News Flash

अफसाना लिख रही हूँ.. : ‘अनुभव’ (१९७१)

निवडक गाण्यांचं, त्या- त्या चित्रपटाच्या कथेचा संदर्भ देत केलेलं विश्लेषण..

(संग्रहित छायाचित्र)

मृदुला दाढे- जोशी

mrudulasjoshi@gmail.com

कथेला पुढे नेणारी आणि भूमिकांचा स्वभाव व्यक्त करणारी, उत्कृष्ट काव्यमूल्यं आणि सांगीतिक श्रीमंती असणारी गाणी हे आपल्या अनेक हिंदी चित्रपटांचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़. एखादी गोष्ट अफसाना कधी बनते? जेव्हा त्यात भावनिक संघर्ष असतो, कलाटणी असते, विस्मय असतो. सहजपणे काय योग्य, काय अयोग्य हे ठरवता येत नाही. अशा वेळी कथेच्या मदतीला गाणी येतात. ही गाणी जरी कथेसाठी जन्माला आली असली तरीही त्यांनी कथेबाहेरही स्वत:चं स्थान निर्माण केलेलं आहे. अशा निवडक गाण्यांचं, त्या- त्या चित्रपटाच्या कथेचा संदर्भ देत केलेलं विश्लेषण..

एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात ‘असणं’ म्हणजे नेमकं काय?

मनात उमटणारा प्रत्येक तरंग एकमेकांना सांगावासा वाटणं? प्रत्येक क्षण आसुसून एकत्र जगावासा वाटणं? की भूतकाळाला हलकेच बाजूला सारून रंध्रांत नवीन आषाढगाणी पेरणं? ‘अनुभव’ भूतकाळात असतो; आणि येणारा प्रत्येक क्षण हाही एक नवा अनुभव देत असतोच की! मग तो आधीचा ‘अनुभव’ आत्ताच्या सुंदर अनुभवांना झाकोळून टाकत असेल तर..? भविष्यातल्या अनेक अनुभवांना जन्मूच देत नसेल तर..?

ही कहाणी आहे अमर आणि मीता सेन या जोडप्याची. अमर कामात स्वत:ला बुडवणारा; तर मीता प्रेमाला आसुसलेली. या घरात नोकर जास्त आणि माणसं दोनच. वरकरणी उत्तमच चाललंय. उच्चभ्रू पाटर्य़ा होतायत. परंतु दोघांत नाजूक साहचर्य जन्मूच शकत नाहीये. कारण त्यांना एकांत म्हणजे काय, हेच कळत नाहीये. तेव्हा मीता नोकरांना काढून टाकते आणि त्यांच्यात नाजूक बंध तयार होतो. आणि इथेच- पूर्वायुष्यात ज्याच्याशी एक हळवं नातं निर्माण झालं होतं तो शशी अचानक तिच्या आयुष्यात येतो. मीता या वादळाला कशी सामोरी जाते आणि अमरलाही त्यातून कशी बाहेर काढते, त्याची ही कहाणी..

‘अनुभव’ या बासू भट्टाचार्य यांच्या चित्रपटाला कनू रॉय यांनी अतिशय वेगळ्या तऱ्हेनं संगीत दिलंय. ज्यांना ‘चाल लावलीय’ असं वाटूच नये, इतक्या नैसर्गिकतेनं संगीतबद्ध केलेल्या गुलजार आणि कपिलकुमार यांच्या रचना.. गीता दत्त, मन्ना डे, सुबीर सेन यांचे आवाज.. संजीवकुमार, तनुजा यांचा कमालीचा सहज अभिनय आणि दिनेश ठाकूर, ए. के. हंगल यांची सुंदर साथ यामुळे ‘अनुभव’ ही एक श्रेष्ठ कलाकृती ठरलीय. त्या काळाच्या खरोखर पुढे असणारा हा चित्रपट! प्रेमाच्या त्रिकोणात इतरही अनेक कोन असतात. आणि कुठल्याच भावनेचं अस्तित्व न नाकारताही तिला तिच्या जागी ठेवून आयुष्य नव्यानं सुरू करता येतं, हे सांगणारा!

महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचा नैसर्गिक पोत गाण्यांतूनही दिसतो. ‘टिपिकल’ नसलेली, बोलण्याचाच पुढचा सांगीतिक भाग असावा अशी वाटणारी, साधीसुधी, पण वर्मावर बोट ठेवणारी गाणी.. कधी जुन्या आठवणींतला हलका प्रणय उजळणारी; पण आत्ता विसंगत वाटून त्रास देणारी (कोई चुपके से आके), कधी खेळकर (मेरा दिल जो), कधी मादक, रोमँटिक (मेरी जां मुझे), कधी खोल समजूत घालणारी (फिर कहीं कोई)! जे अनेक संवादांतून सांगता येणार नाही, ते ही गाणी सांगून जातात. पार्श्वसंगीतात रेडिओच्या जाहिराती, मुंबईची व्यग्र सकाळ, झगमगत्या, रंगीत समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ या सगळ्याला एक अस्तित्व आहे. छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून गाणी ‘उमलतात.’ तव्यावर पाणी टाकल्यावरच्या वाफेनं घामेजलेला, पण विलक्षण आनंदी चेहरा. पदरानं तो चेहरा टिपणं.. मग घाईघाईत केस बांधत अंघोळीला जाणं.. यातून येतं पहिलं गाणं.. ‘मेरा दिल जो मेरा होता..’

बाथरूममध्ये शिरण्यापूर्वीची आणि आत गेल्यानंतरची गृहिणी यांत खूप फरक असतो. हा अवकाश तिच्या एकटीचा असतो. तिच्या मनातलं.. आतलं असं त्या शुभ्र फेसाळ बुडबुडय़ांना, पाण्याच्या तुषारांना समजतं. मनातली प्रेयसी आतुरलेली असते- ‘त्याच्या’साठी सुस्नात होण्यासाठी. त्या गुणगुणण्याला निश्चित असा अर्थ नसतो. ऐकलेलं, मनात रुतलेलं एखादं गाणं, लकेरी एकापाठोपाठ येत असतात. त्यातून एक मस्त मूड बनत असतो..

‘मेरा दिल जो मेरा होता..

पलकों से पकड लेती

होठों से उठा लेती

हाथों में खुदा होता!’

..हा असाच मुक्त विचार. त्याला शक्याशक्यतेचा निकष लावता येत नाही. हे मन पापण्यांत अलवार जपलं असतं, ओठांनी टिपलं असतं, हातावर कोरलं असतं.. जर खरंच ते फक्त माझं असतं!

‘सूरज को मसलकर मं चंदन की तरह मलती..

सोने सा बदन लेकर कुंदन की तरह जलती!’ असं ‘काहीही’ मनात येतं! डोळ्यापुढे अमरच आहे. त्याचा सहवास सुगंधी करायचाय. किती गोड भावना! एकाच अर्थाचे दोन शब्द वापरण्याची ‘गुलजार शैली’ इथंही दिसते. ‘सोनं’ व ‘कुंदन’चा अर्थ एकच. ‘दो जुडवा होंठ’ असं ‘मेरी जान’मध्येसुद्धा गुलजार लिहितात..

‘बरसा है कई बरसो आकाश समंदर में..’

चंद्रकिरणांचे थेंब माझ्या हाताच्या ओंजळीत दंव बनून विरघळले तर..?

किती तो आवाज मधाळ.. वेगळीच उत्तेजना घेऊन आलेला! वाटतं, तिथल्या तिथे मीताला सुचलेलं ती गुणगुणतेय! या शब्द-स्वरांची कमाल! त्यावेळची स्त्रीची मन:स्थिती कशी ओळखलीय यांनी? तेव्हा स्त्रीला आपण आपल्या मर्जीचे मालक (तात्पुरतं का होईना!) आहोत असं वाटतं. न्हाणीघराच्या अवकाशात तिची सत्ता असते. विचारांवर अंकुश नसतो. मुख्य म्हणजे भोवती कुणाच्या नजरा नसतात.

मीताची अंघोळ पडद्यावर सवंग होत नाही. या क्षणी ती फक्त पत्नी आहे. तिच्या हालचालींसाठी संतूरच्या नाजूक पिसेसनी जागा ठेवलीय. ‘मेरा दिल- जो मेरा होता- पलकों में- पकड लेती’ असं छोटय़ा वाक्यांचं विभाजन आहे. तालवाद्य नाहीच. संतूर आणि सतार देतील तोच ताल. म्हटलं तर ताल आहे, म्हटलं तर नाहीही. अंघोळ करताना कोणी ठेक्यात गातं का? अगदी हिमग.. ‘अहाहा!’ असले उद्गारही उत्स्फूर्त येतात. या दृश्यात प्रत्येक गृहिणीला स्वत:चं प्रतिबिंब दिसू शकतं. पण ही गृहिणी आधी प्रेयसी आहे, आणि हे प्रेयस आत्ता- सहा वर्षांनी उमललंय..

