अरुणा अन्तरकर

lokrang@expressindia.com

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
IIIT Pune
आयआयआयटी पुणेमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत उद्या पहिला पदवी प्रदान समारंभ

एकेकाळी देशभरात ज्या प्रभात स्टु्डिओचा सार्थ दबदबा होता, त्या वास्तूचं रूपांतर पुढे फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये होणं, हा एक दुर्मीळ योग होय. चित्रपटनिर्मिती करणाऱ्या वास्तूचं त्या कलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत झालेलं हे मन्वंतर भारतीय चित्रपट इतिहासाला आगळं वळण देणारं ठरलं.

साठाव्या वर्षांला माणूस आणि संस्था दोघांच्याही जीवनात खास महत्त्व असतं. संस्थेच्या बाबतीत थोडंसं जास्तच! माणसाच्या साठीला म्हातारपणाची काजळकडा असते. मात्र, संस्थेच्या साठीला म्हातारपणाचा शाप नसतो. तिथे वयवाढ म्हणजे कर्तृत्व, कीर्ती आणि अर्थात संपत्तीमध्ये भर! त्यातून ज्या संस्थेचं नाव ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’- चुकलं, ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ असतं- तिची ‘साठी’ हा दुहेरी आनंदाचा योग आहे. कारण आज जिथे ही संस्था उभी आहे, त्या वास्तूवर एकेकाळी ‘प्रभात’चा झेंडा डौलानं फडकत होता.

..आणि ‘प्रभात स्टुडिओ’ म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू! महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य हिस्सा!! ‘प्रभात’चा उल्लेख केल्याखेरीज महाराष्ट्राचा आणि कोल्हापूर, पुणे या शहरांचा इतिहास पूर्ण होणंच अशक्य आहे. ‘प्रभात’च्या वास्तूमध्ये ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’चं वास्तव्य म्हणजे वाडवडिलांच्या वास्तूचा पुनर्विकास करून वारसांनी तिथे राहायला जाणं आहे.

अशी ‘रीडेव्हलपमेन्ट’ सर्वाच्या नशिबी नसते. ‘प्रभात’ स्टुडिओमध्ये फिल्म इन्स्टिटय़ूट असणं हा खरोखरच दुहेरी आनंदाचा योग आहे. विशेष म्हणजे सरकारी उपक्रमामध्ये समाविष्ट असूनदेखील तोटय़ात नसलेल्या.. निदान धोक्यात नसलेल्या मोजक्या संस्थांपैकी ही एक भाग्यवान संस्था. ती बऱ्याचदा काही ना काही वादामध्ये आणि बहुतेकदा संपामध्ये असते, हे खरं आहे; पण महत्त्व त्याला नाही. अनेकदा अडचणीत असूनही या संस्थेनं चित्रपटकला टिकून राहण्याच्या आणि वृद्धिंगत होण्याच्या कार्याला मोठा हातभार लावला आहे.

चित्रपटनिर्मितीच्या आर्थिक नाडय़ा मुंबईतल्या दबंग अन् दक्षिणेतल्या बाहुबली निर्मात्यांच्या हातात असतात खऱ्या; परंतु चित्रपटामागे ज्यांचं कर्तृत्व असतं, ते बरेचसे कलाकार या संस्थेत तयार झालेले असतात. ‘बाहुबली’ची अजस्र भव्यता कॅमेऱ्याच्या कवेत आणण्याचं अफलातून कौशल्य दाखवणारा सेंथिलकुमार इथलाच. ‘स्लमडॉग मिलियॉनर’च्या साऊंड डिझायनिंगकरता ‘ऑस्कर’ पटकावणारा रसूल पुकुट्टीदेखील इथेच निर्माण झाला. ‘उडता पंजाब’, ‘बॉम्बे व्हेल्वेट’, ‘चांदनी बार’ छायांकित करणारा राजीव रवी इथेच शिकला. शबाना आझमी, जया बच्चन, नसिरुद्दिन शाह, ओम पुरी यांच्यापासून ते राजकुमार रावपर्यंतच्या खंद्या कलाकारांनी याच संस्थेत अभिनयाचे धडे गिरवले. मिथुन चक्रवर्ती, शत्रुघ्न सिन्हा, असरानी, डॅनी ही कमर्शिअल चित्रपटातली मोठी नावंदेखील या अभिनयशाळेच्या विद्यार्थ्यांपैकीच. मणी कौल, जानू बरुआ, केतन मेहता हे प्रायोगिक सिनेमातील, तर ‘मुन्नाभाई’कर्ते राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा हे कला अन् गल्ला यांची सांगड घालणारे मध्यममार्गी आणि सुभाष घई, डेव्हिड धवन, सतीश कौशिक हे अस्सल ‘मसाला’वादी चित्रपट दिग्दर्शक हे सगळे पुण्याच्या ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’चेच बरं का!

