जागतिक मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची नुकतीच प्रकट मुलाखत झाली. तीत त्यांनी मराठी भाषा आणि एकूणच भाषिक व्यवहार, आपलं लेखन इत्यादीवर मार्मिक भाष्य केलं. एलकुंचवार यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या या मुलाखतीतील काही भाग..

  तुम्ही इंग्रजीचं अध्ययन केलंत, त्याचेच प्राध्यापकही होतात. या पाश्र्वभूमीवर नाटकाकडे कसे पाहत होतात? मुळात नाटकाकडे कसे आलात?

Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण
vaishali darekar s campaign, bjp mla ganpat gaikwad wife, bjp mla ganpat gaikwad wife to media,
मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

एलकुंचवार : आपण नाटकाच्या क्षेत्रात जाऊ, लेखकबिखक होऊ असं मला वयाच्या २८ व्या वर्षांपर्यंत कधीही वाटलं नव्हतं. तोपर्यंत उनाडपणाचं करिअर करणं हेच ध्येय होतं. माझ्या हातून काही होणार नाही असंच सर्वाना वाटत होतं. म्हटलं, चला, आता आपण मोकळे झालो! पण मी वाचन करत असे. माझे वडील, काका प्रचंड वाचायचे. आमच्या मॉरिस कॉलेजची लायब्ररी सुंदर होती. आम्ही चार जण मित्र होतो. रोज एक नवीन पुस्तक वाचायचो. जगण्यातच मौज होती तेव्हा! मग कुठे लेखक वगैरे होता..?

मात्र, जेव्हा ‘मी जिंकलो, मी हरलो’ पाहिलं आणि वाटलं- सोप्पं आहे हे! मग ‘सुलतान’ लिहिलं आणि छापलंही गेलं. प्रवास सुरू झाला. गेली पन्नास र्वष नाटक लिहितोय, ती होतायतही. पण लिहिणं हा माझा अग्रक्रम आहे असं मला कधीच वाटलं नाही. कारण जगणं हाच माझा अग्रक्रम होता. तुम्ही पाहाल तर माझ्या लेखनात पाच-पाच र्वष अंतर आहे. गेल्या चार वर्षांत तर मी एक ओळही लिहिलेली नाही. काहीजण म्हणतात, आम्ही पूर्णवेळ लेखनच करतो, बाकी काही करत नाही. मला आश्चर्य वाटतं. तुम्ही जगला नाहीत तर लिहिण्याचं मूलद्रव्य आणता कुठून? कारण गाणारा जसा सुरांशी खेळतो, चित्रकार रंगांशी खेळतो, तसं लेखकाला जीवनाशी खेळावं लागतं.

मी लिहायला लागलो तेव्हा तर मला ‘सत्यकथा’ हे मोठं मासिक आहे हेदेखील माहीत नव्हतं. प्रभा गणोरकरांनी माझी एकांकिका त्यांना नेऊन दिली. त्यांनी छापली. गणोरकरांनी सांगितलं, चांगलं लिहिता आहात, असा अभिप्राय आहे. मग लिहू लागलो. दीड वर्षांनंतर विजया मेहतांनी त्याचे प्रयोग केले. त्यांचं त्याविषयी पत्र आलं. मी त्यांना म्हटलं, मला रॉयल्टी हवी. त्यांना धक्काच बसला. कानामागून आलेला हा मुलगा अन् रॉयल्टी मागतोय! विशेष म्हणजे तोवर माझी कोणी नाटकं केली नव्हती. मी त्यांना म्हटलं, ‘माझी ही पद्धत आहे. एक रुपया तरी रॉयल्टी हवीच!’ मग त्यांनी जाण्या-येण्याचं तिकीट दिलं. मुद्दा असा की, लेखकानं स्वत:ची प्रतिष्ठा स्वत: जपली पाहिजे. लोकांनी आपली प्रतिष्ठा ठेवावी असं वाटत असेल तर स्वत:ची प्रतिष्ठा स्वत: टिकवावी. हे टिकवणं शिकलं पाहिजे. राजकारण्यांसमोर झुकणाऱ्याला, गुडघे टेकणाऱ्याला ते का नाही वापरून घेणार? त्यात राजकारण्यांची चूक नाही. झुकणाऱ्याला दहा गोष्टी त्यांच्याकडून पाहिजे असतात. मग हे होणारच.

