22 September 2020

News Flash

जावे फिओर्डच्या देशा..

लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते की उत्तर ध्रुवावर एस्किमो लोक राहतात.

(संग्रहित छायाचित्र)

अनुराधा ठाकूर

फिओर्ड म्हणजे समुद्राचा भूगर्भात शिरलेला पाण्याचा लांब व अरुंद प्रवाह! उत्तर ध्रुवाजवळ हिमनद्या उंच डोंगरावरून खाली कोसळताना तो भूभाग कापत जातात व नॉर्थ सी-ला मिळतात. त्यामुळे हे फिओर्डस् निर्माण झाले असे म्हणतात. नॉर्वेत हा निसर्ग चमत्कार पाहताना भान हरपून जाते.

लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते की उत्तर ध्रुवावर एस्किमो लोक राहतात. त्यांच्या घुमटाकार घराला ‘इग्लू’ म्हणतात. तिथे सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते. हे ऐकून बालमनात अनेक शंका-कुशंका यायच्या. २०१५ साली मी कॅनेडियन रॉकीज व अलास्काची क्रूझ टूर घेतली होती तेव्हाच समजले होते की एस्किमो लोक आता इग्लूमध्ये राहत नाहीत, तर पक्क्या घरात राहतात. एक एस्किमो स्त्री मुद्दाम आम्हाला माहिती द्यायला बोलावली होती. अलास्का हे अमेरिकेच्या अधिकारकक्षेत येते. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात खूप सुधारणा झाली आहे. पोलर बिअर (ध्रुवीय बर्फाळ प्रदेशातील अस्वल) जवळपास फिरत असेल तर बाहेर पडू नका, असा सिग्नल त्यांना रेडिओवरून मिळतो. सारे बदलले तरी निसर्ग तोच ना! जुलै-ऑगस्टमध्येच काय ते जीवन! बाकी सारे बर्फाचे साम्राज्य! सहा महिने अंधाराचे!

यंदा नॉर्वेजिअन फिओर्डस् ही दहा दिवसांची टूर घेतली. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये ‘मिल्फोर्द साऊंड’ हा फिओर्ड पाहिला होता व निसर्गाच्या या रूपाबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. फिओर्द म्हणजे समुद्राचा भूगर्भात शिरलेला पाण्याचा लांब व अरुंद प्रवाह! उत्तर ध्रुवाजवळ हिमनद्या उंच डोंगरावरून खाली कोसळताना तो भूभाग कापत जातात व नॉर्थ सी-ला मिळतात. त्यामुळे हे फिओर्द्स निर्माण झाले असे म्हणतात. याला जवळचे शब्द म्हणजे ‘क्रीक’, ‘गल्फ’, ‘बे’; पण फिओर्ड हे याचे अजस्र रूप.

नॉर्वेची खासियत अशी की या देशाला जवळजवळ करवतीसारखा दंतुर किनारा लाभला आहे. नॉर्थ अटलांटिक महासागराच्या या किनाऱ्यावर सर्वत्र उत्तुंग पर्वतराजीचे साम्राज्य आहे. त्यामुळे मधे निळा, अवखळ पाण्याचा प्रवाह, दोन्ही बाजूला उंच, हिरवेगार पर्वतकडे आणि वर निळे आकाश, त्यात तरंगणारे शुभ्र ढग असा सुंदर नजारा इथे पाहायला मिळतो.

गरांगार आणि त्रोल या फिओर्डबद्दल जाणून घेण्याआधी नॉर्वेबद्दल थोडेसे : अनेक लहान लहान राज्ये एकत्र येऊन सन ८७२ मध्ये नॉर्वे हे राष्ट्र निर्माण झाले. १५३७ ते १८१४ पर्यंत ते डेन्मार्कशी जोडलेले होते. त्यानंतर १९०५ पर्यंत ते स्वीडनचा भाग होते. १९४० मध्ये जर्मनीने ते जिंकून घेतले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ते स्वतंत्र झाले. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या देशाची सीमा स्वीडनशी जोडलेली आहे. स्वीडन पूर्वेला, नॉर्वे पश्चिमेला!  एकूण ३८५२०७ किमी क्षेत्रफळ असलेल्या या देशाची लोकसंख्या अवघी ५३,१२,३०० आहे. एक खेडे ५०० लोकसंख्येचेही असते.

