प्रज्ञा शिदोरे

pradnya.shidore@gmail.com

‘साहित्याचा महाकुंभ मेळा’ म्हणून जगभरातल्या साहित्यविश्वात नावाजला जाणारा सोहोळा म्हणजे जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल (‘जेएलएफ’)! हे या सोहोळ्याचं तेरावं वर्ष. गेली बारा वर्ष जयपूरच्या बोचऱ्या थंडीत, जानेवारी महिन्याच्या साधारण तिसऱ्या आठवडय़ात होणारा हा पाच दिवसांचा सोहोळा भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या साहित्यप्रेमींना भुरळ घालतो आहे.

पुस्तकाचं दुकान ही एक विलक्षण जागा असते. प्रत्येक वेळेला ते आपल्याला वेगळ्या विश्वाची ओळख करून द्यायला सज्ज असतं. एक-एक दालन पालथं घालून आपल्या संग्रही राहावं असं एखादं पुस्तक निवडून काढणं ही सगळी प्रोसेसच मुळी विलक्षण असते. या साऱ्या संशोधनातून खूप नवे लेखक, नवे विषय सापडत राहतात. आणि आपल्याला खरंच किती कमी माहिती आहे याची जाणीव होत राहते. पुण्यातल्या कॅम्प भागामधलं मॅनीज- लँडमार्क, डेक्कनवरचं इंटरनॅशनल बुक हाऊस, क्रॉसवर्ड किंवा मुंबईमधलं ऑक्सफर्ड, स्ट्रँड आणि अर्थातच फोर्ट भागामधल्या पुस्तकांनी भरलेल्या रस्त्यांवर मी तासन् तास घालवले आहेत. एखादं नव्या विषयावरचं अनोळखी लेखकाचं पुस्तक विकत घेणं आणि आपल्याला ते आवडणं, त्यातल्या कल्पना, पात्रं आपल्याला भावणं या सगळ्या प्रक्रियेमुळे मिळणाऱ्या आनंदाची सर पुस्तक परीक्षण वाचून अ‍ॅमेझॉनवरून पुस्तक मागवून घेण्याला मुळीच नाही. आता पुस्तकाची दुकानं संपत चालली आहेत आणि हा आनंदही. मात्र, गेल्या आठवडय़ात जयपूर लिट् फेस्टिव्हलला गेले होते. तिथे हा आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला.

२००० सालाच्या सुरुवातीला भारतातील स्थानिक भाषांतील लेखकांना एकमेकांशी संवाद साधायचे असे काही व्यासपीठ उपलब्ध नव्हते. भारतातल्या काही प्रथितयश इंग्रजी लेखकांनीही ‘भारतातील स्थानिक भाषांमधली नवी साहित्यनिर्मिती संपली आहे. जे साहित्य समोर येत आहे ते इंग्रजीमधूनच!’ असा गळा काढला होता. अशा वातावरणात २००२ साली नमिता गोखले यांनी ‘जयपूर विरासत फौंडेशन’च्या सहयोगाने ‘जयपूर हेरिटेज इंटरनॅशनल फेस्टिव्हल’चं आयोजन केलं. इथे त्यांनी स्थानिक भाषांमधले लेखक आणि इंग्रजी लेखक अशा दोन्हींना मुद्दाम बोलावले होते. या दोन गटांमध्ये प्रत्यक्ष चर्चा व्हावी, या हेतूनं. ही चर्चा चांगलीच वादळी झाली! या प्रसंगाच्या पाश्र्वभूमीवर लेखक विलियम डॅलिरपल यांनी नमिता गोखले यांना साहित्य सोहोळ्याचं संयोजन करण्याचं आमंत्रण दिलं. या सोहोळ्यात स्थानिक भाषांना आणि संस्कृतीला बरोबरीचा दर्जा दिला जाईल, या बोलीवर त्यांनी हे निमंत्रण मान्य केलं आणि नमिता गोखले व विलियम डॅलिरपल यांनी जयपूर शहरात २००६ ला एक संमेलन आयोजित केलं. या कार्यक्रमाला केवळ १०० टाळकी आली होती, असं डॅलिरपल यांनी या वर्षीच्या त्यांच्या स्वागत सोहोळ्यात सांगितलं. त्यानंतर या कार्यक्रमाची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी टीमवर्क आर्ट्सचे संजोय रॉय त्यांना सामील झाले. आणि गेली १४ वर्ष हे त्रिकुट जगभरातलं ज्ञान भारतात आणि भारतातलं ज्ञान जगभरात पोहोचवण्याचा हेतू समोर ठेवून  ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’चं आयोजन करत आहेत. पहिल्या वर्षी आलेल्या १०० साहित्यप्रेमींवरून दुसऱ्याच वर्षी हा आकडा ७००० च्या वर गेला. सलमान रश्दींसारख्या लेखकानंही सोहोळ्याच्या पहिल्याच वर्षांत या फेस्टमध्ये सहभागी होण्याचं कबूल केलं आणि या सोहोळ्याला मोठं रूप यायला सुरुवात झाली. मोठे लेखक, राजकीय विधानं, दरवर्षी बॉलीवूडमधील अभिनेत्यांची ये-जा यामुळे आज या पाच दिवस चालणाऱ्या साहित्य सोहोळ्यात ३०० च्या वर लेखक, कवी, गायक  विविध कार्यक्रमांमधून सहभागी झाले आहेत. हे लेखक २५ हून अधिक भाषांमध्ये लेखन करतात. या वर्षी हा सोहोळा अनुभवण्यासाठी जगभरातून चार लाखांहून अधिक मंडळी हजर होती असं आकडेवारी सांगते.

