डॉ. चैतन्य कुंटे

प्रार्थना म्हणजे नेमकं काय? विनंती, याचना, इच्छा व्यक्त करणे हा ‘प्रार्थना’ या शब्दाचा सामान्य अर्थ. पारिभाषिक व्याख्याच करायची तर ‘ईशस्तुती, आळवणी, मागणी, निर्धार अशा स्वरूपाचे तात्त्विक वा नैतिक विचार व्यक्त करणारी मूलभूत धार्मिक अभिव्यक्ती म्हणजे प्रार्थना’ असे म्हणता येईल. प्रार्थना हे एक संप्रेषण वा संवादाचेही रूप आहे. प्रार्थना ही दैवत, आत्मा, पूर्वज, संत अशा पारलौकिकांशी भक्ताने साधलेला संवाद असते. संवादाची अशी अनेक साधने धर्मव्यवस्था करते, वापरते. पारलौकिक शक्ती भक्ताशी संवाद साधतात तेव्हा भक्त त्यास ‘साक्षात्कार’ वा ‘दिव्यानुभूती’ म्हणतात. संत वा धार्मिक व्यक्ती दीक्षा, आदेश, उपदेश, प्रवचन अशा मार्गानी भक्तांशी संवाद साधतात, तर आत्मे एखाद्या भक्तास पछाडतात व त्याच्याद्वारे इतरांशी संवाद साधतात असे मानले जाते. धर्माचे सांगणे पोचवण्यासाठी हे सारे संवादमार्ग वापरले जातात.

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
issues of society
शब्द शिमगोत्सव

अ‍ॅडाल्बर्ट हॅमन या अभ्यासकाने प्रार्थनेतील आशय व त्यानुसार होणारे विविध प्रकार सांगितले आहेत. ते असे- मागणी, कबुली, रदबदली, आणाभाका, स्तुती, आभार, गुणगान, साक्षात्कार, ईश्वरी संकेतास दिलेले उत्तर, दिव्यानुभूतीचे वर्णन इ. आशयाच्या प्रार्थना असतात. मंत्र, जप, स्तोत्र आणि स्तवन (हिम् आणि डॉक्सॉलजी), आशीर्वचन (बेनेडिक्शन वा ब्लेसिंग्ज), बिरुदावली (लिटनी), मागणी, धावा, साकडे, विधीसंबद्ध प्रार्थना, उत्सवी प्रार्थना असे प्रार्थनांचे प्रकार समजले जातात. ‘मुक्त प्रार्थना’ स्वरूपाच्या काही प्रार्थना असतात, त्यांचे ठरावीक असे कार्य नसते, त्या केव्हाही म्हटल्या तरी चालतात, त्यांस विशिष्ट उद्देश वा समय नसतो. जप ही या स्वरूपाची प्रार्थना म्हणता येईल. काही ‘पुनरुक्तीच्या प्रार्थना’ असतात- त्यांचा पुनरुच्चार केला जातो. भारतीय परंपरेत प्रार्थनेचे मंत्र, स्तवन, जप, नामावली, स्तुती, आरती, संकीर्तन, भजन इ. अनेकविध प्रकार रूढ आहेत.

एकटय़ाने प्रार्थना करणे शक्य असले तरी बहुतेक धर्म लोकांनी एकत्र येऊन समूहाने केलेली प्रार्थना अधिक फलद्रूप होणारी मानतात. आठवडय़ातील किमान एक दिवस समाजाने प्रार्थनास्थळात एकत्र जमून उपासना करावी असा संकेत आहे. अशा सामूहिक उपासनेत देव वा प्रेषिताच्या नावाचा गजर असतो. प्रत्यक्ष देव वा प्रेषितांचे उद्गार म्हणून मानल्या गेलेल्या प्रार्थनाही असतात. अशा सामुदायिक प्रार्थनांनी समाजास आत्मिक ताकद मिळते आणि आपण धर्माच्या, देवाच्या वा मोक्षाच्या अधिक जवळ आलो आहोत असा दिलासा मिळतो. अर्थात मोठय़ा समूहाला एकत्र आणून एकमुखाने प्रार्थना म्हणण्यासाठी संगीताशिवाय पर्याय नाही. म्हणूनच धर्माला संगीताचा हात हाती घ्यावा लागतो.

कोणतीही भावना वा विचार गडद करणे, त्याचा परिणाम व प्रभाव खोलवर पोचवणे यासाठी उच्चारित शब्दांपेक्षा गेय शब्द अधिक उपयोगी ठरतात. गेय शब्द ही बाब अर्थातच नेते ‘गीत’तत्त्वाकडे. शब्दांचा बुद्धिगम्य आशय एकदा का पोचवला गेला की मग त्याच्यापुढे जात मनात अधिक काळ घोळवत राहावी अशी भावस्थिती तयार करणं, हा परिणाम ‘गीता’तून साधतो. ‘गीत’तत्त्वाची ही महत्ता जगभरातील संस्कृतींनी मान्य केली आहे.