नॉर्वेमध्ये लोककल्याणकारी राज्य, सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य योजना यामुळे जनजीवन अत्यंत सुरक्षित व उच्च दर्जाचे आहे. दरडोई उत्पन्नात नॉर्वे या छोटय़ाशा देशाचा जगात सहावा नंबर लागतो. जगातला सर्वात मोठा सॉवरिन वेल्थ फंड नॉर्वे सरकारचा आहे. मानवी विकास निर्देशांकामध्ये नॉर्वे पहिल्या पाच क्रमांकात आपले स्थान टिकवून आहे. तर १९१७ च्या जागतिक आनंद निर्देशांकामध्ये (वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स) नॉर्वे उच्चतम स्थानावर होता. आजही आयुष्यमानाची गुणवत्ता, सार्वजनिक जबाबदारी व पारदर्शकता, लोकशाही मूल्ये यांत नॉर्वेचा पहिला क्रमांक लागतो. कमीत कमी गुन्हेगारी असलेल्या जगातल्या मोजक्या देशांतील हा एक!

नॉर्वेचे युरोपीय संघराज्य व अमेरिकेशी घनिष्ठ संबंध आहेत. पण त्यांनी स्वत:ची ‘नॉर्वेजिअन क्रोना’ ही करन्सी अबाधित ठेवली आहे. आपल्या देशातील निसर्गसंपदा, पर्वतराजी, फिओर्डस् याचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळे इतर युरोपीय देशांना त्यांनी फार जवळ येऊ दिले नाही व उद्योगधंदे वाढवायलाही उत्तेजन दिलेले नाही. जिथे आम्ही गेलो, तिथल्या अनेक गावांत गेल्या दहा वर्षांत एकही नवीन हॉटेल बांधायला परवानगी दिलेली नाही. भरभराट की निसर्गाचे जतन व संवर्धन यांत नॉर्वेच्या जनतेने जाणीवपूर्वक निसर्गाची निवड केली आहे. त्यांच्या आनंदी व उत्तम राहणीमानाचे हेच रहस्य असावे. बेसुमार वृक्षतोड व सिमेंटची जंगले बघायला सरावलेल्या आपल्या डोळ्यांना हा बदल सुखकारक वाटतोच, पण विचारप्रवृत्तही करतो.

आमची टूर नॉर्वेजिअन फिओर्डस्अशी होती, त्यामुळे मोठी शहरे पाहणे रद्द केले होते. संपूर्ण निसर्गदर्शन असे तिचे स्वरूप होते. ‘नॅशनल जिऑग्रॉफिक’ या मासिकाने या फिओर्डस्ना जगातील सर्वात मोठे पर्यटक आकर्षण असे संबोधले आहे. यातील गरांगार हा ‘किंग ऑफ फिओर्द्स’ मानला जातो. अफाट लांबी असलेल्या या फिओर्डचा आकार काहीसा ‘Y’ या अक्षरासारखा आहे. हेलीसिल्त या गावातून आम्ही निघालो. एक मोठी फेरीबोट किनाऱ्याला लागली व ट्रकचा मागचा भाग उघडतो तसा तिचा मागचा भाग उघडला. सुमारे शंभरएक प्रवासी गाडय़ा, आठ-नऊ बसेस, तेवढीच अवजड वाहने असा ताफा आत शिरला. पाìकगसाठी तीन वेगवेगळे मजले होते. लिफ्ट व जिन्याने वर जाऊन मध्यावर कॅफेटेरिया व सभोवार उभे राहायला मोकळी जागा, तर वरच्या डेकवर खुर्च्या ठेवल्या होत्या. आम्ही डेकवर जागा पकडल्या. फेरी हलली. पुढचा एक-दीड तास आम्ही एका वेगळ्याच दुनियेत तरंगत होतो. मध्यावर पाणी कापत जाणारी आमची अजस्र बोट, तिचा मागे पसरणारा शुभ्र फेसाळ दुपट्टा, दोहो बाजूंना निळे-हिरवे उन्हात चकाकणारे व मोरपिसांची आठवण करून देणारे संथ पाणी! दोन्ही तीरांना उंचच उंच डोंगरकडे होते. त्यावर हिरवीगार झाडे व रानफुले डोळ्यांना सुखावत होती. डोंगरांवरून अनेक छोटे-मोठे प्रपात खाली झेपावत होते. ‘सेवन सिस्टर्स’ या सात प्रपातांचा प्रसिद्ध समूह पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

या उंच पर्वतांवर शेती केली जाते. स्थानीय समितीकडे त्याच्या देखभालीची जबाबदारी दिलेली आहे. इथले शेतकरी अक्रोडाचे भरपूर पीक काढतात. बोटीवरच्या या निळ्या-हिरव्या मफलीला वरचे निरभ्र आकाश साथ देत होते. या निसर्गात जी भव्यता व उदात्तपण होतं, ते नि:स्तब्ध करणारं होतं. इतके लोक बोटीच्या डेकवर होते, पण जो-तो स्वत:त मग्न होता.