अंघोळ करतानाही तिला काल रात्री एकत्र पाहिलेला चंद्र आणि नंतरची मंतरलेली रात्र आठवतीय. कमालीचं नैसर्गिक गाणं! गीता दत्तनं किती सुंदर जपलाय तो टोन!

या सगळ्यात अचानक ‘शशी’चा फोन. नकार देऊनही तो येतोच. एकेकाळी खूप हवाहवासा वाटणारा, ज्याची आपण अखंड वाट बघत होतो तो. दार उघडताक्षणी त्याला पाहिल्यावर मनातले सगळे जुने तरंग उसळी मारून वर येतात. त्याला नाइलाजानं आत घेणं.. त्याचा अवघड वावर.. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे गाणं ऐकू येतं..

‘कोई चुपके से आ के..’

‘कोई चुपके से आके, सपने सुलाके,

मुझको जगाके.. बोले, के मं आ रहा हूँ!

कौन आये, ये मैं कैसे जानू?’

या ओळींना छंद मीटर नाही. पहिला बासरीचा पीस.. ती आवर्तनं, तो डहुळलेला डोह दाखवून जातो. तो ‘पपीहा’- त्या बासरीत आधी ऐकू येतो.. ज्याची स्वप्नं बघता बघतासुद्धा सुखाची गुंगी येत होती.. त्यातून हलकेच आपल्याला जागवणारा तो. ‘स्वप्नांत का बघतेस वेडे मला? मी खरंच आलोय..’ म्हणत यायचा तो!

‘दूर कहीं बोले पपीहा, पिया आ, मौसम सुहाना!

तडपे है कोई यहा, आ भी जा, करके बहाना!’

सुरेख मौसम असताना का लांब राहावं? काहीही बहाणा करून यावं त्यानं. कुठल्याही क्षणी वाहायला लागतील हे डोळे. कसाबसा थोपवलाय त्यातला पाऊस. ओठांत शब्द अडकलेत. कशी गाऊ ते मनातलं गाणं? ‘इतनी रात गये कैसे गाऊ?’ हे कहर लाडिक गाते गीता.. आणि जीवघेणं हसते! असल्या वेडय़ा हट्टावरच भाळलो की आपण एकेकाळी! पण.. इथे का आलाय हा? खोल गाडल्या होत्या सगळ्या आठवणी. खबरदारीसुद्धा घेतली होती पुन्हा त्यांनी कोंब धरू नये म्हणून. छे! हे काहीतरी विपरीत घडतंय. आत्ता कुठं संसारावर सुखाची साय धरायला लागलीय. एकमेकांत बुडून जाताना नकळत गवसायला लागलंय आपलंच वेगळं रूप. त्याच्यात विरघळताना जाणवतंय की, काय हवं होतं आपल्याला.. काय सुख आहे एकमेकांना ओळखत, सापडत जाण्यात. आसुसलोय आपण त्याच्या हलक्या स्पर्शासाठी! त्याच्या नजरेचा सहवाससुद्धा नोकरांच्यात वाटून घ्यायचा नव्हता. हे सुख गमावण्याची कल्पनासुद्धा सहन होत नाहीये.

काय काय तरळून गेलं डोळ्यांपुढे.. किती सतारी झंकारून गेल्या!

काहीतरी चुकतंय! टळत का नाही हा? सगळा कल्लोळ तनुजाच्या चेहऱ्यावर दिसतो. तरी स्वत:ला सावरते ती. दरम्यान, शशी अमरकडे रुजू होतो. या धक्क्याला फारसं महत्त्व न देता मीता पुन्हा संसारात रममाण होते. पण येणारं वादळ थांबणार नसतं..                  (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 4:06 am

Web Title: article on hindi movie songs analysis abn 97
Next Stories
1 प्रजासत्ताक प्रतिपालक
2 जगणे.. जपणे.. : न मागुती तुवा कधी फिरायचे..
3 मृणाल सेन आणि एकलव्य!
Just Now!
X