एकंदरीत प्रायोगिक आणि धंदेवाईक असा अमंगळ भेदभाव न करता इथल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कामात यश मिळवलं. मोठा आणि छोटा पडदा असा तर-तमभाव न बाळगता कुंदन शहा आणि सईद मिर्झा यांनी टीव्हीवरसुद्धा चांगलं काम करता येतं हे दाखवून दिलंय. ‘ये जो है जिंदगी’ आणि ‘नुक्कड’ ही सुरस, हसरी उदाहरणं आणि ‘जाने भी दो यारों’ आणि ‘सलीम लंगडे पे मत रो’ हे वैशिष्टय़पूर्ण चित्रपटसुद्धा त्यांचेच. या संस्थेचे उमेश कुलकर्णी (‘विहीर’) आणि तुषार परांजपे (‘किल्ला’) यांनी मराठी चित्रपटांत वेगळेपणा आणला. कन्नड आणि मल्याळी या प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट करणाऱ्या गिरीश कासरवल्ली आणि अदुर गोपालकृष्णन् या दिग्दर्शकांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वातदेखील आपल्या नावाचा ठसा उमटवला.

चित्रपटात काम करण्यासाठी शिक्षण लागतं, या कल्पनेची बॉलीवूडनं आधी यथेच्छ टर उडवली. कलेचं कसब प्रशिक्षणावर अवलंबून नाही हे खरं असलं तरी प्रशिक्षित कलाकारांमुळे काम चांगलं तर होतंच, पण वेळेवरही होतं, हे लक्षात आल्यावर मात्र बॉलीवूडकरांनी फिल्म इन्स्टिटय़ूटकरांना आपलंसं केलं. संजय दत्त, कुमार गौरव यांच्यासारख्या नवोदित आणि त्यावेळी टीनएजर कलाकारांना तयार करण्यासाठी रोशन तनेजा, नमित कपूर, आशा चंद्रा यांच्यासारख्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकलेल्या, पण अभिनयात बस्तान बसवण्यात उणे ठरलेल्या कलाकारांना ‘अ‍ॅक्टिंग गुरू’ म्हणून पाचारण करण्याची प्रथा पडली.