या अद्भुत निसर्गात दीड तास व्यतीत केल्यावर आमची बोट गरांगार या गावच्या किनाऱ्याला लागली. गरांगार या फिओर्डचे वैशिष्टय़ असे की, एका हिमनदीत उगम पावून डोंगरावरून कोसळणारा एक दिमाखदार प्रपात इथे फिओर्डला मिळतो. सागराला भेटायला येणारी सरिता व तिला भेटायला आतुर समुद्र फिओर्डच्या रूपाने आतपर्यंत आलेला- असा योग येथे आहे. त्यामुळे गरांगार फिओर्डला जागतिक वारसा- स्थळाचा मान मिळाला आहे.

या प्रपाताच्या बाजूबाजूने एक जिना केला आहे. थोडय़ा पायऱ्या, थोडे सरळ चालणे असा सुमारे दीडशे पायऱ्यांचा प्रवास आहे. प्रपाताचा जवळून येणारा धीरगंभीर ध्वनी, अंगावर उडणारे तुषार, बाजूला उगवलेली रंगीबेरंगी फुले अशा माहोलात आम्ही हळूहळू खाली उतरलो. येथून बसमध्ये बसून आमचा परत दरीतून डोंगराकडे प्रवास सुरू झाला. बस टोकदार अरुंद वळणे घेत घेत पुढे जाते. या वळणांना ‘हेअरपिन्स बेन्ड्स’ असे म्हणतात. ते इतके अरुंद असतात.. सुमारे १५ ते २० अंशाच्या कोनात! या रस्त्याला ‘गोल्डन रूट’ असे नाव आहे. बस जसजशी प्रत्येक वळणावर उंच उंच जाते, तसतसा गरांगार फिओर्ड वेगवेगळ्या उंचीवरून अनुभवायला मिळतो. सर्वात उंच जागी एक व्ह्य़ुइंग पॉइंट बांधला आहे. गरांगार फिओर्डचा संपूर्ण विस्तार येथून दिसतो. आणि तो कॅमेऱ्यात पकडायचा तर पॅनोरमा हे तंत्रच वापरावे लागते. म्हणजे कॅमेरा डावीकडून उजवीकडे अलगद फिरवायचा. मी प्रयत्न केला, पण जमले नाही. खाली तळाशी पाणी कापत जाणाऱ्या पांढऱ्याशुभ्र बोटी, भोवताली सर्व बाजूंना हिरवीगार वनराई, वर निळेभोर आकाश असा सुंदर देखावा अनेकदा उंचावरून पाहायला मिळतो. एखाद्या पक्ष्याने वर झेप घ्यावी आणि खालचा देखावा हळूहळू लहान होत जावा, तसा हा अनुभव! गरांगारला ‘किंग ऑफ फिओर्डस्’ का म्हणतात, ते या गोल्डन रूटवर समजते.

यानंतर इतर काही गावे पाहत आम्ही दोन दिवस लोफोटेन या बेटावर स्वोलवेर येथे राहिलो. सुंदर तळी, उत्तुंग पर्वतशिखरे, नॉर्थ सीमध्ये अनेक बेटे, लाल- पांढरी घरे आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्ससारखे जागोजाग फुलांचे अंथरलेले गालिचे यामुळे लोफोटेन प्रवाशांचे आकर्षण बनले आहे. छोटे छोटे फिओर्द्स, त्यांच्या मधे मधे बेटांवर व डोंगरउतारावर वसलेली लाल कौलांची टुमदार घरे यांनी ही बेटे नटलेली आहेत. इथले ऱ्हाईन हे गाव चांगलेच लक्षात राहिले. वर वर्णन केलेले निसर्गसौंदर्य येथे उंचावरून पाहायला मिळते. एखाद्या पिक्चर पोस्टकार्डसारखे हे गाव आहे.

