सिद्धार्थ खांडेकर

ग्लेन मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने खेळातील मानसिक ताण असह्य़ झाल्यामुळे क्रिकेटपासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच प्रकारे आणखीही काही जण क्रिकेटपासून दूर गेले आहेत. सतत यशस्वी होण्याचे दडपण, कधी न होणारा चांगला खेळ, संघनिवडीतील जीवघेणी स्पर्धा, संघात स्थान कायम राखण्याचा ताण अशा अनेक कारणांमुळे खेळाडू नैराश्यग्रस्त होताना दिसतात. याचे अनिष्ट परिणाम केवळ त्यांच्या खेळावरच होत नाहीत, तर व्यक्तिगत जीवनावरही होतात. खेळाडूंतील या वाढत्या मानसिक ताणाचा ऊहापोह करणारा लेख..

मानसिक कणखरपणासाठी क्रिकेटजगतात गेली अनेक दशके ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी गेल्या काही महिन्यांत मानसिक ताणाचे कारण दाखवत स्पर्धात्मक क्रिकेटपासून बेमुदत माघार घेतलेली आहे. त्यांच्या या कृतीनंतर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार राहुल द्रविड, माजी विक्रमवीर फलंदाज ब्रायन लारा यांनीही मानसिक अस्वस्थतेविषयी विधाने केली आहेत. व्यक्त केल्याने मानसिक ताण कमी होऊ शकतो असा या सर्वाच्या वक्तव्याचा मतितार्थ निघू शकतो. पण हे ‘व्यक्त होणे’ इतके सोपे नसते. किंबहुना, भारतासारख्या देशामध्ये मानसिक स्वास्थ्यविषयक समस्यांकडे सहानुभूतीने पाहण्याची संस्कृती आणि प्रवृत्ती रुजलेली नाही, हे विराट कोहलीने बोलून दाखविले आहेच. ऑस्ट्रेलियातील काही क्रिकेटपटूंनी बोलून दाखविली त्या स्वरूपाची भावना आपल्याकडील कितीतरी क्रिकेटपटू व क्रीडापटूंमध्ये दाटलेली असू शकते. तिचा अतिदाबामुळे स्फोट होऊ द्यायचा की त्या भावनेला वाट मोकळी करून द्यायची, हे ठरवणेही तितकेसे सोपे नाही. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटूंना मानसिक ताण, हुरहूर, भीती, चिंता, भयगंड, न्यूनगंड अशा भावना सतावत असतील यावर सुरुवातीला विश्वास बसणे कठीण होते. प्रतिस्पर्धी संघावर निव्वळ क्रीडाकौशल्य आणि शारीरिक क्षमतेनेच कुरघोडी करणे नव्हे, तर मानसिकदृष्टय़ा प्रतिस्पध्र्याचे खच्चीकरण करणे हे तेथील क्रिकेट संघाचे डावपेचात्मक धोरण होते. स्टीव्ह वॉ याने प्रतिस्पध्र्याच्या ‘मेंटल डिसिंटिग्रेशन’चा नारा दिलेला आजही अनेकांना आठवत असेल. तथाकथित मानसिक कणखरपणाच्या ठाशीव संकल्पनेतूनच शिवीगाळ किंवा स्लेजिंग सुरू झाले होते. वेस्ट इंडिजच्या दिग्विजयी संघासमोर उभ्या राहिलेल्या मोजक्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया होता. म्हणूनच या संघाविरुद्ध एकदा दारुण पराभव पत्करल्यानंतर अश्रुपात करणाऱ्या कर्णधार किम ूजला त्यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींची कोणतीही सहानुभूती मिळाली नव्हती. कारण ऑस्ट्रेलियन्स ‘टफ’ असतात, ही त्यांची प्रतिमा ऑस्ट्रेलियातील आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या मनात रूढ झाली होती. परंतु गेल्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला. मॅक्सवेलप्रमाणेच त्याचे ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया संघातील दोन सहकारी निक मॅडिन्सन आणि विल पुकोवस्की यांनीही मानसिक कारणास्तव क्रिकेटपासून दूर जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. महिन्याभरातच घडलेल्या या तीन घडामोडींमुळे हा