30 March 2020

News Flash

कवीपेक्षा कविता मोठी!

कवी ग्रेस यांचा २६ मार्चला पहिला स्मृतिदिन. अनुकरणास अशक्य पण गुणगुणण्यास सहजशक्य असणाऱ्या ग्रेस यांच्या कविता पिढय़ान् पिढय़ा खुणावत राहतील. तसेच त्यांच्याविषयीच्या आख्यायिका, अफवा, किस्से,

| March 24, 2013 12:01 pm

कवी ग्रेस यांचा २६ मार्चला पहिला स्मृतिदिन. अनुकरणास अशक्य पण गुणगुणण्यास सहजशक्य असणाऱ्या ग्रेस यांच्या कविता पिढय़ान् पिढय़ा खुणावत राहतील. तसेच त्यांच्याविषयीच्या आख्यायिका, अफवा, किस्से, छंदफंद, व्यसने, दुर्वर्तन, दोष, दुर्गुण, संबंध- हे काही दिवस चर्चेत राहिल. काळाच्या ओघात हे सर्व मागे पडेल, कारण हे कवीला चिकटलेले आहेत. त्यांची कविता विशुद्ध, देखणी, गोळीबंदच राहील, खेचून घेईल.
२६ मार्चला मागील वर्षी पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कवीने भिंतीवर लावलेल्या आपल्याच प्रतिमांच्या साक्षीने आणि मोजक्या सुहृदांच्या उपस्थितीत अखेरचा श्वास घेतला. त्या कवीचे नाव ग्रेस. तसे त्याचे कागदोपत्री नाव माणिक सीतारामपंत गोडघाटे असे होते. पण त्याने ते नाइलाजानेच, एक सामाजिक परंपरा आणि कायदेशीर प्रक्रिया म्हणून स्वीकारले होते. त्याला ते कधी आवडले नाही आणि त्याने त्या नावाचा वापरही फारसा केला नाही. ‘ग्रेस’ हे कवी म्हणून घेतलेले नाव त्याला अतिशय प्रिय होते. म्हणून त्याला कविता मागायला गेलेल्या एका दिवाळी अंकाच्या संपादकाला, माझ्याकडे सध्या कविता नाही, असे खोटे खोटे सांगताना तो त्याच्या खास शैलीत म्हणाला होता (या म्हणण्याचे एक कारण म्हणजे संपादकांनी आपली जुनी ओळख दाखवून ‘माणिकराव’ असे म्हणून लगट करण्याचा प्रयत्न केला होता)- ‘माणिक गोडघाटे या नावाने मी तुम्हाला टोपलंभर शेण देऊ शकेन. पण ग्रेस या नावाने तुम्हाला मी काही फुले देऊ शकेन. जी सध्या माझ्याजवळ नाहीत.. तेव्हा फिर कभी..’
आपण कवी असल्याचा त्याला गर्व होता. केशवसुतांच्या ‘आम्ही कोण’मधील कलावंत असल्याचा अहंभाव ग्रेसच्या बाबतीत अहंकाराच्या टोकापर्यंत गेल्याचे जाणवत असे. हे टोक कधीकधी लोकांना बोचतही असे. पण लोकांनी त्याला माफ केले होते. जेव्हा मी लोक असे म्हणतो तेव्हा खरोखरच लोक असेच मला म्हणायचे असते. इतर मोठय़ा कवींना वाचक, रसिक लाभतात. इथे या कवीला कोण लोक लाभले होते? तर कारकुनापासून खासदारापर्यंत. शिक्षकापासून उद्योगपतीपर्यंत. किराणा दुकानदारापासून प्रतिभावंत संगीतकारापर्यंत. कॉलेजातील विद्यार्थिनीपासून शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठाप्राप्त गायिकेपर्यंत. गृहिणीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकर्तीपर्यंत. गुत्तेवाल्यापासून तर हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलावंतांपर्यंत. आणि हा कवी मराठीतील सर्वात दुबरेध कवी मानला जातो. ही चाहती मंडळी वेडी तर नक्कीच नव्हती, पण हे कोडेही होते आणि आश्चर्यही! अंशत: कळणाऱ्या किंवा न कळणाऱ्या, तरीही भुरळ पाडणाऱ्या या कवितेत असे आहे तरी