अन्न, पाणी, चारा आणि रोजगार यांसाठी राज्याच्या दुष्काळी भागातील लोकांचा जीव क्षणोक्षणी मेटाकुटीला येत आहे. दुष्काळाने काळवंडून चाललेल्या या  भागांचा दौरा करून नोंदवलेली निरीक्षणे.
भकास, उदास, रापलेले, करपलेले, ओढलेले, ताणलेले, रया गेलेले चेहरे. कुठलाही चेहरा निरखून पाहा. कुठलीही आशा उरलेली नाही. केवळ अंधार आणि अंधकार वाढून ठेवलाय. कशाचीही यित्कचित अपेक्षा नाही. दु:खात म्हटलं तर उद्वेग आहे. उन्हातान्हात राबराबल्याच्या साऱ्या खुणा चेहऱ्यावर आहेत. अशा रापलेल्या चेहऱ्यावर कधीमधी हसूसुद्धा दिसतं. ते हसणं! तो हसरा चेहरा!! ती नजर!!! व्हिन्सेंट व्हॅनगॉगच्या ‘पोटॅटो इटर्स’मधील जीवघेण्या चेहऱ्यांसारखीच आहे. ते हास्य तर विलक्षण करुण आहे. ‘अवहेलना आणि अपमान यांचा सदैव मानकरी, तो आपला शेतकरी’ अशी त्यांची स्थिती आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच आष्टी तालुक्यातील (जिल्हा बीड) आरणगावात ४० अंश सेल्सियसच्या उन्हाळझळा बडवत आहेत. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात डांबरी रस्त्याच्या कडेला माती टाकण्याचे काम रोजगार हमी योजनेत चालू आहे. ‘महिनाभर पगार झाला नाही. निदान धान्य तरी द्या,’ अशी एकमुखी मागणी होते.
काबाडकष्ट करून सर्व प्रकारचे आजार अंगावर काढत काही जण मजुरी करतच आहेत. असह्य झालेले गावात भिंतीकडेला बसून राहतात. करमाळा तालुक्यातील (जिल्हा सोलापूर) पोथरे गावातील लक्ष्मीबाई दत्तू झिंझजाडेंना संधीवाताचा त्रास आहे. हिरव्या व पिवळ्या पुडीतील गोळ्या घेत त्या घरकाम करतात. त्यांच्या सासूबाई जनाबाईंना महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला. तीस हजारांचा खर्च झाला. सासूबाईंना सांभाळत घरकाम करण्याची जबाबदारी लक्ष्मीबाईंवर आहे. त्यांचे यजमान दत्तू व मुलगा सतीश वीटभट्टीवर कामाला जातात. याच गावातील शहाजी जाधव हे बांधकामावर मजुरी करण्यासाठी सोलापुराकडे निघाले आहेत.
गावात चारा छावणी निघाली तर जनावरं ठेवण्याची सोय होते. मोठय़ा जनावरांना १५ किलो तर लहानांना साडेसात किलो ओला चारा मिळतो. पाणी उपलब्ध होते. परंतु जनावर ठेवण्यासाठी दाखलेच दाखले घ्यावे लागतात. ग्रामसेवकाकडून रहिवासी असल्याचा दाखला मिळवायचा. तलाठय़ाकडून जनावरांचा आणि गावात पशूखाद्य उपलब्ध नसल्याचा दाखला घ्यायचा. मग त्यावर पंचायत समिती मंजुरी आणि अखेरीस तहसीलदाराचा आदेश मिळवायचा. या सर्व कामांत योग्य त्या प्रमाणात मोबदला द्यायचा. असे सोपस्कार झाले तर जनावराला छावणीत जागा मिळते. लाकडं रोवून झावळ्या टाकायच्या. छावणीत जनावर ठेवलं की एक माणूस तिथंच गुंतून पडतो. घरातून कोणी तरी जेवण आणून द्यावं लागतं. हे काम बाई नाही तर मुलांच्या वाटय़ाला येतं. ‘शाळा लवकर सोडा. छावणीला जायचंय.’ मुलं शिक्षकांना सांगत राहतात.
कर्जत व जामखेड तालुक्यात (जिल्हा अहमदनगर) सलग तिसऱ्या वर्षी दुष्ट काळ आला आहे. २०१० ला अतिवृष्टी, २०११व २०१२ला अनावृष्टी. सदासर्वकाळ दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या या दोन्ही तालुक्यांची सदैव यथेच्छ उपेक्षा केली जाते. कायम तहानलेल्या या भागासाठी कायमस्वरूपी पाणी योजना नाही.  
आरोग्य, पाणी, वीज, शिक्षण, वाहतूक या मूलभूत सोयी ही ग्रामीण भागातील जनतेची क्रूर चेष्टा आहे. कुठल्याच सुविधा गावात नाहीत. या परिस्थितीमुळे येणारे नराश्य व असुरक्षितता यांमधून अनेक सामाजिक अपघात घडत आहेत व घडण्याच्या वाटेवर आहेत.
रात्रंदिवस अतोनात श्रमातून सुटका नाही, सुटी नाही, शिक्षण वा आरोग्य ही चन परवडत नाही. करमणुकीचा सवालच नाही. गावातच काय पण कुटुंबात, नातेवाईकांमध्ये प्रतिष्ठा नाही, हातात पसा नाही असा शेती हा व्यवसाय कोण स्वत:हून निवडेल? बहुसंख्य शेतकरी असा आहे.
कुठल्याही आपत्तीनंतर हानीच्या तीव्रतेनुसार तीव्र, मध्यम व सौम्य अशी वर्गवारी केली जाते. त्या नकाशानुसार आपत्ती व्यवस्थापन केले जाते. सध्याच्या भीषण दुष्काळानंतर अशी तसदी घेतली असती तर पाणी, चारा व धान्य यांच्या टंचाईच्या प्रमाणात वर्गवारी करून सत्पात्री मदत करता आली असती. अति तीव्र दुष्काळी गावात विशेष अधिकारी पाठवून निधीच्या विनियोगाची खातरजमा झाली असती. व्यवहार पारदर्शक करण्याकरिता सामाजिक लेखाजोखा (सोशल ऑडिट) मांडता आला असता. अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सने दुष्काळग्रस्तांच्या अडचणी थेट समजून तातडीने सोडवणूक करता आली असती. वर्षांनुवष्रे दुष्काळी गावांचे प्रमाण कमी होत नाही हा आपला अपमान वाटला असता तर केवळ िवधनविहीर व टँकर यापलीकडे जाऊन दीर्घकालीन उपाय केले असते. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या पिकांच्या जातीचे संशोधन करण्यासाठी शेतीशास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले असते. परंतु थातुरमातुरतेमध्ये आकंठ बुडालेल्या राज्य प्रशासनाकडून अशा अपेक्षा करणे गर आहे.
परिणामी सध्या दुष्काळनिधीने मस्त झालेला वर्ग बेहद्द खूष आहे. श्रीमंत शेतकरी, ठेकेदार मंडळी मजेत आहेत. ‘भारता’मधील बांडगुळी ‘इंडिया’चा आनंद भित्तिफलकांतून गगनाला भिडत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पलवान पोसले जात आहेत. बिहारमधील ‘रणवीर सेना’ वेगळ्या अवतारात महाराष्ट्रात दाखल होत आहे.