आपल्या भारतीय समाजात लेखक ही अत्यंत दुय्यम, बिनमहत्त्वाची गोष्ट आहे. चित्रकार, संगीतकार यांना जरा तरी मानानं वागवलं जातं. पण लेखकाला कुठंही ठेवलं तरी चालतं. यावरून आपल्या सामाजिक-सांस्कृतिक प्रकृतीचा अंदाज येतो. ज्या समाजात लेखकाला महत्त्व नाही, त्या समाजाची प्रकृती बरी नाही हे गृहीत धरायला पाहिजे. पुरस्कार वापसीचं उदाहरण घ्या. त्यावेळी अनेक लोकांनी आपले पुरस्कार परत केले. त्यांचा काहीतरी मुद्दा होता. तो बरोबर की चूक, हा प्रश्न नाही. मुद्दा होता त्यांचा. अशा वेळी कुठल्याही सुसंस्कृत सरकारने म्हटलं असतं- ‘तुम्ही हे करीत आहात याचा आम्हाला खेद वाटतो. तुम्ही या, आपण चर्चा करू. तुमची बाजू आम्ही ऐकतो, आमची तुम्ही ऐका!’ पण असं करण्याऐवजी त्या सर्व लोकांची यथास्थित टिंगल साहित्य अकादमीच्या चेअरमननी केली. नयनतारा सहगल.. इंदिरा गांधींच्या आतेबहीण. विजयालक्ष्मी पंडित आणि ‘राजतरंगिणी’चं पहिलं इंग्रजी भाषांतर करणाऱ्या रणजित पंडितांची कन्या. मुख्य म्हणजे नयनताराजींनी आणीबाणीविरुद्ध पहिला आवाज उठवला. १९ महिने सतत त्या ‘इंडियन एक्स्प्रेस’मधून लिहीत होत्या. हे काहीही ध्यानात न घेता साहित्य अकादमीचे ते चेअरमन म्हणाले, ‘आम्ही त्यांना २५ हजार रुपये दिले, आमच्यामुळे यांचं नाव झालं..’ याच्यावरून आपल्या सांस्कृतिक प्रकृतीचा अंदाज यावा.

  नाटय़लेखन कसं सुरू झालं..?

एलकुंचवार : नाटक गंभीरपणे घ्यावं हे मला पुढे कळलं. मग पद्धतशीरपणे नाटकं बघायला, त्यांचं परिशीलन करायला सुरुवात केली. विजयाबाईंबरोबर असण्याचा मला खूप फायदा झाला. त्यांच्या एखाद्या वाक्यातून, सहज बोलण्यातूनही खूप काही कळत असे. त्या एकदा मला म्हणाल्या, ‘तुझ्या एकांकिकांमध्ये दोन-तीन पात्रंच दिसतात. तू स्पेस नीट वापरत नाहीयेस. दोन-तीन पात्रं रंगमंचावर येतात, बोलतात आणि जातात.’ खरं होतं ते. कारण एवढाच अवकाश असतो आम्हा नाटककारांच्या हातात. यातच महाभारत घडतं. पहिलं, दुसरं महायुद्ध घडतं. शोकाचे, आनंदाचे प्रसंग.. सारे काही इथेच घडतं. काळाचं, अवकाशाचं बंधन नाटककारावर जेवढं असतं, तेवढं इतर कुणावरच नसतं. त्या बंधनामध्ये लिहायचं आणि अवकाश वापरायचा. मी बाईंना म्हटलं, ‘काहीतरी लिहून पाहतो.’ मग मी ‘पार्टी’ लिहिलं. त्यात १२ पात्रं आहेत. एकाच वेळी ती रंगमंचावर असतात.. सलग ९० मिनिटं!