काय? ‘निर्मिती, निर्मितिप्रक्रिया आणि आस्वाद यासंबंधी माझ्या कवितेने काही प्रश्न निर्माण केले आहेत,’ असे त्यानेच लिहून ठेवले आहे. ते खरे वाटते. अर्थ आणि आशय, तत्त्व आणि बोध यांची पर्वा न करता वाचक ग्रेसच्या कवितेकडे खेचला गेला. ‘ग्रेस’ म्हटले की पटकन ‘दुबरेध’ असे एक त्याच्या कवितेचे वैशिष्टय़ सांगून अनेक जण आपली सुटका करून घेतात. प्रश्न कळण्याचाच असेल तर असेही विचारता येईल. विराणी लिहिणारे ज्ञानदेव कळतात? ‘आपुले मरण’ आणि ‘नवसे कन्यापुत्र’वाले तुकाराम? ‘मुंगी उडाली आकाशी’ म्हणणारी मुक्ताबाई? एकनाथांची भारूडे? ‘हरपले श्रेय’? बालकवींची ‘औदुंबर’? मर्ढेकरांची ‘पळापळातील जोर मनगटी’? ‘गोलपिठा’वाले ढसाळ? अरुण कोलटकरच्या कविता? – यापैकी काय आणि किती कळते हा प्रश्न कधीकधी पडतो. पण या सर्व कवींना आणि त्यांच्या कवितांना कळून घेण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न केले तेवढे ग्रेसची कविता समजून घेण्यासाठी केले नाहीत, हेही सत्य आहे. ‘दुबरेध’ म्हणायचे आणि दूर सारायचे! आजच्या एखाद्या नवोदित कवीच्या (स्वखर्चाने, म्हणजे प्रकाशकांना पैसे देऊन काढलेल्या, सर्व प्रती भेट म्हणून वाटल्यामुळे पहिली आवृत्ती संपलेल्या!) संग्रहावर जेवढी परीक्षणे छापून येतात तेवढीदेखील ग्रेसच्या ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’वर आलेली नाहीत हे वास्तव आहे. (कवी ‘मार्केटिंग’मध्ये कमी पडला काय?) ही कविता का आणि कशी दुबरेध हे जरी अभ्यासून, समजावून सांगितले असते, या कवितेतील दुबरेधता आशयगत आहे की शैलीगत हे जरी नीट सांगितले असते किंवा ही दुबरेधता अस्सल आहे की कृत्रिम आहे हे जरी पुराव्याने सिद्ध केले असते, तरी मराठी काव्यक्षेत्राचे भलेच झाले असते.
कवीच्या रचनाबंधामध्ये तिच्या लोकप्रिय होण्याची कारणे दडलेली आहेत. सर्व नाही, काही कारणे. मर्ढेकरी युग सुरू झाले, पण प्रभाव मुक्तिबोधांच्या, अनिलांच्या मुक्तछंदाचा पडला. नव्या जगाच्या नव्या युगाच्या नव्या आशयासाठी अनेक कवींना तो अनुरूप वाटला. या पाश्र्वभूमीवर ग्रेसची ‘लिरिकल’ कविता आली. ती छंदोबद्ध होती, गेय होती, नादमय होती. ती चालत नव्हती, पदन्यास करत होती. अभंग, छंद, मालिनी, शिखरिणी, शार्दूलविक्रीडित अशी पारंपरिक वृत्ते, संतसाहित्य, रामदासांची करुणाष्टके यांची आठवण होईल असे आकृतिबंध, ‘उठा दयाघना। लावा निरंजने, देहातले सोने। काळे झाले’ अशी संतकुळातील आर्तता. कर्ण, कुंती, द्रौपदी, सीता, राघव, मिथिला, अशा रामायण-महाभारतातील व्यक्तित्वांचे शोधलेले नवे कंगोरे, यामुळे पारंपरिक कवितेचा वाचक सुखावला. आणि रिल्के, लोर्का, डोस्टोव्हस्की, एमिली ब्राँटे, डॉ. झिवागो, लँडोर, रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या समर्पक समावेशाने आधुनिक साहित्याच्या वाचकांनाही ग्रेस हा कवी ‘आपला’ वाटू लागला. मुक्तछंदातील कवितेपेक्षा छंद, वृत्तातील कविता पाठ होणे अगदी स्वाभाविक आहे. यामुळे ही कविता अनेकांनी मुखोद्गत केली म्हणून ती ‘कानोकानी’ही पोचली.