या चार लाखांमध्ये सर्व प्रकारचे लोक बघायला मिळतात. वीकेंड एन्जॉय करायला, सेल्फी काढायला, बॉलीवूडच्या तारे-तारकांना बघायला आलेले जयपूरमधले तरुण, काहीतरी नवीन ऐकायला मिळण्याची आशा असणारे, कार्यक्रमपत्रिकेचा पूर्ण अभ्यास करून आलेले लोक, भारतातले आणि भारताबाहेरचे अनेक सच्चे साहित्यप्रेमी, अशा विचारवंतांच्या मेळ्यामध्ये आपण दिसायला हवं असं वाटणारे तसंच नंतर होणाऱ्या पार्टीमध्येच अधिक रस असणारे सोशलाइट्स, जयपूरमध्ये राहण्याची जागा घेणं परवडत नाही म्हणून कडाक्याच्या थंडीत रेल्वे स्टेशनवर तळ ठोकून बसणारे तमिळनाडू, आसाम किंवा काश्मीरहून येणारे विद्यार्थी असे सर्व प्रकारचे लोक तुम्हाला इथे भेटतात. या फेस्टला पहिल्या वर्षांपासूनच रामप्रताप दिग्गी यांनी आपल्या दिग्गी पॅलेसची जागा देऊ केली. इथे एकाच वेळी सहा ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात. त्यामुळे जर विशिष्ट कार्यक्रम आपल्याला ऐकायचे असतील तर वेळापत्रकात बघून आपल्या वेळा निश्चित करणं हे सर्वात उत्तम. नाहीतर भलताच गोंधळ उडू शकतो. एका वेळेला कमीत कमी १० ते १५ हजार लोक इथल्या सहा विविध दालनांमध्ये होणारे कार्यक्रम अनुभवत असतात. त्यातले बरेचसे जयपूरची बोचरी थंडी (आणि काही सत्रांमधले बोचरे विचारही!) घालवण्यासाठी मोठय़ा लॉन्सवर ऊन खात, कॉफी-चहा घेत बसलेले दिसतात. विविध पदार्थाची रेलचेल आणि खास राजस्थानी पद्धतीचे चांदीचे दागिने, इथलं ब्लॉकिपट्रचं कापड आणि त्याचे विविध स्टॉल्सही असल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला काही ना काही आवडेल असं  काहीतरी सुरू असतंच! एवढा मोठा पसारा मांडलेला असूनही कार्यक्रमांचं नियोजन अगदी चोख असतं. कार्यक्रम वेळेवरच सुरू होतात आणि संपतातही. प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोय, सावलीत बसायला जागा आणि स्वच्छ शौचालये असतात. आपल्याला कोणती अडचण असेल तर इथले तरुण स्वयंसेवक आपल्या मदतीला तत्पर असतात.

या सोहोळ्याची प्रेरणा घेऊन जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलने आता जागात आठ शाखा सुरू केल्या आहेत. अमेरिकेत कॉलराडो, ुस्टन आणि न्यू यॉर्क या शहरांबरोबरच टोराँटो, लंडन, बेलफास्ट, अ‍ॅडलेड आणि दोहा या शहरांमध्येही ‘जेएलएफ’ या ब्रँडखाली साहित्य सोहोळ्यांचं आयोजन केलं जातं. इथे मिळणाऱ्या निधीमधून जयपूरमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात. याबरोबरच गेल्या सहा वर्षांपासून भारतीय प्रकाशन व्यावसायिक, लेखक, अनुवादकार या सगळ्यांसाठी ‘जयपूर बुकमार्क’ नावाचं व्यासपीठही निर्माण केलं गेलं आहे. जयपूर लिट् फेस्टच्या निमित्ताने जयपूरच्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमधून नाटय़, लेखन या विषयांच्या कार्यशाळाही घेतल्या जातात. जयपूर शहरात होत असलेल्या या साहित्य सोहोळ्यातून प्रेरणा घेऊन आजघडीला देशभरात अशा तऱ्हेचे शंभरहून अधिक सोहोळे सुरू झाले आहेत.

