सुहास सरदेशमुख

suhas.sardeshmukh@expressindia.com

करोनाविषयी लोकांमध्ये कमालीची भीती आहेच, पण जागरूकताही आहे. एकीकडे करोनाच्या नावाखाली लोकांना फसविण्याचा काहींचा धंदाही तेजीत आहे, तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत..

तशी गर्दी म्हणता येणार नाही, पण शुकशुकाटही नाही. बाजारपेठ उघडी तर आहे, पण ग्राहक मात्र कोणी दिसत नाही. प्रत्येकांमध्ये भीती दाटलेली, तोंडावर गुंडाळलेल्या कपडय़ाप्रमाणे. वातावरणात किती असतील विषाणू? असतातच ते, पण त्याची एवढी काळजी कोणी करत नाही. पण करोनाभय कमालीचे. दर पाच मिनिटाला ‘सॅनिटायझर’ची मागणी करणारा एक जण औषधी दुकानात येतो. ते काही त्याला मिळत नाही. मोठय़ा आलिशान दुकानात ग्राहक नसला, तरी ‘मास्क’ म्हणून तोंडाला बांधायचे काळे फडके विकणाऱ्याचा धंदा तेजीत आहे. निमशहरी भागातील अर्थकारणाचे पार कंबरडे मोडून गेले आहे. छोटय़ा शहरातील उलाढालीचे निकषही वेगळेच असतात. औरंगाबादसारख्या शहरात स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे ठरवून आलेले १५-२० हजार तरुण आहेत. महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्ग बंद झाले. अभ्यासिकांमध्ये कोणाला शिंक आली तरी संशयाने पाहिले जाऊ लागले. त्यामुळे बरीच मुले आता गावी परतू लागली आहेत. या मुलांवर अवलंबून असणारे व्यवसाय आता थंडावले आहेत. लातूरसारख्या शहराचे आर्थिक गणितच विद्यार्थी केंद्रित आहे. पहाटे पाच वाजता लातूर हे शहर जागे असते. अकरावी, बारावीमध्ये आपले मूल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून राज्यातील कानाकोपऱ्यातून येथील महाविद्यालयात प्रवेश घेतले जातात. पहाटे पाचपासून खासगी शिकवणी घेणारे किती वर्ग, हे तसे मोजता येणे अवघडच. महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग बंद करण्याचा निर्णय झाला आणि लातूर शहर आता जुना ग्रामीण निवांतपणा अनुभवत आहे.

तिकडे पुण्यात करोनाच्या रुग्णात वाढ होत गेली, तसे बसच्या प्रवासी संख्येचा आलेख कमालीचा वरखाली होऊ लागला. आता पुण्याकडे जाणाऱ्या गाडय़ा रिकाम्या आणि गावाकडे येणाऱ्या गाडय़ा फुल्ल. त्यामुळे हा आलेला लोंढा संसर्गमुक्त असेल तरच करोनाची साथ पसरणार नाही. पण भय एवढे आहे, की उस्मानाबादच्या समुद्रवाणी नावाच्या गावात पुण्यात रंगकाम करणारा एक जण आला. त्याच्याकडे सारे जण करोना झाल्याच्या संशयाने पाहू लागले. शेवटी तोच जिल्हा रुग्णालयात गेला आणि म्हणाला, ‘मला करोना झाला आहे’. त्याची तपासणी केल्यावर असे कोणतेही लक्षण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण जागृतीच्या पातळीवर जे घडते आहे ते चांगलेच. खरे तर हे दिवस लगीनसराईचे. या वर्षी अवेळी का असेना पण पाऊस झालेला. धरणांमध्येही पाणीसाठा असल्याने वयात आलेल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न लाऊन देण्यासाठी घाई सुरू होती. पण करोनामुळे मंगल कार्यालयाच्या मालकांवर प्रशासनाने बंधने आणली आहेत. त्यामुळे मराठवाडय़ासारख्या भागात दुष्काळाने लांबलेली लग्ने आता करोनामुळे पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. पण एक विवेकीपणा सर्वत्र दिसून आला की मंदिरे बंद करताना कोणी खळखळ केली नाही. साथरोगाची व्याप्ती वाढू नये म्हणून केलेल्या सरकारी कोणत्याही उपाययोजनांना विरोध तसा झाला नाही. औरंगाबाद जिल्ह्यतील एकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला आणि तो पळून गेला. पण यंत्रणांनी त्याचा शोध घेतला. साथ रोगाच्या या टप्प्यावर ग्रामीण भागातील भय वाढू लागले आहे.

