं, प्राण्यांचं. कुत्रा, माकड, साप हे प्राणी या कथांमधून वेगळ्याप्रकारे भेटतात. दाक्षिणात्य समाज, तेथील भू-सांस्कृतिक प्रदेशांची वर्णनं निव्वळ वाचनीय आहेत. या कथांमधील अण्णामलाई, सुबय्या, रामा रावसारख्या व्यक्तिरेखा मनात घर करून राहतात.

या कथा अनुवादित करताना त्यातलं ओघवतेपण अबाधित राखण्याचं मोठं आव्हान नंदिनी देशमुख यांनी यशस्वीरीत्या पेललं आहे. कथांमधील वर्णनं, संदर्भ दाक्षिणात्य संस्कृतीशी संबंधित असले तरीही ते परके वाटत नाहीत. उत्तम अनुवादानं ही किमया साधली आहे.

‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’

आर. के. नारायण

अनुवाद- नंदिनी देशमुख

मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- २३४, मूल्य – ३०० रुपये.