News Flash

वेध.. वर्तमान अर्थ-घडामोडींचा!

मुख्य प्रवाहातील वर्गीकरणानुसार प्रस्तुत ग्रंथातील अर्थशास्त्र हे सार्वजनिक अर्थशास्त्र आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. मुकुंद महाजन

मानवी समाज एकत्र वस्ती करून राहिल्यापासून मानवाचे उत्पादन, वितरण, विनिमय, किंमत निश्चयन इ. व्यवहार विकसित झाले आणि व्यापक होत गेले. एकाच वेळी अब्जावधी व्यवहार आपोआप कसे चालतात, या लोकांना चकीत करणाऱ्या प्रश्नाला अ‍ॅडम स्मिथ यांनी- ‘एक अदृश्य हात हे सर्व करतो,’ असे रुपकात्मक उत्तर दिले. अ‍ॅडम स्मिथ यांचे चरित्रकार निकोलस फिलिप्सन म्हणतात, ‘एक विनम्र सज्जन एका साध्या मानवी स्वभाववैशिष्टय़ाचा विचार करायला लागतो, तेव्हा त्याचे निरीक्षण मांडतो. आपला, आपल्या कुटुंबाचा आणि आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचा जीवनस्तर सुधारण्याची आपली नैसर्गिक इच्छा असते.’ ही सहजप्रवृत्ती म्हणजे स्वार्थ-प्रेरणा आहे आणि ज्याच्या मुळाशी ही प्रेरणा आहे ते शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र! अ‍ॅडम स्मिथ यांनी केलेले मूलगामी विवेचन (उदा. श्रमविभागणी, मुक्त व्यापार आणि अदृश्य हात इ.) हे त्यांच्या अर्थशास्त्राच्या आद्य ग्रंथात ‘वेल्थ ऑफ नेशन्स’मध्ये आहे. अब्जावधी लहानमोठय़ा आर्थिक व्यवहारांचे धक्के पचवून पुन्हा आपोआप समतोलावस्थेत येणाऱ्या बाजारयंत्रणेला सावरण्यासाठी लागणारी शक्ती म्हणजे अदृश्य हाताच्या रुपकातून व्यक्त होणारी स्वार्थ प्रेरणा होय.

दुसऱ्या बाजूला, त्या काळात व्यापारवादी विचारसरणीने युरोपचे व्यवसायविश्व भारलेले होते. औद्योगिक क्रांतीच्या झपाटय़ाने जगाचा चेहरामोहरा बदलत चालला होता. शोषक आणि शोषित असे दोन वर्ग निर्माण होऊ घातले होते. ज्या काळात देकार्त, काष्ट, नीत्शे, हॉब्ज, लॉक, पुढे कार्ल मार्क्‍स इ. खंदे सामाजिक तत्त्वचिंतक समाजकालीन परिस्थितीवरील आपली चिंतने जगापुढे मांडत होते, त्या काळात अ‍ॅडम स्मिथ यांचा ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हा ग्रंथ (इ.स.१७७६) प्रकाशित झाला. अर्थशास्त्राची पायाभरणी करणाऱ्या या ग्रंथाचे ‘सायन्स ऑफ वेल्थ’म्हणून काहींनी कौतुक केले. पण मानवतावादी विचारवंतांनी ‘हे तर सायन्स ऑफ इल्थ’ म्हणजे चांगल्याचे नाही, तर वाईटाचे शास्त्र अशी ‘वेल्थ ऑफ नेशनची’ संभावना केली. समता, त्याग, इ. उदात्त मूल्यांचा स्वीकार व प्रसार केला पाहिजे. पशूच्या अवस्थेतून मानवाच्या अवस्थेत स्वत:चे उन्नयन करणे ही माणुसकी आहे. माणसाला पशू बनवणाऱ्या सहज प्रेरणांवर मात करता आली पाहिजे म्हणून. प्रस्तुत अर्थशास्त्राला ‘नग्न अर्थशास्त्र’आणि त्याला इंधन पुरवणारा ‘नग्न स्वार्थ’ या शब्दात स्मिथच्या आर्थिक विचारांची निर्भत्सना होऊ लागली. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या अनेक अंगोपांगाचाही विकास झाला आणि तर्ककठोर चिकित्साही होत राहिली. उण्यापुऱ्या अडीच शतकांची पूर्वपीठिका लाभलेल्या अर्थशास्त्राची आजची अवस्था ध्यानात घेऊनच ‘स्वार्थातून सर्वार्थाकडे’ या ग्रंथाकडे पाहिले पाहिजे.