नमिता गोखले एका मुलाखतीत म्हणतात की, अशा प्रकारचा कोणताही साहित्य सोहोळा यशस्वी करायचा असेल तर काही सूत्रं लक्षात ठेवायला हवीत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिकता जपणं. तिथली भाषा, इतिहास, तिथले संस्कार या सगळ्या गोष्टी असं संमेलन भरवताना लक्षात घ्यायलाच हव्यात. त्या जागेचं मूळ जपतानाच सर्वसमावेशकही व्हायला हवं. इतर देशांमध्ये होत असलेला विचार, आंदोलनं याबद्दल जागरूक असायला हवं. इथे होणारे सगळे कार्यक्रम हे नमिता गोखले यांनी मांडलेला उद्देश आणि सूत्रांशी संलग्नच आहेत. या वर्षीच्या स्वागत कार्यक्रमात विजयदन देठा यांनी मूळ राजस्थानी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा विश्वास कोठारी यांनी केलेला इंग्रजी अनुवाद-‘स्टोरीज् फ्रॉम मारवाड’चं प्रकाशन झालं. त्या संध्याकाळी नंतर ‘मंटो अँड आय’ या नंदिता दास यांच्या पुस्तकाविषयी गप्पा झाल्या. ‘मंटो’ हा चित्रपट तयार करताना आलेल्या अनुभवांविषयी नंदिता दास यांनी त्यात लिहिलं होतं. विविध कार्यक्रमांमधून सध्या लेखक-पत्रकारांवर असलेला दबाव, जेएनयू व जामियामधील हल्ले, नागरिकत्व सुधारणा कायद्याला असलेला विरोध आणि शहीनबाग हे विषय चर्चिले गेले. फक्त नंदिता दासच नाही, तर ज्या ज्या कार्यक्रमांमध्ये भारतातील सध्याच्या सरकारचा उल्लेख यायचा तिथे तिथे प्रत्येक लेखकाने थेट भूमिका घेतलेली यावेळी पाहायला मिळाली. एका चर्चासत्रात तर राणा आयुबने तिच्यावर ट्रोलिंग नाही, तर आपला सरकारपुरस्कृत छळच होतो आहे अशी भूमिका मांडली. त्यामुळे भारतात संविधानाची प्रत हातात घेऊन उभी राहिलेली आंदोलनं आणि या आंदोलनांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही या लिट् फेस्टची थीम असल्याचं जाणवलं. राजस्थानी भाषेत साहित्यनिर्मिती होत असूनही आणि तीत अधिकृत भाषेच्या नियमांची पूर्तता होत असूनदेखील या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही याबद्दल एका सत्रात चर्चा झाली. तसंच प्रत्येक भाषा, बोली तिथल्या ठिकाणचा स्वभाव सांगते, या विषयावरही चर्चा झाली. संस्कृत ही एकेकाळची ज्ञानभाषा. या भाषेचा प्रसार व भविष्याविषयीही ऊहापोह झाला.

या सोहोळ्याला जायच्या आधी एखाद् दिवस मी ‘छायाचित्रण आणि स्त्रिया’ याविषयी ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीमध्ये लिहिलं होतं. या लेखात काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी सुझन साँताग या अमेरिकन विचारवंत- लेखिकेच्या ‘ऑन फोटोग्राफी’ या पुस्तकाचा आधार घेतला होता. साँताग या काही सध्याच्या काळातील प्रसिद्ध विचारवंत नक्कीच नाहीत. तरीही ‘जेएलएफ’मध्ये बेंजामिन मोझर लिखित साँताग यांच्या आत्मचरित्राविषयीची चर्चा होती. अशा योगायोगांमुळे कुठेतरी आपण योग्य दिशेनं विचार करतो आहोत असा उगाच स्वत:ला कुरवाळणारा विचार मनात येतो आणि तुम्ही अशा सोहोळ्यामध्ये दुप्पट उत्साहानं सहभागी होता. त्यानंतर तुम्ही वायजीअन शान या लेखकाचं ‘एस्केप फ्रॉम गोबी’ या पुस्तकाविषयीचं सादरीकरण ऐकता आणि खाड्कन जमिनीवर येता. शान हे चीनच्या ‘लॉस्ट जनरेशन’मधले. माओने चीनच्या शाळा दहा वर्ष बंद केल्या आणि त्यांच्यासारख्या अनेक तरुणांना गोबी वाळवंटातील जमीन सुपीक करण्याच्या कामावर पाठवलं. तिथून सुटून त्यांनी अमेरिकेतील बर्कली विद्यापीठात गणित विषयात पीएच. डी. केली आणि नंतर आपला स्वत:चा व्यवसाय कसा उभारला याची चित्तथरारक कहाणी ते या पुस्तकात सांगतात. तसंच टॉम सेगेव्ह यांच्या ‘अ स्टेट अ‍ॅट एनी कॉस्ट’ या इस्रायल राष्ट्रनिर्मितीसंबंधीच्या पुस्तकावर झालेल्या चच्रेने आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे आपण अधिक डोळसपणे बघू शकतो. शशी थरूर, जयराम रमेश तसंच अर्थशास्त्राचं नोबेल मिळालेले अभिजीत बॅनर्जी यांची सत्रंही फेस्टमध्ये होती. या सत्रांमध्ये एक मात्र लक्षात आलं, की लेखकाने आपल्या पुस्तकात कितीही उत्कृष्ट लेखन केलेलं असलं तरी तो लेखक चांगला वक्ता नसेल तर अशा कार्यक्रमांमध्ये त्याच्या विचारांना योग्य तो न्याय मिळत नाही.