येथे मध्यरात्रीचा सूर्य कधी दिसतो, कधी नाही- असे ऐकले होते. आम्हाला तर ढगाळ हवा व रिपरिप पाऊस लागला होता. मोजके दोन-तीन दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला. एका रात्री सूर्याची आराधना केली, पण ढगाच्या दाट आवरणाने आमची निराशा केली. बरं, नॉर्वेत जाऊन ‘मिडनाइट सन’ दिसला नाही, असे कसे सांगायचे? अखेरीस ३० जूनला सूर्यनारायणाने कृपा केली. रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही हॉटेलमधून निघालो आणि दीड तास त्या प्रकाशात आम्ही नॉर्थ सीच्या दिशेने प्रवास केला. सोबतीला सुंदर पर्वतशिखरे आणि जागोजाग तलाव होते. हळूहळू मधूनच निसटते सूर्यकिरण दिसू लागले. कधी ते दिसायचे, तर कधी झाडांआड लपायचे. रात्री साडेअकराच्या सुमारास आम्ही समुद्रकिनारी पोहोचलो. खास मिडनाइट सन पाहण्यासाठी! एका लाइट हाऊसजवळ उंचावर रस्ता बांधला होता. तिथे पोहोचलो. आणि काय सांगू! रात्री पावणेबाराच्या सुमारास आसमंत सूर्यकिरणांत न्हाऊन निघाला होता. सूर्यिबब हळूहळू मावळतीला क्षितिजाकडे खाली खाली सरकत होते आणि एका क्षणी तो तेजोनिधी क्षितिजापासून परत वरवर जाऊ लागला. अत्यंत संथगतीने एका तासात होणारे हे संक्रमण अतिशय विलोभनीय होते. रात्री सव्वाबारा वाजता हा उगवता सूर्यनारायण गुलाबी जांभळ्या आकाशात आम्हाला दर्शन देत होता. त्याची तेजस्वीता, प्रखरपणा व शुद्ध गोल आकार आयुष्यात कधीच अशा प्रकारे जाणवला नव्हता. ‘संधिकाल होता होता उष:काल झाला..’ असा चमत्कार याचि देही याचि डोळा पाहिला. सूर्यबिंबाकडे परत परत पाहताना डोळे दिपत होते, पण मन ऐकत नव्हते. आसपासची घरे व झाडे सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होती. डोळ्यात साठवून घेतला हा मनोरम सोहळा! आयुष्यभर आठवणींच्या कुपीत जपून ठेवावे असे काही अनुभव असतात, त्यातला हा एक!

लोफोटेनहून दुपारी ट्रोल फिओर्डला निघालो. अंगात थोडा ताप, सर्दी तर होतीच; पण अनोळखी गावात हॉटेलात एकटंच पडून राहण्यापेक्षा आपल्या ग्रुपबरोबर असावे म्हणून निघाले. छोटय़ा बोटीत केबिनमध्ये जॅकेट घालून बसले. पण खिडकीतून दिसणारे सौंदर्य खुणावत होते. मग टुर मॅनेजर मयुरने व बोटीच्या होस्टेसने मला स्पेस सूटसारखा सूट वेल्क्रोच्या पट्टय़ांनी बांधून चढवला. इतका उबदार, की मी चक्क डेकवर जाऊन बसले. या फिओर्डला गैरांगारची भव्यता व अथांगता नव्हती, पण सभोवताली आर्क्टिक प्रदेशाचे अनुपम सौंदर्य होते. रुंद पात्राच्या दोन्ही बाजूला टेकडय़ा, छोटे डोंगर. काही गर्द हिरव्या झाडीने नटलेले, तर काही अगदी उघडेबोडके! काहींच्या डोक्यावर बर्फाच्या टोप्या. मधूनच लाल टुमदार घरे. एक ‘बाल्ड हेडेड’ जातीचं गरुड एका कडय़ावर एकटंच बसलं होतं. ही  प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून, त्यांची संख्या वाढवण्याचे व सध्या अस्तित्वात असलेली प्रजाती जतन करण्याचे प्रयत्न पक्षीप्रेमी करत आहेत. या प्रदेशात असे ४० ईगल्स आहेत अशी माहिती मिळाली. शिवाय सीगल्सही होते. वाटेत कॉड माशांच्या पदाशीसाठी पाण्यात जाळी बांधून फार्म्स तयार केले होते.