मुख्य प्रवाहातील वर्गीकरणानुसार प्रस्तुत ग्रंथातील अर्थशास्त्र हे सार्वजनिक अर्थशास्त्र आहे. तसेच ते सकारात्मक म्हणजे ‘जसे आहे तसे’ ऐवजी काय असावे याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

चार्लस व्हीलन यांच्या ‘नेकेड इकॉनॉमिक्स’ या अर्थशास्त्रविषयक ग्रंथाचा डॉ. अजय ब्रह्मनाळकर यांनी ‘स्वार्थातून सर्वार्थाकडे’ या नावाने अनुवाद केला आहे. अर्थशास्त्रासारख्या एरवी नीरस आणि अवघड वाटणाऱ्या विषयासंबंधीचे पुस्तक सुलभतेने अनुवादित करण्याची अनुवादकाची हातोटी वाखाणण्यासारखी आहे.

समाजाच्या आर्थिक जीवनात अनेक टप्प्यांवर आर्थिक विचार आणि आर्थिक विवेक आवश्यक असतो, पण अर्थसाक्षरतेचा अभाव अनेकांच्या निर्णयक्षमतेआड येतो आणि परिणामस्वरुप अनेकदा अविवेकी निर्णय घेतले जातात. हा अनुवादकाचा यातील दावा रास्त आहे. त्यामुळे आर्थिक निरक्षरता दूर करण्यासाठी जे जे उपक्रम हाती घेतले जातील, त्या सर्वाचे स्वागतच केले पाहिजे.

अनुवादकाच्या लेखनशैलीतून त्यांचे भाषिक ज्ञान चतुरस्र असल्याचे जाणवते. मात्र मराठीत रूढ झालेल्या पारिभाषिक शब्दांपेक्षा काही वेगळे प्रतिशब्द वापरल्यामुळे काही वेळा वाचताना अडखळल्यासारखे होते. मात्र पुस्तकाच्या ओघवतेपणात कोठेही बाधा येत नाही.

अर्थशास्त्रासारख्या सुंदर आणि रंजक विषयांबद्दल लोकांमध्ये अप्रीती निर्माण करण्याचे काम- ज्यांच्यावर या शास्त्राबद्दल गोडी निर्माण करण्याची जबाबदारी आहे त्यांनी केले आहे, असे व्हीलन म्हणतात. या संपूर्ण ग्रंथात व्हीलन यांनी प्रत्यक्ष अमलात आणली गेलेली असंख्य उदाहरणे दिली आहेत. ती वाचताना देशोदेशीच्या आर्थिक धोरणांचा आढावा तर कळतोच, पण या घटनांची विसंगतीही रंजक पद्धतीने ध्यानात येते. उदा. २००० साली फ्रेंच सरकारने दोन अंकांपर्यंत पोचलेला बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी कामाचे तास ३९ वरून कमी करून ३५ पर्यंत आणले म्हणजे शिल्लक राहिलेल्या कामासाठी नवीन नोकरभरती करता येईल! प्रत्यक्षात हा तद्दन मूर्खपणा होता! कारण याच काळात (१९८० नंतरच्या काळात) अमेरिकेत करोडो नवे रोजगार निर्माण झाले ते १९८० पूर्वी अस्तित्वातही नव्हते!

धोरणातील विसंगतींची आणखी अनेक उदाहरणे दिलेली आहेत. एक-दोन उदाहरणे पाहू. १९९८ च्या निवडणुकीत प्रचाराचा एक मुद्दा क्लिंटन यांनी लावून धरला होता. आरोग्य विमा कंपन्यांनी बाळंतपणानंतर एक ऐवजी दोन दिवस रुग्णालयात राहण्याचे बिल देण्यास भाग पाडायचे आश्वासन क्लिंटन यांनी दिले होते. मुळात एक दिवस राहू शकणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी. त्यात काही कारणासाठी एक ऐवजी दोन दिवस राहण्याची गरज असणाऱ्यांची संख्या आणखी कमी. पण यासाठी सरसकट दोन दिवसांची सक्ती केली तरच वाढलेल्या खर्चाच्या वसुलीचा बोजा विमा कंपन्या प्रीमियम वाढवून विमा पॉलिसीधारकांकडून वसूल करतील किंवा सरकारकडून सबसिडी घेऊन करदात्यांवरील बोजा वाढविण्यास कारणीभूत ठरतील.