तर, हे शिकवणं होतं स्वत:ला. हे असं शिकवताना यशस्वी होतो की अयशस्वी, हा बिनमहत्त्वाचा मुद्दा. खरं तर यशस्वी होणं ही मला काळजीची गोष्ट वाटते. कारण मग आपण स्वत:लाच गिरवत राहतो. ‘रंगायन’ जेव्हा निर्माण झाली तेव्हा विजयाबाई, तेंडुलकर, श्रीपु या मंडळींचा अजेण्डाच होता, की कुठलंही नाटक करताना ते कितीही चाललं तरी त्याचे पाच-सात प्रयोगच करायचे. आपल्याला प्रसिद्धीही नको वा पैसेही! हे सारं शिक्षण होतं. म्हणजे स्वत:लाच शिकवण्यासाठी होतं. ते सारे शोधणारे लोक होते. अशात मी नाटक लिहीत होतो. त्यात शिरल्यावर गंभीरपणे त्याचा विचार करू लागलो. लक्षात आलं, की हे माध्यम फार मोठं आहे. आपला वकूब किती यावर आपण किती खोल पाण्यात जाऊ, हे ठरतं. त्यामुळे माझं स्वत:चं समाधान कधी होत नाही.

  ‘वाडा’ नाटय़त्रयीत वऱ्हाडी भाषेतील काही शब्द आले आहेत.. त्यात तुम्ही मांडलेले प्रश्न.. हे सारं कसं आलं?

एलकुंचवार : १९९० मध्ये आपण कुठे चाललो आहोत याचा अंदाज शहाण्या, सुशिक्षित माणसाला येत होताच. पर्यावरणाची काळजी तर त्यापूर्वीच सुरू झालेली होती. मी खेडय़ातला. आमच्या विहिरीतल्या पाण्याची पातळी ३५ फूट खोल कशी गेली, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पिकं बदलली आमची. आधी जिथं विडय़ाची पानं लावत होतो, तिथं ऊस आला. मग केळी, संत्री.. आणि आता काहीच नाही. जिथं मे महिन्यातही दोन-तीन पुरुष पाण्यात पोहत होतो, तिथे आता मार्चमध्ये गुडघाभर पाणीही नसतं. माझ्या या वैयक्तिक अनुभवांतून अवतीभवती पाहत होतो. आणि हे देशभरच पाहत होतो. आपण आंधळे, नादान, आडमुठे आणि अडाणी असल्याने पर्यावरण तर नष्ट केलंच; पण खेडंही बदललं. तिथली आत्मीयता नाहीशी झाली. खेडय़ात राजकारण घुसलं आणि जातीय गट निर्माण झाले. माझा भाऊ- त्याने तर विरघळवून घेतलं होतं स्वत:ला त्यांच्यात. एकेकाळी जबरदस्त फॅशनेबल माणूस. नागपूरला कॉलेजमध्ये शिकलेला. तो खेडय़ात गेल्यानंतर त्याने धोतर-कुर्ता घालायला सुरुवात केली. मित्रांच्याबरोबर बसून  विडय़ा ओढल्या. इतका मिसळून गेला होता तो त्यांच्यात. मात्र, तो गेला तर त्याच्या प्रेतयात्रेला बारा माणसंही नव्हती. कारण काय, तर तो ब्राह्मण आहे! माझे बालपणचे मित्रही.. आता गेलो तर एक अंतर असतं आमच्यात. जाणवतं ते मला. एक बरडपणा, कोरडेपणा.. हा नुसता पर्यावरणात नव्हे, तर नातेसंबंधांतही आलेला आहे. आता नवनिर्माण करण्याचीही या देशातल्या माणसांना उमेद उरलेली नाही. असं सगळं विषाक्त झालेलं वातावरण.

आपण डोळे उघडे ठेवून वाळवंट तयार करतो आहोत, विनाशाकडे धावतो आहोत- हे १९९० साली वाचणाऱ्या माणसाला माहीत होतं. ते वेगळ्या प्रकारे नाटकात आलं. मात्र, शहरातल्या माणसांना त्याची खंत नाही, तर खेडय़ातल्या माणसांना का नावं ठेवायची? परंतु ज्या निर्मम, अनाठायी हट्टानं हे चाललेलं आहे, ज्या वेगानं सगळंच बदलू लागलं आहे त्याचा मला त्रास होतो.