प्रकार जणू साथीचा आजार बनल्याचे ध्यानात येऊ लागले. मॅक्सवेल हा एरवी अतिशय हसतमुख असलेला क्रिकेटपटू. मैदानावर- विशेषत: टी-२० प्रकारामध्ये अतिशय सहजपणे तो प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवतो. उपयुक्त गोलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक असल्यामुळे मैदानावर त्याची बऱ्यापैकी दहशत असते. या गुणत्रयीमुळेच आयपीएल आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये त्याच्या नावावर नेहमीच उंची बोली लागतात. परंतु २०१९ मधील विश्वचषक स्पर्धेत मॅक्सवेलला म्हणावी तशी छाप पाडता आली नव्हती. नंतर लगेचच झालेल्या आणि कोणत्याही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूसाठी विश्वचषकाइतक्याच प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेसाठी त्याची निवड झाली नव्हती. याचा नकारात्मक परिणाम मॅक्सवेलवर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅक्सवेलने क्रिकेटपासून तात्पुरता संन्यास घेण्याआधीच्या एका टी-२० सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते. तरीही क्रिकेटमुळे सातत्याने जाणवणारा ताण, चांगले खेळत राहण्याचे दडपण, सततच्या दौऱ्यांमुळे कुटुंबीयांपासून दूर राहावे लागणे नि या सगळ्यातून खेळाविषयी आणि क्वचित प्रसंगी आयुष्याविषयी उत्पन्न झालेली एक प्रकारची उबग याची लक्षणे दाखवणारा मॅक्सवेल एकटा किंवा अपवादात्मक क्रिकेटपटू नक्कीच नाही. त्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने- आजघडीला अत्यंत कणखर, आक्रमक, यशस्वी क्रिकेटपटू मानल्या जाणाऱ्या कोहलीने- २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील स्वानुभव कथन केला. त्या दौऱ्यात धावा होत नसल्यामुळे विराट हिरमुसला होता आणि त्याला मानसिक आधाराची गरज भासत होती. पण त्याबद्दल उघड बोलायची मात्र चोरी. कारण कुणाला काय वाटेल, ही भीती! म्हणजे मॅक्सवेलने क्रिकेटमधून माघार घेतली नसती तर कोहलीची ही नैराश्यकथा उजेडातच आली नसती! मॅक्सवेल आणि कोहली यांच्यासारख्या यशस्वी आणि आक्रमक क्रिकेटपटूंवर अशी वेळ येत असेल तर इतर तुलनेने कमी अनुभवी, कमी आक्रमक, कमी यशस्वी क्रिकेटपटूंचे काय होत असेल, याचा विचार आता क्रिकेटजगतात सुरू झाला आहे.

खेळाडू आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य या विषयावर चर्चा करताना प्रतिस्पध्र्यासमोर नांगी न टाकणे आणि प्रतिस्पध्र्याच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेणे, या दोन विषयांवरच बहुधा लक्ष केंद्रित केले जाते. व्यावसायिक खेळाडू अनेक प्रलोभनांचा त्याग करून उच्च स्तरावर पोहोचत असतात किंवा पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. बालपणीचे खेळण्या-बागडण्याचे क्षण, मित्र-मैत्रिणींचा सहवास, आई-वडिलांचे प्रेम, इतर प्रकारची चंगळ यांचा त्याग करणे खचितच सोपे नसते. हे सगळं केल्यानंतरही यशाची खात्री नसतेच. त्यात आणखी नशिबाचा भाग आला की अपयशी खेळाडूंमध्ये कमनशिबीपणाचा गंड निर्माण होतो आणि तो त्यांना पोखरू लागतो. मग यातून बाहेर येण्याचा मार्गच त्यांना सापडत नाही. आपण घाबरलो आहोत किंवा दु:खी आहोत हे सांगण्याला खरे म्हणजे कोणत्याच समाजात पुरेशी प्रतिष्ठा नाही. क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या खेळामध्ये सामान्य खेळाडूंसाठी १०-१२ वर्षे, तर असामान्य खेळाडूंसाठी १५-२० वर्षे इतकीच कारकीर्द असते. बहुतेकदा खेळासाठी म्हणून खेळाडूंनी शिक्षण अर्धवट सोडलेले असते. त्यामुळे उच्च शिक्षणाचा प्रश्नच नसतो. