29 March 2020

News Flash

स्वप्नाचा कणाच मोडला..

‘क्राफ्ट वर्ल्ड, काश्मीर’ म्हणून मानाने मिरवणाऱ्या आमच्या ऑनलाइन विणकाम व्यवसायाला उतरती कळा लागली.

(संग्रहित छायाचित्र)

‘५ ऑगस्टला सरकारने काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद केली आणि सर्व काही ठप्प झालं. ‘क्राफ्ट वर्ल्ड, काश्मीर’ म्हणून मानाने मिरवणाऱ्या आमच्या ऑनलाइन विणकाम व्यवसायाला उतरती कळा लागली. तब्बल ४४ हजार ‘फॉलोअर्स’ असलेल्या आमच्या तंत्रस्नेही व्यवसायासाठी सध्या बिकट काळ आहे.

विणकामाबद्दल आम्हा दोघींना माहिती असल्याने आमच्या कलागुणांना वाव देता येईल असा मंच उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही २०१५ मध्ये हा व्यवसाय सुरू केला. मग आम्ही आमची कला व उत्पादने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही पेश करू लागलो. या व्यवसायात नावीन्य असल्याने ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि आम्ही भाग्यवान ठरलो. यात कल्पकता होती. काश्मीरमधील अशा प्रकारचा हा पहिलाच व्यवसाय होता. गेल्या तीन वर्षांत आमच्या व्यवसायाचा विस्तार झाला आणि मग आम्ही नववधूंसाठी फुलांचे दागिने बनवण्यास सुरुवात केली. लोकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला. म्हणून मग आम्ही आणखी वस्तू, उत्पादने उपलब्ध करून देऊ  लागलो.

५ ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद होण्यापूर्वी सर्व काही व्यवस्थित होते. आम्ही प्रशिक्षित केलेल्या १५ मुलीही आमच्याबरोबर या व्यवसायाला हातभार लावत होत्या. आमच्यासह २० जणांना या व्यवसायाने रोजगार दिला होता. परंतु काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद झाल्यापासून आम्ही फेसबुक व इन्स्टाग्रामवर माहिती अद्ययावत करू शकलेलो नाही. परिणामी आमच्या कारागिरांच्या हाताला आजघडीला रोजगारच नाही. आमचा व्यवसाय हा ९० टक्के इंटरनेटवर अवलंबून होता. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आम्ही तयार केलेली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत होतो. या माध्यमातून आमच्याकडे मागणी नोंदवली जायची आणि आम्ही ती उत्पादने ग्राहकांना पुरवीत असू. मात्र, इंटरनेट सेवा बंद झाल्यापासून सगळेच संपले आहे. आमचा व्यवसाय गाळात जाण्याच्या मार्गावर आहे.

काश्मीरमधील नेटबंदीने आमच्या नवउद्योगाच्या कल्पनाच मारल्या  आहेत. ही बंदी केवळ इंटरनेटवरील नाही, तर ती आमच्या कामावर, सृजनशील कल्पनांवर आणि आमची नवोन्मेषाची स्वप्ने तसेच आमच्या जगण्यावरही आहे. या इंटरनेटबंदीने आमचे केवळ जगणेच हिरावून घेतले असे नाही, तर आमच्यासोबत काम करणाऱ्या मुलींचा रोजगारही हिसकावून घेतला आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे आमच्या वस्तूंकरिता मागणी नोंदली जाऊ  शकत नाही; परिणामी या मुलींना आम्ही कामही देऊ शकत नाही.

इंटरनेटबंदी, संभाषणबंदी यांसारख्या अस्त्रांचे आम्ही काश्मिरी नेहमीच लक्ष्य ठरतो. आम्ही दुसऱ्या राज्यात असतो तर कदाचित वेगळे चित्र असते. हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. इंटरनेट वापरण्याचा मूलभूत अधिकार आम्हाला का नाही?

इंटरनेटच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालविणाऱ्या काश्मीरमधील तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. इंटरनेट बंद झाल्यापासून अनेक तरुण मानसिक तणावाखाली आहेत. अनेकांनी त्यांचा व्यवसाय पूर्णत: बंद केला आहे. तर काही जण राज्याबाहेर पडून अन्य व्यवसायांकडे वळले आहेत आणि नव्याने संघर्षांला सामोरे जात आहेत.

बंद पडलेल्या इंटरनेटमुळे आम्हाला निराशावादी केले आहे. यामुळे झालेले आमचे मानसिक नुकसान कोण भरून काढणार? जगण्याच्या प्रयत्नांना आम्ही दिलेली कठोर परिश्रमांची जोड कुणी परत करू शकेल का? कधी कधी तर वाटते की, आम्ही इतर ठिकाणच्या लोकांसारखे भाग्यवान नाही. आमच्या स्वप्नांना काहीच किंमत नाही. ती चिरडणे सोपे आहे.

काश्मीरमध्ये आम्हाला यापूर्वीही इंटरनेटबंदीचा अनुभव आला होता. परंतु तेव्हा ब्रॉडबँड कार्यरत होते. म्हणून आम्ही आमचे काम कसेतरी चालू ठेवू शकत होतो. सरकार जेव्हा असे निर्णय घेते तेव्हा त्याचा तरुणांना आर्थिकदृष्टय़ा अधिक फटका बसतो. आमच्या व्यवसायाचा कणाच मोडला आहे. पहिल्यापासून पुन्हा उभे राहणे आता खूप कठीण आहे.’

(ओमैरा आणि बेनिश या श्रीनगरच्या दोन मुली. ‘क्राफ्ट वर्ल्ड, काश्मीर’ या तंत्रस्नेही मंचावरील (ऑनलाइन) दालनाच्या त्या प्रवर्तक आहेत. काश्मीरमध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्यापासून त्यांचा हा व्यवसाय प्रचंड तोटय़ात आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 4:10 am

Web Title: article on craft world kashmir online weaving business abn 97
Next Stories
1 सांगतो ऐका : अर्जेटिनामधील हस्तिनापूर
2 या मातीतील सूर : नाटय़संगीताचे भावपूर्ण वळण
3 बुद्धी-भावनांचं दृढ नातं
Just Now!
X