  तुमच्या समकालीन नाटककारांविषयी काय सांगाल? त्यांच्याशी तुम्हाला जोडणारा समान धागा कोणता?

एलकुंचवार : परस्परांबद्दल प्रेम आणि आदर.. एवढाच!

आणि नाटकांविषयी, त्यातल्या आशयाविषयी..

एलकुंचवार : आमची सगळ्यांची नाटकं एकमेकांहून वेगळी होती. तेंडुलकरांचं नाटक कार्नाडांपेक्षा (गिरीश कार्नाड) वेगळं, कार्नाडांचं बादलबाबूंपेक्षा (बादल सरकार) वेगळं, बादलबाबूंचं हबीबपेक्षा (हबीब तन्वीर) वेगळं. आणि मी लिहू लागलो तेव्हा माझं नाटक तेंडुलकरांपेक्षा वेगळं होतं. आमच्या प्रत्येकाचा स्वतंत्र बाज होता. मात्र, आमच्यातील स्नेहसंबंध घट्ट होते. तेंडुलकरांनी तर माझ्यावर छत्रच धरलं होतं. मला त्यांनी पाहिलंही नव्हतं तेव्हा. ‘होळी’ आणि ‘सुलतान’वर त्यांनी मोठा लेख लिहिला होता ‘माणूस’मध्ये! ते जाईपर्यंत माझे त्यांच्याशी स्नेहाचे संबंध राहिले. कार्नाडांशीही आहेत. नव्या पिढीतील लोकही संपर्क ठेवून आहेत. एकंदरीत निरोगी वातावरण आहे आमच्यात.. म्हणजे नाटय़लेखकांमध्ये!

  तुमच्या नाटय़लेखनाला धरून एक प्रश्न असा की, पुण्या-मुंबईपासून लांब राहिल्याने आलेली तटस्थता किंवा अलिप्ततेतील निवांतपणामुळे या बदलांकडे पाहता आलं का? विशेषत: ‘मी मुंबईला स्थलांतरित झालो नाही हे बरंच झालं..’ असं तुम्ही नेहमी म्हणता. त्याबद्दल..

एलकुंचवार : मी मुंबईला यावं असा आग्रह विजयाबाईंनी, डॉ. लागूंनी १९७० च्या दशकात केला होता. पण मी कुठंतरी भाईंदरला राहून, लोकलला लटकून चर्चगेटला जातो आहे, ही कल्पनाच मला असह्य़ झाली. मला ना पैसे मिळवायचे होते, ना प्रसिद्धी. मग ही दगदग कशाला? यात माझा वैदर्भीय आळसही प्रभावी ठरला असला पाहिजे. शिवाय बाहेर गेलो तरच मानवी जीवनाचा अंदाज विस्तारतो असंही काही नाही. मुंबईत राहून मला कदाचित वेगळं जीवन दिसलं असतंही.. भाऊ पाध्येंप्रमाणे. मग आमच्याकडे आहे ते जीवन नाही काय? मुंबईत राहून मी ‘वाडा चिरेबंदी’ लिहू शकलो असतो काय? एक लक्षात घ्या, साहित्याचं केंद्र पुण्या-मुंबईपासून कधीच सरकलंय. आताचे सगळे महत्त्वाचे लेखक ग्रामीण भागातून आले आहेत. छोटय़ा छोटय़ा गावांतून आलेले लेखक फार सुंदर, कसदार लिहितायत. जीवनाला साक्षात भिडलेलं लिहितायत ते.