दुसरे सर्वज्ञात उदाहरण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयाचे आहे. दोन्ही प्रश्नांच्या मुळाशी अर्थशास्त्रीय नियम आहे. बौद्धिक अथवा शारीरिक श्रमातून होणाऱ्या उत्पादनांची आयात-निर्यात (कोणत्याही कारणांनी) होऊ शकत नाही, तेव्हा पर्याय म्हणून (श्रम) या उत्पादक घटकाची आयात निर्यात होते. पण अमेरिकेसारख्या जागरूक आणि निरंतर शिकत राहणाऱ्या समाजातही अर्थनिरक्षरतेमुळे विदेशी नागरिकांमुळे अमेरिकेत नागरिकांच्या रोजगार संधी हिरावल्या जातात, या गैरसमजाच्या भांडवलावर ट्रम्प निवडणूक जिंकून व्हाइट हाउसमध्ये जाऊन बसले.

अनिर्बंध स्पर्धेचे गुणदोष उणीपुरी अडीच शतकं जगाने अनुभवले आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेच्या मर्यादाही पाहिल्या आहेत. या सर्वाच्या अनुभवातून एक तथ्य लक्षात आले आहे. अर्थव्यवस्थेची कार्ये योग्यपणे चालू राहण्यासाठी स्वार्थ ही एकच प्रेरणा यशस्वी ठरली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ‘स्वार्थातून सर्वार्थाकडे’ या मंत्राचे पुनरुज्जीवन करण्याची निकड आहे. आजवर बाजारयंत्रणेच्या अनेक मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. तरी अधूनमधून बाजार यंत्रणेचे कौतुक डोके वर काढतेच काढते. तेव्हा याबाबत मूलभूत काही समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरतं.

आर्थिक विषमता जितकी जास्त, तितकी बचत आणि गुंतवणूक जास्त होऊन आर्थिक वृद्धीला गती मिळते म्हणून आर्थिक विषमतेला उत्तेजन द्यावे असे नाही. तसेच मुक्त व्यापार असला आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिगत स्वार्थाचे महत्तमीकरण करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य दिले की समाजाचे कल्याण आपोआप वाढते म्हणून हे धोरण जनहितासाठी आदर्श होय असेही नव्हे, कारण त्यातही अंर्तविरोध आहेतच.

या ग्रंथाचा प्रमुख हेतू आर्थिक साक्षरता वाढविणे हा आहे. त्यासाठी रंजक पद्धतीने आर्थिक सिद्धांत समजावून सांगितले पाहिजेत. पण सुलभतेसाठी तार्किकतेचा बळी जाणार नाही हेही पाहिले पाहिजे. या पुस्तकाची भाषा आणि विवेचनशैली दोन्ही अकृत्रिम, गप्पांच्या स्वरूपाच्या आहेत.

हे पुस्तक म्हणजे अर्थशास्त्र सरळ, सोपे करून कसे सांगता येईल याचा वस्तुपाठ आहे. याचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे प्रत्यक्षात घडलेल्या घटना आणि जगभरच्या शासनकर्त्यांनी घेतलेले निर्णय यांची भरपूर उदाहरणे तपशिलाने दिली आहेत. त्या निर्णयांना कोणते पर्याय उपलब्ध होते – (पर्याय शोधून निवडणे हे अर्थशास्त्राचे कामच आहे) हे तपशीलवार आणि मनोरंजक पद्धतीने सांगितले आहे. यामुळे रंजकतेने आर्थिक समस्या कळतातच शिवाय चालू घडामोडींची ऐतिहासिक पृष्ठभूमीही समजते, हा एक आनुषंगिक लाभ!

‘स्वार्थातून सर्वार्थाकडे’- चार्लस व्हीलन,

अनुवाद- डॉ. अजय ब्रह्मनाळकर,

राजहंस प्रकाशन, पृष्ठे- ४९०, मूल्य- ४५० रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 4:16 am

Web Title: article on swarthatun sarwarthakade charles wheelan book review abn 97
Next Stories
1 ‘मौज’ला आकार देणारे संपादक
2 तत्त्वनिष्ठ जीवनाचा कलात्मक आविष्कार
3 सांगतो ऐका : सत्यजित रे : एक दुर्मीळ संयोग
Just Now!
X