परदेशी व्यक्तीचा संपर्क येईल असे ठिकाण म्हणजे औरंगाबाद. पर्यटनस्थळ असल्यामुळे विविध देशातील नागरिक येथे येतात. पण एका बाजूला जेव्हा यात्रा, जत्रा रद्द केल्या जात होत्या, तोपर्यंत पर्यटनस्थळे मात्र सुरू होती. याच काळात अंतूरचा किल्ला पाहण्यासाठी आलेले विदेशी पर्यटक दिसताच गावकऱ्यांनी अक्षरश: पळ काढला. वेरुळसारख्या गावातील नागरिक एरवी कधी विदेशी पर्यटक येतात, याची वाट पाहतात. पण आता ते कमालीचे घाबरू लागले आहेत. पण आता पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. वेरुळ, अजिंठा, बीबी का मकबरा ही पर्यटनस्थळे बंद केली आहेत. ऐतिहासिक दौलताबादच्या किल्ल्यास पहिल्यांदाच कुलूप लागले. पण वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक जाणीव ठेवून काम करणाऱ्या डॉक्टरांना भीती आहे ती झोपडपट्टी भागाची. सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळामध्ये काम करणारे १९ डॉक्टर झोपडपट्टी भागात कार्यरत आहेत. शहराच्या ज्या भागात करोनाबाधित रुग्ण आढळून आला, त्याच भागात मुकुंदवाडी ही वस्ती तशी दाटीवाटीची. घरांची रचना चिकटून. त्यामुळे येथे हा विषाणू येऊ नये यासाठी सतत हात धुण्यास सांगणे आणि तशी कृती करून घेणे, हे अवघड काम सध्या ही सारी मंडळी करीत आहेत. डॉ. प्रतिभा सांगत होत्या – ‘‘ग्रामीण भागात वस्ती तशी विखुरलेली असते. पण समाजमाध्यमातून मिळणाऱ्या संदेशामुळे गावागावांत दक्षतेचा संदेश गेला आहे. अगदी धुळे, नंदुरबार जिल्ह्यंत काम करणाऱ्या आरोग्य कार्यकर्तीने कोणती काळजी घ्यावी याची विचारणा केली. पण हा विषाणू शहरी भागातील झोपडपट्टी भागात आला तर धोका अधिक वाढू शकतो.’’

नव्याने ग्रामीण भागात येणारे लोंढे या विषाणूचा प्रसाद घेऊन तर येणार नाहीत ना, याची भीती दाटली आहे. कारण ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा फारशा सक्षम नाहीत. त्यामुळेच भयही अधिक आहे. त्याचबरोबर एक बेफिकिरीही आहे. आपल्याकडे कोण येणार परदेशी माणूस, असा बेफिकिरीचा सवालही कायम केला जातो. मात्र, शहराजवळील गावातील मानसिकता पूर्णत: बदलू लागली आहे. अगदी आवश्यक असेल तरच शहरात जाऊ. अन्यथा गडय़ा आपला गाव बरा, असा संदेश आता पोहोचलेला आहे. परिणामी गावातील सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करूनही फारसे कोणी खळखळ करीत नाही. अगदी गावातील देवळात होणारे भजनही बंद झाले आहे. बहुतेकांची मानसिकता प्रशासन आणि सरकार म्हणेल तसे वागू, अशी बनू लागली आहे. पण जगण्यासाठीची अपरिहार्यता एवढी आहे की कोणालाच घरी कसे बसता येईल? शक्य तो भेटीगाठी टाळा, असा हे चित्र सर्वत्र दिसत आहे.

मोठय़ा नैसर्गिक संकटात एक प्रकारची हावहाव सुटते, असे अनेक वेळा अनुभवास आलेले आहे. १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर अनेकांनी अगदी मृतांच्या अंगावरचे दागिने चोरले होते. पुढे मिळेल न मिळेल म्हणून परदेशातून आलेल्या दुधाच्या पावडरचे डबेही साठवून ठेवले होते. आताही सारे काही बंद होईल ही भीती कमालीची आहे. त्यामुळेच ‘आम्ही दोन महिन्यांचा किराणा भरून घेतला,’ हे वाक्य जसे पुण्यात ऐकायला मिळते तसे ते औरंगाबादमध्ये ऐकू येऊ लागले आहे. पण परभणी, नांदेडसह मराठवाडय़ातील अन्य भागांत तशी हावहाव सुटल्यासारखे चित्र नाही. पण भय किती असेल? – सोलापूरमध्ये एका सोसायटीत पुण्याहून एक महिला तिच्या लहान मुलासह माहेरी आली आणि बहुतेकांनी ते घरच जाण्या-येण्यासाठी वर्ज्य केले. दाटलेले हे भय कमी व्हावे असे प्रयत्न करण्याची गरज आहे. पण हे भय कायम ठेवण्यामागे या विषाणूची सुप्त भीतीही हेही एक कारण आहे. साधारणत: १४ दिवस कोणतेही लक्षणे न दाखवता हा विषाणू राहू शकतो. त्यामुळे ३१ मार्च ही तारीख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी महत्त्वाची मानली जाते. एखाद्या परदेशी व्यक्तीला शोधणे सहज शक्य आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही शोधता येऊ शकते. त्याला वैद्यकीय भाषेत स्थानिक विस्तार असे म्हणतात. त्यानंतर मात्र कोणाकडून कोणाला करोना होईल, हे सांगता येत नाही. त्यानंतर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यासाठी वापरला जाणारा साथरोग प्रतिबंधक कायदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना अधिक अधिकार देणारा आहे. विशेष म्हणजे या वेळी महसुली अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होताना दिसत आहे. फक्त हा विषाणू इटली देशात ज्या पद्धतीने पसरला तसा अन्यत्र पसरू नये याची भीती सर्वत्र आहे. त्या भीतीचे भांडवल होऊ नये म्हणून घेतली जाणारी काळजी तेवढीच महत्त्वाची आहे. पण भय कायम आहे. ते किती दिवसाचे, हे मात्र अजून ठरायचे आहे. तुलनेने ग्रामीण आणि निमशहरी भाग महाभीतीच्या सावटाखाली आहे.