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये त्यांच्या राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी शंभरातून १४-१५ जणांना मिळत असेल, तर भारतात ३०० ते ४०० क्रिकेटपटूंमधून ही निवड करावी लागते. पुन्हा राष्ट्रीय कसोटी संघ, एक-दिवसीय संघ आणि टी-२० संघांसाठी वेगळी निवड होते. हे कमी म्हणून की काय, क्रिकेटमधील वाढत्या फ्रँचायझीकरणामुळे एक वेगळीच समस्या जोर धरू लागलेली आहे. या फ्रँचायझींसाठी अनेकदा क्षेत्रीय (डोमेस्टिक) क्रिकेटपटू उचलले जातात. काही खेळाडूंवर तथाकथित पारखींच्या आग्रहापायी कोटींच्या बोली लावल्या जातात. मात्र, प्रत्यक्ष हंगामात त्यानुसार त्या खेळाडूचा खेळ झाला नाही, त्याला अपयश आले की त्यातून भीती आणि हुरहूर निर्माण होऊ लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा वाढलेला पसारा आणि हाताबाहेर जाऊ लागलेले फ्रँचायझीकरण यामुळे क्रिकेटपटूंचा मानसिक समतोल ढासळू लागल्याची अनेक उदाहरणे सापडतील. पाकिस्तानातील काही फलंदाजांनी संघाच्या यशातील योगदानापेक्षा वैयक्तिक कामगिरीवर भर देण्यास सुरुवात केली आहे, हा केवळ योगायोग नाही. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना मानसिक दडपणाचा सामना वारंवार करावा लागतो हे दिसून आले आहे. सिडनी बार्न्‍स हा इंग्लंडचा विख्यात गोलंदाज. त्याने मानसिक ताणातून आपले जीवन संपवले. इंग्लंडचे काही कसोटीपटू आणि कौंटी क्रिकेटपटू जॅक आयव्हरसन, जिम बर्क, डेव्हिड बेयरस्टो यांनी आत्महत्या केली. डेव्हिड बेयरस्टो हे इंग्लंडचा विद्यमान आक्रमक फलंदाज व यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टोचे वडील. इंग्लिश क्रिकेटपटूंच्या आत्महत्यांवर एक पुस्तक लिहिले गेले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे विख्यात क्रिकेट लेखक पीटर रोबक यांनी. ते स्वत: उत्तम कौंटी क्रिकेट खेळायचे. विचित्र योग म्हणजे रोबक यांनीही पुढे आत्महत्या केली. मार्कस ट्रेस्कोथिक आणि जोनाथन ट्रॉट हे इंग्लंडचे नवीन सहस्रकातील क्रिकेटपटू. या दोघांनी मानसिक ताणामुळे दौरे अर्धवट सोडून मायदेशी धाव घेतली होती. इंग्लंडमध्ये फुटबॉलइतका पैसा क्रिकेटमध्ये नाही. ट्रेस्कोथिक आणि ट्रॉट यांना नैराश्याने ग्रासले तो फ्रँचायझीपूर्व काळ होता. आयपीएल सुरू झाल्यानंतर मोजके अपवाद वगळता इंग्लिश क्रिकेटपटूंनी या लीगमध्ये सहभागी होण्याबाबत इंग्लिश क्रिकेट मंडळ नेहमीच नाखूश असे. म्हणजे पर्याय केवळ कौंटी, कसोटी आणि इंग्लंडमध्ये सुरू झालेल्या टी-२० लीगचा. ती फ्रँचायझी आधारित नव्हती, तर कौंटींमार्फत चालवली जायची. म्हणजे पुन्हा मर्यादित पैसा. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटची विद्यमान दशा ही फ्रँचायझी क्रिकेटमुळे झाली आहे असे मानायला जागा आहे. कारण फ्रँचायझी क्रिकेटमध्ये काही वर्षे काढल्यानंतर आयुष्यभराची माया जमवता येऊ लागली. त्यामुळे क्रिकेटपटूंमध्ये एक भीषण दरी निर्माण होऊ लागली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये या दरीचे विध्वंसक रूप दिसू लागले आहे.