मात्र, काही गोष्टी माझ्या फायद्याच्या ठरल्या. आम्ही खेडय़ात राहत होतो, पण आमच्या घरचं वातावरण संपूर्णपणे नागरी होतं. माझे वडील अलाहाबाद विद्यापीठाचे लॉ ग्रॅज्युएट होते. अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, पर्शियन, फ्रेंच अशा बऱ्याच भाषा त्यांना येत होत्या. आमची घरची स्वत:ची लायब्ररी होती. आजूबाजूला कायम पुस्तकं. घरी दर महिन्याला छोटी-मोठी गाण्याची बैठक होत असे. बाहेरच्या जीवनाशी आमचा कायमच संबंध होता. त्यामुळे नंतर शहरात आलो तेव्हा मला त्यांच्यात एकजीव व्हायला वेळ लागला नाही. परंतु माझं शिरपुरी वाण आहे ते हरवलं नाही.

  तुम्ही जाणीवपूर्वक.. कधी कंटाळा म्हणून, कधी थांबावं म्हणून, कधी स्वत:साठी म्हणून असेल, पण तुम्ही नाटय़लेखनात थांबा घेतलेला दिसतो. एका टप्प्यावर तर तुम्ही नाटक सोडून ललित लेखनाकडे वळलात. त्या प्रक्रियेविषयी..

एलकुंचवार : मी निबंधलेखनाकडे का वळलो, याची दोन-तीन कारणं आहेत. एकतर नाटय़व्यवहारामध्ये माझा प्रचंड भ्रमनिरास झाला होता. नाटय़व्यवहारातील सगळे लोक सतत बोलत राहिले की, नाटक ही कलेक्टिव्ह आर्ट- सामुदायिक कला आहे, आपण सगळे मिळून कशाचा तरी शोध घेत असतो, सगळे मिळून कलेसाठी काहीतरी करतो, वगैरे. ‘रंगायन’ होतं तेव्हा हे खरं होतं. मात्र, नंतर नवीन लोकांशी माझा संबंध येऊ लागला आणि मला असा अनुभव आला की, तसं काही नाहीये. इथे प्रत्येकाचा स्वतंत्र अजेण्डा आहे. कोणाला नाटकात कौशल्य दाखवून सिनेमात, तर कोणाला टेलिव्हिजनवर जायचं आहे. प्रत्येकाचं काहीतरी वेगळं चालू आहे. आणि ते कोणी सांगतही नसे. दुसरं म्हणजे- लेखकही हळूहळू बिनमहत्त्वाचा होऊ लागला होता. तू नाटक दिलंस, आता त्याचं काय करायचं ते आम्ही करू.. असं सारं! त्यामुळे एकत्र बसून चर्चा केल्या, कशाचा तरी वेध घेतला, हे वातावरण नाहीसं झालं.

मग मला यात काही रस वाटेना. कारण मुळात हे सारं कशासाठी करायचं? तर- एकमेकांशी इनर कॉन्टॅक्ट निर्माण व्हावा यासाठी! नाटक करताना सर्वात सुंदर काळ कुठला असतो? ज्या दिवशी प्रयोग होतो- तो? नाही! मग टाळ्या पडतात- तो? तोही नाही. नंतर बक्षिसं मिळतात- तो? तर, तोही नाही. नाटकाचा सर्वात सुंदर काळ त्याच्या रिहर्सल्सचा असतो. कारण तेव्हा माणसं एकत्र येतात. एकमेकांशी जोडलेली असतात. एकमेकांवर रागावतात, प्रेमही करतात. सगळं विसरून एक वेगळं विश्व निर्माण करून तिथे जगत असतात. तेव्हा आतून त्यांच्यात एक संबंध निर्माण होतो. तीच तर मानवी संबंधांतली गंमत आहे. त्यासाठीच तर आपण जगतो किंवा जगायला पाहिजे. मात्र, तसा आतला संबंध नाटकाच्या क्षेत्रात मला मिळेनासा झाला. मला ते पुरेना. तसेच दरम्यानच्या काळात माझ्यातही बरेच फरक होत होते. वाचन वाढलं होतं, अनुभव वाढले होते. संथपणा, शांतपणा आला होता. त्यामुळे मला वाटलं, निबंधलेखन हे माझे अनुभव व्यक्त करण्यासाठी जास्त योग्य आहे. शेवटी नाटक ही परावलंबी कला आहे. माझं नाटक मी पाहतो तेव्हा ते माझं कधीच नसतं; पण ललित लेखनाचं तसं नाही. ते पोहण्यासारखं आहे. आपण पाण्यात उतरतो आणि पाणी व आपण एकरूप होऊन जातो. मधे कुठलाही एजंट नाही. फक्त पाणी आणि मी. ललित लेखनाचं तसं आहे. त्याच्यात जी मुभा घेता येते, जास्त प्रामाणिकपणे व्यक्त होता येतं, त्यामुळे मला तो फॉर्म जास्त आकर्षक वाटू लागला.