भारतीय लोकमनाने तर हे गीत-तत्त्व अधिकच आत्मीयतेने आपलेसे केले आहे. म्हणून तर भारतात कोणताही विधी- मग तो सामाजिक असो वा धार्मिक- त्यात गीते हमखास आढळतात. डॉ. अशोक दा. रानडे यांनी फार मार्मिकपणे नोंदवले आहे की, मानवी संस्कृती दिन-रजनी, जन्म-मृत्यू, ऋतू अशा चक्रांना गीतांतून प्रतिसाद देत राहते. म्हणूनच भारतात केवळ आदिम आणि लोकसंगीतच नव्हे, तर धर्मसंगीत आणि जनसंगीतातही गीतांची मुबलक निर्मिती होते. इतकंच काय, पार्श्वसंगीतावर भर देणाऱ्या पाश्चात्त्य चित्रपटांच्या विपरीत अशी भारतीय चित्रपटांतील गीतांची, नृत्यांची मोठी मागणी आणि निर्मिती याचंही मूळ भारतीयांच्या या मनोवृत्तीत आहे. प्रार्थना नुसती गद्य का चालत नाही, ती गायली जावी अशी भारतीयांची सहज प्रवृत्ती असते, याची कारणमीमांसा यातून सहजच लक्षात येईल.

‘बोलण्याच्या क्रियेचे वाढीव रूप म्हणजे गायन’ आणि ‘मानवी आवाजाखेरीज अन्य साधनांनी ध्वनिनिर्मिती करून संगीताशय मांडणे म्हणजे वादन’ अशा मार्मिक व्याख्या संस्कृती- संगीतशास्त्र करते. बोलण्याकडून गायनाकडे आपली वाटचाल कशी होते? भाषणातील स्वरव्यंजनांना अधिक निश्चित व स्थिर अशी तारता देणे ही बोलण्याचे गाणे होण्यातली पहिली पायरी. दुसरी पायरी गाठली जाते शब्दाघातांना लयबद्धतेचे, लयछंदाचे कोंदण दिले की! आणि तिसरी पायरी चढलो की गीतापर्यंत आपण पोचू. ती पायरी म्हणजे तारता व लयछंदाच्या जोडीला पद्यात्मक शब्दरचना करणे.. गद्याकडून पद्याकडे जाणे. भाषण ते गायन या प्रवासात एक टप्पा असतो पठणाचा. रव, घोष, भाषण, पठण आणि गायन या वाटचालीत एका स्वरापासून सप्तकापर्यंत, स्वनापासून धुनेपर्यंत आणि अनियंत्रित भाषिक लयीपासून नियंत्रित लयीचे छंद, मग ताल येथवर उन्नयन होते. हा सारा प्रवास अनुभवायचा असेल तर धर्मसंगीतातील वैविध्यपूर्ण गीतांचे आविष्कार पाहावेत.

हिंदू धर्मातील मंत्रजप, स्तोत्र, आरती, नामगजर, संकीर्तन, कीर्तनी पदे, भारूडासारखे उपदेशपर प्रकार, गोंधळासारखे विधीसंबद्ध प्रकार, अभंग-गवळण-विराणी इ. भक्तिपदे, विविध प्रादेशिक संप्रदायांतील सगुण-निर्गुण भजने, इ. कित्येक आविष्कार आहेत. बौद्ध आणि जैनांचे मंत्र, स्तोत्रपठण, आरती, स्तवन, चर्यापद, शीखांचे सबद कीर्तन, अरदास, आसादी वार असे धर्मसंगीताचे अनेक नमुने दिसतात. इस्लाममध्ये अझान, सब्रमधील पठण, कलमा, सलावत, नात, हम्द, मन्कबत, सोज, रिवायत, कव्वाली, कल्बाना, गिनान, इ. प्रकार आहेत. पारशी धर्मातील गाथा, मंत्र, यष्त, ज्यू- धर्मीयांचे झेमिरोत, पिय्युत, निगुन, पिझ्मोनिम, बकाशोत्, तर ख्रिश्चनधर्मीयांचे चँट, साम्स, हिम्स, कॅरल्स, मासमधील गीते, इ. किती किती प्रकार सांगावेत!

प्रार्थनेतील वृत्तछंदानुसार केले जाणारे लयाघात, शब्दांच्या उच्चारणातील हेलातून साधले जाणारे तारताभेद वा स्वरभेद, प्रार्थनेतील चरणांच्या पुनरुक्तीतून साधले जाणारे तालावर्तन या घटकांतून प्रार्थनेत संगीत अवतरते. प्रार्थनेतील तारताभेद आणि धुना यांच्या आधारे प्रार्थनेचे तीन मूलभूत प्रकार मानता येतात. (१) पठण, (२) सस्वर पाठ, (३) गायन. प्रार्थनांत विपुलतेने कंठध्वनीचा वापर केला जातो. कंठध्वनीच्या निर्मितीने प्रार्थना मुखर होण्यापर्यंतच्या विविध अवस्था डॉ. रानडे यांनी नमूद केल्या आहेत..