संयत अभिनय, सामाजिक विषय, कमी वेळात आणि कमी खर्चातली चित्रपटनिर्मिती, कामाच्या पद्धतीत सुधारणा, शिस्त व व्यावसायिक दृष्टिकोन ही कार्यसंस्कृती आता बॉलीवूडमध्ये रुळते आहे. यामागेही फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये तयार झालेल्या आणि वेगळ्या मार्गावरचा समांतर चित्रपटसुद्धा यशस्वी होतो, हे दाखवून देणाऱ्या निर्माते-दिग्दर्शकांचा हात आहे. त्यांच्या या चौफेर कामगिरीवर नजर टाकल्यावर मागे वळून त्यांच्या पूर्वजांकडे.. ‘प्रभात’च्या कामगिरीकडे कटाक्ष टाकला तर आनंदाश्चर्याचा धक्का बसतो. फिल्म इन्स्टिटय़ूटनं जी श्रेय मिळवणारी कामगिरी केली, ती ‘प्रभात’च्या गुणवंतांनी तितक्याच कौशल्यानं आणि त्याच व्यावसायिक शिस्तीनं केल्याचं आढळतं. किंबहुना, ‘प्रभात’नंच कला अन् तंत्र, कला आणि व्यवसाय यांचा मेळ घालण्याचं काम सुजाणतेनं केलं. मराठी चित्रपटामध्ये आधुनिकता, नावीन्य आणून त्याला वळण लावण्याचं श्रेय चित्रपटाचे इतिहासकार ‘प्रभात’लाच देतात. काळाबरोबर राहण्याची क्षमता ‘प्रभात’कारांमध्ये होती. त्यांच्या कामात वैविध्य आणि सातत्य होतं. कोल्हापूरमध्ये पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक किंवा पोशाखी चित्रपट काढणारी ही चित्रसंस्था पुण्यात काम करू लागल्यावर तत्कालीन सामाजिक विषयांकडे वळली. सामाजिक परिवर्तनाची दखल घेणारे, जरठ-बाला विवाहासारख्या दुष्ट, अन्याय्य प्रथांवर प्रहार करणारे (‘कुंकू’), हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार करणारे (‘शेजारी’) त्यांचे चित्रपट अभिजात दर्जाचे होते. विशेष म्हणजे या चित्रपटांची हाताळणी वास्तवस्पर्शी होती. ‘माणूस’मध्ये एक पतिता आणि एक सहृदय, सरळमार्गी माणूस यांची शेकडो वेळा पडद्यावर आलेली प्रेमकहाणीच होती; परंतु या प्रकारच्या चित्रपटांमध्ये दिसणारा आदर्श, भाबडा सुखान्त त्यात नव्हता. सर्वस्वी भिन्न स्तरावर वावरणाऱ्या या प्रेमिकांचं नातं विवाहवेदीपर्यंत पोचत नाही. आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा कौल स्वीकारून नायिका तिथे पोचण्याआधीच माघार घेते, हा या चित्रपटाचा शेवट हृदयविदारक असला तरीही पटणारा होता. वास्तवाचं हेच भान ‘संत तुकाराम’सारख्या चित्रपटामध्ये अबाधित होतं. ‘गोपालकृष्ण’, ‘ज्ञानेश्वर’सारख्या संतपटांमध्ये भाबडा भक्तिभाव, अंधश्रद्धा किंवा चमत्कृती यांच्यावर भर न देता त्यात या सत्पुरुषांची मानवी मूल्यं शोधण्याचा दृष्टिकोन होता. उत्तम आशय, विषय, कथा याबद्दल आग्रह असला तरी ‘प्रभात’पटांना करमणूक, हास्यविनोद आणि संगीत, तंत्रज्ञानाच्या करामती यांचं वावडं नव्हतं. ‘संत ज्ञानेश्वर’मध्ये भिंत चालण्याची करामत होती, तर ‘अमृतमंथन’मध्ये खलनायकाच्या भेदक नजरेचा भलामोठा क्लोजअप होता. गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, वसंत देसाई प्रभृती श्रेष्ठ संगीतकार ‘प्रभात’कडे होते. भावपूर्ण आणि अर्थवाही गाणी लिहिणारे गीतकार होते आणि त्यांच्या गुणांना पुरेपूर वाव देणारे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्टय़पूर्ण विषयही होते. त्यामुळे ‘माणूस’मध्ये एखादं इंग्रजी गाणंही ऐकायला मिळतं. ‘संत तुकाराम’मध्ये कानी पडणारे अभंग गीतकाराचे असले तरी ते मूळचेच असावेत असं वाटण्याइतका कस त्या लेखनात होता. ‘भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे’ हे ‘कुंकू’मधलं गाणं तर पुढे पाठय़पुस्तकात समाविष्ट झालं.

‘प्रभात’च्या चित्रपटांमधलं हे वेगळेपण कथेवर मात न करता, आशयापासून दूर न जाता चित्रपटात सहजी मिसळून जाणारं होतं. ते प्रेक्षकांपर्यंत सहज पोचत होतं. म्हणूनच ‘प्रभात’चे चित्रपट कमालीचे लोकप्रिय ठरले. सुशिक्षित, सुसंस्कृत प्रेक्षक त्यांच्याकडे आकृष्ट झाले, तसेच समर्थ लेखकही ‘प्रभात’मध्ये काम करायला उत्सुक असत. अनंत काणेकर (‘माणूस’) आणि ना. ह. आपटे (‘कुंकू’) या प्रसिद्ध लेखकांना न्याय मिळाल्यामुळे अरविंद गोखले यांच्यासारख्या श्रेष्ठ लेखकालाही ‘प्रभात’मध्ये काम करण्याची इच्छा निर्माण झाली. कुसुमाग्रजांनी तर एक पाऊल पुढे टाकून ‘प्रभात’मध्ये काही काळ उमेदवारीही केली. दुर्गाबाई खोटे यांच्यासारखी सधन घराण्यातली, पदवीधर, विवाहित स्त्री-कलाकार ‘प्रभात’पटांमध्ये (‘अयोध्येचा राजा’) काम करताना दिसली.