  तुमच्या ‘मौनराग’मध्ये सुंदर मराठी भाषा आहे. त्यातील शब्दकळा, भारतीय दर्शन, संगीत, वाचन या सगळ्याची त्यात अभिव्यक्ती झाली आहे. मराठी असण्याला समृद्ध कसा करता येतं, हे त्यातून कळतं. पण आज अवतीभोवती आपल्या मराठीपणाचा विसर पडल्यासारखं दिसतंय. मराठीचा प्रश्न हा एक तर राजकीय असतो किंवा मराठी शाळांपुरता तरी असतो. पण ही भाषा समृद्ध करण्यासाठी, तिचा विकास करण्यासाठी काय करता येईल?

एलकुंचवार : मराठी भाषेच्या संदर्भात सर्वसाधारणपणे असा सूर लागतो की, सर्व काही शासनानं करावं. शासनानं अमुक केलं नाही, तमुक केलं नाही- असं सतत म्हटलं जातं. पण यात एक नाठाळ आळशीपणा आहे. कारण भाषा टिकवण्याची जबाबदारी शासनावर कशी टाकता येईल? मराठी टिकविण्याची जबाबदारी आपल्यावर.. ती बोलणाऱ्यांवर आहे. आपण एकदा शोधून पाहू, की आपण नीट मराठी बोलतो का? मी खेडय़ातल्या लोकांबद्दल बोलत नाहीये. ते छानच मराठी बोलतात. कित्येक इंग्रजी शब्दांचं सुंदर मराठीकरण केलं आहे त्यांनी. पण जो मध्यमवर्ग आहे- सुशिक्षित, आपल्या मराठी बाण्याचा अभिमान बाळगून असणारा.. तो वर्ग मराठी बोलतो काय? त्याचे व्यवहार मराठीत होतात का?

याबाबत मी एक उदाहरण नेहमी देतो. दूरचित्रवाणीवर खाद्यपदार्थ बनवण्याचे कार्यक्रम दाखवतात. तिथे येणाऱ्या बायकांचं बोलणं असं असतं : ‘फ्रेश व्हेजिटेबल्स आणून ते बॉइल करा.. आणि नंतर स्मॅश करून ते डव्ह करा आणि त्याच्या रिंग्स कट करून त्या डीप फ्राय करा..’ म्हणजे क्रियापद तेवढं मराठी! इथं सहजगत्या मराठी बोलता येऊ शकतं, पण आपण बोलत नाही. मग ‘मराठीवर आक्रमण झालं’ म्हणण्यात काय अर्थ आहे? आपल्या परंपरेशी आपला धागा राहिलेला नाही. बौद्धिक आळस आपल्या भारतीय.. मराठी माणसांत प्रचंड आहे. आम्हाला कालचं आज माहीत नाही. आपल्याला संत वाङ्मय माहीत नाही. लोकवाङ्मयाचा अभ्यास आमच्या अंगात मुरलेला नाही. त्याकडे आम्ही ढुंकूनही पाहिलेलं नाही. याचा अर्थ इतर भाषांचा द्वेष करावा असंही नाही. इतर भाषाही आपण शिकल्या पाहिजेत. पण आम्हाला इंग्रजीही नीट येत नाही. असा सांस्कृतिक भिकारडेपणा जिथं आलेला आहे, तिथं भाषा टिकवण्याची जबाबदारी ही आपलीच.. मध्यमवर्गाची असते. मराठी भाषा टिकली पाहिजे असं जेव्हा या वर्गाला वाटेल, तेव्हाच सगळं चित्र पालटेल.

शब्दांकन : प्रसाद हावले