ग्रेसच्या कवितेचे एक विलोभनीय वैशिष्टय़ म्हणजे अंतर्गत संगीत-
‘किरमिजि वळणाचा धुंद पाऊस येतो
निळसर कनकाचे दीप हातात देतो’
(संगीतकारांना आकर्षून घेणारा हाही एक नादगुण असावा.)
कविता कशी भोगावी हे सांगताना विंदा करंदीकरांनी एक विलक्षण प्रयोग सांगितला होता. तो जिज्ञासूंनी करून पाहावा एकांतामध्ये. पण असेही वाटते, की एखादी कविता कळत नसेल तर ती वाचकाने मोठय़ाने म्हणून पाहावी. प्रत्येक कवितेला एक आवाज असतो. तो ऐकू येतो. जशी आजीच्या खरखरीत तळहाताच्या थरथरत्या स्पर्शाने नातवाच्या पाठीला माया कळते, न बोलतासुद्धा! प्रयोग करून पहा..
तू उदास मी उदास मेघही उदासले
स्मृतींतले विदग्ध नाद पैंजणात सांडले..
मंद मंद वाहते दिव्यातली अनंतता
तुझ्या सुखांस गंधवीत लोचनी निजे कथा..
सहा कवितासंग्रह आणि सात ललितलेखांचे संग्रह (ज्यांना कवी ‘ललितबंध’ असे म्हणत असे. इतरांपेक्षा वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न? जशी दुसऱ्या एका मोठय़ा कवीने भाषांतर आणि अनुवाद यासाठी ‘अपभ्रंश’ या शब्दाची योजना केली होती?) एवढा ऐवज कवी मागे ठेवून गेला.
आत्मलीन आणि आत्मलुब्ध असलेला हा कवी आत्मतृप्त मात्र नव्हता. याचे कारण असेही असावे की ‘संध्याकाळच्या कविता’पासून ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’पर्यंत उंच उंच जात असलेला हा कवी नंतर थबकला. आपल्यावरील म्हणजे आपल्या कवितेवरील आरोपांनी अस्वस्थ होऊ लागला. दुबरेधता हे एखाद्या कवितेचे वैशिष्टय़ असू शकते; पण दुबरेधता हे काही काव्यमूल्य होऊ शकत नाही. हे कवीलाही जाणवू लागले असावे. नंतरच्या काळात निर्मितीमधील आशय विस्कळीत वाटू लागला आणि रचनेत सराईतपणा जाणवू लागला. भीती- काही हिरावले जाण्याची आणि काही गमावण्याची भीती- यांच्या जोडीला आली निर्मितिनाशाची किंवा निर्मितिविन्मुखतेची भीती.. ‘भय इथले संपत नाही..’! मग कवी बोलताना किंवा लिहिताना स्वत:ला जी. ए. कुलकर्णी आणि आरती प्रभू यांच्याशी किंवा त्या प्रतिभावंतांना स्वत:शी जोडून घेऊ लागला. त्यात चाहते नावाचा त्याचे दैवतीकरण करणारा समूह..
कुछ तो होता है दीवाने मे जुनूँ का भी असर
और कुछ लोग भी दीवाना बना देते हैं
म्हणजे एका दिवाळी अंकातील अकरा कवितांसाठी अकरा हजार रुपयांचा चेक आधीच मिळत असेल तर कवीचे काय होईल? किंवा एक श्रीमंत खासदार सोन्याचे पेन भेट म्हणून देईल तर कवीचे काय होईल? एखादी कलावंत स्त्री उंची चिरुटांचा डबा कवीला पाठवील तर कवीचे काय होईल? आणि एखादा चाहता नगरहून स्कॉचची बाटली कवीसाठी विमानाने घेऊन येईल तर कवीचे काय होईल?- कविता हरवेल. आरती प्रभूंना ते भान होते. रूक्ष व्यवहार आणि काव्यनिर्मिती या दोन पातळ्या त्यांना कळत होत्या. म्हणून चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नावाच्या खानावळवाल्या माणसाच्या आत दडलेल्या आरती प्रभू या प्रतिभावंत कवीविषयी ते म्हणायचे- ‘तो कुणी माझ्यातला घनतमीं जे तेजाळतो. .. आणि मी? मी भाकरीचे तुकडे मोडणारा..’