चित्रपट आणि त्यातले कलाकार यांच्याबद्दल सर्वच काळात आकर्षण दिसतं; पण तिशी-चाळिशीच्या दशकांमध्ये त्यांना प्रतिष्ठा नव्हती. ती ‘प्रभात’नं मिळवून दिली. आपल्या चित्रसंस्थेच्या आणि तिथल्या कलाकारांच्या प्रतिमेला धक्का लागू नये याबद्दल ‘प्रभात’चे मालक व भागीदार (व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल, केशवराव धायबर) जागरूक होते. ‘गॉसिप’ पत्रकारिता तेव्हाही होती; पण तिला खाद्य मिळणारच नाही अशी कडक शिस्त आणि नियम ‘प्रभात’मध्ये होते. कोणत्याही प्रकारे गैरप्रसिद्धी तर नको, पण प्रसिद्धी तर मिळावी, हा धोरणीपणाही ‘प्रभात’कारांजवळ होता आणि ‘प्रभात मंथली’ या नावाचं नियतकालिक काढून त्यांनी त्याची चोख व्यवस्थाही केली होती. ‘प्रभात’ स्टुडिओला सदिच्छा भेट देणाऱ्या नामवंतांची छायाचित्रं आणि वृत्तान्त या मासिकात छापले जात. परीक्षांमध्ये मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘प्रभात’पटांच्या प्रीमियरच्या खेळांचे पास पाठवले जात होते. याबाबतीतही ‘प्रभात’ काळाच्या पुढे होती. त्यांच्या चित्रपटांच्या गुणवत्तेबरोबरच या जनसंपर्काचाही त्यांना लोकमान्यता मिळवण्यासाठी उत्तम उपयोग झाला.

१९३४ ते १९४४ हा ‘प्रभात’चा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशावर कब्जा असलेल्या हिंदी चित्रपटांशी टक्कर देत या संस्थेनं मोठा प्रभाव निर्माण केला. ‘न्यू थिएटर्स’ हा दर्जा, गुणवत्ता आणि लोकप्रियता याबाबतीत तिचा एकमेव तुल्यबळ प्रतिस्पर्धी होता. त्याकाळी दोन प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांचा जनमनावर पगडा असणं ही विलक्षणच गोष्ट होती. तरीही ‘न्यू थिएटर्स’पेक्षा ‘प्रभात’चं यश थोडं मोठं होतं. ‘न्यू थिएटर्स’प्रमाणे ‘प्रभात’ सतत हिंदी चित्रपट काढत नव्हती. ‘शेजारी’, ‘कुंकू’, ‘माणूस’ वगैरे मोजक्याच चित्रपटांच्या तिनं हिंदी आवृत्त्या काढल्या आणि तरीही ती ‘न्यू थिएटर्स’च्या नेहमीच बरोबरीची राहिली होती.

एक प्रादेशिक चित्रपट असं घवघवीत यश मिळवू शकला याचं श्रेय त्याच्या निर्विवाद गुणवत्तेला आहे, तसंच चित्रपटनिर्मितीप्रती समर्पित असणाऱ्या ‘प्रभात’च्या संस्थापकांनाही आहे. चित्रपटाचं कसलंही प्रशिक्षण नाही, चित्रपटनिर्मितीचा वारसा नाही, अनुभव नाही, सक्षम कौटुंबिक स्थितीचा आधार नाही, अशी एकूण प्रतिकूलता असूनही चित्रपटाबद्दलच्या प्रेमापायी ‘वेडात दौडले वीर चार’ अशी ‘प्रभात’ची स्थिती होती. आज १५ हजार रुपये म्हणजे अगदी मामुली रक्कम वाटते, पण तिशीच्या दशकात तेवढय़ा भांडवलावर शांताराम- दामले- फत्तेलाल- धायबर यांनी कोल्हापुरात ‘प्रभात’ सुरू केली (१९२९). तीनच वर्षांत त्यांना पुण्याला स्थलांतर करावं लागलं. पण या जिद्दी माणसांनी तिथे स्वत:चा स्टुडिओ उभारला. अकरा एकरांवर उभा राहिलेला तो स्टुडिओ त्या काळात आशियातला सर्वात मोठा स्टुडिओ होता. चांगले चित्रपट काढण्यासाठी स्वत:चा स्टुडिओ हवा आणि तो अद्ययावत हवा, याबद्दल सगळेच ‘प्रभात’कार जागरूक होते. नवनव्या विषयांबरोबर चित्रपटात आधुनिक तंत्र वापरायला हवं, अद्ययावत यंत्रसामग्री हवी याची त्यांना जाण होती. अर्थातच त्या काळात आजच्याएवढी प्रगत सामग्री नव्हती. चित्रीकरण चालू असतानाच संवादांचं आणि गाण्यांचं ध्वनिमुद्रण करावं लागत होतं. तेवढेसे शक्तिमान कॅमेरे उपलब्ध नव्हते. पण आजही ‘प्रभात’चे चित्रपट पाहताना त्यांचं स्पष्ट छायाचित्रण आणि निर्दोष ध्वनिमुद्रण याचं कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही. यंत्रं हाताळणारी माणसं आपल्या कामात तरबेज आणि कलेशी निष्ठावान असतील तरच ही किमया घडते.