इतर खेळांमध्येही अशीच मानसिक ताणाची, नैराश्याची, उबग येण्याची उदाहरणे सापडतात. ११ ग्रँड स्लॅम जेतेपदं पटकावणारा बियाँ बोर्ग २६ व्या वर्षीच कंटाळून टेनिसमधून निवृत्त झाला. विख्यात जलतरणपटू मायकेल फेल्प्सला सतत दडपणाखाली राहावे लागायचे. फुटबॉलपटू पॉल गॅसकॉइन किंवा स्नूकरपटू पीटर ओसुलिवान ही आणखी काही उदाहरणे. भारतातही क्रिकेटेतर खेळांमध्ये अशी उदाहरणे सापडतील. कारण क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळाडूंच्या नशिबी अधिक कष्ट, अधिक प्रतीक्षा, तुलनेने कमी मोबदला आणि म्हणूनच अधिक निराशा ही ठरलेली आहे. परंतु अजून तरी मोठय़ा प्रमाणावर ही निराशा फुटून बाहेर आलेली नाही. क्रिकेट आणि इतर खेळांमध्ये असलेला आणखी एक मोठा फरक म्हणजे इतर खेळ बारमाही चालत नाहीत! क्रिकेटचे विश्व लहान असले तरी हा खेळ सर्वाधिक व्यग्र वेळापत्रकाचा आहे. असा कोणताही महिना नसतो, ज्यावेळी जगात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे क्रिकेट सुरू नसते. कसोटी, एक-दिवसीय, आंतरराष्ट्रीय टी-२० आणि फ्रँचायझींच्या टी-२० क्रिकेटमुळे एखादा क्रिकेटपटू स्वत:च्या देशात खेळत असला तरी आपल्या घरी जाऊन कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकेलच याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. इतर कोणत्याही खेळामध्ये अशा प्रकारची पिळवणूक दिसून येत नाही. जर्मन फुटबॉल लीगमध्ये नाताळची दोन आठवडे सुट्टी असते. किमान हा वेळ तरी खेळाडूंनी कुटुंबीयांना द्यावा अशी अपेक्षा असते. शिवाय व्यावसायिक फुटबॉलमध्ये किमान जून-जुलै महिन्यात तरी विराम असतो. टेनिसमध्ये प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत खेळवल्या जातात. पण अशी कोणतीही सूट क्रिकेटपटूंना नाही. त्यामुळे इतर कोणत्याही खेळापेक्षा या खेळात मानसिक तणावाची समस्या अधिक उग्र बनू लागली आहे. ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात मध्यंतरी विख्यात क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांनी युवा क्रिकेटपटूंच्या मानसिकतेचा दाखला दिला होता. बहुतेक जण शिक्षण पूर्ण न करताच मुख्य प्रवाहातून खेळू लागतात. त्यातले काही जण चमकतात, त्यांचे कौतुक होते. काही अपयशी ठरतात; जे अतिशय स्वाभाविक आहे. पण अपयशी क्रिकेटपटूंना मानसिक आधार देण्याची कोणतीही योजना सध्या तरी बीसीसीआय किंवा फ्रँचायझींकडे उपलब्ध नाही. तशात समाजमाध्यमांनी त्यांचे उरलेसुरले मानसिक स्वास्थ्यही विस्कटून टाकलेले असते. खराब कामगिरीबद्दल समाजमाध्यमांतून वाहणारा शिव्याशापांचा महापूर भल्याभल्यांना उद्ध्वस्त करू शकतो. तरीही ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर मिरवल्याशिवाय किंवा व्यक्त झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. पण व्यक्त होण्याचीही चोरी, अशी आपल्याकडील जल्पकगिरीत धन्यता मानणाऱ्या समाजमाध्यम बहाद्दरांची खुजट मानसिकता असते. अशा वेळी या क्रिकेटपटूंना स्वत:चा अवकाश सापडेनासा होतो, मग ज्या क्रिकेटमुळे प्रसिद्धीचा झोत त्यांच्यावर पडला, ते क्रिकेटही नकोसे वाटू लागते. मॅक्सवेल किंवा त्याच्या काही सहकाऱ्यांना किमान तेथील मंडळाने आधार दिला. या तीन क्रिकेटपटूंच्या कृतीमुळे तेथील यंत्रणा ढवळून निघाली. मानसिक स्वास्थ्याच्या मुद्दय़ावर क्रिकेटबाहेर राहू इच्छिणाऱ्यांना, इतर जायबंदी क्रिकेटपटूंना मिळतात तसेच फायदे दिले जातील असे आश्वासन तेथील क्रिकेटपटूंना मिळू शकते. आपल्याकडे ही समस्या व्यक्त करण्यास कोहलीसारखे क्रिकेटपटूदेखील कचरतात, तिथे मॅक्सवेलसारख्यांची काय कथा? भयगंडाची ही वाळवी व्यवस्थेला पूर्ण पोखरण्याआधी तिचा नायनाट करण्याची वेळ आली आहे. पण आम्हाला चिंता आहे- लवकरच होऊ घातलेल्या आयपीएल लिलावाची आणि लोढा समितीने ‘लादलेल्या’ जाचक अटी झुगारून देण्याची! या प्राधान्यक्रमावरून आपल्या शहाणिवेची परीक्षा सहजी करता येते.

siddharth.khandekar@expressindia.com