१४ वं वर्ष म्हणजे आता या उत्सवाने ‘टीनएज’मध्ये प्रवेश केला आहे. या सोहोळ्यातली ऊर्जा या शहराला आता पेलेनाशी झाली आहे असं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे. दिग्गी पॅलेसला जायला एकच निमुळता मार्ग आहे. शेजारीच राजस्थानचं सर्वात मोठं सवाई मानसिंग हे हॉस्पिटल आहे. त्यामुळे तिथल्या गर्दीत अधिकच वाढ होते. पाच दिवसांत चार लाख लोकांनी या ठिकाणी गर्दी करणं म्हणजे आपत्तीला आमंत्रण देण्यासारखंच आहे. म्हणूनच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही लिट् फेस्टचं हे स्थळ हलवणं राज्य प्रशासनाला योग्य वाटतंय. परंतु १७ व्या शतकात बांधला गेलेला राजवाडा- जिथली प्रत्येक जागा इतिहासाची साक्षीदार आहे, असं ठिकाण कुठे आणि एखादं रूक्ष कन्व्हेन्शन किंवा बिझनेस सेंटर कुठे! दिग्गी पॅलेसमधून हा सोहोळा हलवला तर जयपूर लिट् फेस्ट आपला आत्माच हरवून बसेल, त्यापेक्षा हा सोहोळा वेगळ्या शहरात करावा असं या सोहोळ्याचे संयोजक म्हणतात. संयोजकांनी पाच वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘जेएलएफ’च्या पाच दिवसांमध्ये शहरात साधारण ४० कोटींचे व्यवहार होतात. यात हॉटेल, दळणवळणासाठी लागणाऱ्या गाडय़ा, जयपूरचे पारंपरिक आणि स्थानिक कपडे, दागिने यांची विक्री असं सगळं येतं. या वर्षी हा आकडा शंभर कोटीवर जाईल असं त्यांचा अभ्यास सांगतो. त्यामुळे ‘जेएलएफ’ला जशी जयपूरची गरज आहे, त्याहीपेक्षा जास्त गरज जयपूर शहराला या सोहोळ्याची आहे, असं दिग्गी पॅलेसचे मालक रामप्रताप दिग्गी सांगतात.

सोहोळ्याच्या शेवटच्या दिवशी दिग्गी पॅलेसला जाताना बसमध्ये जयपूरचीच राहणारी, फार्मसीचं शिक्षण घेणारी एक मुलगी भेटली. दिवांशी तिचं नाव. ती म्हणाली की, हे लिट् फेस्ट लागलं की आठवडाभर जयपूरमधली कॉलेजेस ओस पडलेली असतात. तिला आणि तिच्या मित्र-मत्रिणींना साहित्य, संगीत यामध्ये काही रस नव्हता. ‘पण वर्षांतून एकच आठवडा जयपूरमध्ये एवढा मोठा फेस्टिव्हल होतो.. तोही फुकट पाहता येतो म्हणून आम्ही दरवर्षी एकदा तरी इथे येतोच!’ असं ती म्हणाली. त्यामुळे आठवडय़ाला किमान एक तरी सांस्कृतिक कार्यक्रम, नाहीतर नाटक वा परिसंवाद हमखासच असणार, असा सगळा सांस्कृतिक माहोल असलेल्या राज्यातून जयपूरला गेलेल्या मला पुनश्च एकदा महाराष्ट्रातल्या व्यापक साहित्य परंपरेचं महत्त्व पटलं.