ग्रेसला हा तोल साधला नाही. कवीला हिंदी सिनेमाची गाणी आवडायची. ‘मैं अपने आपसे घबरा गया हूँ; मुझे ऐ जिंदगी दीवाना कर दे’ – हे रफ़ी साहेबांचे गाणे त्याने उत्तरार्धातील आयुष्यासाठी शीर्षक म्हणून स्वीकारले असावे. कुछ ग़मे-जानाँ, कुछ ग़मे-दौराँ या कात्रीत सापडून कवीने आतापावेतो जपलेला एकांत सोडला आणि एकदम समूहातच उडी घेतली. त्यानेच ‘चर्चबेल’मधील एका लेखात म्हटले आहे, ‘रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये.’- असेच काहीसे झाले असावे.
खरे तर ‘चर्चबेल’ आणि ‘मितवा’मधील ललितबंधांमध्ये ग्रेस पूर्ण काव्यबळाने प्रकट होतो. नंतरच्या लेखांमध्ये गोधडीचे रूप समोर फक्त. फक्त ही गोधडी किंवा वाकळ रंगीत, झगझगीत, रेशमी, भरजरी, जरतारी, मुलायम, मखमली तुकडय़ांनी शिवलेली आहे. काही ठिकाणी तर शिवणही उघडी पडते.
तशीच गंमत कवीच्या भाषणाची. त्याचे भाषण म्हणजे अंतरिक्षातील उड्डाणच. कधी या ग्रहावर, कधी त्या नक्षत्राजवळ, कधी धूमकेतूचे दर्शन, कधी कृष्णविवरात प्रवेश. पण लोक नादावल्यासारखे ऐकत (आणि पाहतसुद्धा.)!
एक गोष्ट निश्चित. आपल्या निर्मितीविषयी तो प्रचंड अस्वस्थ आणि जागरूक होता. त्याला खूप काही सांगायचे होते (अब्द अब्द मनी येते!) आणि मांडताना त्याला भाषेच्या मर्यादा जाणवत होत्या. नवी भाषा निर्माण करण्याच्या प्रयत्नात त्याची कविता दुबरेध होत गेली असावी. ‘भाषाच ही निकामी । अर्थासही पुरेना’ किंवा ‘तनमनगणमात्रा दीर्घ आकाशभाषा’ किंवा ‘ज्या भाषेत मी जन्माला आलो, तिथेही अनाथ वाटते मला’ – या त्याच्या ओळी त्याच्या कलावंत म्हणून अस्वस्थतेच्या निदर्शक आहेत.
त्याचे अनुकरण अशक्य आहे. तो एकमेवाद्वितीयच राहील. आता आख्यायिका, अफवा, किस्से, त्याचे छंदफंद, व्यसने, दुर्वर्तन, दोष, दुर्गुण, संबंध- हे काही दिवस चर्चेत राहतील. कुठे? तर जिथे घसा ओलसर झाल्यानंतर जीभ सैलसर होते अशा बैठकांमध्ये. हे सर्व मागे पडेल, कारण हे कवीला चिकटलेले होते. कविता विशुद्ध, देखणी, गोळीबंद अशी त्याच्यानंतरही पिढय़ान् पिढय़ांना खुणावत राहील, खेचून घेईल. म्हणून कवीपेक्षा कविता मोठी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2013 12:01 pm

Web Title: article on marathi poet grace poem is bigger than poet
टॅग Poet
Next Stories
1 तपशिलातून तत्त्वाकडे…
2 नीयत आणि नियती
3 वास्तवाचा वेध अवघड
Just Now!
X