तिकीट खिडकीवरचा गल्ला आणि त्याची जाहिरात करणं हे तेव्हा यशाचं लक्षण नव्हतं. त्या काळात ‘प्रभात’नं कलात्मक आणि व्यावसायिक यशही मिळवलं. आपलं नाव सार्थ करत ‘प्रभात’ ही मराठी चित्रपटसृष्टीची पहाट ठरली. परंतु सगळ्या चांगल्या गोष्टींना असतो तसा तिलाही शेवट होता. ‘प्रभात’चे सर्वेसर्वा म्हणावे असे व्ही. शांताराम तिचा निरोप घेऊन गेले, तेव्हा ‘शेजारी’तल्या धरणाला पडला तसा तडा तिला गेला. प्रगतीचा वेग मंदावला. आणि हा तडा रुंद होत जाऊन अखेर १९५३ साल उजाडताना उष:काल होता होता काळरात्र झाली आणि ‘प्रभात’ पडद्याआड गेली. मात्र, आख्यायिका बनून ती रसिकांच्या स्मरणात राहिली. ‘प्रभात’वर लिहिली गेली तेवढी पुस्तकं दुसऱ्या कोणत्याही संस्थेबद्दल लिहिली गेली नसतील. जिचं नाव तिच्या परिसराला दिलं गेलं, अशी ‘प्रभात’ ही पहिली आणि बहुधा एकमेव चित्रसंस्था असेल. (निदान महाराष्ट्रात तरी!)

‘प्रभात’काळ संपला तरी ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’च्या रूपानं तिचं कार्य, तिची परंपरा चालू राहिली, हा मोठाच दिलासा आहे. देशात आणखी बऱ्याच बडय़ा चित्रसंस्था होत्या, मोठे स्टुडिओ होते, पण त्यांच्या संस्थापकांनंतर हाताच्या बोटांवर मोजावे इतकेच शिल्लक राहिले. फारच थोडय़ा संस्थांमध्ये चित्रपटनिर्मिती सुरू राहिली. ‘प्रभात’ स्टुडिओच्या प्रयाणावर शिक्कामोर्तब होऊन तो सरकारच्या ताब्यात गेला तेव्हा एका जाहीर कार्यक्रमात शांतारामबापू उद्वेगानं म्हणाले होते,‘‘प्रभात’च्या जागी एखादी तेलाची गिरणी किंवा कारखाना सुरू झाला असता तरी चाललं असतं!’

या उद्गारातून कोणताही विपरीत अर्थ काढण्याचा हेतू नाही. जिच्या आवारात पडलेला कागदाचा कपटासुद्धा शांतारामबापू स्वत: उचलत होते, ती वास्तू तिच्या या संस्थापकाकरिता वास्तू नव्हतीच; ती त्यांची जीवनाची भागीदार होती. कदाचित म्हणूनच त्यापोटी ‘तुम्हारा चाहनेवाला खुदा की दुनिया में मेरे सिवा भी कोई और हो खुदा न करे’ अशी पराकोटीची भावना त्यांच्या मनात असेल. पण ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’नं आजवर केलेलं काम पाहता त्यांच्या मनाला शांती मिळाली असेल असं वाटतं. असो.

आजही ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’चा उल्लेख ‘प्रभात स्टुडिओ’ करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’ची धुरा वाहणाऱ्यांना अजून केवढं काम करायचं आहे याची कल्पना यावरून येईलच.