१) इच्छा : इच्छा ही एक प्रेरक शक्ती म्हणून कार्यरत होते आणि प्रत्यक्ष शारीर पातळीवरील आविष्कारापूर्वी शारीर क्रिया होण्यासाठीची यंत्रणा मानसिक पातळीवर तयार होते. प्रार्थनेची ही मानसिक स्तरावरील अवस्था मूलभूत होय. प्रार्थना प्रथम मनात आकार घेत नंतर प्रत्यक्षात उमटते, तेव्हा इच्छा हे तिचे पहिले रूप. (इथे वाणीचे परा, पश्यन्ति, मध्यमा, वैखरी हे चार भेद आठवतील.)

२) हुंकार : एक हलकासा, प्राय: मंद्र, पण दीर्घ आणि विशिष्ट शब्दरूप प्राप्त न झालेला कंठध्वनी उच्च्चारणे. हा अनेकदा अन्य व्यक्तींस जाणवणार नाही, केवळ निर्मात्या व्यक्तीसच श्रवणगम्य असेल असा असतो.

३) कुजबुज : शब्दरूप प्राप्त झालेला, इतरांनाही श्रवणगम्य असेल असा, पण तरीही हलकासा, अल्प गरिम्याचा ध्वनी निर्माण करणे.

४) उच्चार : स्वरव्यंजनांनी सहेतुक बांधणी असलेला, सार्थ, मध्यम गरिम्याचा, हेतुपुरस्सर निर्माण केलेला, अन्य व्यक्तींस नक्कीच श्रव्य असा ध्वनीचा आविष्कार. हा बव्हंशी इतरांकडून प्रतिसाद यावा या अपेक्षेने निर्माण केला जातो.

५) पठण : शब्दांना कमी-अधिक तारता बहाल करून निर्माण केलेली उच्चारांची पुनरावर्तनयुक्त दीर्घ मालिका. हिचा गरिमा आधीच्या अवस्थांपेक्षा निश्चितच हेतुपूर्वक मोठा असतो. यात इतरांनीही सामील व्हावे ही अपेक्षा असते.

६) घोष : शब्दांना जाणीवपूर्वक आघात देऊन मोठय़ा गरिम्याचा दीर्घ उच्चार करणे व यात मोठय़ा समूहास सामील करून घेणे. यात अनेकदा काही ठरीव शारीर हालचाली, बंध वा मुद्रा याही असतात.

७) गायन : शब्दांना तारताभेदाद्वारे स्वरांच्या मालिकेत गुंफून, विशिष्ट आघातांनी लयबद्ध उच्चारण करून, निश्चित भावस्थिती जागृत करण्याच्या हेतूने उच्चारणे.

८) गीत : गायनाच्या क्रियेस धार्मिक संदर्भाखेरीजही अन्य सांस्कृतिक संकेतांचे वहन करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावर ही अवस्था सिद्ध होते.

प्रार्थनेच्या क्रियेत या आठ अवस्थांत सांगीतिक मूल्यांचा अधिकाधिक वापर होत जातो व प्रार्थना संगीताच्या पातळीवर अभिव्यक्त होते.

प्रार्थनेतल्या संगीताबद्दल आपण हे विवेचन पाहिलं. जाता जाता प्रार्थनेतील संगीतबा, पण रोचक बाबींचाही उल्लेख करतो. ती म्हणजे प्रार्थनेतील हालचाल. प्रार्थनेच्या क्रियेत आवाजाच्या वापराव्यतिरिक्त काही शारीर हालचाली, विशिष्ट मुद्रा इत्यादींचाही प्रयोग होतो. प्रार्थनेतील या शारीर क्रियांविषयीचे दंडकही विविध धर्मानी आखून दिले आहेत. अमुकच दिशेला तोंड करणे, डोक्याची वा मानेची विविक्षित हालचाल, कानाच्या पाळ्या चिमटीत पकडणे, आसने वा मांडी घालून किंवा उकिडवे बसण्याचे विविध प्रकार, कपाळ टेकणे, हाताच्या नाना मुद्रा यांची रेलचेल प्रार्थनेच्या अवतीभवती असते. प्रार्थनेदरम्यान माणसे किती प्रकारचे आविर्भाव, विभ्रम करतात! ते तटस्थपणे पाहता कधी कधी हसूही येते. आमच्या परिसरात अगदी हमरस्त्यावरच्या देवळातल्या मूर्तीपुढे उभे राहून, चालता चालता, एवढेच काय वाहनावरून भुर्रकन् जाता जाताही लोकांनी केलेल्या नमनाचे नाना प्रकार पाहता येतात. काही हात जोडतात, काही लोटांगण घालतात, नाक ते कपाळ अशी बोटे फिरवतात, कान पकडतात, स्वत:भोवती फेर धरतात. काही तर देवाला चुंबन दिल्याचा- म्हणजे अगदी ‘फ्लाइंग किस’ दिल्याचाही आविर्भाव करतात! मात्र, हे करणाऱ्या माणसाची भावना इतकी प्रामाणिक असते की हास्यास्पद वाटाव्यात अशा हालचालीही प्रार्थना वा आराधना म्हणून मान्य होतात.

keshavchaitanya@gmail.com

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)