रुंद पात्राकडून आमची बोट फिओर्डच्या अरुंद भागाकडे- मुखाकडे गेली. बाजूने छोटे छोटे प्रपात उडय़ा मारत खाली येत होते. एका कपारीत एक ‘ट्रोल’ही ऐटीत उभा होता. ट्रोल म्हणजे बुटका, बसक्या नाकाचा कपोलकल्पित राक्षस! नॉर्वेकरांना याचे भारी कौतुक! ट्रोलच्या प्रतिकृती जागोजाग दिसतात. या फिओर्डच्या मुखाशी अगदी अरुंद भाग व तिन्ही बाजूना फक्त डोंगरकपारी वेढलेल्या! तिथे उंचावर एकच कौलारू घर होते. मनात आले, कोण राहत असेल अशा भयाण, एकाकी जागेत? मलोन् मल मनुष्यवस्ती नाही. जीवाच्या आकांताने ओरडले तरी कुणालाही ऐकू जाणार नाही. मग कळले की, तिथे एक विद्युत स्टेशन होते व त्याच्या देखरेखीसाठी एक माणूस तिथे राहायचा. आता सारे रिमोट कंट्रोलने होते. बरे झाले कळले.. जीव भांडय़ात पडला!

त्या निमुळत्या टोकाशी जाऊन बोटीने यू टर्न घेतला आणि आम्ही परत रुंद पात्राकडे वळलो. फिओर्डची पूर्ण रचना येथे स्पष्ट कळते, म्हणून हा फिओर्ड महत्त्वाचा! आमच्यातील काही मंडळींनी गळ टाकून मासे पकडले व तुकडे करून ते टोस्टबरोबर परतीच्या वाटेवर सीगल्सना खाऊ घातले. हे सीगल्स मोठे डौलदार! ऐटीत खाली झेपावत व खाद्य उचलून भर्रकन् वर जात. त्यांची ती लयबद्ध हालचाल, बोटीभोवती वर्तुळाकार फिरणे या लीला व्हिडीओत टिपण्यात सगळे दंग होते.

शेवटी ट्रोम्सो हे शहर पहिले. नॉर्दन लाइट्सची राजधानी म्हणून हे शहर सध्या गाजते आहे. नॉर्वेच्या उत्तर भागात असूनही गल्फ स्ट्रीम या उष्ण प्रवाहामुळे ते तितके थंड नसते. डिसेंबर ते मार्च या काळात ‘नॉर्दन लाइट्स’ दिसतात. इतरत्र -१६ ते २० सेल्सिअस तापमान असताना ट्रोम्सोला मात्र ते सहसा -१० सेल्सिअसच्या खाली जात नाही. शिवाय नॉर्दन लाइट्स किंवा ‘ऑरा बोरोलिस’ हे येथे जेवढे स्पष्ट व विस्तृत दिसतात, तेवढे ते जपानच्या उत्तर भागात वा जगात इतरत्र कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे ट्रोम्सो आणि आसपासच्या भागात हिवाळा हा peak season असतो व हॉटेलपासून सगळ्याचे भाव या दिवसांत चढे असतात.

येथील टूर गाईडने अतिशय रंजक माहिती दिली. ती अशी की- मे ते जुलै या काळात ६९ दिवस २४ तास सूर्यप्रकाश असतो. ढगांचे आवरण असल्यास दिसत नाही, पण असतो. जुलैपासून दिवस लहान लहान होत जातो व नोव्हेंबरमध्ये पूर्ण अंधाराचे साम्राज्य सुरू होते ते फेब्रुवारीपर्यंत! रात्रंदिवस घरात, रस्त्यावर, सार्वजनिक जागी दिवे जळत असतात! नंतर हळूहळू बदल होऊ लागतो व मार्चमध्ये सूर्य तीन मिनिटे दिसतो. मग दिवस मोठा होत जातो व मे ते जुलै सूर्याचे राज्य सुरू होते. आपल्यासारख्या आठ महिने सूर्यप्रकाश व चार महिने पावसाळा या ऋतुचक्रापेक्षा हे चक्र किती वेगळे!

विज्ञान व तंत्रज्ञान इतके पुढे गेले. आपले आजी-आजोबा यांच्यापेक्षा आपली पिढी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कुठल्या कुठे गेली. जीवन सुकर झाले. भौगोलिक अंतर नाहीसे होऊन आपण आपल्यापासून हजारो मल दूर असलेल्या निकटवर्तीयांशी सहज बोलतो. त्यांना पाहतो. पण जिथे निसर्ग आहे, तिथे तोच कर्ताकरविता! आपण य:कश्चित प्राणी! लहानपणी भूगोलात वाचल्याप्रमाणे उत्तर ध्रुवावर आजही सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते आणि निसर्गाचा हा  चमत्कार पाहायचा असेल तर- जावे फिओर्डच्या देशा.. नॉर्वेला!

anuradha333@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 4:26 am

Web Title: article on norway fjords abn 97
Next Stories
1 दखल : शिक्षणहक्कावर ‘कोयता’
2 सीरिया समजून घेण्यासाठी
3 बहरहाल : स्वानस्वांग
Just Now!
X